बुधवार, १ जुलै, २०२६
चुके काळजाचा ठोका!
शुक्रवार, २६ जून, २०२६
केदारनाथ-भाग-१७
आम्ही हेलिकॉप्टरमधे बसल्यावर आम्हाला थंडी वाजेनाशी झाली. सुमारे ११७०० फुटांवरून काही मिनिटांतच बरेच खाली उतरल्यावर आनंदला बरे वाटेल, या कल्पनेने मी जरा सुखावले. तरीही, त्याच्या आजाराचे अजून नेमके निदान न झाल्यामुळे एक डॉक्टर या नात्याने मी मनातून अस्वस्थ होते. मी त्याला रोजच तपासत होते. त्याला Viral infection झाले आहे असेच मला त्या तपासणीमधून वाटत होते. तरीही सहा-सात दिवस त्याला चढ-उतार ताप होता. आम्ही केदारनाथला असताना त्याच्या सर्व रक्ततपासण्या होऊ शकल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत, त्याला टायफॉईड, मलेरिया किंवा अजूनच काहीतरी गंभीर आजार नाहीये ना? अशी चिंता माझ्या मनाला भेडसावत होती.
आमच्याबरोबर हेलिकॉप्टरमधे बसलेले तिघेजण मराठी भाषिकच निघाले. त्यातले एक जोडपे आणि आम्ही तिघे मागे बसलेलो होतो. ते जोडपे माझ्या आणि आनंदच्या समोर बसले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच, डॉ. सुभाषिनीने तिच्या फोनवर बाहेरच्या विहंगम दृश्याचे चलत-चित्र रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आमच्या समोर बसलेल्या नवरा-बायकोना, हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतानाचा त्यांचा फोटो आणि व्हिडीओ काढून हवा होता, असे मला वाटले. त्यामुळे मी हात पुढे करून, "मी तुमचे फोटो आणि व्हिडीओ काढते," असे सुचवले. त्यांनीही तत्परतेने मला त्यांचा फोन दिला. मी त्यांचे फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ काढून दिला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने, लगेच माझा फोन मागून घेतला आणि माझा व आनंदचा एक फोटो आणि छोटासा व्हिडीओ काढला.
आम्ही सकाळी दहाच्या सुमारास सेरसीला पोहोचलो. खाली उतरल्यावर आमच्या अंगावरचे गरम कपडे काढून आम्ही आपापल्या बॅकपॅक्समध्ये ठेवले. आता आनंदला ताप नसल्याने तो जरा बरा दिसत होता. केदारनाथहून सुखरूप खाली उतरल्यामुळे आमच्या मनावरचा ताण आता बराचसा कमी झाला होता. सकाळपासून आम्ही तिघांनी काहीही खाल्लेले नव्हते. त्यामुळे आम्हा तिघांनाही आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. आधी नाश्ता करावा आणि मग एखादी टॅक्सी पकडून सोनप्रयागला आमच्यासाठी आलेल्या गाडीपर्यंत पोहोचावे, असे आम्ही ठरवले. जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमधे थांबून आम्ही पनीर पराठे खाल्ले आणि चहा घेतला. त्यानंतर टॅक्सीचा शोध चालू केला. सेरसी ते सोनप्रयाग हे अंतर जेमतेम पाच-सहा किलोमीटर आहे. हेलिपॅडच्या बाहेर अनेक टॅक्सीझ् उभ्या होत्या, पण बऱ्याचश्या टॅक्सीझमधे चालक बसलेले नव्हते. काही टॅक्सीझमधे चालक होते, पण आम्ही कितीही पैसे द्यायची तयारी दाखवली तरीही सोनप्रयागपर्यंत यायला कोणीही तयार होईना. शेवटी, थोडे चालत पुढे जावे, तिथे एखादी टॅक्सी मिळेल, अशा आशेने आम्ही शंभरएक मीटर चालत पुढे गेलो. पण एकही टॅक्सीवाला आम्हाला न्यायला तयार झाला नाही. शेवटी कसेबसे एका टॅक्सीवाल्याला अक्षरशः हात जोडून विंनती करून आम्ही तयार केले. तो म्हणाला, "मी तुम्हाला इथून फार तर तीन किलोमीटरवर सोडेन. पुढे तुमचे तुम्ही जा. तुम्हाला तिथपर्यंत सोडण्याचे मी १२०० रुपये घेईन." आमचा नाईलाज झाला. तीन किलोमीटर तर तीन किलोमीटर, असे म्हणून आम्ही त्याच्या टॅक्सीमध्ये बसलो. काही वेळातच एका ठिकाणी रस्त्यावर आम्हाला उतरायला सांगून तो निघून गेला.
आम्हाला पुढचे अडीच-तीन किलोमीटर चालत जायचे होते. मनावरचा ताण आणि जागरण यामुळे आम्ही दमलेले होतो. आनंदला त्या सकाळी ताप नसला तरीही त्याला बराच अशक्तपणा जाणवत होता. आम्ही तिघेही तसेच पाय ओढत चालत निघालो. तेवढ्यात आम्हाला सोनप्रयागकडे जाणारा एक मोटारसायकलवाला दिसला. आम्ही त्याला थांबवून आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडण्याची विंनती केली. आमच्या नशिबाने त्याने ती विनंती मानली. आम्ही दोघींनी त्याच्या पाठीमागे बसून जावे, असे आनंदचे मत होते. त्याचे ते मत आम्ही दोघींनी पूर्णपणे खोडून काढले. आम्ही आनंदजवळ आमच्याकडच्या दोन बॅकपॅक्स दिल्या आणि त्याला त्या मोटारसायकलवाल्याच्या पाठीमागे बसून जायला लावले. आता आम्हा दोघींमधे मिळून वजनाने हलका असा एकच बॅकपॅक होता. त्यातून उताराचा रस्ता असल्याने आम्ही दोघी सहजी चालत वीसएक मिनिटातच सोनप्रयागपर्यंत पोहोचलो. आनंद आमच्या आधीच पोहोचलेला होता. त्याने आमच्यासाठी पाण्याच्या बाटल्याही विकत घेऊन ठेवलेल्या होत्या.
सोनप्रयाग ते नारायणकोटीच्या प्रवासात वाहतूक कोंडीमुळे, वरचेवर अनेक ठिकाणी थांबत-थांबत मार्गक्रमण करावे लागले. शेवटी दुपारी एक वाजायच्या सुमारास आम्ही नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे पोहोचलो. तिथे जेवायला वगैरे न थांबता लवकरात लवकर, पुढे हरिद्वारला निघून जाण्याची आमची इच्छा होती. पण नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे त्या दिवशी प्रथमच नवीन सोनोग्राफी मशीन आलेले होते. त्या मशीनच्या उदघाटनाचा कार्यक्रम आणि पूजा पार पडलेली होती. त्या पूजेचा प्रसाद खाऊनच आम्ही हरिद्वारला जायला निघावे, असा प्रेमळ आग्रह आम्हाला मोडता आला नाही. छोले, मसालापुरी, रायता, डाळ-भात आणि प्रसादाचा शिरा असे मस्त जेवण मी आणि सुभाषिनीने हॉस्पिटलमध्ये जाऊन केले. आनंद खालच्या मजल्यावरच्या खोलीत झोपून होता. त्याने फक्त प्रसादाचा शिरा खाल्ला आणि दूध प्यायले. दुपारी दीड-दोनच्या सुमारास, आम्ही अजून नारायणकोटीला असतानाच आनंदला पुन्हा १०१ च्या वर ताप चढायला लागला होता. त्याला त्याची अँटिबायोटिकची आणि क्रोसिनची गोळी देऊन आम्ही हरिद्वारला निघालो. केदारनाथहून खेचरावरून पाठवलेले आमचे सामान आमच्या आधीच नारायणकोटीला पोहोचलेले होते. हरिद्वारकडे टॅक्सीने निघण्याआधी आमचे सामान तपासून ते टॅक्सीमधे ठेवले. नारायणकोटी ते हरिद्वार या प्रवासातही आनंदला ताप होताच. त्यामुळे हरिद्वारच्या हॉस्पिटलमधील डॉ. संजय शहा यांच्याशी मी संपर्क साधला व त्यांना कल्पना देऊन ठेवली. रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमुळे आम्ही रात्री बाराच्या सुमारास हरिद्वारला पोहोचलो. आम्ही पोहोचल्यावर लगेच आनंदच्या सर्व तपासण्या होतील, अशी सोय डॉ. संजय शहा यांनी केलेली होती. सुदैवाने हरिद्वारला पोहोचेपर्यंत आनंदचा ताप उतरला होता. त्याच्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट्स एका तासाभरात मिळाले. ते रिपोर्टही नॉर्मल आले.
