शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

काकवीचा चहा!

काकवीचा चहा

काल सोलापूरहून पुण्याला परत येत असताना वाटेत एके ठिकाणी 'काकवीचा चहा' अशी पाटी दिसली आणि मन भूतकाळात गेले.

माझे माहेर सोलापूरचे. वाड्यामधे आम्ही एकत्र कुटुंबात राहात होतो. माझे मोठे काका प्रथितयश डॉक्टर आणि माझे वडील वकील होते. त्याकाळी काकांना त्यांचे नेहमीचे रूग्ण आणि वडिलांना त्यांचे पक्षकार वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा अगदी प्रेमाने आणून देत. हरभरा, ऊस, शेतातली ताजी भाजी-फळे, खरवसाचे दूध, खवा, गुळाच्या ढेपी आणि काकवी असे अनेक पदार्थ आमच्या घरी येत असत.

त्याकाळी अनेक शेतकरी अगदी मोठी कासंडी भरून काकवी आमच्या घरी आणून द्यायचे. आई किंवा काकू ती काकवी फिरकीच्या बरणीत काढून ठेवायच्या. त्यामुळे आमच्या लहानपणी जवळपास वर्षभर काकवी घरी असायचीच. 

थंडीच्या दिवसांत पोळीला लावून काकवी खायला खूप आवडायचे. त्यासाठी एखाद्या छोट्या वाटीत किंवा एखाद्या छोट्या खोलगट ताटलीमधे काकवी  घ्यायची. त्यामधे चमचाभर तूप घालायचे. थंडीच्या दिवसात, साजूक तुपाच्या ताम्हलीमधील, तुपाचा वरचा थर थिजलेला असतो. त्यामुळे तूप घेण्यासाठी ताम्हलीत चमचा घातला की वरचा रवाळ थर आणि त्याखालचे पातळ तूप यांचे मिश्रण चमच्यामधे यायचे. ते तूप काकवीत घातले की रवाळ तुपाचे थर काकवीवर तरंगत राहायचे. पण पातळसर तूप काकवीत खाली डुबकी मारून नंतर वर येऊन काकवीवर तरंगायचे लागायचे. तूप घातल्यावर ते तूप बोटाने ढवळून ते बोट आधी चाटून पुसून स्वच्छ केले की पोळी आणि काकवी खायला आम्ही सज्ज व्हायचो.

पोळीचा एखादा छोटा तुकडा दोन बोटांनी पकडून आधी त्याचा एक चमचा करायचा. मग तो चमचा काकवीमध्ये बुडवून त्यात काकवी भरून गट्टम करायचा! आहाहा.. काय अवर्णनीय सुख होते म्हणून सांगू! काकवीला एकप्रकारचा वास आणि खमंग स्वाद असायचा.  कधीकधी तूप-काकवी मधे लिंबू पिळूनही खायचो. एकूणच काकवी खायला मजा यायची.

पण गडबडीत कधीकधी तो चमचा बोटांच्या चिमटीत नीट पकडला गेला नसेल तर   काकवीचा एखादा ओघळ पार कोपरापर्यंत यायचा. मग तो स्वच्छ करायला लागायचा.

बरं त्या काळात आई-काकू-आजी या बायका आम्हा मुलांना अगदी सढळ हाताने तूप आणि काकवी वाढायच्या. त्यांच्या बोलण्यात कधीही हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस, वजन वाढेल, कॅलरीज् जास्त आहेत, कोलेस्टेरॉल वाढतं असले  काहिही नसायचे. त्यामुळे मनात कुठलीही धास्ती न बाळगता काकवी आणि तुपाचा मनमुराद आस्वाद आम्ही घेत असू. 

गेल्या कित्येक वर्षांमधे मी काकवी खाल्लेली नाही. अमॅझॉनवर 'मोलॅसेस' या स्टायलिश नावाने बाटलीभर काकवी विकत मिळते. परंतु काकवी  विकत घेऊन खायची इच्छा कधी झाली नाही. आता कधीही कुठेही काकवी खायला मिळाली तरी त्यातल्या कॅलरीज् आणि साखरेचे प्रमाण हेच प्रथम डोक्यात येईल. पण 'काकवीचा चहा' ही पाटी वाचून लहानपणीच्या तूप-काकवी खाण्याच्या मधुर आठवणी मनात घोळवता आल्या, हे ही नसे थोडके!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा