गुरुवार, २२ जुलै, २०२१

फॅट बट फिट!

माझ्या एका मैत्रिणीच्या बंगल्यावर आम्ही दहा-बारा शालेय मैत्रिणी जमणार होतो. संध्याकाळचे पेशंट तपासून निघेपर्यंत मला जरा उशिराच झाला होता. बाकी सगळ्याजणी माझ्या आधीच पोहोचल्या होत्या. मी गेल्या-गेल्या, माझ्याकडे बघून माझ्या मैत्रिणींना कमालीचे आश्चर्य वाटले. सगळ्यांनी मला घेरून प्रश्नांची सरबत्ती चालू केली. 

" अय्या, स्वाती कसली स्लिम झाली आहेस! काय केलंस तरी काय? आम्हाला सांग ना" 

"ए, तू दीक्षित केलेस का दिवेकर? सांग ना गं. मी गेले सहा महिने दीक्षित करतेय. पहिल्या दोन-तीन महिने जरा फरक पडला, पण आता काही केल्या काटा हालत नाहीये. अगदी फ्रस्टेट व्हायला होतंय गं" 

"तू काय बाई, डॉक्टर आहेस. तुला सगळंच माहिती असेल. वजन कमी करणं तुझ्यासाठी अगदीच सोप्पं आहे. पण कसं कमी करायचे आम्हाला सांग ना गं."  

मला अगदी कसचं-कसचं होऊन माझ्या पोटात गुदगुल्या होत होत्या. माझा चेहरा अगदी आनंदाने फुलला होता. मी उत्तर द्यायला सरसावले आणि... 

...नेमकी मला झोपेतून जाग आली! 

मनगटावरील 'स्मार्ट वॉच'मधे मी पाहिले, पहाटेचे पाच वाजले होते. ही माझी रोजची जाग येण्याचीच वेळ होती. खरंतर, पहाटेची स्वप्ने सत्यात उतरतात असे म्हणतात. गेली अनेक वर्षे, थोड्याफार फरकाने हे असेच स्वप्न, नेमके पहाटेच्याच वेळी मला पडत आहे. पण अजून एकदाही ते सत्यात उतरलेले नाही. त्यामुळे, 'पहाटेची स्वप्ने खरी ठरतात' या विधानावर माझा अजिबात विश्वास नाही!


गेली कित्येक वर्षे, स्लिम होण्यासाठी अनेक प्रयत्न करून मी अगदी थकून गेले आहे. या सर्व काळांत डाएट,  कॅलरीज, फॅट्स, ट्रान्सफॅट्स असल्या भीतीदायक शब्दजंजाळात मी अडकलेले आहे. प्रत्येक वेळी, एखादा खाद्यपदार्थ समोर आला की हे शब्द माझ्या मनात थैमान घालू लागतात. त्यामुळे घास तोंडाजवळ न्यायच्या आधीच अपराधीपणाची भावना मनाला घेरते. या क्लेशदायक काळात माझे वजन मात्र सातत्याने वाढतच आहे. आणि या दुःखावर डागण्या द्यायला," तू काय डॉक्टर आहेस बाई. तुला काय सगळंच माहिती आहे." अशा टिप्पण्या ऐकायला लागतात. 

खरंतर डॉक्टर असल्याने, वजन, आहार, व्यायाम आणि जीवनशैली याबाबत बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत. त्याशिवाय, गेली सहा वर्षे, तीन-चार फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मेडिसिन व पीडियाट्रिक्स हे विषय मी शिकवते आहे. त्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या, 'स्थूलत्व' या विषयावर लेक्चर घ्यायला मला फार आवडते. स्थूलत्व, त्याची व्याख्या, त्याची कारणे, दुष्परिणाम आणि ते कमी करण्याचे उपाय, यावर अगदी प्रत्येकवेळी सखोल अभ्यास करून मी व्याख्याने देते. पण हे सगळे ब्रह्मज्ञान प्रत्यक्षांत उतरवणे मला अशक्य होतेय. त्यामुळे, 'सगळं कळतंय पण वळत नाही' अशी परिस्थिती आहे. या कारणाने गेली कित्येक वर्षे मनावर एक प्रकारची मरगळ आल्यासारखे झाले होते. 

