बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

अपघात, एक नव्हे दोन

मागच्या बुधवारची गोष्ट.  घरातून बाहेर पडून माझ्या क्लिनिककडे  चालत निघाले होते. नेहरू मेमोरियल हॉलच्या चौकात, सुप्रिया हॉटेल समोर, एक तरुणी अचानक  दुचाकी वाहनाचा जोराचा धक्का लागून रस्त्यावर पडताना दिसली. मी धावत तिला उचलायला गेले. आसपास बरीच गर्दीही जमली. आम्ही तिला उचलून समोरच्या दुकानात बसवले व पाणी दिले. मी डॉक्टर आहे, हे सांगून सूत्रे हातात घेतली व तिची तपासणी केली. मुलीच्या कंबरेला थोडा मुका मार लागला होता, पण तिच्या जिवाला काही धोका नव्हता.

वरकरणी जरी काळजी करण्यासारखे काहीच नसले, तरी  तिच्या घरच्या कोणाला तरी बोलावून त्यांच्याकडे तिला सुपूर्द करावी अथवा पोलिसांनीच तिला तिच्या घरी पोहोचवावे, असा सल्ला मी वाहतूक पोलिसांना दिला. गंमत म्हणजे ती तरुणी त्या गोष्टीला काही केल्या  तयार होईना. 'माझ्या आई-वडिलांना अपघाताबद्दल काहीही सांगू नका', अशा हात जोडून विनवण्या करू लागली. 'मला फारसे काहीही झालेले नाही व माझी मी घरी जाईन' असा आग्रह तिने धरला. तिच्या अशा भूमिकेमुळे गर्दीतल्या सर्वांच्याच मनात डोकावलेल्या वेगवेगळ्या शंका त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या.

मी तिला विचारले, "आई वडिलांना कळवायला का नको म्हणते आहेस तू ?"
"माझ्या बाबांना न सांगता माझ्या आईने माझ्यासाठी स्पोकन इंग्रजीचा क्लास लावला आहे. पूर्ण फीदेखील भरली आहे. आज क्लासचा पहिलाच दिवस होता. आता हे अपघाताचे कळले, तर बाबांना माझ्या क्लासचेही कळणार. मग माझे बाबा आईला रागावतील आणि माझा क्लास बंद पाडतील. म्हणून म्हणते, मला जाऊ द्या. माझ्या घरच्यांना कृपा  करून कळू देऊ नका. " ती तरुणी पुन्हा गयावया करू लागली.

तशा परिस्थितीत तिला एकटीलाच घरी जाऊ देणे मला योग्य वाटत नव्हते. मुका मार असला तरी आतल्या आत रक्तस्त्राव होऊ शकतो याची कल्पना मी पोलिसांना दिली. तिला एकटीला घरी पाठवले आणि नंतर नेमके तसे काही झालेच तर तिच्या जिवाला धोका आहे व तुमच्यावर बेजबाबदारपणाचा ठपकाही येऊ शकतो, असे पोलिसांना सांगून मी माझ्या क्लिनिकला निघून गेले .

स्वत:च्या हिमतीवर, अगदी नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध मुलीला इंग्रजी शिकवून पुढे आणण्याच्या एका आईच्या जिद्दीचे मला कौतुक वाटले . पण त्या मुलीला एकटीला घरी न सोडण्याचा माझा सल्ला, तिच्या आईच्या जिद्दीच्या आणि  त्या मुलीच्या प्रगतीच्या आड, येणार की काय, ही बोच मनाला लागून राहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा