रविवार, १६ मे, २०२१

X=Y

काही दिवसांपूर्वी 'वाजदा' नावाचा, एका अगदी छोट्याश्या विषयावरचा, सौदी अरेबियन सिनेमा पाहिला. 

वाजदा नावाच्या, एका नऊ-दहा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीला स्वतःची दुचाकी सायकल हवी असते. वाजदाच्या आईवडिलांचे परस्परसंबंध तणावपूर्ण झालेले असल्याने, वडिलांकडून सायकलसाठी पैसे मिळण्याची शक्यता जवळ-जवळ नसतेच. मुलीने सायकल चालवणे, या गोष्टीला तेथील समाजात मान्यता नसल्याने वाजदाच्या  आईचाही विरोधच असतो. वाजदाच्या आईला पहिल्या बाळंतपणात खूप त्रास झालेला असल्याने ती दुसरे मूल होऊ द्यायला तयार नसते. परंतु, वाजदाच्या आजीला, म्हणजे वडिलांच्या आईला, घराण्याला वारस म्हणून नातू हवा असतो. त्यामुळे, वाजदाच्या वडिलांचा दुसरा विवाह होतो. 

स्वकष्टातून सायकल विकत घेण्यासाठी वाजदा अनेक प्रकारे पैसे जमवू लागते. कुराणपठणाची स्पर्धा जिंकल्यास, मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेतून  आपण सहजी सायकल विकत घेऊ शकू , हे तिच्या लक्षात येते. त्यामुळे मोठ्या जिद्दीने आणि डोकेबाजपणे कुराणपठणाचा सराव करून वाजदा ती स्पर्धा जिंकते. बक्षिसाच्या रक्कमेतून स्वतःसाठी सायकल घेणार असल्याचे, ती स्टेजवरून मोठ्या अभिमानाने सांगते. स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य नसलेल्या त्या देशात, जिथे मुलींनी सायकल चालवण्याचा विचार करणेही जणू पाप असते, तिथे सायकल विकत घेण्याचा तिचा हा धक्कादायक निर्णय तिच्या शाळेच्या मुख्याध्यापक बाईंना अजिबात आवडत नाही. त्यामुळे तिच्या बक्षिसाची रक्कम त्या परस्परच धर्मादायी संस्थेला दान करण्याचे जाहीर करून टाकतात. इतक्या प्रयत्नानंतरही आपल्याला आता सायकल मिळणार नाही हे लक्षात आल्यावर वाजदा हिरमुसली होते. पण वाजदाची आई तिच्यासाठी सायकल खरेदी करून तिला आणि प्रेक्षकांनाही शेवटी सुखद धक्का देते.
 
हा सिनेमा मला खूप आवडला. पूर्णपणे सौदी अरेबियात चित्रित झालेला आणि एका स्त्री दिग्दर्शिकेने मोठ्या हिमतीने बनवलेला हा दर्जेदार सिनेमा आवर्जून बघावा असाच आहे. एका व्हॅनमध्ये कॅमेरा ठेवून, चोरीछुपे या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आलेले आहे, असेही वाचनात आले. एका श्रीमंत मुस्लिम राष्ट्रात स्त्रियांकडून अपेक्षित असलेली वर्तणूक, त्यांच्यावर असलेली बंधने, व त्यामुळे समाजातील त्यांचे दुय्य्म स्थान, यावर हा सिनेमा  प्रकाश टाकतो. प्रत्येक विवाहित स्त्रीने मुलगा जन्माला घालून नवऱ्याच्या कुटुंबाची वंशवेल वाढवणे हे अत्यावश्यक असते, हेही त्यातून अधोरेखित होते. आपली आई मुलगा जन्माला घालू शकत नसल्यानेच आपल्या आईवडिलांमध्ये बेबनाव आहे, याचा अंदाज वाजदाला आलेला असतो. केवळ याच कारणामुळे आपले वडील आपल्या आईला सोडून दुसरे लग्न करणार आहेत हेही तिला कळलेले असते. एकदा घरात खेळत असताना, एका फलकावर लावलेली, आपल्या कुटुंबीयांची वंशावळ  वाजदाला दिसते. त्या वंशावळी मध्ये प्रत्येक पुरुषाच्या अपत्यांपैकी फक्त मुलांचीच नावे लिहिलेली असतात. अर्थातच, वाजदाच्या वडिलांच्या नावाखाली कोणाचेच नाव लिहिलेले नसते. वाजदाला ते खटकते आणि ती तिथे आपले स्वतःचे  नाव लिहिते. सिनेमात अगदी सहज दाखवलेला हा प्रसंग माझ्या मनाला फार भिडला. विचाराने मागास असलेल्या राष्ट्रांमध्ये वंशावळी  बाबत हीच संकल्पना रूढ असणार हे जाणून, तिथल्या स्त्रियांबद्दल प्रचंड कीव माझ्या मनात दाटली. 

पण खरी गंमत तर पुढे झाली. माझ्या माहेरच्या कुटुंबीयांची वंशावळ माझ्या पाहण्यात आली. त्यामध्ये पिढ्यानपिढ्या, एकाही 'कन्ये'चे नाव मला दिसले नाही. माझ्या ध्यानात आले की, माझ्या सासरच्या वंशावळीतही माझे नाव असायचे कारण नव्हते. म्हणजे, दोन्हीकडच्या वंशावळींमध्ये कदाचित मला स्थानच नव्हते. आपला समाज पुढारलेला आहे असे आपल्याला कितीही वाटत असले तरी, आपल्याही समाजात स्त्रीला अजूनही  दुय्यम  स्थानच आहे. मुलगा म्हणजे 'वंशाचा दिवा', ही संकल्पना अजूनही आपल्या समाजात मूळ धरून आहे. 


'हम दो हमारे दो' या घोषवाक्याची जागा आता  'हम दो हमारा एक'  या नाऱ्याने घेतली आहे. पहिला मुलगा झाला तर आनंदीआनंद असतो. अशावेळी, एका अपत्यानंतर थांबण्याच्या निर्णयाचे, आप्तस्वकीयांकडून स्वागत होते. पण यदाकदाचित पहिली मुलगी झाली, तर दुसऱ्या 'चान्स'साठी दोन्हीकडचे आप्त त्या नवरा-बायकोच्या मागे लागल्याशिवाय राहत नाहीत. एकापाठोपाठ दोन मुली झाल्या तर 'बिच्चारीला दुसरी मुलगीच झाली' असे वाक्य हमखास ऐकू येतेच. किंवा 'दुसरी मुलगी झाली म्हणून काय झाले? हल्ली मुलीसुद्धा आईवडिलांना म्हातारपणी बघतातच की' असे एखादे 'उत्तेजनार्थ' वाक्य कोणीतरी बोलते. शंभर वर्षांपूर्वी आपल्या समाजात एखाद्या 'पुत्रवती' स्त्रीला जितके महत्व होते, तितकेच महत्व आज आहे असे मला म्हणायचे नाही. किंवा, प्रत्येक पुत्रहीन स्त्रीला आजही डावी वागणूकच मिळते, असेही मला वाटत नाही. पण, एकंदरीत समाजाच्या वैचारिक सुधारणेचा वेग अजूनही मंदच आहे हे खरे. कित्येक घरांमधून, तथाकथित 'वंशाचे दिवे' किती दिवटे निघतात, हे आपल्याला दिसतेच. एखाद्या दिवट्या पुत्राच्या प्रेमात अंध होऊन वाहवलेले पालकही आपण बघतो. परंतु, जर आज आपण मुलगा-मुलगी समान मानतो असे म्हटले, तर निदान वंशावळी मध्ये मुलींच्या नावाचा उल्लेख सहजच यायला हवा. नाही का?

आमच्या मुलीने, तिच्या लग्नानंतर स्वतःचे नाव आणि आडनाव बदललेले नाही. आमची मुलगी आणि जावई ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. तिथल्या पद्धतीप्रमाणे, अपत्य जन्माला येताच त्याच्या नावानिशी त्याची नोंद करावी लागते. तसेच, मुलगा जन्मणार का मुलगी, हे आधी जाणून घेण्याची आई-वडिलांची इच्छा असेल तर, ते त्यांना आधीच सांगितले जाते. त्यानुसार, आमच्या मुलीला मुलगी होणार हे आम्हाला कळलेले  होते. नवजात मुलीचे नाव आणि आडनाव काय ठेवायचे हे आमच्या मुलगी व जावयाने आधीच ठरवून ठेवले होते. आमच्या नातीचे कागदोपत्री नाव आहे 'नूर बापट'. आता जर मी जुन्या पद्धतीप्रमाणे विचार केला तर, 'बापट वंशावळीमध्ये जिथे आमच्या मुलीलाच स्थान नाही तिथे तिच्या मुलीला कसे स्थान मिळणार'? हा प्रश्न मला पडणारच. नाही का?

काल-परवा मी टीव्हीवर एक कार्यक्रम बघत होते. त्यात 'मॅटर्नल लिनिएज' आणि 'पॅटर्नल लिनिएज', यावर शास्त्रीय चर्चा सुरु होती. आई आणि वडिलांकडून त्यांच्या अपत्यांना X आणि Y ही गुणसूत्रे मिळतात. आईच्या पेशींमध्ये दोन X गुणसूत्रे असल्याने, आईच्या बीजातून अपत्याला फक्त X गुणसूत्रच मिळू शकते. मात्र, वडिलांच्या पेशींमध्ये X आणि Y ही दोन्ही गुणसूत्रे असल्याने, होणाऱ्या अपत्याला आपल्या वडिलांकडून X किंवा Y यांपैकी कोणतेही एक गुणसूत्र मिळू शकते. वडिलांकडून जर Y गुणसूत्र आले तर, आणि तरच, पुत्र जन्मतो. आणि वडिलांकडून जर अपत्याला X गुणसूत्र आले तर मुलगी जन्मते. 

चर्चेत पुढे असेही बोलले गेले की, Y हे गुणसूत्र अपत्याला वडिलांकडून, आणि वडिलांना त्यांच्या वडिलांकडून असेच पिढ्यानपिढ्या येत असल्याने, Y गुणसूत्राचा अभ्यास केल्यास 'पॅटर्नल लिनिएज'चा अभ्यास करता येतो. 'पॅटर्नल लिनिएज' ही संकल्पना 'गोत्र' या नावाने आपल्या धर्मात मानली गेलेली आहे. त्यामुळे, एखाद्या कुटुंबातील मुलगाच त्या कुटुंबाचे गोत्र पुढे चालवू शकतो असाही विचार चर्चेत मांडला गेला. इथपर्यंतची माहिती योग्य पद्धतीने सांगितली गेली. परंतु, त्यापाठोपाठ, "सगोत्र विवाह करणे अयोग्य आहे" असे अशास्त्रीय किंवा अंधश्रद्ध भाष्य केले गेले. याबाबत समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे, याची मला जाणीव झाली. नियोजित वर आणि वधू या दोघांच्याही कुटुंबांच्या वंशावळीतील वरच्या तीन पिढ्यांपैकी एकाही पूर्वजाचे दुसऱ्या कुटुंबातील पूर्वजासोबत सख्खे नाते असू नये असे आधुनिक शास्त्र सांगते. म्हणजेच, वरच्या तीन पिढ्यांमध्ये दोन्ही कुटुंबांपैकी कोणीही एकमेकांची सख्खी भावंडे नसतील तर सगोत्र विवाहामध्येदेखील धोका नसतो.

आज हे सगळे आठवण्याचे कारण असे की, स्वतःच्या वडिलांकडून आलेले Y गुणसूत्र धारण करणाऱ्या आमच्या मुलाचा, अनिरुद्धचा आज वाढदिवस आहे. आमच्या परीने आम्ही आमच्या दोन्ही अपत्यांना, म्हणजे XX गुणसूत्रधारक मुलीला आणि XY गुणसूत्रधारक मुलाला, समान वागणूक दिली. हेच जर गणिती सूत्रात मांडले तर XX=XY, म्हणजेच X=Y, असेच आम्ही मानत आलो. तरीदेखील, आमच्यावर आपसूक झालेल्या संस्कारांमुळे, कदाचित आमच्याकडून आमच्याही नकळत काही डावे-उजवे झाले असण्याची शक्यता आहे. 

जेंव्हा संपूर्ण समाज, जनुकीय संदर्भात X=Y हे मानायला लागेल, तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने प्रगत झाला असे म्हणता येईल.

२८ टिप्पण्या:

  1. सत्यस्थिती आहे, कोणताही समाज असलातरी.

    उत्तर द्याहटवा
  2. खरं आहे. आपण आपली मानसिकता बदलायला हवी

    उत्तर द्याहटवा
  3. Great. आम्हीसुद्धा आमच्या मुलीला व मुलाला समानतेने वागवले. पण अजूनही समाजाची प्रगती समानतेच्या दृष्टीकोनातून संथच आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. अत्यंत महत्वाचा विषय, खूप छान लिहिले आहे मॅडम.

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच छान लिहिलंय.
    सध्या हळूहळू पण नक्कीच,
    स्त्री-पुरूष समानतेच्या दिशेनं समाजाची वाटचाल सुरू आहे. तथापि त्याला वेग देण्याचं प्रबोधनात्मक कार्य,
    अशा लेखांमुळेच होईल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ते प्रबोधन होईलच की नाही हे मला सांगता येणार नाही. कारण असले लेख वाचणाऱ्या समाजाला कदाचित या प्रबोधनाची गरजच नसते!

      हटवा
  6. Agadi mazya manatee lihilet ma'am, since childhood I was very sure that I will never change my name... I followed it but I get too many questions on it... few people think I don't get well with my husband....so it is even very difficult for a girl to keep her identity...too much social change is still needed.

    उत्तर द्याहटवा
  7. विषय मनाचा तळ गाठणारा आहे आणि presentation hi अप्रतिम!अजूनही ज्या समाजात ह्या विषयाचे महत्त्व समजलेले नाही तिथे मुलगा होईपर्यंत त्या स्त्रीला अनेकदा मातृत्वाच्या दिव्यातून जावे लागते परिणामी आर्थिक परिस्थिती नसतानाही घरातील मुलांची संख्या वाढते आणि गरिबी,अशिक्षितपणा वाढतो जो देशाच्या सर्वांगीण प्रगतीला घातक ठरतो

    उत्तर द्याहटवा
  8. आपल्या पांढरपेशा, सुशिक्षित समाजातही हे आज होते आहे. मुलगा व्हावा म्हणून अजून नवस काय बोलतात, गर्भारशीला कोणी बुवा फकीर यांच्याकडून आणून काय काय खायला देतात, हे सर्व मी जवळून बघितले आहे. आजही " मॅडम तुमच्या ओळखीने गर्भलिंग निदान कोणी डॉक्टर करून देतील का?" हा प्रश्न मला विचारणारे महाभाग मला भेटतात.

    उत्तर द्याहटवा
  9. स्वाती नेहमी प्रमाणे खूप छान व्यक्त झाली आहेस. हळु हळु बदल होतोय, परंतु अजूनही समाजात सहजासहजी स्विकार केला जात नाही. पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्कारांचा भाग आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल. पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. असेच लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा
  10. अतिशय विचार करायला लावणारं artical.
    अगदी आपल्याही नकळत आपल्याकडून
    स्त्रिपुरूष भेदाभेद होऊ शकतो.ह्या लेखामुळे आपण विचार प्रवण नक्कीच होतो.हे ह्या लेखाचं यश आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. हल्ली थोडाफार फरक झालाय.एकदम नाही होणार बदलहोणार .हल्नली सारख मुलगीहोउ दे याचा .अतिरेक झालेला दिसतो.जे आपल्या हातात नाही ते अमुकच हव हा अट्टाहास खरण्यापेक्षाजे होणार आहे ते सुदृढ असूदे अशी करुन येणार्प्राया बाळाचे आनंदाने स्वागत करावे.

    उत्तर द्याहटवा