गेल्या ऑक्टोबरात मात्र ही मरगळ झटकायला मदत करणारा एक छोटा मित्र मला मिळाला. झालं असं, की अमेरिकेत असलेल्या आमच्या मुलाने, अनिरुद्धने, माझ्यासाठी आणि आनंदसाठी प्रत्येकी एक 'फिटबीट व्हर्सा-२' नावाचे स्मार्टवॉच  पाठवले. 'याने उगीचच १०० डॉलर्स खर्च केले' असाच विचार प्रथमदर्शनी माझ्या मनात आला होता. पण आता पोराने विकत घेतलेच आहे  तर वापरू या, अशा विचाराने मी ते वापरायला सुरुवात केली. तेव्हापासून मात्र माझे पूर्ण लक्ष 'फॅटनेस' वरून उडून 'फिटनेस' वर केंद्रित झालेय हे मात्र खरे. 

खरंतर मी अनेक वर्षे' 'फॅट' कॅटॅगरीतच आहे पण, अगदी न चुकता, रोजचा व्यायाम करत असल्याने 'फिट'देखील आहेच. पहाटे उठून आठ-दहा किलोमीटर चालायला जाणे किंवा सुमारे १५-२० किलोमीटर सायकलस्वारी करणे, हा माझा गेल्या अनेक वर्षांचा परिपाठ आहे. व्यायामाचा मला कधीही कंटाळा येत नाही. पूर्वी आमची मुले लहान असताना, माझे व्यायामाचे कपडे, बूट-मोजे आदल्या रात्रीच काढून ठेऊन मी जय्यत तयारी ठेवायचे. पहाटे चार-साडेचारलाच उठून मी पळायला जायचे. मुलाची शाळा साडेसातला भरत असल्यामुळे, साडेसहा वाजेपर्यंत व्यायाम संपवून मला घरी परतावे लागायचे. पण हे सगळे मी अगदी उत्साहाने न चुकता करायचे. पण, माझ्या पसरलेल्या देहाकडे बघून, "मी फिट आहे", हे माझे म्हणणे लोकांना पटतच नाही. 

'फिटबिट वर्सा-२' हातावर बांधल्यापासूनच तो माझा जिवलग मित्र झाला. दिवसाचे चोवीस तास हा मित्र माझ्यासोबतच असतो. त्याच्यामुळे माझ्या फिटनेसचे नेमके मोजमाप मी करू शकतेय, हे मला खूप आवडते आहे. सर्वसाधारणपणे, दिवसभरात मनुष्यप्राण्याने १०००० पाऊले चालणे आरोग्यदायी असते असे म्हटले जाते. फिटबिट माझ्या आयुष्यात आल्यापासून, जवळ-जवळ रोजच मी तेवढी पावले सहजी पूर्ण करते, हे माझ्या लक्षात आले. 

आम्ही असा वैद्यकीय सल्ला देतो की, आठवडाभरात किमान पाच दिवस, रोज ३० मिनिटे moderate intensity चा  किंवा रोज किमान १५ मिनिटे vigorous intensityचा व्यायाम करावा. म्हणजेच आठवडाभरात किमान १५० 'झोन मिनिटां'चा व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. मी करत असलेल्या व्यायामाद्वारे आठवड्यभरात माझी सरासरी २५०-३०० 'झोन मिनिटे' सहजी होत आहेत, असे माझा 'मित्र' मला सांगतो आहे. 

चार महिन्यांपूर्वी कोव्हिड न्यूमोनियामुळे मला रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. माझे स्थूलत्व, साठीच्या आसपासचे वयोमान आणि दम्याचा आजार, या तिन्ही धोकादायक गोष्टींमुळे कोव्हिड न्यूमोनियातून बाहेर पडेस्तोवर मनात थोडीफार धाकधूक होतीच. रुग्णालयातल्या नर्सबाई माझ्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी(SpO2), हृदयाच्या ठोक्यांचा वेग (Heart rate), मी विश्रांती घेत असतानाचा हृदयाच्या ठोक्यांचा वेग(Resting Heart Rate), माझ्या श्वसनाचा वेग(Respiratory rate), हे सगळे दिवसातून दोन वेळा तपासायच्या. पण माझ्या मनगटावर विराजमान असलेला माझा 'मित्र' मला ते सगळे सातत्याने सांगत होता. 

