आपल्या पूर्वजांनी, चौषष्ठ कला आणि चौदा विद्यांबद्दल लिहून ठेवलेले आहे. सहज म्हणून ती यादी वाचली, तर त्यात काही कलांचा उल्लेख करायचे राहून गेले आहे असे वाटते. त्यापैकी एक कला म्हणजे घासाघीस करण्याची कला!
काही कला आपण केवळ निरीक्षणाने शिकतो. तशीच, घासाघीस करण्याची कला मला माझ्या आईचे निरीक्षण करता-करता अवगत झाली असावी. घरामध्ये कामाला नवी मोलकरीण ठेवणे असो, बाजारहाट करणे असो किंवा बोहारीणीशी सौदा करणे असो, अनेक ठिकाणी आई तिची ती कला मनसोक्तपणे वापरायची. नवीन मोलकरीण नेमताना, तिच्या कामाचे तास, यायची वेळ, ती काय-काय कामे करणार याचे तपशील आणि तिचा पगार या सर्व मुद्द्यांवर भरपूर घासाघीस व्हायची. मोलकरीणही घासाघीस करण्यांत तरबेज असायची. शेवटी, त्या मोलकरणीला पटवल्यानंतर आई मनोमन खूष असायची. पण सांगायची गंमत म्हणजे, त्या बाईने दोन चार महिने चांगले काम केले की तिच्या महिन्याच्या पगारापेक्षा दुप्पट पैसे आईने तिला अंगावर दिलेले असायचे.
"आई, तिला कामावर ठेवताना तिच्याशी पगारासाठी किती वेळ घासाघीस केली होतीस. मग आता तिला अंगावर इतके पैसे का दिले आहेस ? असे मी आईला विचारायचे.
त्यावर आईचे ठरलेले उत्तर असायचे, "तिची बिचारीची फारच आबदा होतेय गं. नवरा दारुडा, काही कमवत तर नाहीच उलट हिच्याकडचे पैसेच काढून घेतो. तिची लहान-लहान मुले आहेत. त्यांना दोन वेळचे पोटाला तरी मिळायला नको का? म्हणून मी पैसे दिलेत. तिच्या पगारातून ती फेडेल हळू-हळू. "
घासाघीस करून, चांगली मोलकरीण मिळवल्याचा आनंद आईला आधीच मिळालेला असायचा. आता, तिने दिलेल्या जास्तीच्या पैशांमुळे, त्या बाईच्या मुलांच्या पोटात अन्न जातेय, याचेही तिला अपार समाधान मिळत असायचे. मोलकरणीच्या अंगावर दिलेले पैसे तिने फेडावेत यासाठी आई तिच्यामागे कधी फारसा तगादाही लावायची नाही.
आईबरोबर खरेदीला गेले की आई सगळ्या वस्तू छान भाव करून मगच घ्यायची. वस्तूची प्रत बघून त्यामानाने त्या-त्या वस्तूला किती किंमत द्यावी, उत्तम प्रतीची वस्तू योग्य भावात कशी विकत घ्यावी, हे मी आईकडे बघून-बघूनच शिकले. कधीकधी मात्र, आई अगदी छोट्या खरेदीतही फार वेळ घासाघीस करायची. तिच्या मनासारखा सौदा झाला नाही की ती वस्तू खरेदी करण्याचा बेतच रद्द करायची. आम्हाला हव्या असलेल्या वस्तूसाठी असे होताना दिसले की, आपल्याला ती वस्तू मिळणार नाही की काय, असे वाटून आमचा धीर सुटू लागायचा. आमच्या लहानपणी एकदा, दारावर डहाळ्याच्या पेंड्या विकायला आलेल्या बाईबरोबर, आई बराच वेळ घासाघीस करत होती. ती बाई चार आण्याला चार पेंड्या असा भाव सांगत होती तर आई चार आण्याला सहा पेंड्या दे म्हणत होती. थोड्याच वेळात, आईने त्या बाईकडून चार आण्याला पाच पेंड्या मिळवल्या असत्या. पण जास्त वेळ घासाघीस चाललेली बघून, आता आपल्याला डहाळे मिळणारच नाहीत, असे वाटल्यामुळे माझा मोठा भाऊ, जयंत जाम वैतागून त्या बाईला म्हणाला, "तुला चार आण्याला चार पेंड्या द्यायच्या असतील तर दे नाहीतर आम्ही दुसरीकडून घेऊ"
आईने डोक्याला हात लावून घेतला. नाईलाजाने त्या बाईकडून तिने चार आण्याला चार पेंड्या विकत घेतल्या. नंतर मात्र तिने जयंतची चांगलीच कानउघडणी केली. घासाघीस करताना आपण कधीही घायकुतीला येऊ नये, आणि आपल्यापैकी कोणी एकजण घासघीस करत असेल तर दुसऱ्या कोणीही पडते घेऊ नये, याचा धडा तिने आम्हाला दिला.
एखाद्या दिवशी दुपारी घरी बोहारीण यायची. आईची आणि त्या बोहारणीची, घासाघीस करण्याची जणू जुगलबंदीच चालायची. ती जुगलबंदी ऐकताना आणि बघताना आम्हा मुलांचे दोन-अडीच तास आनंदात निघून जायचे. या दोन्ही कलाकारांनी आपापली कला यावेळी अगदी पणाला लावलेली असायची. अर्थात तो सामना बरोबरीतच सुटायचा. या असल्या अनेक प्रसंगांची साक्षीदार राहिल्यामुळे हळूहळू मला ही कला अवगत झाली असावी. पण माझे लग्न होईपर्यंत, ती कला वापरायची संधी मला फारशी कधी मिळाली नव्हती.
आमच्या लग्नानंतर लगेच, आम्ही मध्यप्रदेशमध्ये महू येथे राहत होतो. कॉलेजकुमार असलेला माझा लहान भाऊ गिरीश, उन्हाळ्याच्या सुटीत, आमच्या घरी काही दिवसांसाठी राहायला आला होता. पीटी आणि गेम्स परेडमध्ये घालण्यासाठी, आनंदला नवीन पांढऱ्या पँट्सची त्यावेळी गरज होती. पॅंटपीस आणि इतरही काही खरेदी करायला आम्ही तिघेही महूपासून जवळच असलेल्या इंदौर शहरातील तुकोजी मार्केटमध्ये गेलो. तिथे भरपूर घासाघीस करावी लागते, हे माझ्या काही मैत्रिणींकडून मला आधीच कळले होते. आईकडून अवगत झालेली कला वापरण्याची संधी मला मिळणार, या विचाराने मी हुरळून गेले. सगळ्या वस्तूंचा भाव मी करेन, तुम्ही दोघांनी मधे काहीही बोलायचे नाही अशी तंबी मी, आनंदला आणि गिरीशला, घरून निघतानाच देऊन ठेवली होती.
तुकोजी मार्केटमधल्या एका फिरत्या विक्रेत्याने, एका पॅंटपीसची किंमत ११० रुपये सांगितली. मी कापड पाहिले, त्याची रास्त किंमत काय द्यायला हवी याचा मनोमन अंदाज बांधला आणि, त्या पँटपीसचे मी फक्त पन्नास रुपये देईन असे त्याला सांगितले. मी अर्ध्याहून कमी किंमत सांगितल्यावर, मी काहीतरीच बोलले आहे असे गिरीश आणि आनंदला वाटले. त्यातून त्या माणसाने, "मेडमजी, आपको पचास रुपयेही देना है तो साहब के लिये पॅंटका कपडा क्यूँ खरीद रहीं हैं? आप पैजामा का कपडा देखिये ना। आपके बजेटमें केवल पैजामेका ही कपडा मिलेगा" असे बोलून माझी लाज काढली. ते ऐकल्यावर तर आनंदला आणि गिरीशला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्या दोघांनी, मला तिकडून जवळजवळ ओढतच पुढे नेले. मी किती मूर्खपणा केलाय, माझ्यामुळे त्यांना हे असले बोलणे ऐकावे लागले, असे बरेच काही त्यांनी मला सुनवले.
"११० रुपयाचा पॅंटपीस फार-फार तर तो १०० रुपयात देईल. पण तू पन्नासला मागितलास. तो कसा देईल? त्याने आपली किती लाज काढली ऐकलंस ना? आता यापुढे खरेदी करताना तू बोलायचे नाहीस. आम्ही व्यवस्थित भाव ठरवू"
पण माझ्या कलेवरचा माझा विश्वास दृढ असल्याने, मी शांतपणे त्या दोघांचे बोलणे ऐकत होते. गंमत म्हणजे, थोड्या वेळात तो विक्रेता आमच्या मागे-मागे येऊन ९० रुपये तरी द्या, ८० रुपये तरी द्या असे म्हणू लागला. आतातरी तो पॅंटपीस मी विकत घेऊन टाकावा असे आनंद आणि गिरीशचे मत होते. पण मी मात्र पन्नास रुपये देणार यावर ठाम होते. त्यामुळे, पुन्हा त्या दोघांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, मी त्या विक्रेत्याशी बोलणे चालू ठेवले. शेवटी, त्याने तो पॅंटपीस मला ५५ रुपयाला दिला. माझ्या कलेचा विजय झाल्यामुळे मी खुश झाले होते. आनंदची आणि माझ्या हुशार भावाची चांगलीच जिरल्यामुळे त्या दोघांचीही तोंडे बंद झाली होती. त्यावेळेपासूनच, गिरीश माझा पाठचा भाऊ असूनही मला पाठिंबा न देता, माझी चेष्टा करण्यासाठी आनंदच्या पक्षात जाऊन मिळालेला आहे, असे मला वाटते .
१९९२-९६ या काळात आम्ही अलाहाबादला होतो. एके दिवशी, आम्ही प्रथमच गंगा-यमुना आणि सरस्वतीचा संगम बघायला गेलो. संगम बघण्यासाठी, नावेत बसून नदीच्या पात्रात बरेच आत जावे लागते. अलाहाबादच्या घाटावर नावाड्यांपैकीच काही पोरे, संगम बघायला आलेल्या आमच्यासारख्या पर्यटकांना, "आता संगमावर जाणारी ही शेवटचीच नाव आहे, ती काही मिनिटातच सुटणार आहे, तीही आता जवळजवळ भरत आली आहे, तुम्हाला जागा हवी असेल तर माणशी १५० रुपये द्या आणि पटापट चला, नाहीतर इथपर्यंत येऊन संगम बघायला मिळणार नाही", असे बोलून खूपच घाई करत होते. ते फार जास्त पैसे मागत आहेत याचा अंदाज प्रत्येकालाच आलेला होता. काही पर्यटक थोडीफार घासाघीस करत, माणशी १०० रुपये देऊन नावेत बसायला तयार होत होते. त्या सर्व लोंकांपेक्षा आपल्याला कमी पैसे पडले पाहिजेत असे मनाशी ठरवून मी त्या नावाड्यांशी बराच वेळ घासाघीस केली. पण ते काही केल्या तयार होत नव्हते. आमच्यासमोर पंचवीस-एक लोक माणशी १०० रुपये देऊन नावेकडे गेलेही. आता नाव सुटेल आणि आपल्याला आज संगम बघायला मिळणार नाही, असेही आम्हाला वाटू लागले.
मी मोठ्या संयमाने घासाघीस करत राहिले. शेवटी, मी अजिबात बधणार नाही हे लक्षात आल्यावर, ते नावाडी माणशी ५० रुपयांवर तयार झाले. घासाघीस करण्याच्या कलेतल्या माझ्या नैपुण्यामुळेच आपल्याला रास्त भाव मिळाला या आनंदात आम्ही नावेमधे जाऊन बसलो. आता काही मिनिटातच नाव संगमाकडे जायला निघणार, असा आमचा समज करून दिला गेलेला होता. पण प्रत्यक्षात, पुढचा अर्धा-पाऊण तास, ती नाव तिथून हलली नाही. नाव फक्त अर्धीच भरलेली होती. हळूहळू करत, आमच्यानंतरही अनेक पर्यटक येतच राहिले. बऱ्याच वेळानंतर नाव भरली आणि आम्ही संगम बघायला नदीच्या पात्रात निघालो. आपल्यानंतर आलेल्यांकडून नावाड्यांनी किती पैसे घेतले असावेत, हे जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा झाली. आमच्यानंतर शेवटी-शेवटी आलेल्या लोकांनी माणशी १० रुपये आणि शेवटच्या दोघा-तिघांनी तर केवळ ५ रुपये देऊ केल्याचे मला कळले. त्यामुळे, घासाघीस करण्याच्या कलेची मला अजून बरीच साधना करायला हवी, हे मला कळून चुकले. तसेच कोणत्याही कलाकाराला आपल्या कलेचा गर्व वाटू लागला तर मात्र गर्वहरण होतेच, हे मला कळले.
मला अवगत झालेली ही कला, आजपर्यंत गेली अनेक वर्षे, ठिकठिकाणी वापरून त्यामधून मी कमालीचा आनंद मिळवलेला आहे. जिथे घासाघीस करायला मिळणारच नाही अशा ठिकाणी खरेदी करायला मला फारसे आवडत नाही. त्यामुळे, सेलमध्ये, मॉलमध्ये, 'एकच फिक्स्ड रेट' असलेल्या दुकानांमधून, खरेदी करायला मी जातच नाही. परदेशातही खरेदी करण्यात मला फारशी मजा येत नाही. नाही म्हणायला, उझबेकिस्तानमध्ये वस्तू खरेदी करताना घासाघीस करण्याचा आनंद मला मिळाला. अमेरिकेत 'क्रेग्स लिस्ट' वरून काही गोष्टी खरेदी करताना, थोडीफार 'ऑनलाईन' घासाघीस करता आली, पण त्यात फारशी मजा आली नाही.
कुठेही घासाघीस करायची वेळ आली की आजही आनंद माझ्या कलेला, 'मोठ्या मनाने', मुक्त वाव देतो. यात त्याचे अनेक हेतू साध्य होतात. एकतर त्याला स्वतःला कधी घासाघीस करावी लागत नाही. दुसरे म्हणजे, त्याने घासाघीस करून विकत आणलेली वस्तू, "यापेक्षा कशी स्वस्त मिळायला पाहिजे होती", किंवा "याच भावांत जास्त चांगल्या दर्जाची मिळायला हवी होती", अशी माझी बोलणी त्याला ऐकावी लागत नाहीत. घासाघीस करून मी चांगला भाव मिळवते याबाबत तो माझे नेहमीच तोंड भरून कौतुक करतो. पण, एखाद्यावेळी माझी फजिती झालीच, तर गिरीशसोबत माझी चेष्टा करायला त्याला एक चांगला विषय मिळतो आणि ती संधी ते दोघेही सोडत नाहीत !
नेहमीप्रमाणेच 👍
ReplyDeleteThanks Girish!
Deleteताई, मस्त वाटले वाचून. मला ही कला थोडीच येते. माझा नवरा मात्र मस्त घासाघीस करतो.
ReplyDeleteThanks Sharmila!
DeleteNice
ReplyDeleteThanks!
DeleteMast
ReplyDeleteThanks!
ReplyDelete