शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

३. मलाबारची सफर- बेकलचा किल्ला


कासारगोडमधील सिटी टॉवर्स हॉटेलच्या खोल्या तशा टिचक्या होत्या पण अगदी स्वच्छ आणि नेटक्या होत्या. वामकुक्षी घेऊन ताजेतवाने झालेले सर्व प्रवासी साडेचारच्या सुमारास तळमजल्यावरच्या रेस्टोरंटमध्ये जमलो. चहा प्यायल्यानंतर  सर्वांना अजूनच तरतरी आली. त्यानंतर आम्ही सगळेजण बेकल किल्ला बघायला गाडीमधून निघालो. आमच्या हॉटेलपासून किल्ला साधारण १६-१७ किलोमीटर अंतरावर होता. सुमारे अर्धातास प्रवास केल्यानंतर आम्ही बेकल किल्ल्यापाशी पोहोचलो. 

बेकलचा किल्ला हा केरळमधील सर्वांत मोठा आणि अत्यंत महत्वाचा सागरी किल्ला आहे. फार पुरातन काळापासून मलबार किनारपट्टीमधे बेकल हे महत्त्वाचे बंदर होते. तिथे पूर्वी कोळाथरी राजवटीने बांधलेला एक साधा किल्ला होता, असे म्हटले जाते. पण आत्ताचा हा दणकट किल्ला, शिवाप्पा नायक या राजाने १६५० साली बांधला. १७६३ साली हा किल्ला मैसूरचा सुलतान हैदर अली याने जिंकला. हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान याने बेकलच्या किल्ल्यामध्ये तळ ठोकून मलबार पट्टी काबीज केली. पुढे बरीच वर्षे हा किल्ला टिपू सुलतान याची अत्यंत महत्वाची सैन्यछावणी होती. १७९९ साली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या युद्धामध्ये टिपू सुलतान मारला गेला. त्यानंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यातच राहिला. या ऐतिहासिक महत्वापेक्षाही बेकल किल्ल्याचे महत्व अलीकडच्या काळात एका वेगळ्याच कारणामुळे वाढलेले आहे. दिग्दर्शक मणिरत्नम याच्या 'बॉंबे' या सिनेमातील 'तू ही रे, तेरे बिना मैं कैसे जिऊं...' या सुमधूर गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण, या किल्ल्यामध्ये झाले आहे. बेकल किल्ल्यावरचे आमचे फोटो मित्र-मैत्रिणींना आणि मुलांना पाठवल्यावर, त्यांच्याकडून ही माहिती मला कळली.     

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराभोवती खंदक आहे, आणि बाकी तिन्ही बाजूने तो अरबी समुद्राने वेढलेला आहे. नागमोडी वळण घेत आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश करावा लागतो. चाळीस एकरवर पसरलेला हा किल्ला जवळजवळ समुद्रात घुसलेला आहे असेच वाटते. आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास किल्ल्याच्या आत पोहोचलो. ऊन उतरलेले असल्याने, तिथले वातावरण आल्हाददायक होते. आम्ही भर पावसाळ्यात तिथे गेलेलो असूनही आम्हाला पाऊस लागला नव्हता, पण मान्सूनमधले समुद्री वारे भरभिरत होते. हवेमध्ये ओलसर गारवा होता. किल्ल्याच्या आत सगळीकडे हिरवाई होती. त्यात भर म्हणून, अनेक मोर डौलदार चालीत इकडे-तिकडे फिरत होते, झाडा-झुडुपांवरून उड्या मारत होते. तिथल्या हिरवाईमुळे, केकावलीमुळे, समुद्राच्या लाटांच्या गाजेमुळे आणि तुफान वाऱ्यामुळे  वातावरणांत एकप्रकारची धुंदी आली होती. 

