या लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला जरा आश्चर्यच वाटले असेल. गावाकडच्या मराठी भाषेमध्ये 'रताळ्या' हा एक तुच्छतादर्शक शब्द आहे. साधारणपणे एखाद्या रेम्याडोक्याच्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो. खेडयापाडयात, एखाद्या पुरुषाने तरुणींची छेडछाड केली तर, चिडून जाऊन, त्या पुरुषाला कधीकधी 'का रे, ए रताळ्या, तुला काही आई बहिणी नाहीत का?' असे मुली दटावतात.
त्याचप्रमाणे, एखाद्याला कचऱ्यात काढणे, म्हणजे कस्पटासमान समजणे, या वाक्प्रचाराचा अर्थही अपमानास्पद असाच आहे.
व्हॅट्सऍप आणि फेसबुकवर बागकामविषयक चर्चा व मार्गदर्शन करणाऱ्या काही ग्रुप्सची मी सदस्य आहे. "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" हा फेसबुक ग्रुप मला आवडतो. या ग्रुपवरील सदस्यांच्या पोस्ट आणि त्यावर चाललेली चर्चा वाचून, मला बागकामाविषयी खूप चांगली माहिती मिळते.
माझ्या गच्चीवरच्या बागेत, थर्माकोलच्या एका डब्यात लावलेली रताळी शिवरात्रीच्या निमित्ताने मी काढली. त्या रताळ्यांचे वजन सुमारे दीड किलो भरले. वजनकाट्यावर ठेवलेल्या त्या रताळ्यांचा फोटो मी काढला, आणि "आज एका थर्माकोलच्या डब्यातली रताळी काढली! मातीविरहित बागेतून आलेले पीक!" अशा शीर्षकाखाली तो फोटो, "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" या ग्रुपमध्ये टाकला. त्यावर अनेकजणांनी कौतुक केले व मातीशिवाय रताळी कशी उगवली? असा प्रश्न मला विचारला. उत्तरादाखल मी खुलासा केला होता.
लोकांनी फेकून दिलेल्या थर्माकोलच्या, पत्र्याच्या, व प्लॅस्टिकच्या डब्यांमधे रोपे लावून, आमच्या इमारतीवरच्या गच्चीमध्ये मी माझी बाग उभी केली आहे. तिथेच, प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या कचराकुंड्या आणि थर्माकोलच्या डब्यांमध्ये मी कंपोस्ट तयार करते. त्या डब्यांमधे आणि कचराकुंड्यांमध्ये मी गांडुळे सोडलेली आहेत. त्यामुळे गांडूळखत व कंपोस्ट एकत्रच तयार होत असते. ते चाळल्यावर खाली जी खतमिश्रित माती मिळते त्यातच मी भाजी-पाला लावते. चाळणीत उरलेला चाळ एका मोठ्या थर्माकोलच्या डब्यात मी साठवते.
साधारण दीड वर्षांपूर्वी, माझ्या आतोबांनी, त्यांच्या बागेतल्या रताळ्याच्या वेलाचा एक लांबलचक तुकडा मला दिला. ते रोप लावण्यासाठी एकही रिकामा डबा त्यावेळी माझ्याकडे नसल्यामुळे, वेलाचा तो तुकडा मी पाण्यात घालून ठेवला होता. काही दिवसातच त्याला पुष्कळशी मुळे फुटली. अखेर, त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे कापले आणि खताचा चाळ साठवलेल्या डब्यात खुपसून ठेवले.
गंमत म्हणजे, ती रोपे तिथे रुजली. त्यानंतरही मी त्या डब्यात चाळ व पाणी घालतच राहिले. मागच्या वर्षी दोनवेळा रताळ्याचा वेल उपसून, त्याखाली लागलेली रताळी मी काढली होती. पण, गेल्या सात-आठ महिन्यांत मात्र मी रताळी काढली नव्हती.
यावेळी आलेली ती सणसणीत रताळी बघून मला आनंद झालाच, पण इतरांनीही कौतुक केल्यामुळे तो द्विगुणित झाला. रताळ्याचा वेल लावलेल्या डब्यात चाळ, म्हणजेच झाड-पाल्याचे मोठे-मोठे तुकडे, असल्यामुळे त्या डब्यात हवा खेळती राहिली होती . तसेच, गांडुळांच्या अविरत कार्यामुळे तेथे गांडूळखतही तयार होत राहिले होते. त्यामुळेच त्या रोपाला भरपूर पोषण मिळून जोरदार पीक आले असावे, असा निष्कर्ष मी काढला .
आतोबांकडून आणलेल्या त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे, शिरीष गोडबोले या माझ्या सोलापूरस्थित भावालाही दिले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी, शिरीषने त्याच्याकडे उगवलेल्या रताळ्यांचा एक फोटो मला पाठवला. रताळ्यांचे आकारमान लक्षात यावे म्हणून त्याने त्या रताळ्यांच्या शेजारी एक बॉलपेन ठेवले होते. "डाव्या बाजूचे कचऱ्यातले, आणि उजव्या बाजूचे मातीतले" अशी तुलनात्मक टिप्पणी फोटोखाली त्याने लिहिली होती. कचऱ्यात उगवलेले ते धष्टपुष्ट रताळे बघून मी पटकन म्हणून गेले, "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!"
एखादे पीक काढणे म्हणजेच एखादे पीक घेणे, असा एक अर्थ अभिप्रेत असतो. पण, "रताळ्या", आणि "कचऱ्यात काढणे" यांचा बोली भाषेतला अर्थ, आणि "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!" या वाक्यामधे मला प्रत्यक्षात अभिप्रेत असलेला अर्थ, यांच्यामधला विरोधाभास लक्षात आल्याने मला खूपच मजा वाटली.
अचानकच झालेल्या या शाब्दिक कोटीमुळे, मायमराठीबद्दल अभिमानही माझ्या मनात दाटून आला.
मराठी भाषेचे गुणगान 'मराठी राजभाषा दिनी'च झाले पाहिजे, असे काही नाही! हो ना ?
छान! सगळ्या रताळ्यांना रताळी दे.
ReplyDelete🤣🤣
ReplyDeleteगोली मार भेजे मे हे श्री शिरीष कणेकरांचे पुस्तक अर्धे वाचून झाले होते, तुझा ब्लॉग येत आहे असा msg ग्रुप वर आला, पुस्तक बाजुला ठेवून ब्लॉग वाचला. तुही भन्नाट लिहितेस खरं. इंटरेस्टिंग आहे.
ReplyDeleteधन्यवाद नितीन!
Deleteव्वा! सुरेख! रताळ्याचे पिक ही आणि लेखही! खूपच छान लिहिलंस. नेहमीप्रमाणे. सहज जागी झाले ते टक्कच अगदी.
ReplyDeleteमोबाईल वर तुझा ब्लॉग दिसला आणि वाचला.
मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे तुझं लेखन.
धन्यवाद अनु!
ReplyDeleteवा छान.
ReplyDeleteलेख
लेखीका
रताळी.
Yes, anything is possible!
Deleteआजची महाशिवरात्र रताळ्याची का असे लिहिताना मलाही हा दुसरा अर्थ अभिप्रेत होता
Deleteकष्टाचे फळ
ReplyDeleteचॅन लेख
धन्यवाद
Deleteखरंच कमाल आहे ...तुम्ही कचऱ्यातून काढलेल्या रताळ्याची अन खुसखुशीत लिखाणाची
ReplyDeleteधन्यवाद अंजली!
ReplyDeleteवा.. कमाल! रताळी आणि लेख दोन्ही दमदार!
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteछान झालाय ब्लॉग. रताळ्यात औषधी गुणधर्म असतात असं ऐकून आहे. त्याबद्दलही लिहिलं असतं तर बरं झालं असतं.
ReplyDeleteरताळी अशी उगवण्याचे काम मस्त आणि त्यावर लिहिलेला लेखही मस्त☺️
ReplyDeleteLekhache shirshak, Lekh v Ratali sarech khumasdar. Hardik abhinandan. Please do keep up the bagkam and also writing.
ReplyDelete