माझ्या सासूबाई २०१५ च्या डिसेंबरात वारल्या. त्यानंतर माझे सासरे त्यांच्या वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत माझ्या नणंदेच्या घरीच वास्तव्यास होते. माझ्या नणंदेला २०१६ च्या नोव्हेंबरात एका लग्नानिमित्त दोन दिवसांसाठी बाहेरगावी जायचे होते. त्यावेळी माझे मामेसासूसासरे पुण्यात येऊन माझ्या सासऱ्यांच्या सोबतीला माझ्या नणंदेच्या घरी राहिले होते. माझ्या मामेसासूसासऱ्यांचे वयही त्यावेळी ऐंशीच्या पुढेच होते. त्या तिघांनीही आमच्या घरी राहावे असे आम्ही उभयतांनी माझ्या सासऱ्यांना सुचवले होते. "एक-दोन दिवसांसाठी जा-ये नको, आम्ही तिघेही येथेच राहू" असे माझे सासरे म्हणाले. म्हणून मग त्यातल्या एका दिवशी नणंदेच्या घरीच जाऊन, स्वयंपाक करून मी त्या तिघांना जेवायला वाढले. दुसऱ्या दिवशी मी कामात व्यस्त असल्याने त्या तिघांना संध्याकाळी आमच्या घरी जेवायला घेऊन आले.
त्या रात्री, मी माझ्या सासऱ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक केले होते. मी त्यांना आग्रहाने गरम-गरम जेवण वाढले. त्यांनीही मोदक खाऊन, तृप्त होऊन माझे कौतुक केले. जेवण होता-होता रात्रीचे दहा वाजत आले होते. आम्ही सगळेजण मजेत गप्पा मारत बसलो होतो. नणंदेची फ्लाईट अकरा-साडेअकरा पर्यंत पुण्यात पोहोचणार होती. तोपर्यंत त्या तिघांनीही आमच्याच घरी थांबावे, असा आग्रह आम्ही दोघे करीत होतो. पण माझे सासरे दमले होते. घरी जाऊन झोपतो म्हणाले. ते अगदी दारात असताना मी त्यांना म्हणाले, "बाबा, जरा आत येता का? आपण आपला सगळ्यांचा एक फोटो काढू या ना'. पण ते म्हणाले, "आता नको. मी जातो आणि झोपतो". मग मीही आग्रह धरला नाही. त्या दिवशीची त्यांची आणि आमची ती भेट शेवटचीच ठरली. दहा-बारा दिवसांनी, २९ नोव्हेंबर २०१६ रोजी माझ्या सासऱ्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्यासोबत फोटो काढण्याची शेवटची संधी हातातून निसटून गेली ती गेलीच.
आज या गोष्टीची प्रकर्षाने आठवण होण्यासाठी कारणही तसेच घडले. साधारण महिन्याभरापूर्वी माझी आई अत्यवस्थ होती आणि आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिला भेटायला आयसीयूमध्ये कोणीही येऊ नये, असेच डॉक्टरांनी सांगितले होते. हॉस्पिटलमध्ये जाऊन आईला बघण्याचा दुराग्रह न धरता, माझ्या वहिनीचे वडील ऍडव्होकेट आबा गांगल व वहिनीच्या काकू डॉ. सुधा गांगल, माझ्या वडिलाना भेटायला आवर्जून आमच्या घरी आले होते. कॅन्सरवरील संशोधनासाठी जगभरात नावाजल्या गेलेल्या, आणि टाटा कॅन्सर संशोधन केंद्राच्या माजी संचालक, विदुषी डॉ.सुधा गांगल, प्रथमच आमच्या घरी आल्या होत्या. त्यामुळे मी भारावून गेले होते. त्यांच्यासोबत आपण आपला एखादा फोटो काढावा असे एकदा माझ्या मनांत आलेही. पण त्याप्रसंगी तो विचार बोलणे कदाचित योग्य दिसणार नाही असे वाटून मी काही बोलले नाही.
दुर्दैवाने, पुढच्या दोन दिवसातच डॉ. सुधा गांगल यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले आणि त्यांना दुर्धर कॅन्सरने ग्रासले आहे, असे निदान झाले. त्या आजारातून सुधाकाकू बाहेर पडूच शकल्या नाहीत व आज पहाटे त्या पंचत्वात विलीन झाल्या. मनोमन त्यांना श्रद्धांजली वाहताना एकच चुटपुट मनांत घर करून आहे. त्यांच्यासोबत फोटो काढून घेणे आता कधीच शक्य होणार नाही.
थोडक्यात काय? जीवन क्षणभंगुर आहे. प्रत्येक क्षणी, मनांत जे येते ते बोलावे, करून मोकळे व्हावे. निसटून गेलेले असे हे अनेक क्षण मनाला टोचणी देत राहतात.
True.I have experienced similar moments many times.
उत्तर द्याहटवाTouching!
उत्तर द्याहटवाखरच......
उत्तर द्याहटवाअगदीं बरोबर लिहीले आहेस.......
हटवामन मोकळं केलंस
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवातुमचे नाव कळेल का?
निसटुनी जाई संधीचा क्षण ,
उत्तर द्याहटवासदा असा संकोच नडे
असे कवी अनिलांचेही म्हणणे आहे. आपल्या सगळयांनाच असे अनुभव येत राहतात !
Very true!well expressed Swatee!
उत्तर द्याहटवाअगदी खरे “ जीवन क्षणभंगुर आहे. प्रत्येक क्षणी, मनांत जे येते ते बोलावे, करून मोकळे व्हावे. ” पण आपण कोणत्यातरी संकोच / परीस्थिती / दडपणात राहतो आणि मग एक प्रकारची टोचणी रांगून जाते.
उत्तर द्याहटवाSwatee, nobody knows of our future.Touching moments you expressed.
उत्तर द्याहटवाअनेक निसटलेल्या क्षणांची तीव्रतेने आठवण झाली.
उत्तर द्याहटवास्वाती, अगं खरंच आहे.अशा अनेक क्षणांनी मनाला सल दिली आहे.तुझ्या अनुभवातलं असल्यानं थेट मनाला भिडलं.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवातुमचे नाव कळेल का?
Kiti chaan lihilays. I think everyone will remember such moments after reading your blog.
उत्तर द्याहटवाशब्द शब्द जपून ठेव तसे क्षण क्षण जपून ठेव असे जीवन आपल्याला शिकवते .... मेघा
उत्तर द्याहटवा