आमचे दादा आता नव्वदीला आलेले असले तरीही छान चालते-फिरते आहेत. पण इतर सर्वांच्या बरोबरीने खूप लांबवर चालायला त्यांना जरा त्रासाचे होते. सहलीमध्ये त्यांना सगळ्यांच्या बरोबर राहता यावे या दृष्टीने, आम्ही अशा प्रवासात त्यांच्यासाठी व्हीलचेयर बरोबर ठेवतो. बेकल किल्ल्यामध्ये आत बरेच चालायचे होते. तिथे आम्ही दादांना व्हीलचेयरवरून हिंडवले. किल्ल्यामध्ये दोन-तीन उंच टेहळणी बुरुज आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या टेहळणी बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या नाहीत तर अगदी खडी चढण आहे. दादांना व्हिलचेयरवर बसवून, त्या चढणीवरून ढकलत वर नेणे, त्यांना आणि आम्हालाही त्रासाचे झाले असते. त्यामुळे त्या बुरुजाच्या पायथ्याशी व्हीलचेयर वरून दादांना उतरवले. त्यानंतर एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा उत्साहात आणि वेगाने दादा एका दमात तो बुरुज चढून वर आले. त्यामुळे आमच्याबरोबर आलेल्या सर्वानाच आश्चर्याचा धक्काच बसला! 


त्या टेहळणी बुरुजावरून किल्ल्यातील सर्व भाग, ३६० कोनातला आसपासचा रम्य परिसर आणि बेकलची किनारपट्टी दिसत होती. सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, आणि हल्ला झालाच तर त्यापासून प्रभावीपणे किल्ल्याचा बचाव करण्यासाठी, तटबंदीबर अनेक झरोके आहेत. त्या झरोक्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना अतिशय कल्पकतेने केलेली आहे. वेगवेगळ्या आकारांचे हे झरोके तटबंदीवर वेगवेगळ्या उंचीवर, आणि वेगवेगळ्या कोनांमध्ये आहेत. किल्ल्यापासून कमी-जास्त अंतरावर असलेल्या शत्रूच्या नौकांना टिपण्यासाठी नेमक्या कोनातून तोफांचा मारा करता यावा यासाठी झरोक्यांचा वापर केला जात असे. दारुगोळा साठवण्यासाठी किल्ल्याच्या आत एक भलेमोठे कोठारही आहे. पण ते सध्या बंद आहे. किल्ल्यामध्ये असलेली दोन भुयारे  किनारपट्टीवर उघडतात. पण ते भुयारी मार्ग सध्या बंद करून ठेवलेले आहेत. किल्ल्याच्या आत एक भलीमोठी विहीर आहे. किल्ल्यामधून खाली किनारपट्टीकडे जायला एक चांगली दगडी पायवाट आहे. 

बेकल किल्ला पाहून आल्यावर आम्ही सर्व सहप्रवासी 

किल्ला बघून परतताना आम्ही बेकल बीच वर न जाता, वाटेतल्या एका छोट्या पुळणीवर थांबलो. दादाही मोठ्या उत्साहाने तिथे उतरले. संध्याकाळी हॉटेलवर परत येईपर्यंत आम्ही बरेच दमलेले होतो. आम्ही पुण्याहून निघण्यापूर्वी जयंताने, माझ्या मोठ्या भावाने, अगदी प्रेमाने  आनंदला, 'One for the road' असे म्हणत,  'Malibu Rum' ची एक छोटी बाटली दिली होती. दादांनी आणि आनंदने त्याचा आस्वाद घेतला. इतर दर्दी मंडळींनी, हॉटेलबाहेर जाऊन श्रमपरिहारासाठी पेय विकत आणले ही माहिती आम्हाला जेवताना मिळाली. गप्पा मारत निवांतपणे जेवण झाले. त्यावेळीच प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली. दुपारचे जेवण उशिरा झालेले असल्याने मी जेवले नाही. पण जेवणानंतर आलेल्या फालुद्याची चव बघितली. ती गोड चव जिभेवर आणि दिवसभरातील गोड आठवणी मनांमध्ये घोळवत मी निद्राधीन झाले.  


९ टिप्पण्या:

 1. खरंच दादा ग्रेट आहेत. आम्ही कोर्ट मध्ये असताना पण दादा ५२ पायऱ्या एका दमात चढायचे. दादा असेच सुदृढ रहा आणि आयुष्याची मजा लुटा. ताई तुझ्या मस्त लिखाणाने सर्व दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले.

  उत्तर द्याहटवा
 2. 3 generation enjoying with DADA every wonderful moments of life.Keep it up.Tons of thanks for sharing this with us

  उत्तर द्याहटवा
 3. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. बेकल किल्ला व ईतर प्रवास वर्णन छान आहे .दुपारी उशिरा जेवण झाल्यावर सायंकाळी न जेवता झोपलीस यावरुन तुझा जीभेवरील ताबा लक्षात आला .भाषा नेहमीप्रमाणे ओघवती व रसाळ आहे.

  उत्तर द्याहटवा