शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-१

यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, गिरीश-प्राची, म्हणजे माझे भाऊ-वहिनी, मुंबईहून सोमनाथ-द्वारका दर्शनासाठी जाणार होते. मी, आनंद, माझा चुलतभाऊ शिरीष, आणि  'दादा', म्हणजे माझे वडील, अशा चौघांनीही त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. त्यानुसार १३ नोव्हेंबर २०२३ च्या दुपारी मुंबईहून दुपारची फ्लाईट पकडून आम्ही तासाभरात दीवला पोहोचलो. आधीच्या आठवडाभराचे जागरण, पुणे-मुंबई प्रवास, दिवाळीच्या कामांची दगदग अशामुळे आम्ही सगळे दमलो होतो. जेवण झाल्यावर सगळेजण झोपून गेलो. संध्याकाळी चहा घेऊन पत्त्यांचे  डाव लावले आणि सुट्टी सुरू झाल्यासारखे वाटले.


दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ नोव्हेंबरच्या सकाळी एक खाजगी टॅक्सी करून आम्ही दीव-दर्शन करायला बाहेर पडलो. सर्वप्रथम आम्ही दीवचा किल्ला बघितला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला  अतिशय प्रेक्षणीय आहे. दीव या बेटावर पूर्वापार अनेक राज्यकर्ते राज्य करून गेले. पण १३३० साली गुजरातेतील सुलतान शाहबहादूर याने दीव जिंकून घेतले. १४९८ साली पोर्तुगीजांनी भारतभूमीवर पाय ठेवला. त्यानंतर ते भारताच्या किनारपट्टीवरील एकेका बंदरात आपले पाय रोवू लागले. अनेक वर्षे, दीव येथे किल्ला बांधण्याची परवानगी पोर्तुगीज गुजरातच्या सुलतानाकडे मागत होते. पण, मलिक अय्याझ नावाचा, सुलतानाचा एक सुभेदार पोर्तुगीजांच्या मागणीला सातत्याने विरोध करत राहिला. १५३५ साली मुघल सम्राट हुमाँयू याने गुजरातच्या सुलतानावर स्वारी केली. त्यावेळी  सुलतान शाहबहादूर याने 'नुनो दा कुन्हा' या पोर्तुगीज अधिकाऱ्याशी युती केली. मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी सुलतानाला मदत करण्याच्या बदल्यात पोर्तुगीजानी दीव किनाऱ्यावर किल्ला बांधण्याची परवानगी सुलतानाकडून मिळवली. पोर्तुगीजांनी १५३७ ते १९६१ असे जवळपास सव्वाचारशे वर्षे दीव-दमण या भागावर राज्य केले. 

दीव  बेटाच्या नैऋत्य टोकावर वसवलेला हा मजबूत किल्ला अजूनही उत्तम स्थितीत आहे.  किल्ल्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे. त्या अथांग सागराचे दर्शन आपल्याला श्वास  रोखायला लावते. बाहेरील तटबंदी समुद्रकिनाऱ्यालगतच आहे. आतल्या तटरक्षक भिंतीवर सर्वबाजूनी तोफा मांडलेल्या आहेत. दोन्ही भिंतींच्या मधल्या खंदकामध्ये पाणी आहे. मुख्य प्रवेशदारातून आत आल्यावर उजव्या बाजूला पाच मोठ्ठ्या खिडक्या असलेली भिंत दिसते. डाव्या बाजूला भर समुद्रात वसलेला, 'पाणकोट' नावाचा जलदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरुज, आतील कमानी, मजबूत तटबंदी हे पाहिल्यावर, हा किल्ला चार शतके अभेद्य का राहिला असावा हे समजून येते. किल्ल्याच्या एका टोकाला समुद्राच्या आत घुसणारी वाट, म्हणजेच बोटींना थांबण्यासाठीचा धक्का आहे. किल्ल्याच्या आत एक कैदखाना, चर्च, दारुगोळ्याचे कोठार, छोटेखानी दीपगृह अशा काही इमारती आहेत. किल्ल्याच्या आत असलेले एक तुळशी वृंदावन पाहून मला आश्चर्यच वाटले. बारकाईने पाहता, त्यावर सोमवार दि. १३/१२/१९४३ असा तपशील कोरलेला दिसला. म्हणजेच किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असतानाच्या काळातलेच ते तुळशी वृंदावन होते! परंतु, ते कोणी व का बांधले असावे हे मात्र गूढच राहिले. 


