शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

१. सीमोल्लंघन !

माझे वडील, सोलापूरचे श्री. श्रीकृष्ण गोडबोले वकील, यांना नुकतीच ८८ वर्षे पूर्ण झाली. ते खूप हौशी असल्याने, दरवर्षी कोर्टाच्या प्रत्येक मोठ्या सुट्टीमध्ये लांबलांबच्या सहली आखत असत. जवळजवळ ५७ वर्षांपूर्वी, १९६४ सालच्या नाताळच्या सुट्टीत, सोलापुरातील काही वकिलांबरोबर त्यांनी दक्षिण भारताची सहल काढली होती. त्या सहलीदरम्यान, तामिळनाडूमधील शेणकोटा नावाच्या स्थानकावर त्यांची बोगी, शेणकोटा-रामेश्वर पॅसेंजर गाडीला जोडण्यात येणार होती. परंतु ऐनवेळी तेथील स्टेशन मास्तरांनी त्यांची बोगी गाडीला न जोडता, त्याऐवजी, काही गुजराथी व्यापाऱ्यांची बोगी त्या गाडीला जोडून टाकली. व्यापाऱ्यांकडून थोडी 'वरकमाई' करून घेऊन त्याने तसे केले असावे, अशी माझ्या वडिलांची व त्यांच्या मित्रमंडळींची जवळजवळ खात्रीच झाली होती. सात्विक संतापापोटी सर्व वकिलांनी त्या स्टेशन मास्तरला घेरले आणि त्याच्यावर भरपूर तोंडसुख घेतले. पण तोपर्यंत रामेश्वरची गाडी निघून गेल्याने त्यांचा नाईलाज झाला. 

कालांतराने समजलेल्या बातमीमुळे मात्र सोलापूरच्या त्या सर्व वकील मंडळींना कळेना की, त्या स्टेशन मास्तराचे आभार कसे मानावे. ज्या दिवशी त्यांचा रामेश्वर प्रवास हुकला होता त्याच रात्री, एका अभूतपूर्व चक्रीवादळाने त्या सर्व परिसराला झोडपले होते. रामेश्वर बेटाला भारताच्या किनारपट्टीसोबत जोडणारा पंबन रेल्वे पूल त्या वादळाच्या तडाख्यामुळे कोसळला होता. त्याच वेळी त्या पुलावरून धावत असलेली शेणकोटा-रामेश्वर पॅसेंजर गाडीदेखील समुद्रात कोसळून त्यातील सर्व १५४ प्रवासी ठार झाले होते!

त्या स्टेशनमास्तरच्या 'कृपे'ने माझ्या वडिलांचे रामेश्वर दर्शन जरी चुकले असले, तरी त्यांचा जीव मात्र वाचला होता. १९६४ सालच्या त्या घटनेनंतर माझ्या वडिलांनी अनेक सहली आखल्या, पण रामेश्वरला जाण्याचा त्यांचा योग मात्र पुन्हा कधीच जुळून आला नव्हता. 

तीन वर्षांपूर्वी दिवाळीत, माझ्या आई-वडिलांना रामेश्वरला घेऊन जावे असे आम्ही ठरवत होतो. पण त्याच सुमारास आई आजारी पडल्यामुळे आमचे जाणे रहित झाले. त्यानंतर माझी आई वरचेवर आजारीच होती व शेवटी गेल्या वर्षी ३० एप्रिलला ती वारली. त्याच काळात सर्वत्र लॉकडाऊनही झालेला असल्याने कोणताच प्रवास करणे अशक्य होते. वडिलांची रामेश्वर दर्शनाची इच्छा आहे हे आम्हाला कळत होते. त्यामुळे, कोव्हिडचे निर्बंध जरासे शिथिल झाल्या-झाल्या आम्ही वडिलांसोबत रामेश्वर दर्शनाचा बेत आखला. माझे वडील, मी व माझा नवरा आनंद, तसेच माझा धाकटा भाऊ गिरीश, भावजय प्राची, आणि त्यांचा मुलगा देवाशिष, असे सगळे या सहलीला जाणार होतो. गिरीशने नेहमीच्या उत्साहात मुंबई मदुराई जाण्या-येण्याची विमान तिकिटे, आणि हॉटेल्सची बुकिंग तातडीने करून टाकली.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुण्याहून मुंबईला जाऊन गिरीशकडे मुक्काम करायचा, दसऱ्याच्या दिवशी, १५ ऑक्टोबरला मुंबईहून विमानाने निघून मदुराईला उतरायचे, आणि विमानतळावरूनच टॅक्सीने निघून तडक रामेश्वर गाठायचे, आणि १५ व १६ ऑक्टोबर रामेश्वर दर्शन करून मदुराईला यायचे असे ठरले. १७-१८ तारखेला मदुराईत हिंडून आणि मीनाक्षी-दर्शन करून १९ तारखेला दुपारपर्यंत मुंबईत परतायचे असा एकूण बेत होता. त्यानंतर, माझा चुलतभाऊ, म्हणजेच व्यवसायाने बिल्डर असलेला शिरीष, आणि चुलतबहीण डॉ. ज्योत्स्ना यांनाही आमच्याबरोबर यायचा आग्रह आम्ही केला. ज्योत्स्ना आनंदाने तयार झाली. शिरीष मात्र आढेवेढे घेत होता. एकदा गमतीने तो असेही म्हणाला, "रामेश्वरला जाण्याइतके काही माझे वय अजून झालेले नाही." मग मीही त्याला चेष्टेखोरपणे म्हणाले, "अरे आमची ट्रीप स्पॉन्सर करायला आम्हाला तुझ्यासारखी 'बडी मछली' पाहिजेच आहे!" बराच आग्रह केल्यानंतर शिरीष आमच्याबरोबर यायला राजी झाला. त्यानंतर त्या दोघांची विमान तिकिटे काढली व हॉटेलचे जास्तीच्या खोल्यांचे बुकिंगही करून टाकले. 

