सोमवार, ७ मार्च, २०२२

मी तर घरीच असते!

अलीकडेच कुठल्याशा समारंभात एका मध्यमवयीन बाईंशी माझी कोणीतरी ओळख करून दिली. त्यांचा नवरा उच्च्पदस्थ अधिकारी होता. बोलताना सहजच  मी त्या बाईंना विचारले,
"तुम्ही काय करता?"
अगदी कसनुसं हसून त्या म्हणाल्या,
"तशी मी डबल ग्रॅज्युएट झालेली आहे. पण मी घरीच असते."

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि बोलण्याचा सूर, त्यांच्यातला न्यूनगंड दर्शवत होते. त्या बाईंशी बोलत असतानाच मला सौ. सिन्हा आठवल्या. 

पंधरा-सोळा वर्षांपूर्वी आनंदचे पोस्टिंग दिल्लीला होते. मुलांना घेऊन मी पुण्यातच राहत होते. असिलताने, आमच्या मुलीने, नुकतेच भारताच्या ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड संघात स्थान मिळवून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गणित ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय शिबिरातही तिची निवड झालेली होती. ही सर्व माहिती आनंदबरोबर काम करणाऱ्या एका बिहारी सेनाधिकाऱ्याला समजली. त्याच्या ओळखीतल्या, श्री. सिन्हा या सनदी अधिकाऱ्याचा मुलगादेखील त्याच स्पर्धांसाठी तयारी करत होता. असिलताची यशोगाथा त्या सेनाधिकाऱ्याने सिन्हा कुटुंबियांना सांगितली असणार.

थोड्याच दिवसात मला सौ. सिन्हा यांचा दिल्लीहून फोन आला. "तुमच्या मुलीने या परीक्षांची तयारी कशी केली? कोणकोणती पुस्तके वापरली?" त्या फोनवर मला प्रश्न विचारू लागल्या. माझी उत्तरे त्या लिहून घेत होत्या. 

चार दिवसांनी परत सौ. सिन्हांचा मला फोन आला. त्या स्पर्धापरीक्षांची काही पुस्तके दिल्लीमध्ये उपलब्ध नसल्याने, ती पुण्यात विकत घेऊन, मी  त्यांना पार्सल करावीत अशी विनंती त्यांनी मला केली.  

मुलांना सुट्टी लागत असल्याने दोनच दिवसांनी, मी आणि मुले दिल्लीला जाणार होतो. त्यामुळे, पुस्तके सोबतच घेऊन येईन असे मी त्यांना सांगितले.
 
दिल्लीला पोहोचल्यानंतर मी सौ. सिन्हांना फोन केला. 
 
"स्वातीजी, क्या आप किताबें भिजवा सकती हैं? या फिर आप स्वयं लेकर हमारे घर आईए ना। उसी बहाने मिलना भी हो जाएगा। असलमें, मेरे घरमें कई बच्चे पढ रहें हैं, नहीं तो मैं स्वयं किताबे लेने आ जाती।" 
बाईंनी अत्यंत मृदू स्वरात मला सांगितले. 

"ही 'कई' बच्चेकंपनी कुठून आली?" हा प्रश्न मला पडला पण सौ. सिन्हांच्या मुलाचे मित्र त्याच्याबरोबर अभ्यास करत असतील असा विचार मी केला. ठरलेल्या वेळी मी त्यांच्या घरी गेले. दिल्लीतल्या रामकृष्णपुरम या भागात, सरकारी अधिकाऱ्यांच्या वसाहतीत त्यांचा खूप मोठ्ठा चार बेडरूमचा फ्लॅट होता. प्रशस्त दिवाणखान्याची अगदी साधी सजावट होती. चारही बेडरूम्सची दारे बंद होती. 

सिन्हा बाईंनी हसतमुखाने  माझे स्वागत केले. चहापानाबरोबर आमच्या गप्पा सुरु झाल्या. बोलण्या-बोलण्यात त्यांनी मला  सांगितले,
"मैं घरमेंही रहती हूँ। सब बच्चोंकी पढाई, खाना-पीना, किताबें, नोट्स सब मुझे देखना पड़ता है। कुछ बच्चों को मैं गणित सिखाती भी हूँ।"

उत्सुकतेपोटी, शेवटी मी त्यांना त्यांच्या "बच्चेकंपनीबद्दल" विचारलेच. 