किल्ला पाहून झाल्यावर आम्हाला दीवचे सुप्रसिद्ध सेंट पॉल चर्च बघायचे होते. पण त्या चर्चचा जीर्णोद्धार होत असल्यामुळे ते बंद होते आणि आम्हाला ते बाहेरूनच बघावे लागले. चर्चेच्या शुभ्र, दिमाखदार इमारतीचे बाह्यदर्शनही खूप सुखावह होते. त्यानंतर आम्ही दीवपासून तीन किलोमीटर अंतरावरच्या  फुडम  गावाजवळ गंगेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. हे प्राचीन मंदिर पांडवांनी बांधले आहे असे मानले जाते. या ठिकाणाला मंदिर म्हणण्यापेक्षा देवस्थान म्हणणे योग्य आहे. कारण, याची रचना कोणत्याही सर्वसामान्य मंदिराप्रमाणे नाही. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका खडकाच्या पोटात नैसर्गिकरीत्या एक गुहा बनलेली आहे. या गुहेमध्ये किंवा दगडाच्या खोबणीमध्ये, पाच सुबक शिवलिंगे आहेत. हे देवस्थान अतिशय सुंदर आहे. समुद्राच्या लाटा अहोरात्र या शिवलिंगांवर अभिषेक करत असतात. समुद्राला भरती आल्यावर, समुद्रात घुसणारा खडकाचा एक सुळका वगळता बाकी संपूर्ण खडक पाण्याखाली लुप्त होतो, हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. 


सकाळपासून जवळपास तीन-चार तास कडक उन्हामध्ये बाहेर हिंडल्याने आम्हाला दमणूक जाणवायला लागली होती. त्यामुळे दुपारच्या वामकुक्षीनंतरच पुन्हा बाहेर पडायचे ठरवून आम्ही हॉटेलवर परतलो.  
 

३४ टिप्पण्या:

  1. छान प्रवासवर्णन
    - विठ्ठल कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. प्रवास वर्णन छानच !
      आम्ही खूप वर्षांपूर्वी दीव ला गेलो होतो तेव्हा वास्को-दी-गामा चा पुतळा पाहिला होता.

      हटवा
  3. छायाचित्रं आणि प्रवास वर्णन दोन्हीही छान. ती दादा कोणत्याच फोटोत नाहीत? नितीन चौधरी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. किल्ल्यात खूप चालावं लागणार होतं आणि खूप ऊन होतं.
      म्हणून दादा किल्ल्यात आले नव्हते.

      हटवा
  4. स्वाती..तू डाॅक्टरकी सोडुन दे आणि लेखनच कर..अतिसुंदर..👌👌👍👍

    उत्तर द्याहटवा
  5. गुजरातच्या किनाऱ्या पलीकडे असलेली दीव, दमण आणि थोडे दक्षिणेकडे गोवा हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश आणि स्वतंत्र भारतातील केंद्रशासित प्रदेश अशी जुजबी माहिती होती. नंतर गोव्याबद्दल सगळ्यांना खूप माहिती झाली. दीव, दमण त्या मानाने पर्यटनदृष्ट्या दुर्लक्षित राहिले. आता स्वाती तिच्या खुमासदार शैलीत आपली दीव - दमण ची सफर घडवेल. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम सुंदर लेख लिहिला आहे

    उत्तर द्याहटवा
  7. Swati you write very nice and detailed along with beautiful photos...
    Feels exited to visit the places..
    Keep it up..
    Mohini

    उत्तर द्याहटवा
  8. व्वा. वाचूनच पाहिल्यासारखं वाटतंय

    उत्तर द्याहटवा