आम्ही ३० मे रोजी रात्री उशिरा हरिद्वारला पोहोचलो होतो. आमची परतीची फ्लाईट एक जूनला दुपारी होती. त्यामुळे आमच्याकडे दीड दिवस होता. त्या दीड दिवसांमधे या संस्थेचे, धर्मावाला येथील मुख्यालय आणि तिथले हॉस्पिटल बघून यावे, असे आम्ही आधी मनोमन योजले होते. पण आता ते शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही दोघांनीही खोलीतच आराम केला. डॉ. संजय शहा रोज दोनवेळा आमच्या खोलीमधे येऊन आनंदला तपासत होते. त्यांनी त्याला औषधे तर दिलीच पण त्याला धीरही दिला. हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे बालरोगतज्ज्ञ कार्यरत नसल्यामुळे, तिथे आलेल्या एक-दोन बालरुग्णांना मी तपासावे अशी विनंती डॉ. संजय शहांनी मला केली. त्यानुसार मी बालरुग्ण तपासले. मी एका मुलाला तपासत असताना, डॉ. शहांच्या सांगण्यानुसार हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याने माझा फोटो काढला. आम्ही एक जूनला विमानतळावर जायला निघण्यापूर्वी डॉ. संजय शहा यांनी मला स्वामी विवेकानंद धर्मार्थ हॉस्पिटलचे अहवाल भेट दिले. त्यांचा, आनंदचा आणि माझा एक फोटोही काढला गेला.
केदारनाथाचे मंदिर पाहताना माझे मन सहजच ४५ वर्षांपूर्वी मी केलेल्या यात्रेची उजळणी करून आले. 'स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन सोसायटी' च्या कर्मचाऱ्यांची निःस्वार्थ सेवा पाहून आणि केदारनाथाच्या सुंदर व विशाल मंदिरातील शिळारुपी पिंडीचे स्पर्शदर्शन करून आल्यानंतर माझ्या मनात एक विचार अगदी सहजपणे उमटला,
"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती"
[लेखमाला समाप्त]
डॉ. स्वाती बापट.
बुधवार, २४ जून, २०२६
केदारनाथ- भाग- १६
काल रात्री मी उशिरा झोपले होते आणि झोपेतसुद्धा जरा अस्वस्थच होते. पहाटे चार वाजताचा गजर लावलेला होता. गजर वाजायच्या आधीच पाचएक मिनिटे सुभाषिनी आमच्या खोलीच्या दारावर टकटक करून आम्हाला जागे करून गेली. आम्ही उठून तयारीला लागलो. सुभाषिनीने दिलेली मिल्क पावडर गरम पाण्यामधे घालून, मी दूध तयार केले आणि आम्ही दोघांनीही प्यायले. आम्ही तयार व्हायच्या आधीच सुभाषिनी तयार झाली होती. ती खाली उतरून एखादा पिठठूवाला ठरवून ठेवणार होती. आम्हा तिघांचे सामान हेलिपॅडपर्यंत वाहून नेण्यासाठी पिठठूवाल्याची गरज लागणार होती. आनंदला मी आधी खाली हॉस्पिटलमधे जाऊन त्याच्या इंजेक्शनचा डोस घ्यायला सांगितले. त्यानंतर त्याच्या हाताच्या शिरेमधली intracath सुईदेखील काढून घेणे आवश्यक होते.
