शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

२. मलाबारची सफर- कासारगोड

 

आम्ही मंगळुरुला ११ तारखेला दुपारी पोहोचलो होतो. 'अनुभव ट्रॅव्हल्सचे' निलेश राजाध्यक्ष आणि सुमंत पेडणेकर हे दोन प्रतिनिधीही ११ तारखेला संध्याकाळी आमच्याच हॉटेलमध्ये डेरेदाखल झाले. रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्हाला भेटून त्यांनी आमची अगदी आस्थेने विचारपूस केली. तसेच, दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे १२ ऑगस्टचा कार्यक्रम काय असणार आहे याची कल्पना आम्हाला दिली. १२ ऑगस्टला  सकाळी ११ वाजेपर्यंत सामान-सुमान बांधून आम्ही तयार राहावे, असे त्यांनी आम्हाला सांगितले. 'अनुभव ट्रॅव्हल्स'ची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मुंबईहून येणाऱ्या सहप्रवाशांना विमानतळावरून घेऊन, त्यानंतर पद्मश्री हॉटेलमधून आम्हा तिघांना घेऊन पुढे कासारगोडकडे जाईल, असेही सांगितले. 

१२ ऑगस्टला सकाळी अजूनही  माझ्या अंगात ताप होताच. तरीही, मला सकाळी  नेहमीसारखी अगदी व्यवस्थित  भूक लागली होती. मला एक महिन्यापूर्वीच दुसऱ्यांदा (त्या आधी दीड वर्षापूर्वी पहिल्यांदा) कोव्हिड होऊन गेला होता. पण त्यावेळीही कधी भूक काही कमी झाली नव्हती! कोव्हिड झाल्यावर भीती वाटण्याच्या ऐवजी आता या निमित्ताने का होईना आपले वजन थोडेफार कमी होईल की काय, असा विचार मनाला सुखावह वाटला होता. पण कसले काय, त्याही वेळी भूक लागतच होती. एकीकडे आहार तसाच राहिला पण  रोजचा व्यायाम मात्र कमी झाला. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम अंगावर दिसू लागला होता. तरीही खादाडीचे व्यसन सुटण्याची शक्यता नव्हती!

'पद्मश्री' हॉटेलच्या खालच्या मजल्यावर 'पद्मश्री रेस्टॉरंट' होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिथे नाश्ता करायला गेलो. आम्ही तिघांनी मसाला डोसा, इडली-वडा आणि मुख्य म्हणजे मंगळुरुचे सुप्रसिद्ध बन्स व त्यानंतर फिल्टर कॉफी, असा भरपेट नाश्ता केला. पण त्यातल्या कुठल्याही पदार्थाला स्पर्श करण्याच्या आधी, त्यांचे वेगवेगळ्या बाजूंनी फोटो काढले. ते फोटो मित्र-मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या व्हाट्सएप् ग्रुप्सवर पाठवले. खरंतर पदार्थाचे असे फोटो काढून ते वेगवेगळ्या ग्रुपवर पाठवण्याचा आनंद जास्त असतो, की त्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद जास्त असतो, हे ठरवणे  हल्ली अवघड होऊन गेले आहे! फोटोमधे ते पदार्थ अगदी मोहक दिसत असले तरी त्यांची चव तशी बेताचीच होती. पण हलक्या गोडसर चवीचे, भटुऱ्यासारखी आतून छानशी जाळी असलेले, 'मंगळुरु बन्स' मात्र मला आवडले. 


सकाळी अंघोळी करून, निवांतपणे नाश्ता खाऊन व सामानसुमान बांधून ११ वाजेपर्यंत आम्ही तयार होतो. पण मुंबईहून मंगळुरुला  येणारे विमान जरा उशिरा आले. त्यामुळे आमच्या सहप्रवाशांना घेऊन येणारी गाडी पद्मश्री हॉटेलला जरा उशीरानेच पोहोचली. शेवटी साधारण दुपारी १२च्या सुमारास आम्ही आमच्या सामानासह गाडीत चढलो आणि तिथून आमच्या 'Malabar Coast-a drift experience'  या सहलीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.  