'फिटबिट' मला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देतो, आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेली चांगली माहिती देतो, मी चांगला व्यायाम केला की माझे कौतुक करतो, मी काय खावे आणि काय खाऊ नये याचा सल्ला देतो, मी स्वस्थ झोपते आहे का आणि पुरेशी विश्रांती घेते आहे की नाही? यावर बारकाईने लक्ष ठेवतो, दिवसभरात मी किती कॅलरीज खर्च केल्या आहेत ते सांगतो, मी किती वेळ आणि किती वेगात व्यायाम केला, याची नोंद करून मला दाखवतो, बराच काळ मी एकाजागी बसून राहिले की, "आता उठ आणि  जरा हालचाल कर बरं" असा इशारा मला देतो. असा हा माझा मित्र मी सर्वतोपरीने फिट राहावे म्हणून सातत्याने मदत करत असतो. 

आपल्या एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीलादेखील आपण आपल्या सगळ्या गोष्टी सांगतोच असे नाही. 'मी  दिवसभरात काय काय खाल्ले, किती वाजता आणि किती खाल्ले?' हे सगळे माझ्या या मित्राला मी रोज सांगणे अपेक्षित आहे. त्याने बरेचदा मला तसे विचारून झालेय. पण मी मात्र अजून त्याला ते सांगायला सुरुवात केलेली नाहीये!

त्याला मी रोज फक्त एकच सांगते, 

"फिटबिट्, माय डियर फ्रेंड, डोन्ट वरी. आय विल रिड्यूस माय वेट बिट बाय बिट. अनटिल देन, आय विल रिमेन फॅट बट फिट!" 

१८ टिप्पण्या:

 1. भारी आहे तुझा मित्रं...त्याच्याशी थोडं हातचं राखून लागतेस ,हे पण भारी..

  उत्तर द्याहटवा
 2. काय करावे! वाढता वाढता वाढे. असे चालले आहे खरे! छान वर्णन केले आहेस तुझे अनुभव !.... मेघा

  उत्तर द्याहटवा
 3. 'जाड' कशाला म्हणायचे हे व्यक्तिसापेक्ष असावे. चरबीचे प्रमाण जास्त असलेल्यांना साधारणपणे आपण जाड म्हणतो. (काहींची कातडीच जाड असते. त्याला आपण गेड्यांची कातडी म्हणतो.😀😀) LOL
  पण तू तर 'फिट' पण आहेस.
  छान लिहिलेस.🙏🙏

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. फिटमपण आहेस म्हणजे काय?
   चरबी जास्त आहे असे मीच म्हणतेय...जाड कातडी आहे असं तुला सुचवायचे आहे का? 🤣

   हटवा
 4. वाह as always.....we always look for some motivation to do something & fitbit is one of the best 😊. Definitely fat doesn't mean that the person is not fit 👍

  उत्तर द्याहटवा
 5. आपण बारीक असलो की कीती बारिक जरा जाड हो जाड असल बारिक व्हायला हव.जाड बारिक महत्वाच नसून आपण सर्वकाम व्वस्थित पार पाडतोय.दमत नाही ना त्यामुळे आहे तेच छान म्हणावे.
  बारिक व्हायच नावर घेऊन काही उपाय केले की १ले ५किलो पटकन कमी होत नंतरच नंतरच वजन सलाईन लावल्यावर जस थेंबथेंबा टपकत तस कमी होत.खाण्यापिण्यावरच बंधन मरेपर्यंत ठेवावे लागते .गोड पदारथावर प्रथम घाला.तू साय वर्ज वगैरे.उपयोग किती?ठेविले अनंते तैसेची रहावे.

  उत्तर द्याहटवा
 6. खुमासदार भाषेत मांडलेला एक अत्यंत गहन विषय

  उत्तर द्याहटवा