मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

उजळणी "संस्कृतीची"!


आज आषाढी अमावास्या. हा दिवस 'दिवली अमावास्या', 'दिवळी आवस', 'दिव्याची आवस' 'दर्श अमावास्या' किंवा 'गटारी अमावास्या' अशा अनेक नावांनी ओळखला जातॊ. सकाळपासून सोशल मीडियावर दीपोत्सवाची महती आणि माहिती सांगणाऱ्या अनेक पोस्ट्स फिरताहेत, तितक्याच गटारीवर घसरलेल्याही पोस्ट्स आहेत. आज सकाळी-सकाळी 'मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?' अशी एक पोस्ट वाचली. त्या पोस्टचा आशय काहीसा असा होता की या मंगल दिवसाला, "गटारी" म्हणून इतकी कुप्रसिद्धी मिळत आहे, की ज्याची अवघ्या मराठी माणसांना लाज वाटावी, आणि हे योग्य नव्हे. दिव्याची अमावास्या साजरी करण्यामागची शास्त्रीय कारणे देऊन, खरंतर आपण पारंपरिक पद्धतीने आजचा आनंदमय दिवस साजरा करून आपली संस्कृती जपूया, असे छान विचार त्या  पोस्टमध्ये होते. परंतु, ते सगळं वाचून  मी मात्र विचारात पडले की 'आपली संस्कृती' म्हणजे नेमके काय? आणि आपली म्हणजे कोणाची? 

परंपरा जपणाऱ्या, एकत्र कुटुंबात जन्मल्यामुळे, लहानपणी घरात सगळे सण यथासांग साजरे होताना मला पाहायला मिळाले. दिव्याच्या अमावास्येच्या दिवशी मोलकरणी घरातले सगळे पितळी दिवे चिंच लावून घासून ठेवायच्या. आई-काकू गव्हाच्या जाडसर पिठांत तेल आणि गूळ घालून त्याचे दिवे करायच्या. पातेल्यावर चाळणी ठेऊन, त्यावर ते दिवे ठेऊन छान  वाफवायच्या. नंतर ते काढून, त्या दिव्यांमध्ये वातींची जोडी व तूप घालून ते प्रज्ज्वलित करून देवाला नैवेद्य दाखवायच्या. तसंच, त्या दिव्यांनी आम्हा बालगोपालांचे औक्षण झाल्यावरच मग आम्हाला दिवे खायला मिळायचे. घरातल्या मोलकरणीबरोबर तिची एखाद-दोन लहान मुले आलेली असली तर आई-काकू त्यांना पण ओवाळायच्या आणि दिवे खायला द्यायच्या.

दिवे करणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी फारच आनंददायक असायच्या. गुळाने चिकट झालेल्या कणकेत हात घोळवत दिवे करायला मजा यायची. पण आम्ही मुले जरूरीपेक्षा जरा जास्तच कलाकुसर करुन वेगवेगळ्या आकाराचे दिवे करायला लागलो, की मग आई आम्हाला स्वयंपाकघरातून हुसकून लावायची. जेवताना आपण स्वतः केलेला दिवा मिळावा यासाठी धडपड असायची आणि तो विशेष गोड लागायचा हे वेगळं सांगायलाच नकोच  कणकेच्या दिव्यामध्ये, कणीदार साजूक तूप भरून खाण्याची लज्जत काही औरच असायची.

दिव्याच्या अमावास्येची दुसरी आठवण म्हणजे, केवळ त्या दिवशीच वाचली जाणारी, विशिष्ट कहाणी आणि सुरु होणारी जिवतीची पूजा. संपूर्ण श्रावण महिना देवघरात वास्तव्यास असलेला तो जिवतीचा फोटो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. जिवती नेहमीच दागिन्याने मढलेली, मोठ्ठ कुंकू लावलेली, गोल गरगरीत चेहऱ्याची आणि सुदृढ बांध्याची असायची. तिच्या पदराखाली एक आणि अंगा-खांद्यावर कमीतकमी चार-पाच मुले असायची. त्या काळात, "दो या तीन बस" "छोटा परिवार सुखी परिवार", "एक के बाद अभी नही और दो के बाद कभी नहीं", असली नारेबाजी एकीकडे वाचनात यायची आणि ठिकठिकाणी लाल त्रिकोण दिसायचा; तर दुसरीकडे हा फोटो! आमच्या कळत्या वयांत हा विरोधाभास  त्रासदायक वाटल्यामुळे, आम्ही आईला विचारायचो, "एकापाठोपाठची इतकी लहान मुले असलेल्या या जिवतीची पूजा का करायची? त्यावर, "मी सांगते म्हणून करायची", किंवा "आपल्या घरात पूर्वीपासून करतात म्हणून करायची" अशी न पटणारी उत्तरे मिळत असत. क्वचित एखादी चापटही खावी लागायची.   