आमच्या सुदैवाने पहाटे पाऊस किंवा बर्फ पडत नव्हते. तसा माझ्याकडे नर्स कृष्णाचा रेनकोट अजूनही होता. मी तो रेनकोट माझ्याकडेच ठेवून घ्यावा, म्हणजे पहाटे पाऊस असेल तर उपयोगी पडेल, असे त्याने मला आवर्जून सांगितले होते. इतक्या थोड्या दिवसांचा सहवास असूनही सहकाऱ्यांकडून इतके प्रेम आम्हाला मिळत होते, हे बघून आम्हा दोघांनाही खूप बरे वाटत होते. पण पाऊस किंवा बर्फ पडत नसल्याचे पाहून मी नर्स कृष्णाचा रेनकोट रात्रपाळीच्या परवेझ नर्सकडे दिला आणि तो आठवणीने कृष्णाला द्यायला सांगितले. आमच्या खोलीची किल्ली मी फार्मसिस्टकडे सुपूर्द केली. भल्या पहाटे आम्हाला इलेक्ट्रिकची गाडी मिळणे शक्य नसल्याने, मी आणि आनंद हेलिपॅडकडे चालत जायला निघालो. आम्हाला निरोप द्यायला हॉस्पिटलमधील रात्रपाळीचा सगळा स्टाफ बाहेर व्हरांड्यात आला होता. मोठ्या जड मनाने आणि साश्रुनयनांनी आम्ही सर्वांचा निरोप घेतला.
आमचे सामान वाहून नेणाऱ्या पिठठूवाल्याच्या बरोबरच आम्ही चालावे आणि त्याला नजरेच्या टप्प्यातून दूर होऊ देऊ नये, असा मोलाचा सल्ला मला हॉस्पिटलमधील नर्सेसनी दिलेला होता. पिठठूवाला जरा वयस्कर असल्याने तो हळूहळूच चालत होता. तरीही त्याच्याबरोबर चालणे मला जरा अवघड जात होते. आनंद तर माझ्यापेक्षाही हळू चालत होता. त्यामुळे त्याला मागे सोडून पुढे जायलाही नको वाटत होते. पण आनंदने मला सांगितले, "तू त्याच्याबरोबर पुढे हो, मी हळूहळू मागून येतो आणि हेलिपॅडपर्यंत पोहोचतो".
मी आणि पिठठूवाला हेलिपॅडपर्यंत पोहोचलो तर तिथे सुभाषिनी अतिशय हवालदिल अवस्थेत उभी होती. हेलिपॅडवर चार वेगवेळ्या तंबूंमधे चार हेलिकॉप्टर कंपन्यांची तात्पुरती ऑफिसेस होती. आम्ही ज्या 'एरो एव्हिएशन' कंपनीच्या हेलिकॉप्टरने जाणार होतो, त्या कंपनीच्या माणसाने सुभाषिनीला निक्षून सांगितले होते, "आज आम्ही फक्त काल जाऊ न शकलेल्या यात्रेकरूंना नेणार आहोत. त्यामुळे आज तुम्हाला जाता येणारच नाही".
सहा वाजेपर्यंत आनंदही हेलिपॅडपर्यंत पोहोचला. हेलिपॅडसमोर एका शेडखाली काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. कालपासून आपापल्या हेलिकॉप्टरच्या फेरीची वाट बघत असलेल्या अनेक यात्रेकरुंची गर्दी तिथे उसळलेली होती. आनंदला मी सगळी परिस्थिती थोडक्यात सांगितली. कशीबशी एक खुर्ची पकडून त्याला आधी तिथे बसवले आणि आमचे सगळे सामान त्याच्याजवळ ठेवले. मी आणि सुभाषिनी आमच्या हेलिकॉप्टर कंपनीच्या त्या तंबूवजा "ऑफिस" मधे ठिय्याच देऊन बसलो.
ऑफिसमधला तो मनुष्य दर १५-२० मिनिटांनी हेलिपॅडवर जाऊन प्रवाश्यांना "चेक-इन" करून येत होता. त्याच्याकडे असलेल्या एका वहीमधे लिहिलेल्या नावांपैकी पुढची चार-सहा नावे तो पुकारत होता आणि त्या लोकांना हेलिपॅडकडे पाठवत होता. प्रत्येकवेळी तो आला की आम्ही त्याला आमच्या तिकिटाबद्दल विचारत होतो. त्यावर तो अतिशय तुच्छतेने आम्हाला उडवून लावत होता, "माताजी आप यहाँ आजके दिन रुकनेका इंतजाम करो. आज तो आप पक्का नहीं जा सकते."
सकाळचे साडेआठ वाजेपर्यंत आमच्या जाण्याबाबत काहीही होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. संदीपजी, धनवीरजी आणि रोहनजी यांना फोन आणि मेसेजेस करून-करून सुभाषिनी थकली होती. पण त्यांच्यापैकी कोणीच उत्तरे देत नव्हते. शेवटी पावणेनऊ वाजायच्या सुमारास संदीपजींनी सुभाषिनीच्या फोनवर मेसेज पाठवला की, कोणी कुलदीप नामक मनुष्य येईल आणि आम्हाला जाण्यासाठी मदत करेल. आमच्या हेलिकॉप्टर कंपनीच्या माणसाला आम्ही विचारले, "भैय्या, कुलदीप कौन है? वो कहां मिलेंगे?" त्यावर त्याने "मैं किसी कुलदीप को जानता नही हूं. आप कृपा करके यहांसे जाईये और मुझे तंग मत करिये." असे निर्वाणीच्या सुरात सांगितले.
नऊ वाजत आले तरी त्या कोणा कुलदीपचा पत्ताच नव्हता. हळूहळू तिथले हवामानही बदलायला लागले होते. गार वारे सुटले होते आणि थोड्याच वेळात पाऊस सुरु होईल असे वाटायला लागले होते. आनंदला खूप थंडी वाजत होती. जवळ कुठेही चहापाण्याची सोय नव्हती. स्वच्छतागृह कुठेतरी खूप लांब आणि कमालीचे अस्वच्छ होते. आमच्या जाण्याबाबत तर काहीच खबर मिळत नव्हती. अशा अवस्थेत आम्ही हताश होऊन बसून होतो.
नऊ वाजता काय जादू घडली कळले नाही. अचानक ऑफिसमधील त्या माणसाने येऊन आम्हा तिघांना सांगितले, "हेलिपॅडवर असलेल्या त्या लोखंडी बाकड्यावर जाऊन बसा." आम्ही जवळजवळ धावतच पुढे जाऊन बसलो. एका माणसाने येऊन आमचे प्रत्येकाचे वजन विचारले. ऐंशी किलो वजनापर्यंत एक ठराविक तिकीट, आणि पुढील जास्तीच्या वजनासाठी अधिक दर आकारला जातो, असे सुभाषिनीने आम्हाला सांगितले होते. त्या माणसाने आमच्याकडून तिकिटाचे आणि सामानाचे मिळून १३३२०/- रुपये घेतले पण आमच्या हातात तिकीट वगैरे काहीच दिले नाही. हे पैसे त्याने कुठल्या हिशोबाने घेतले? आम्हाला तिकीट कधी आणि कोण देणार? अशी काही चौकशी किंवा विचार न करता त्याच्याकडे आम्ही तातडीने पैसे देऊन टाकले.
आमच्यासमोर असलेल्या मोठ्या डांबरी मैदानामधे, एकूण चार हेलिपॅडस होती. दर पाच-सात मिनिटाला तिथे एकेका कंपनीचे एकेक हेलिकॉप्टर येऊन उतरत होते. आलेल्या प्रवाशांना उतरवले आणि जाणाऱ्या प्रवाशांना बसवले की ते लगेच पुन्हा उड्डाण करत होते. हेलिकॉप्टर उतरताना आणि परत हवेमध्ये झेप घेताना, हेलिकॉप्टरच्या गरागरा फिरणाऱ्या पंख्यामुळे गार वाऱ्याचा प्रचंड झोत आमच्या अंगावर येत होता. त्यामुळे आनंदला कमालीची हुडहुडी भरत होती. शेवटी मी माझ्याकडे असलेली ओढणी आनंदच्या नाका-तोंडाला घट्ट बांधली, सुभाषिनीने तिचे गरम हातमोजे स्वतःच्या हातातून काढून आनंदला हातावर चढवायला लावले. तेव्हा कुठे त्याला जरा बरे वाटले.
आम्ही तिघे आणि अजून तीन प्रवासी असे सहाजण एका हेलिकॉप्टरने जाणार होतो. हेलिकॉप्टर कंपनीच्या माणसाने आम्हाला, हेलिकॉप्टरमध्ये कोणी कुठे बसायचे, आत शिरताना कसे जायचे व उतरल्यानंतर कसे बाहेर पडायचे याबाबतच्या सूचना दिल्या. आता आम्ही अगदी जीव मुठीत धरून, आम्हाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कधी येते, याची आतुरतेने वाट बघत बसलो होतो. शेवटी, सुमारे अर्ध्या तासानंतर आम्हाला सांगण्यात आले, "आता जे हेलिकॉप्टर उतरेल त्या हेलिकॉप्टरमधून तुम्हाला जायचे आहे."
हेलिकॉप्टर उतरल्या-उतरल्या आम्ही त्याच्या दिशेने अक्षरशः धावत सुटलो. आमचे सामान हेलिकॉप्टर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या हेलिकॉप्टरमधे ठेवले. आम्ही आत बसल्यानंतर काही क्षणातच आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझा आणि आनंदचा हा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास होता. पण तो प्रवास आणि त्या सुंदर प्रदेशाचे उंचीवरून दिसत असलेले विहंगम दृश्य यापैकी कशाचाही आनंद लुटण्याची आमची मनःस्थिती नव्हती. अखेर आपण घरच्या वाटेला लागलो, अशा विचारामुळे काहीसे बरे वाटत होते इतकेच.
हरिद्वारपर्यंत पोहोचेस्तोवर आम्हाला अजून अनेक अडचणींचा सामना करायचा होता, पण त्यावेळी आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती.
त्याबाबत पुढच्या आणि या लेखमालेच्या शेवटच्या भागामध्ये लिहीन.
[क्रमशः]
डॉ. स्वाती बापट.
मंगळवार, २३ जून, २०२६
केदारनाथ - भाग १५
आम्ही केदारनाथाचे दर्शन घेऊन परत येईपर्यंत आनंदच्या दुपारच्या इंजेक्शनच्या डोसची वेळ झाली होती. रवि नर्सने आनंदला तिथेच वॉर्डमधल्या एका पलंगावर झोपायला सांगितले आणि त्याला शिरेवाटे इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. आनंदचे बूट आणि मोजे पावडसात भिजून ओले झालेले होते. त्यामुळे त्याला थंडी वाजत होती. त्याचे बूट-मोजे मी वर नेऊन ठेवले आणि त्याच्यासाठी आमच्या खोलीतून स्लिपर्स घेऊन आले. त्याचे इंजेक्शन घेऊन झाल्यावर तो खोलीत झोपायला गेला. मी मात्र ओपीडीतच थांबून काम करत बसले. कारण नेहमीप्रमाणे तिथे पेशंट्सची भलीमोठी रांग लागलेलीच होती.