आम्ही एकूण दहाजण या सहलीमध्ये सहभागी झालो होतो. सोनम-शुभेन्दू साहनी, हे तिशीतले जोडपे, श्री. प्रफुल्ल व सौ. स्नेहल पेंडसे, श्री. अशोक व सौ. अस्मिता म्हात्रे, कु. वृंदा जोशी आणि आम्ही तिघे. आधी WhatsApp ग्रूप तयार केलेला असल्याने, सहप्रवाशांची नावे माहिती होतीच. आम्ही गाडीमध्ये बसल्यावर सगळ्यांशी जुजबी तोंडओळखही झाली. टेम्पो ट्रॅव्हलर गाडी वातानुकूलित होती. बस चालक श्याम गाडी सावधानीने चालवत होता. तासभर प्रवास केल्यावर आम्ही कासारगोडच्या 'सिटी टॉवर्स' या हॉटेलमध्ये पोहोचलो. 

अनुभव ट्रॅव्हल्सच्या गाडीला कर्नाटकातून केरळमध्ये शिरण्यापूर्वी एक परवाना काढावा लागला. त्यामुळे वाटेत एके ठिकाणी थोडावेळ थांबावे लागले. त्यावेळी आता आपण कर्नाटकमधून आता केरळमधे शिरणार आहोत हे कळले. नाहीतर स्थानिक भाषेतील पाट्यांवरून आम्हाला काही बोध होणे शक्यच नव्हते. त्या पाट्यांवरच्या अक्षररूपी जिलब्यांचे वळण थोडेफार बदललेले आहे, इतकेच काय ते कळत होते. पण ते सगळे लिखाण अगम्य होते. नाही म्हणायला काही ठिकाणी इंग्रजीमधून पाट्या होत्या. त्यामुळे वाटेत लागणाऱ्या गावांची नावे वाचता येत होती. 
 
'सिटी टॉवर्स' या हॉटेलच्या तळमजल्यावरच्या रेस्टोरंटमध्ये आमच्या ग्रुपसाठी जेवणाची खास वेगळी सोय केली होती. जेवणामध्ये चमचमीत व चविष्ट शाकाहारी आणि सामिष पदार्थांची रेलचेल होती. अनुभव ट्रॅव्हल्सच्या सहलीमध्ये जेवण-खाण्याची बरीच चंगळ असते, हे ऐकून होतेच. कासारगोडपासूनच तो अनुभव सुरु झाला. श्री निलेश राजाध्यक्ष कुणाला काय हवे-नको आहे याची जातीने चौकशी करत होते. आम्हाला आग्रह करकरून जेवण वाढतही होते. दादांना चावायला सोपे पडावे म्हणून, नीलेश राजाध्यक्ष यांनी गरमागरम मलाबार पराठा मागवला. आम्ही इतरांनीही ते लुसलुशीत, लच्छेदार पराठे चवीने खाल्ले. फ्राईड चिकन, मटार-पनीर, चमचमीत चिकन रस्सा, डाळ फ्राय, मिक्स भाजी, जिरा राईस, सलाड, वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्या आणि त्यानंतर दुधी हलवा असे रुचकर जेवण झाले. तासाभराच्या विश्रांतीनंतर साडेचारच्या सुमारास चहा घेऊन बेकल किल्ला बघायला बाहेर पडायचे आहे, असे निलेश यांनी आम्हा सर्वांना सांगितले. सगळेच दमलेले असल्यामुळे, तडक आपापल्या खोलीत जाऊन सगळ्यांनी ताणून दिली. 




१० टिप्पण्या:

  1. रसाळ आणि ओघवती भाषा फारच छान

    उत्तर द्याहटवा
  2. स्वाती छानच लिहीतेस

    उत्तर द्याहटवा
  3. ओघवती भाषा व सुंदर वर्णन.

    उत्तर द्याहटवा