अशा वातावरणामध्ये वाढत असताना, या अमावास्येला गटारी अमावास्या म्हणतात याचा मला गंधही नव्हता. मात्र, आमच्या घराच्या मागे एक देशी दारूचा गुत्ता होता. संध्याकाळी आजीच्या देखरेखीखाली पाढे आणि परवचा म्हणायची आमची वेळ, आणि घरामागील गुत्त्यावर दर्दी लोकांची वर्दळ वाढायची वेळ, साधारण एकच असायची. त्या गुत्त्यावर येणारी माणसे बघण्यामध्ये आणि ती काय बोलतात हे ऐकण्यामध्ये आम्हा भावंडांना कमालीचा रस असायचा. गुत्त्यावर चाललेली भांडणे, आरडाओरडा, खूप प्यायल्यानंतरच्या गळाभेटी आणि एकूण सर्वच तमाशा, घरातल्या मोठयांची नजर चुकवून, गच्चीवर लपून बघताना खूपच मजा यायची. तिथल्या वाचस्पतींमुळे आमचे (अप)शब्दभांडारही खूप समृद्ध झाले! या गुत्त्यावर गोंधळ घालणाऱ्या महाभागांमध्ये आमच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींचे नवरेही असायचे. रोज संध्याकाळी सुरु झालेला हा गदारोळ मध्यरात्रीनंतर कधीतरी संपत असावा. गटारी अमावास्येला तिथे काही खास वेगळा सोहळा होत होता की नव्हता, हे मी नाही सांगू शकणार!

मी आज मात्र विचारात पडते. आमच्या घरी साजरा होणारा तो दिवस, आमच्या मोलकरणींकडे तसाच साजरा होत असेल का? दिव्याची अमावास्या म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर आपल्या संस्कृतीची जी दृष्ये येतात, तशीच दृष्ये आज त्यांच्या मुलांच्या डोळ्यांसमोर येत असतील? का नेहमीपेक्षा जास्त पिऊन गटारात पडलेला बापच त्यांच्या डोळ्यांसमोर येत असेल आणि तोच त्यांच्या संस्कृतीचा भाग असेल? शेतकरी कामकरी कुटुंबातील इतर काहींच्या डोळ्यांसमोर, फक्त त्याच दिवशी जास्त दारू पिणारे त्यांच्या घरातले पुरुष असतील का? आपण जेंव्हा "आपली संस्कृती" असे म्हणतो तेंव्हा त्यात जसा दिव्याच्या आवसेचा दीपोत्सव आहे तसंच "गटारी"चं  पिणंही आहेच. तोही आपल्या समाजातल्या काही घटकांच्या संस्कृतीचा भाग होता आणि राहणार आहे. पण तशी "गटारी" साजरी करणारे लोक, बहुदा व्रतस्थपणे श्रावणही  पाळत असतील. आजच्या समाजात, कुठल्याही वारांचा, सणांचा किंवा चातुर्मासाचा धरबंध न ठेवणाऱ्या लोकांनी "गटारी"च्या प्रथेला ग्लोरिफाय करणं जसं योग्य नाही तसंच आपली "संस्कृती-संस्कृती" असा टाहो फोडत ती प्रथा नाकारणंही अयोग्य होईल. आपल्या  मुलांपुढे आपण कुठली संस्कृती ठेवतोय, हे जास्त महत्वाचे आहे. ती मोठी झाल्यावर, या दिवसाच्या त्यांच्या आठवणी काय असतील? सोशल मीडियावर "दिव्याच्या अमावास्येच्या" आणि "गटारीच्या" नवनवीन पोस्ट वाचण्यात आणि पुढे पाठवण्यात मग्न झालेले आई-वडीलच त्यांना आठवतील, कदाचित!  

दिव्याच्या अवसेला, दिवेलागणीच्या वेळी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडून बसलेल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला मिळाल्यामुळे मला छान वाटतंय, हे मात्र खरं! 
   

११ टिप्पण्या:

  1. वा छान लिहिले आहेस स्वाती . आजच्या दिवसाच्या दोन्ही बाजू समर्पकपणे मांडल्या आहेस .
    Keep it up.
    Pramod

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान. पूर्वी सगळीकडे अशीच परिस्थिती होती.

    उत्तर द्याहटवा