रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

आमचा विनूकाका



गिरीशने आज सकाळी फोनवर विनायक काकाच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली.गेला महिनाभर विनूकाका खूपच आजारी होता, मृत्यूशी झुंजच देत होता म्हणा ना. नानावटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागांत तो बेशुद्धावस्थेत होता. म्हणजे तसा आपल्यांत नव्हताच म्हणायचे. पण जोपर्यंत डॉक्टर एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करीत नाहीत तोवर ती व्यक्ती अजून आपल्यांत आहे, असेच आपण समजत असतो, नाही का?

गेल्या महिन्यात १३ जुलैला,  असिलताच्या लग्नानिमित्त योजलेल्या स्वागत समारंभाला विनूकाका आवर्जून आला होता. तीच त्याची आणि माझी शेवटची भेट. नेहमीसारखाच प्रसन्न, उत्साही आणि आनंदी दिसत होता. साधेच पण टापटिपीचे राहणीमान, तेल लावून बसवलेले केस आणि किंचितसे हसत बोलणे. त्याचे बोलणे आणि वागणे अगदी प्रेमळ आणि सच्चे असायचे. त्या कार्यक्रमाच्या दिवशी अगदी सकाळी लवकर आला होता. सगळ्यांशी मनमोकळेपणाने आणि हास्यविनोद करत बोलत होता. कार्यक्रमांत बरेच नातेवाईक भेटल्यामुळे त्याला मनापासून आनंद झाला होता. "स्वाती मी तुमच्याबरोबर जेवायला थांबलो नाही तर चालेल का? मला डायबेटीस आहे, मी जरा लवकर, माझ्या ठराविक वेळेवर जेऊन घेऊ का?" त्याने हे मला विचारायची खरंतर काय गरज होती? पण तसाच होता तो. आपल्या वागण्या बोलण्याने कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घेणारा!

विनूकाका कितीदातरी आम्हा दोघांना आवर्जून फोन करायचा. आम्हालाच फोन करायला जमायचे नाही याची लाज वाटायची. पण आमच्याकडून उलटा फोन करायचा राहून गेला तरी कधीही रागवायचा नाही. कुणाच्याही यशाचे मनापासून आणि भरभरून  कौतुक करायचा. सर्व नातेवाईकांच्या सुख-दु:खांत अगदी निरपेक्षपणे सहभागी व्हायची त्याची वृत्ती. पण स्वत:ची दु;खे कधीही कोणाला सांगत बसायचा नाही की त्यावर रडत-कुढत बसायचा नाही. कित्येक वेळा त्याच्याकडूनच इतर सर्व आप्तांची खबरबात आम्हाला कळायची.

विनूकाकाचे वाचन अफाट होते. रोजची वर्तमानपत्रे अगदी बारकाईने वाचण्याचा त्याला छंद होता. पण बँकिंग , अर्थशास्त्र आणि राजकारण हे त्याचे विशेष आवडीचे विषय होते. शेयर बाजारातले चढ उतार, अर्थसंकल्प किंवा नवीन आर्थिक घडामोडी अशा विषयांवर तो कितीही काळ बोलू शकत असे. या विषयांवर तो बोलायला लागला की जणू तो मला त्या विषयांचा चालता-बोलता Encyclopedia वाटायचा .

विनूकाकाचे शेवटचे दर्शन घ्यायला तातडीने मुंबईला जावे असे एकदा मनांत आलेही होते. पण महिनाभर शरीराचे हाल झाल्यानंतरचे त्याचे रूप पहायला मन धजावेना. असिलताच्या कार्यक्रमाच्या वेळचे, त्याचे हसरे रूप आणि त्याचा तो हसरा आवाज माझ्या मनात जपून ठेवायला मला जास्त बरे वाटते आहे. मी ते रूप आणि तो आवाज आयुष्यभर साठवून आणि आठवून विनूकाका अजूनही आपल्यात आहे असेच समजत राहीन. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा