साडेचार महिन्यांच्या प्रदीर्घ आजारपणाने कृश झालेली माझी वयोवृद्ध आई, गेले अनेक दिवस आयसीयूत आहे. आठ-नऊ दिवस व्हेंटिलेटरवर व डायलिसिसवर राहून, तीन दिवसांपूर्वी त्या दिव्यातून ती सुखरूप बाहेर पडली. कालपासून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ती द्यायला लागली आहे.
काल मी सहज तिला विचारले, "काय आई, बरी आहेस ना? काय करावंसं वाटतं आहे? कुठे जावसं वाटतंय? "
तिने माझ्या पहिल्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मान हलवून दिले. मला बरे वाटले.
मी दुसरा व तिसरा प्रश्न परत विचारला. त्यावर ती म्हणाली, "मला जगायचंय. मला सोलापूरला जायचंय"
तिच्या उत्तराने मी अवाक् झाले.
यावर्षी जुलैच्या २२ तारखेला, मुलीच्या बाळंतपणाच्या निमित्ताने, मी पाच आठवड्यांसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. पण पाठोपाठच माझी आई सोलापूरला आजारी पडली. तिने खाणे-पिणे सोडले. शेवटी, ती जवळ-जवळ ग्लानीत जायला लागल्याने, सहा ऑगस्टला सोलापुरातच तिला आयसीयूत अॅडमिट करावे लागले.
बरेच दिवस तिच्या आजाराचे काहीही निदान होत नसल्याने आणि तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने, तिच्यावर उपचार करणाऱ्या सोलापूरच्या डॉक्टरांनी हात टेकलेलेच होते. त्यातही कहर असा झाला की तिला नळीवाटे पातळ अन्न देताना, ते अन्न दोन-तीनदा तिच्या फुफुसांत गेले. त्यामुळे तिला Aspiration Pneumonia झाला. तिला दम लागू लागला. तिचे वय आणि एकूणच तिची अवस्था बघून, शेवटी तिथल्या डॉक्टरांनी सांगितले, "आता इथे आम्हाला याउपर कुठलेही वैद्यकीय उपचार करणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. तुम्ही सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. तिला आता घरी घेऊन जा किंवा पुण्या-मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवा"
मला हे समजताच, माझ्या भारतात परतण्याच्या नियोजित तारखेपेक्षा आठवडाभर आधीच निघून मी तडक सोलापूरला पोहोचले. आईला अँब्युलन्समध्ये घालून पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये आणले. तिच्यावर पूर्वी एकदा ज्यांनी उपचार केले होते त्या डॉक्टर वाडियांनी यावेळीही योग्य उपचार करून तिला वाचवले.
त्यानंतर जरी तिला घरी आणले तरी अशक्तपणामुळे तिला नीट खाता-पीता येत नव्हते. त्यामुळे अजूनच अशक्तपणा वाढून तिची प्रतिकारशक्ति संपून गेली व तिला वरचेवर जंतूसंसर्ग होत राहिला. तीन आठवड्यांपूर्वी तिला परत रूबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट करावे लागले. हॉस्पिटलच्या खोलीमध्ये असताना काही दिवसांपूर्वी, नळीवाटे पातळ अन्नपदार्थ देताना पुन्हा तिच्या फुफुसांमध्ये अन्न जाऊन तिला अत्यंत गंभीर स्वरूपाचा Aspiration Pneumonia झाला. त्यामुळे तिला पुन्हा आयसीयूत हलवावे लागले. श्वसनाला त्रास होत असल्याने आठ-नऊ दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्याकाळात ती बेशुद्धावस्थेतच होती. तिच्या किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्याने तिचे तीन वेळा हिमोडायलिसीस करावे लागले. निष्णात डॉक्टर असलेल्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच आयसीयूत आईवर वैद्यकीय उपचार करीत आहेत. त्यामुळेच उपचारांमध्ये काही हयगय होणार नाही, याबाबत आता मी निर्धास्त आहे.
आठ-दहा दिवसांपूर्वी जेंव्हा आई अत्यवस्थ होती, तेंव्हा कुठलेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या जवळपासच्या सर्व व्यक्तींनाही तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे "आता कधी?" अशा अर्थाचे प्रश्नचिन्हच फक्त त्या सर्वांच्या चेहऱ्यावर होते. आई बरी व्हावी म्हणून माझ्या डॉक्टर मैत्रिणी व मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतो. रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्व प्रयत्न करीत राहायचे, अशी शिकवण आमच्या अंगात भिनलेली असली तरीही, आई या दिव्यातून बाहेर पडेल की नाही याबाबत आम्ही सर्व डॉक्टर्स त्यावेळी जरा साशंकच होतो.
कमालीचा अशक्तपणा, बेशुद्धावस्था, व्हेंटिलेटर, डायलिसीस, सेप्सीस या सगळ्यातून आई कशी काय बाहेर पडली हा आम्हा सर्व डॉक्टर्सच्या दृष्टीनेही एक आश्चर्याचा विषय आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आई शुद्धीवर आली. त्यानंतर डॉक्टर वाडियांनी विचारलेल्या प्रश्नांची आईने सुसंगत उत्तरे दिली. ते ऐकून डॉक्टर वाडिया आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "चमत्कार घडतात."
"मला जगायचं आहे" हे आईचे वाक्य ऐकले आणि हा चमत्कार कसा घडला असावा याचा मला उलगडा झाला.
आई अजूनही आयसीयूतच आहे आणि ती पूर्ण बरी झाली आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती आजही नाही. पण तिची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सोलापूरला तिच्या स्वतःच्या घरी जाण्याची उत्कट इच्छा आणि जिद्दच तिला जगवते आहे असे मला वाटते. तिची ही इच्छाशक्ती आणि जिद्द बघून, तिला जगविण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आम्हालाही बळ येते आहे!
Tai,vahini kontya Ruby hall madhe aahet. Mi bhetayala yete. Please sang.
उत्तर द्याहटवादुर्दम्य इच्छाशक्ती,
उत्तर द्याहटवासकारात्मक दृष्टिकोन आणि
प्रचंड आत्मविश्वास यांच्यासमोर
परमेश्वरालाही नमतं घ्यायला लागतं.
घटनेचं शब्दांकन
नेहमीप्रमाणेच सुंदर अवतरलंय.
तुम्ही लिहित नाहीच.
तुमचे विचार लेखणीतून
जणू पाझरतात.
म्हणून
तूमच्या कुठल्याच लिखाणाला
ओढून-ताणून शब्दांची मोट
बांधावी लागत नाही.
आईंच्या प्रकृतीस लवकर आराम पडतो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना....!!!
वहिनी सोलापूरला नक्की जातील चमत्कार घडतातच माझे भाऊजी पण मागच्या वर्षी Autoimmune सारख्या आजारातून बाहेर येत आहेत ते फक्त इच्छाशक्ती आणि चमत्कारा मुळेच ...
उत्तर द्याहटवा👍 🌹
उत्तर द्याहटवाAnything is Possible.
उत्तर द्याहटवाGod has answered our prayers.May God bless her and give her more strength and soon she will be out of it.
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख शब्दांत मांडणी केली आहेस. ती आईंची इच्छा पूर्ण होवो.
उत्तर द्याहटवास्वाती,सहज सुंदर आणि अनुभवातलं लेखन.
उत्तर द्याहटवाअन् लेखन करताना प्रसंगाचं अवलोकन समतोलपणे करणं,
कोणताही अभिनिवेश नसणं हे खूप छान साधतेस गं!
ति. आईस,सा.न.त्यांना बरं वाटून त्यांचे आशीर्वाद कायम मिळोत.
उत्तर द्याहटवा