"हमारा इकलौता बेटा है, जो हमारी बेडरूम में पढ रहा है। बाकी तीनों बेडरूम में दूसरे बच्चे पढ रहें हैं।"

सौ. सिन्हांनी मला पुढे सांगितले की, एका बेडरूममध्ये यूपीएस्सीची तयारी करणारे तीन तरुण, दुसऱ्या बेडरूममध्ये मेडिकलची तयारी करणारी दोन मुले, तर तिसऱ्या बेडरूममध्ये आय.आय.एम. च्या प्रवेशपरीक्षेची तयारी करणारी काही मुले होती.

"हा प्रकार तरी काय असेल?"  मी बुचकळ्यात पडले होते. 

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून सिन्हा बाईंनीच खुलासा केला. 

श्री. सिन्हा बिहारमधील अगदी गरीब कुटुंबात जन्मलेले, पण जात्याच हुशार होते. नोकरी करत-करत ते पदवीधर झाले आणि नंतर दिल्लीला आले. दहा-बारा बिहारी मुलांबरोबर ते एका खोलीत राहिले. अर्धवेळ नोकरी करून, स्वहस्ते जेवण शिजवून खात, कष्टाने अभ्यास करून श्री. सिन्हा पहिल्याच प्रयत्नात  यूपीएससी परीक्षा अव्वल दर्जाने उत्तीर्ण झाले आणि सनदी अधिकारी म्हणून दिल्लीतच रुजू झाले. 

सिन्हा पती-पत्नींनी लग्नानंतर, त्यांच्या नात्या-गोत्यातल्या, ओळखीपाळखीच्या अनेक हुशार मुलांना दिल्लीत आपल्या सरकारी निवासात ठेऊन घेतले. त्यांच्या घरीच राहून, अभ्यास करून अनेक मुले सनदी अधिकारी झाली, कित्येक मुले आयआयटी, आयआयएम मध्ये दाखल झाली.  

सिन्हा साहेब बढती मिळवत, उच्च पदांवर चढत गेले तरी सिन्हा पती-पत्नींनी त्यांचा शिरस्ता तसाच चालू ठेवला. पुढे-पुढे तर बिहारच्या खेड्यातील, अनेक अनोळखी होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना हुडकून आणून त्यांनी आपल्या घरी ठेऊन शिकवले. 

मी अवाक झाले. आणि मग मला जाणवले, सिन्हा बाईंच्या, "मैं घरमेंही रहती हूँ।" या वाक्यामध्ये कमीपणाचा कुठेही लवलेश नव्हता, उलट खूप अभिमान होता. 

"मी घरीच असते" असे सांगताना स्त्रियांच्या बोलण्यातला कमीपणाचा भाव मला नेहमीच खटकतो. आपल्या आधीच्या पिढ्यांमधल्या बहुतांश बायका घरीच असायच्या.   

माझी आई सतत स्वयंपाकघरात आणि आल्या-गेल्यांचे आगत-स्वागत करण्यात व्यग्र असायची. माझ्या सासूबाई शिवणकाम, विणकाम, वाचन याबरोबरच घरात मुलांची शिकवणीही घ्यायच्या. माझी मोठी काकू तिच्या मोलकरणीच्या मुलांना इंग्रजी बोलायला शिकवायची. तसेच, माझ्या आत्या, मावशा आणि इतरही कितीतरी बायका घरीच असायच्या. सुस्थितीत असलेल्या या सगळ्या बायका, मुलांचे संगोपन, स्वयंपाक, घरची टापटीप अशा कितीतरी गोष्टी करायच्या. अनेक बायका, गृहउद्योग करून आपापल्या संसाराला हातभार लावताना आपण  बघतोच. 



"मी तर घरीच असते!" हे कमीपणाने सांगणाऱ्या स्त्रियांना मला नेहमीच सिन्हा बाईंचे उदाहरण सांगावेसे वाटते. तसेच हेच वाक्य, मोठ्या अभिमानाने उच्चारता येईल, असे काहीतरी  करा असे त्यांना सुचवावेसे वाटते.

वर्षातला एखादाच दिवस 'महिला दिन' म्हणून साजरा करण्याऐवजी, एकही महिला कधीही 'दीन' कशी होणार नाही, याचा विचार करणे मला अधिक महत्वाचे वाटते.    
 
