शनिवार, २३ मे, २०२०

"आईने केलेले" डिंकाचे लाडू!

माझ्या मुलीला, असिलताला दिवस गेल्याचे माझ्या आईला कळल्यावर ती खूपच आनंदली होती. पण बाळंतपणासाठी मी काहीच तयारी करत नाहीये, हे बघून ती अस्वस्थ झाली होती. जवळच्या कोणालाही दिवस गेल्याचे कळले, की तिची तयारी सुरु व्हायची. स्वेटर विणायला घेणे, रंगीत तुकडे जोडून सुंदर दुपटी शिवणे, उबदार कापड आणून त्याच्या बंड्या शिवणे, जुन्या मऊ साडया एकावर एक जोडून सुंदर गोधड्या शिवणे, अशी जय्यत तयारी ती हळूहळू करत असायची. त्यामुळे बाळ व्हायच्या आधी छानसा बाळंतविडा  तयार असायचा. बाळ जन्मले की बाळंतिणीसाठी डिंकाचे आणि अळिवाचे लाडू, खसखसीच्या वड्या, बदामाची खीर, शिरा असे अनेक पदार्थ करण्यात ती पुढे असायची. बरेच येणे-जाणे असलेल्या तिच्या मोठ्या घरातल्या कामाचा धबडगा सांभाळत, हे सगळेदेखील ती अगदी हौसेने करायची हे विशेष! 

२०१९ च्या मे  महिन्यात आई पुण्याला आलेली होती. आपण पणजी होणार याचा आनंद असला तरीही तिला स्वतःला हे काहीच करणे शक्य नव्हते. पण मी बाळंतविडा करणे अत्यावश्यक आहे, असा तिचा आग्रह होता. एकीकडे आईने हा धोशा लावला होता, तर दुसरीकडे, आईची तब्येत अगदी नाजूक असताना तिला मागे सोडून बाळंतपणासाठी, इतक्या लांब मी येऊच नये, असे असिलता म्हणत होती. पण मला जायची इच्छा होती. मधला मार्ग म्हणून, थोड्या काळासाठी का होईना, मी ऑस्ट्रेलियाला जायचे ठरवले. असिलता आणि आमचा जावई आनंद, या दोघांनी, त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी बरीच तयारी केलेली होती. तसेच, असिलताच्या सासूबाईंनी बरेच कपडे आणून दिले होते. त्यामुळे, बाळंतविडा करण्यात मी वेळ घालवू नये, असेही असिलताने मला सांगितले होते. तरी असिलताशी बोलून, तिला लागणाऱ्या काही गोष्टींचा मी अंदाज घेतला होता. त्यानुसार, जुन्या सुती साड्या आणि ओढण्या वापरून दोन-तीन दुपटी आणि गोधड्या मी शिवल्या, काही लंगोट विकत आणले. बाळंतविडा करण्यासाठी मी काहीतरी हालचाल करते आहे  हे बघून आई जरा शांत झाली. 

जून महिन्यात माझे आई-वडील पुण्याहून सोलापूरला त्यांच्या घरी परत गेले. ऑस्ट्रेलियाला जाण्याआधीचा दीड महिना सोलापूरला अनेक चकरा मारून मी आईची औषधे, मोलकरणी वगैरे व्यवस्था लावून दिली. तरीही आईच्या काळजीने माझी घालमेल होत होती. तर, बाळंतिणीसाठी मी डिंकाचे लाडू करणार नाहीये, हे समजल्यामुळे आईचा जीव कासावीस होत होता. पूर्वीपासून अनेक वर्षे, माझ्याकडेही आई वेगवेगळे लाडू करून पाठवीत असायची. पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे मी जी सदासर्वकाळ गर्भारशी असल्यासारखी दिसते, त्यासाठी आई व तिचे लाडूच जबाबदार आहेत, असे मी गमतीने नेहमी म्हणायचे. त्यामुळेच, कुठलेही लाडू आणायचे नाहीत, अशी तंबी असिलताने मला दिलेली होती. मलाही डिंकाचे लाडू करण्याची खास इच्छा नव्हती. जुलैच्या शेवटाला, जसजशी  माझी जाण्याची तारीख जवळ आली तसे आईने डिंकाच्या लाडवांसाठी लागणारे सामान आणण्यासाठी हट्टच धरला. मी बरीच टाळाटाळ केली. मला करायला येत नाहीत, इथे कशाला घाट घालायचा? मी निघण्यापूर्वी मुंबईत विकत घेईन, तिच्या सासूबाई करणार आहेत, अशी बरीच करणे सांगून बघितली. पण तिने जाम ऐकले नाही. 

"हे बघ, मीच करणार आहे. मी करत असताना तू पाहा आणि शीक. त्यानिमित्ताने शिकशील तरी." 
असे बोलून आईने मला निरुत्तर केले. पण, आईची तब्येत अगदीच तोळामासा झालेली होती. तिला लाडू करणे जमणार नाहीये हे मला दिसत होते. केवळ तिची इच्छा राखण्यासाठी, माझ्या ऑस्ट्रेलियाला जाण्याचा आधीच्या सोलापूर-फेरीत, मी डिंकाच्या लाडवांचे सामान आणून द्यायला तयार झाले. तीही उत्साहाने गाडीत बसून आमच्याबरोबर सामान आणायला निघाली. कुठल्या तरी पेठेतल्या, तिच्या जुन्या ओळखीच्या एका घाऊक व्यापाऱ्याकडे घेऊन गेली. अमुक झाडाचा डिंक, तमुक प्रकारच्या गोडंब्या असे तिच्या यादीप्रमाणे सगळे सामान घेऊन आम्ही घरी आलो. तोपर्यंत संध्याकाळचे आठ वाजले होते. त्यानंतर एकीकडे तिला जेवायला वाढून, दुसरीकडे ती सांगेल ती व तशी कामे मी करत गेले. काजू-बदामाचे काप करणे, खारकांची पूड करणे, सुके खोबरे किसून भाजून घेणे, गूळ चिरणे, डिंक तळून घेणे, वेलदोड्याची पूड करणे, ही सगळी तयारी करेस्तोवर जवळजवळ रात्रीचे अकरा वाजायला आले. पूर्वतयारी झालेली असल्याने, आता लाडू पाकात टाकणे आणि वळणे एवढेच बाकी होते. पण डिंकाच्या लाडवांसाठी पाक करणे आणि लाडू वळणे ही मोठी कौशल्याची कामे असतात हे मला माहिती होते. त्या दोनही गोष्टी निवांतपणे कराव्यात म्हणून, मी आमची जेवणेही उरकून घेतली होती. 

पाक करायच्या आधी मी आईला म्हणाले, 
"आता या सामानाच्या अंदाजाने किती गूळ घ्यायचा आणि त्याचा पाक किती-तारी आणि कसा करायचा ते सांग."

"अगं, काही नाही. पाक करणं अगदीच सोप्पं असतं. आता ते तू कर. तुला येईल. लाडू मात्र अगदी गरम असतानाच वळावे लागतात बरं का. हात चांगले भाजतात. जरा जपून वळ. आता मला झोप येतेय. मी झोपते." असे म्हणून ती शांतपणे झोपायला निघून गेली !

आईने माझी चांगलीच पंचाईत केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे सोलापूरहून निघून मला पुण्याला परतायचे होते. त्यामुळे ते लाडू वळून झाल्यावर सगळा चिकटलोळ पसारा आवरून झोपणे अनिवार्य होते. पण, "तयार केलेल्या सामग्रीच्या हिशोबाने किती गूळ घ्यायचा आणि लाडवांसाठी पाक कसा करायचा?" हे रात्री अकरा वाजता कोणाला आणि कसं विचारायचं, हा मला प्रश्नच पडला. मग काय, 'रुचिरा' पुस्तक शोधले, यू-ट्यूब बघितले, सर्व साहित्याच्या अंदाजाने गूळ घेतला, आणि देवाचे नाव घेऊन मी पाक तयार केला. सगळे साहित्य पाकात घातले आणि भराभरा लाडू वळले. चांगले पन्नास-साठ लाडू वळून झाल्यावरही अजून बरेच लाडू होणार आहेत हे माझ्या लक्षात आले. तोपर्यंत, किती लाडू होणार आहेत याबद्दल मी माझे डोके वापरलेलेच नव्हते. आईच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, खूप जास्त सामान आणलेले होते आणि भरपूर लाडू तयार होणार होते ! 

सगळी आवरासावर करून, लाडू डब्यांमध्ये भरून, कमालीची दमून मी एक-दीडला झोपले असेंन. पहाटे उठून पुण्याला जाऊन कामाला जुंपून घेणे अशक्य आहे, हे माझ्या लक्षात आल्याने मी पुण्याला परतणे पुढे ढकलले. तो दिवसभर मला चांगलीच दमणूक जाणवत होती. सदैव येणे-जाणे असलेल्या आमच्या त्या मोठ्या घरातली सगळी कामे सांभाळून, इतरांसाठी बाळंतविडे, लाडू आणि इतरही बरेच काही माझी आई कशी काय करत असेल, याचे मला कमालीचे नवल वाटले. आईने तिच्या देखरेखीखाली, माझ्या भाचरंडांसाठी व इतर नातेवाईकांसाठी वेगळे, आणि असिलतासाठी वेगळे, असे डबे मला भरायला लावले. त्याशिवाय नेहमीप्रमाणेच, घरात आल्या-गेलेल्या प्रत्येकाला तिने लाडू खायला दिले. सर्व मोलकरणींबरोबर त्यांच्या पोरा-बाळांसाठी दोन-चार लाडू मला द्यायला लावले. गंमत म्हणजे सगळ्यांना ती मोठ्या आंनदाने आणि अभिमानाने सांगत होती,

"असिलताच्या बाळंतपणासाठी स्वाती ऑस्ट्रेलियाला चालली आहे. डॉक्टर असली तरी स्वातीला काही कळत नाही आणि तिची मुलगीही तसलीच. डिंकाच्या लाडवांशिवाय कुठे काय बाळंतपण होत असते का? माझं ती ऐकतच नव्हती. पण मला करायचेच होते. म्हणून मीच लाडू केले!" 

मी ऑस्ट्रेलियाला गेल्यावर काही दिवसातच आई खूप आजारी पडली. त्यामुळे मी तिकडून जरा लवकरच परतले. "तिने केलेले" डिंकाचे लाडू तिच्या नातीने खाल्ले, हे ऐकल्यावर तिला खूप बरे वाटले. आईचे ते आजारपण जवळजवळ शेवटचे आजारपण ठरले. पण ती जायच्या आधी, तिच्या लाडक्या नातीच्या बाळंतपणासाठी डिंकाचे लाडू करण्याचे समाधान तिला मिळाले, हे एक बरे झाले!      
     

२५ टिप्पण्या:

  1. Very nice Swati tai.You have just written down the exact envoirement of your Solapur house and auntys love for every member of the family even Girish friends and how can I forget the delicious Shira aunty use to make with so much love and lucukly I would be there every time.She used to be so much happy and would always say Alas ka Shira kahayala.

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहिलंयस स्वाती!हे समाधान काही वेगळ्याच जातीचं आहे!आता डिंकाचे लाडू म्हटले की तुझ्या आईची आणि या गोष्टीची पण आठवण येईल!

    उत्तर द्याहटवा
  3. सर्वकाही स्पष्ट समोर दिसत आहे ..तत्वनिष्ठ आई , मोठ्ठे घर , मोठ्या कामाचा आईंचा आवाका .छान लिहिली आहे आठवण ...डिंकाचे लाडू आणि बाळंतपण यांचे पक्के नाते असायचे ...विनायक जोशी

    उत्तर द्याहटवा
  4. अगदी सगळं डोळ्या समोर घडतंय ...
    इतके छान लिहीले आहे ...कधी पाहिलेले नाही पण आई डोळ्यांसमोर उभ्या राहिल्यात . दडंवत त्या माऊलीला ����

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर वर्णन केलंय..सगळा सुकामेवा गुळाचा पाक एकत्र आणतो आणि त्याचा लाडू बनतो..त्याप्रमाणेच सगळ्यांना जोडणाऱ्या काकू गुळासारख्याच गोड होत्या... कायमच त्या आपल्या मनात राहतील ��

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लिहिलंय, नेहमीप्रमाणे! चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं! माझी आत्ता 86 वर्षाची आई मला नात झाली दोन वर्षांपूर्वी तेंव्हा फोन वर असेच आदेश देत होती. आणि आई पेक्षा गूगल वर जास्त विश्वास ठेवणारा माझा मुलगा, आजी ने असं करायला सांगितलंय म्हटलं की लगेच ऐकत होता! त्यावर त्याचं explanation होतं, की आजी ला बाळंतपणं करायचा केवढा experience आहे...तुझी ही पहिलीच वेळ आहे! :):)

    उत्तर द्याहटवा
  7. नेहमीप्रमाणे चलतचित्र डोळ्यासमोरून पटकन सरकत गेले आणि आता खात्री झाली की तू डिंक लाडू बनविण्यात तज्ञ झाली. (कधी येऊ?) कै. ती. काकूंच्या प्रेमळ स्वभावाचा व सुग्रणतेचा वारसा तू पूढे चालवत आहेस.

    उत्तर द्याहटवा
  8. कधीही बाळंतपण काढ... आईने शिकवल्याप्रमाणेच उत्तम लाडू करून खायला घालेन!

    उत्तर द्याहटवा
  9. Hello Swati tai - Vasundhara vahini gelya he babanna (Dr. Mukund Rahalkar) / aaila mahiti navhta... Atta blog vachun kalla. Mi tyanna kalavla ahe.

    उत्तर द्याहटवा