काही वर्षांपूर्वीच्या आषाढी एकादशीची गोष्ट. त्यावेळी माझ्याकडे, अक्कूताई नावाची म्हातारी विधवा बाई, घरकामासाठी यायची. ती आणि तिची अपंग मोठी बहीण, दोघीच झोपडपट्टीतल्या खोपटात राहायच्या. गावाकडून आणून तिच्या मुलाने त्या दोघींना इथे सोडले होते. कधीतरी वर्ष सहा महिन्याने तो यायचा आणि थोडं धान्य आणि पैसे देऊन निघून जायचा.
अक्कूताई त्यांच्या घरापासून अर्धातास चालत सकाळी सातपर्यंत माझ्याकडे यायच्या, नऊ-साडेनऊपर्यंत माझ्या घरचं काम संपवून पुढच्या कामांना जायच्या.
आमच्या पहाटेच्या चहाबरोबर आम्ही अक्कूताईंसाठीपण चहा करून ठेवायचो. त्या आल्यावर त्यांना भरपूर साखर घालून तो चहा गरम करून द्यायचो. नऊ- साडेनऊला आमच्या नाष्ट्याच्या वेळेला, आमच्या बरोबर त्यांनाही नाष्टा द्यायचो. अक्कूताईंची खूप गरीबी होती. कधी रात्रीचं उरलेलं अन्न दिलं, तरीही त्या आनंदाने घेऊन जायच्या.
दरवर्षी आमचा आषाढीचा उपास, सकाळी केलेल्या साबुदाणा खिचडी पुरताच मर्यादित असतो. तसाच त्या दिवशीही होता.
नाष्ट्याला केलेल्या गरम खिचडीची बशी मी अक्कूताईंना दिली आणि सहजी विचारले,
"काय अक्कूताई आज आषाढीचा उपास धरलाय ना?"
"नाय वो ताई"
"मग देवदर्शनाला जाणार ना?"
"नाय वो नाय" अक्कूताईचा चेहरा कसनुसा झाला होता.
"का? देवळात नाही जाणार?"
"वस्तीतली पोरं नाय जाऊ देत" अक्कूताई वरमून बोलल्या.
"पोरं का जाऊ देत नाहीत? " मला आश्चर्य वाटलं.
"वस्तीतली पोरं म्हनत्यात, आता आमचा धर्म येगळा, देव येगळा आन् आमचा सनबी येगळा हाय. आता फक्त जयंतीच आमचा सन. आता इट्टल, गणपती, शंकर, अंबाबाई .. हे आमचे देव न्हाईत. आता आमच्या लोकांनी देवळात जायाचं न्हाई आसं आमाला सांगत्यात."
अक्कूताईंची जात, धर्म मी आधी कधीच विचारले नव्हते. पण अक्कूताईंच्या त्या उत्तरामुळे मला सगळा प्रकार लक्षात आला.
"पण लहानपणापासून तुम्ही देवळात जात असाल ना? उपास करत असाल ना?"
"देवळात जायाचो, उपास पन करायचो. पन आताची पोरं जायचं नाही म्हनत्यात. त्यांच्या तोंडाला कोन लागनार."
"देवदर्शन नाही, तर मग कसं हो? तुम्हाला वाईट वाटत नाही का?"
"वाईट वाटतं. पन ताई, इट्टल फकस्त देवळातच भेटतो असं कुटं हाय का? त्यो तर मानसाच्या मनातबी असतो ना? देवळात गेलं न्हाई तरी माऊलीला माझा नमस्कार पावतोच न्हवं का?"
अक्कूताई कपाळा जवळ हात जोडत, नमस्कार करत, म्हणाल्या.
"पण अक्कूताई, तुम्ही उपास केलाय का जेवताय, हे बघायला तुमच्या घरांत कोणी येणार आहे का? विठ्ठलावर तुमची भक्ती आहे, तर उपास धरायचा होतात. म्हणजे देवाला तुमचा नमस्कार पोहोचला असता ना."
"उपासाचं काय घेऊन बसलात ताई? आमी करून खानारी मानसं. कामं नाय मिळाली, जिवाला आलं, कामाचा खाडा झाला, की आमाला तसाच उपास घडतुया की. आन् आता तुमी रोज आमच्या पोटाला देता. तुमच्या रुपाने रोज इट्टल मला भेटतोच न्हवं का?"
अक्कूताईंनी परत कपाळावर हात जोडून मला नमस्कार केला.
अक्कूताईंच्या रुपात मलाही विठ्ठल भेटल्याचा भास झाला आणि नकळत माझे हात जोडले गेले.
अडाणी आक्कूताईनी अध्यात्माचं सारचं सांगितलं.
उत्तर द्याहटवाविठ्ठल केवळ देवळात थोडीच आहे?
Nice experience
उत्तर द्याहटवाKhup Chan.
उत्तर द्याहटवावा.. नेटक्या शब्दांत मांडलं आहेस. न बघितलेल्या अक्कूताईंपुढे मनातल्या मनात हात जोडले गेले.
उत्तर द्याहटवाअतिशय साधी सरळ सोप्पी मांडणी . छान लिहिले आहे ..
उत्तर द्याहटवाAs usual very simple but touching
उत्तर द्याहटवाAs a devotee of Vitthal, I believe faith and trust in God never diminishes among people due to poverty or modern thinking. I am touched by the blog written by you. Thanks for sharing.
उत्तर द्याहटवाPriyadarshini Dalvi