 


६४ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. खूपच छान विचार, विचारांची प्रगल्भता जाणवते

      असे विद्यारथी शाळेला लाभले ,ही खूप मानाची गोष्ट आहे

      हटवा
  2. महिला दिनाच्या शुभेच्छा advance देतो, उद्या खंडपीठात महिला वकील भगिनी साठी बार असोशिअन् मोठा कार्यक्रम घेत आहे. हा ब्लॉग दाखवुन योग्य बोध घ्या असं सुचवेन

    उत्तर द्याहटवा
  3. व्वा! काय बोलणार, स्वाती!! आता तुझं कौतुक कसं करू?
    हे म्हणजे एखाद्या दिग्गज व्यक्तिमत्वाचं साध्या शब्दांत वर्णन केल्यासारखं होईल. थोडक्यात शब्द संपले आहेत,माझे.
    आता फक्त त्रिवार नमस्कार!
    So simple but so sweet, dear SWATI.

    उत्तर द्याहटवा
  4. सहमत👍 स्वतः चं अवमूल्यन स्रिया स्वतःच करतात

    उत्तर द्याहटवा
  5. वा! दरवेळी नवीन आणि सुयोग्य विचार येतो तुझ्या ब्लॉगमधून. ग्रेट!

    उत्तर द्याहटवा
  6. सिन्हा बाई तर ग्रेटच आहेत पण तूझं शब्दांकन नेहमी प्रमाणे खूप छान आहे.

    आदर्श घ्यावा अशी सिन्हा जोडी आहे....!!!

    उत्तर द्याहटवा
  7. Yessss... swati mam khupach sundar lekh ahe apratim��������..streeyani .. mi gharich ahe... he sangtana kadhihi kamipana Balgu naye...asa ha lekh ahe

    उत्तर द्याहटवा
  8. खुप छान मॅडम.
    महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻😌

    उत्तर द्याहटवा
  9. स्वाती, सर्व गृहिणीच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत, मी हे आयुष्य जगले आहे, आणि कसल्याही प्रकारचा न्यूनगंड मला नाही 😊

    उत्तर द्याहटवा
  10. स्त्रिया घरी असल्यातरी कधीच रिकाम्या बसत नाहीत काहीना काही करत असतात ,छान लेख

    उत्तर द्याहटवा
  11. नेहमी प्रमाणे उत्तम लिखाण.
    महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  12. खरं आहे.
    पण वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणाऱ्याही अनेकजणी असतात.

    उत्तर द्याहटवा
  13. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता l यत्र एतास्तु न पूज्यन्ते तत्र सर्वम असफला   क्रिया lSwatee,Wish you a very happy woman's day.In our society women are respected more so, if they are so called "professionally " qualified.But 'Homemakers' are nothing less and should be respected equally.Swatee,the theme is very well positioned in your blog.Keep it up.God bless you.

    उत्तर द्याहटवा
  14. अशा व्यक्तींच्या सहवासात येण्याचं भाग्यच म्हणावं लागेल, जगात कितीतरी लोकं अशी समाजसेवा करीत असतात, त्यांना नमन 🙏

    उत्तर द्याहटवा
  15. वा स्वाती, तुझे लेख नुसते छानच नाही तर प्रेरणादायी असतात. इतरांचं कर्तृत्व अशा नेमक्या शब्दांत सगळ्यांसमोर आणणाऱ्या तुझाही अभिमान वाटतो..

    उत्तर द्याहटवा
  16. अप्रतिम👌 खूपच सुयोग्य विचार, स्वाती..
    तुझ्या लेखणीतून महिला दिनानिमित्त दिलेले उदाहरण व मांडलेले विचार नारीशक्तीचे उत्तम दर्शन घडवतात..
    नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर लेखन..👌💐💐

    उत्तर द्याहटवा
  17. आताच आया व गया लेख वाचला व प्रतिसाद दिला. तो लेख वाचुन *तशी माणसे कमी झालीयत* अशा आशयाच जे लिहील , त्याला सुखद तडा गेला. सौ. सिन्हा व श्री, सिन्हा यांची कृतीशील जाण वाचुन मनस्वी आनंद झाला. ही सहका-याची भावना अजुनही खेड्यातुन आलेल्यांमधे जास्त प्रमाणात दिसुन येते. वास्तविकतः ही भावना सर्वांनीच जोपासणे गरजेचे वाटते.अशा बाबी समोर आणुन खूप छान करतेयस. सुंदर शब्दांकन . धन्यवाद . मित्रगोत्री

    उत्तर द्याहटवा
  18. Some time staying at home is more important than working for gain.Many things are included in the word I am at home.

    उत्तर द्याहटवा
  19. Very nice Dr Swatee, your blogs are so different and equally interesting to read. Thank you!

    उत्तर द्याहटवा
  20. खुप छान लिहले आहेस, सौ.सिन्हाचे कौतुक करावे तेवढे कमीच!!

    उत्तर द्याहटवा