शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

'बॅलन्स' सायकल!


माझ्या लहानपणी, एखाद्या कुटुंबामध्ये स्वतःच्या मालकीची सायकल असणे हे सुस्थितीचे लक्षण होते, असे जर आजच्या मुलांना सांगितले तर ते त्यांना खरे वाटणार नाही. सुदैवाने आमच्या घरी सायकल होती. आमच्या एकत्र कुटुंबात आम्ही सात भावंडे एकमेकांबरोबर वाढलो. 'गुण्यागोविंदाने' हा गोंडस शब्द वापरायचे मी मुद्दामच टाळले आहे. कारण आम्ही एकमेकांच्या भरपूर खोड्या काढत, भांडणे-मारामाऱ्या करत, एकमेकांना चिडवत, एकमेकांच्या चुगल्या करत, एकमेकांवर कुरघोड्या करत, पण तरीहि अगदी आनंदात वाढलो. 

आमच्या घरच्या मुला-मुलींनी पहिल्या इयत्तेत प्रवेश करण्यापूर्वीच्या उन्हाळी सुट्टीमध्ये  'दुचाकी सायकल शिकलीच पाहिजे' असा  जणू दंडकच होता. त्याकाळी रंगीत सायकली, फुलाफुलाची चित्रे असलेल्या सायकली, कमी उंचीच्या सायकली, तोल सांभाळता यावा म्हणून मागे दोन छोटी चाके असलेल्या सायकली, वगैरे अभावानेच असायच्या. तसल्या सायकली असणे हे अतिश्रीमंतीचे लक्षण होते. लेडीज सायकल्स सुद्धा फार कमीच घरांमधून असायच्या. त्यामुळे सर्वाना सरसकट सायकल चालवायला शिकण्यासाठी २४ इंची जेन्टस सायकलच असायची. आम्ही भावंडे सायकल चालवायला ज्या प्रकारे शिकलो, थोड्याफार फरकाने आमच्या पिढीतील सर्वच मुले त्याच पद्धतीने  सायकल चालवायला  शिकली असावीत. 

शिकाऊ मुलाच्या किंवा मुलीच्या सायकलचे सीट व कॅरियर सर्व बाजूने पकडून, सायकल शिकवणे चालू होई.  प्रथम डाव्या पायाने डाव्या बाजूचे पेडल अर्धवट मारत, हॉपिंग करायला शिकावे लागायचे. एकदा का हॉपिंग जमले की मग हॉपिंग करत-करत, कंबर डाव्या बाजूला झुकवून, जेन्टस सायकलच्या दांड्याखालून पाय नेऊन उजव्या पेडलवर पाय ठेवण्याच्या दिव्याला सामोरे जावे लागे. त्यानंतर कात्री म्हणजे पेडल्स अर्धवट मारत  किंवा हाफ पेडल मारत सायकल चालवणे शिकवले जायचे. ते जमेस्तोवर पायाला खरचटणे, किंवा पाय चाकात, सायकलच्या चेनमध्ये, अचानक खाली आलेल्या सायकल स्टँडमध्ये अडकणे, सायकलची चेन पडणे वगैरे प्रकार होतच असत.

त्यानंतर पुढची पायरी, म्हणजे, फुल पेडलवर सायकल चालवणे शिकवले जायचे. फुल पेडल मारल्यावर पुढे जाणारी सायकल जणू  विमान-भरारीचा आनंद त्या शिकाऊ मुलाला देऊन जायची. सायकल पुढे जात असताना भावंडे व इतर मित्रमंडळी सायकलला सर्व बाजूने धरून पळत, शिकाऊ मुलाला शाब्दिक आधारही देत असत. सर्व बाजूंनी आधार असल्याने, शिकाऊ मुलाला पडण्याची भीती नसायची. या शिक्षणामध्ये ब्रेक दाबणे, उजवा ब्रेक कधी दाबायचा, डावा कधी दाबायचा, दोन्ही ब्रेक एकदम कधी दाबायचे, याबाबतचे मौलिक शिक्षणही मिळायचे.  

दोन्ही पेडल मारत सायकल चालवण्याचा सराव झाला की भावंडे आणि गल्लीतील इतर मित्र-मैत्रिणी हळूहळू आधार कमी करत. शिकाऊ मुलाच्या तिन्ही बाजूने पळणारी भावंडे, प्रथम फक्त सीट धरून सायकलस्वाराच्या मागून पळायला लागायची. थोड्या सरावानंतर, "मी तुला धरले आहे, तू फक्त पेडल मारत  राहा" असे नुसते तोंडाने म्हणत, प्रत्यक्षात मात्र शिकाऊ मुलाला एकटेच सोडून देत असत. सायकल थांबवल्यावर, आपण कुणाच्याही आधाराशिवाय सायकल चालवू शकलो याचा साक्षात्कार त्या मुलाला व्हायचा. असे प्रशिक्षण मिळाल्यावर तयार झालेले ते मूल, मिळेल तेंव्हा आणि मिळेल ती सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद लुटायचे. आमच्या घरात वडिलांकडे आलेल्या पक्षकारांची, पत्र टाकायला घरात गेलेल्या पोस्टमनची, किंवा दूध घालायला आलेल्या गवळ्याची सायकल गुपचूप पळवून एखादी चक्कर मारलेली मला आठवते आहे.  

आमची मुले पाच-सहा वर्षांची असतानाच सायकल शिकलो. पण त्यावेळेपर्यंत कमी उंचीच्या, रंगीबेरंगी सायकली आल्या होत्या. आमची मुलगी जेमतेम तीन-साडेतीन वर्षांची असताना तिच्यासाठी आम्ही एक लाल रंगाची सायकल विकत घेतली होती. पुढे धाकट्या मुलासाठीही रंगीबेरंगी सायकल आणली होती. सुरुवातीला दोन्ही बाजूला छोटी चाके असलेल्या सायकलींवर आमची मुले सायकल शिकली. ती जरा मोठी झाल्यावर, सीटवर बसूनही पाय सहजी खाली टेकतील अशा कमी उंचीच्या सायकली त्यांच्यासाठी आणल्या. पाय खाली टेकत असल्यामुळे मुले थोडीफार पडत, धडपडत सायकल शिकली. मुले अजून थोडी मोठी झाल्यावर, सायकलवरच शाळेला जायला लागली. मुलीसाठी आम्ही छानशी लेडी-बर्ड सायकल आणली होती आणि मुलासाठी गियरवाली सायकल आणली होती. 

सध्या ऑस्ट्रेलियात  स्थायिक असलेल्या आमच्या मुलीने आणि जावयाने, सुमारे नऊ-दहा महिन्यापूर्वी, नूरसाठी, म्हणजे  आमच्या छोट्या नातीसाठी, एक लहान सायकल विकत घेतली. त्यावेळी नूर जेमतेम दोन-सव्वादोन वर्षांची असेल. ती सायकल चालवत असतानाचे नूरचे फोटो आणि व्हिडीओ पाहून आम्ही चकितच झालो. मुख्य म्हणजे, त्या सायकलीला पेडलच नव्हती! अशा सायकलला बॅलन्स सायकल म्हणतात असे मला त्या वेळी प्रथमच कळले. तिचे पाय सहजी टेकतील एवढ्याच उंचीची ती सायकल होती. सुरुवातीला पाय टेकवत-टेकवत सायकल पुढे नेण्याचा सराव मुलाने करायचा, आणि ते जमायला लागले व सायकलला वेग आला की जमिनीवरून दोन्ही पाय उचलून,  सायकलचा तोल सांभाळत, भरारी घेत  पुढे जायचे, अशी त्या सायकलची योजना होती. 

बॅलन्स सायकलमुळे तोल सांभाळण्याचा सराव मुलांना होतो. ही सायकल उंचीने अगदीच कमी असते. तसेच ती चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य असते.  त्यामुळे सरावादरम्यान मूल पडले तरी फारशी इजा होत नाही. पुढच्या दोन-तीन महिन्यातच दोन्ही पाय उचलून, आपल्या शरीराचा तोल सांभाळत सफाईने बॅलन्स सायकल चालवतानाचे नूरचे व्हिडीओ बघून आम्हाला खूप कौतुक वाटले. मुले जरा मोठी झाल्यावर पेडल्सवाली सायकल, तोल सांभाळत सहजी चालवू शकतात. जेमतेम साडेतीन वर्षांच्या नूरसाठी आता पेडल्सवाली नवीन सायकल आणली आहे. 

बॅलन्स सायकलचा प्रातिनिधिक फोटो 

बॅलन्स सायकलची कल्पना मला भलतीच आवडली. त्याचबरोबर, अर्धे पेडल-पूर्ण पेडल, हा आमच्या लहानपणीचा प्रवासदेखील आठवला. सायकल शिकण्याच्या त्या प्रवासातला सायकलभोवतीचा भावंडांचा किंवा मित्रमंडळींचा घोळका आठवला. हल्लीच्या मुलांना अगदी लहानपणीच स्वतःचा तोल सांभाळायची कला अवगत होतेय, हे खरे आहे. पण त्यांच्याभोवती, आमच्या लहानपणी होता तसा भावंडांचा आणि मित्रमंडळींचा घोळका मात्र नाही, याचे कुठेतरी वाईटही वाटते. सायकलचे पेडल उलटे फिरवत 'स्टाईल'मध्ये सायकल चालवण्यातही एक निराळी मजा होती, पण आज काळाचे चक्र उलटे फिरवणे आपल्या हातात थोडेच आहे?      

५ टिप्पण्या:

  1. बालपणीच्या आठवणी, मी दुसरीत असताना पुसद येथे छोट्या सायकल वर सायकलिंग शिकलो, तेंव्हाही पडायचो, चार पाच महिन्यांपूर्वी गेअरच्या सायकल वरून पण पडलो. मजा आली

    उत्तर द्याहटवा
  2. खरयं. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वडील दुपारी जेवायला आल्यावर त्यांची सायकल पळवायचे मी. शाळेतून घरी जाताना मैत्रिणीची सायकल चालवत होतो

    उत्तर द्याहटवा
  3. मी तर सायकल शिकल्याच्या आनंदात घरातली कोणतीही कामे करायच्या मागे लागलो. अट एकच सायकल घेऊन जाऊ देणे.

    उत्तर द्याहटवा