माझे वडील, मी, आनंद, ज्योत्स्ना, आणि शिरीष असे सर्वजण १४ ऑक्टोबरला संध्याकाळी पुण्याहून निघालो. शिरीषच्या मोठ्या 'पाजेरो' गाडीतून अगदी अलगद प्रवास झाला. पुणे-मुंबई 'एक्सप्रेस वे' वर नवीनच झालेल्या फूड मॉल मध्ये मस्त खादाडीही झाली. 

१४ ऑक्टोबरला सकाळीच आम्हाला समजले होते की, तामिळनाडू सरकारच्या नियमावलीनुसार, रामेश्वर मंदिर फक्त सोमवार ते गुरुवार असे चारच दिवस दर्शनासाठी खुले असणार होते. ठरलेल्या बेताप्रमाणे आम्ही १५ तारखेला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी उशिरा रामेश्वरला पोहोचणार होतो. ही नवीन माहिती कळल्यानंतर आम्ही आमचा बेत बदलला आणि १५-१६ ऑक्टोबर मदुराईतच मुक्काम करून, १७-१८ ऑक्टोबर रामेश्वर करायचे असे आम्ही ठरवले. निदान सोमवारी, म्हणजे १८ तारखेला तरी रामेश्वर दर्शन होऊ शकेल, या कल्पनेने आम्हाला जरा हायसे वाटले. 

देवशिषने तत्परतेने हॉटेलची बुकिंग्स बदलून घेतली. बदललेल्या प्लॅनप्रमाणे, १५-१६ ऑक्टोबर मदुराईमधील पर्यटन स्थळे पाहायची आणि मीनाक्षी दर्शन करायचे असे ठरले होते. पण १४ ऑक्टोबरला संध्याकाळी आम्हाला आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली. तामिळनाडूमधील सगळीच मंदिरे शुक्रवार ते रविवार बंद असणार होती. इतक्या दूरचा प्रवास करून मदुराईचे सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर पाहता येणार नाही याचे आम्हाला सर्वांनाच फार वाईट वाटले. "मीनाक्षी-दर्शन नाही तर नाही, रामेश्वर-दर्शन तर होणारच आहे. शुक्रवार-शनिवार मदुराईच्या रिसॉर्ट मध्ये पत्ते खेळू, गप्पा मारू, आणि आराम करू" अशी आम्ही आमच्या मनाची समजूत घातली. 

वृद्ध वडिलांना इतक्या दूर घेऊन जात असल्याने त्यांना काही त्रास न होता आमची सहल निर्विघ्न पार पडावी अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही सर्व माहितगारांकडून मदुराई व रामेश्वरची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या एका बालरुग्णाचे वडील, श्री श्याम, सौ. गीता नावाची माझी मैत्रीण, आणि कर्नल रामकृष्ण व कर्नल गणपती नावाच्या आनंदच्या दोन मित्रांची या बाबतीत खूपच मदत झाली. श्री. श्याम यांनी तर मदुराईच्या श्री. गणेश नावाच्या त्यांच्या एका मित्राशी माझे बोलणेच करून दिले. श्री. गणेश म्हणाले की, "सध्या राज्यातील सगळी मंदिरे शुक्रवार ते रविवार बंद असली तरी इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरचे निर्बंध कधीचेच उठवले आहेत. त्यामुळे हिंदू देवळावरचे निर्बंधही उठवण्यासाठी हिंदू भाविक तामिळनाडू सरकारवर दबाव आणत आहेत." एक-दोन दिवसातच हे निर्बंध उठवले जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. 

१५ तारखेला आम्ही विमानात बसण्यापूर्वीच श्री. गणेश यांनी आम्हाला आनंदाची बातमी दिली की, तामिळनाडू सरकारने सर्व मंदिरे दर्शनासाठी संपूर्णपणे खुली केली आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही महाराष्ट्र राज्याचे सीमोल्लंघन केले. आमच्या तिकिटावर विमानातील खाद्यपदार्थ फुकट मिळू शकणार असल्याची सुवार्ता इंडिगो च्या हवाई सुंदरीने आम्हाला दिली. घरून नाश्ता करून निघालेलो असलो तरीही विमानातील सुकामेवा, चिकन नूडल्स आणि वाफाळती कॉफी अशा सर्व गोष्टींचा आस्वाद आम्ही घेतला. अतिशय सुखद असा विमान प्रवास झाल्यावर मदुराई एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीची वाट बघत उभे असताना, तेथील हवेचा दमटपणा आणि उन्हाचा तडाखा आम्हाला अधिकच जाणवला. दोन टॅक्सी करून, एअरपोर्टपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या, ताज ग्रुपच्या "द गेटवे हॉटेल" नावाच्या रिसॉर्टमध्ये आम्ही पोहोचलो. पसुमलाई नावाच्या टेकाडावर वसलेल्या त्या रिसॉर्टमध्ये  पोहोचेपर्यंत दुपारचे दोन-सव्वा दोन वाजले होते. सर्वांनाच प्रवासाचा शीण जाणवायला लागला होता. हिरवीगार वनराई, पक्ष्यांची किलबिल, धिटाईने इतस्ततः हिंडणारे अनेक मोर, आणि तेथील प्रशस्त वातानुकूलित खोल्यातील उबदार पलंग, असे सर्व निवांत वातावरण पाहताच, उरलेला दिवस आरामात लोळून काढण्याबाबत सगळ्यांचे एकमत झाले. 


थोड्या विश्रांतीनंतर आम्ही त्या रिसॉर्टचा परिसर हिंडून बघितला. तिथल्या माणसाळलेल्या मोरांना आपल्या हाताने खाणे भरवायला फारच मजा येत होती. इकडे-तिकडे हिंडून आम्ही बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले. संध्याकाळच्या चहानंतर, एकीकडे आय. पी. एल. ची फायनल मॅच बघत, तास दोन तास रमी खेळलो. रात्रीचे जेवण झाल्यावर मात्र सगळ्यांच्याच डोळ्यावर निद्रादेवीने आपले उबदार पांघरूण घातले. 

(क्रमशः)

३१ टिप्पण्या:

  1. स्वाती छान लिहिलेस नेहमीप्रमाणे. मीनाक्षी मंदिर, रामेश्वर , धनुष्यकोडी येथील फोटो, व्हिडिओ पोस्ट कर, मी बऱ्याच वर्षांपूर्वी गेलो होतो. तो फार निसर्ग रम्य प्रदेश आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरंय. खूपच रम्य प्रदेश आहे!

      हटवा
    2. स्वाती नेहमी प्रमाणेच उत्तम लेख आहे.पुन्हा एकदा रामेश्वर चे दर्शन तुझ्या लेखणी तून झाले.अशीच लीहित रहा.👌👌👌👌👌

      हटवा
  2. अन् मी वाटच पहात होते. खूप दिवसांनी वाचायला मिळालं. पाठवत रहा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुम्ही असे प्रोत्साहन देता.. त्यामुळे लिहायला हुरूप येतो!

      हटवा
  3. प्रवास वृत्तान्त वाचल्यावर खरेच हा बघायचा राहिलेला प्रदेश बघायची इच्छा झाली... मेघा

    उत्तर द्याहटवा
  4. नेहमी प्रमाणेच तुमच्या लिखाणा मधला खेळकरपणा खुप छान वाटला.... सुंदर लिखाण..... लिखणामधील उत्सुकता ही सगळ्यांना प्रोत्साहित करणारी असते...... धन्यवाद मॅडम 👍🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुम्ही वाचता आणि प्रतिसाद देता यामुळे मलाही खूप छान वाटते.

      हटवा
  5. परत एकदा मनाने मी मदुराई ला पोचले

    उत्तर द्याहटवा
  6. छानच लिहीले आहेस….
    लेखाचा उत्तरार्ध लवकरच post कर.
    आमची ही सहल हुकली असे वाटणार नाही 😂

    उत्तर द्याहटवा
  7. God is great we can't read his plans or even understand his methodology of execcution of plans Dada Godbole must have done excellent work in his life to get reward like this and children like you

    उत्तर द्याहटवा
  8. अतीशय सुंदर वृत्तांत,
    माझ्या आठवणींचा खजिना ताजा झाला.
    Shenkottai ला भेट दिली की नाही.
    तुम्ही सांगितलेल्या जागी मदुरा कोट मध्ये काही वेळा तिथल्या मित्र अधिकार्‍यांनी भेट द्यायची संधी मिळाली होती,
    GOKAK Mills, ITC,चहाच्या मळ्यात प्रबंधक बंगले खरोखर लाट साहेबांनी किती विलासी जीवन जगले होते याची कल्पना येते.
    तुम्हाला कधी शक्य झाले तर रामलिंग (yedshi) च्या बार्शी लाइट रेल्वे ऑफिसर रेस्ट हाऊस ला पण भेट द्या.
    परवानगी Sr. DRM सोलापूर ह्यांच्या कडून मिळेल जर एखादे रेल्वे प्रादेशिक सेना अधिकारी तिथे असतील तर काम ताबडतोब फत्ते होईल किंवा रेल्वे दंडाधिकारी सुद्धा वडील वरीष्ठ वकील असल्याने सहयोग करू शकतील अनुभव एकदा घ्यायला हवा.
    अप्रतिम ब्लॉग.

    उत्तर द्याहटवा