मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

दीव-सोमनाथ-व्दारका-३

१५ नोव्हेंबरच्या सकाळी आम्ही सगळेच आरामात उठलो. सामान आवरून, दोन टॅक्सी घेऊन आम्ही सोमनाथकडे निघालो. आमच्या चालकाने सुचवलेल्या, हायवे वरच्या एका हॉटेलमधे थांबून नाष्टा घेतला. सोमनाथ देवस्थान प्रभास पाटण या गावामधे आहे. दीव ते प्रभास पाटण हे अंतर ९५ किलोमीटर आहे. रस्ता चांगला असल्याने आम्ही एक वाजायच्या आतच प्रभास पाटण येथील हॉटेलमधे पोहोचलो. त्या दिवशी दुपारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणारा विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना, कुठल्याही परिस्थितीत शिरीषला चुकवायचा नव्हता. म्हणूनच सोमनाथला दुपारी एक वाजायच्या आत पोहोचण्याबाबत तो आग्रही होता. आपापल्या खोल्यांचा ताबा घेऊन स्थिरस्थावर होईपर्यंत भारत-न्यूझीलंड सामना सुरू झाला होता.

सकाळी उशीरा आणि भरभक्कम नाष्टा केलेला असल्याने कोणालाही जेवायची इच्छा नव्हती. तसे अडीअडचणीला उपयोगी पडावा म्हणून मी आणि प्राचीने, एका पिशवीमध्ये दिवाळीचा फराळ भरून आणला होता. खाद्यपदार्थाच्या गच्च भरलेल्या त्या पिशवीचे नामकरण शिरीषने 'गाझा पिशवी' असे केले होते! त्याच्या म्हणण्याप्रमाणे, हेलिकॉप्टरने ती पिशवी गाझा पट्टीमध्ये टाकली तर युद्धविराम होईपर्यंत तमाम गाझावासियांना पुरून उरतील इतके खाद्यपदार्थ त्या पिशवीत होते! त्याउप्पर, शिरीषच्या मित्राने आणि शिरीषच्या सासूबाईंनी बांधून दिलेला फराळ त्याने सोबत आणलेला होता, तो वेगळाच! त्यामुळे एखादे-एखादे जेवण चुकले आणि अगदीच भूक लागली तर चिवडा, लाडू, शंकरपाळे, चिरोटे आणि चकल्यांवर भागवायचे, असा अलिखित नियम आम्ही केला होता. 

त्याच संध्याकाळी सोमनाथ देऊळ बघण्याची माझी व प्राचीची इच्छा होती. पण आम्ही काही बोलायच्या आतच, सामना संपेपर्यंत कुठेही बाहेर न पडण्याचा निर्णय चौघाही पुरुषांनी जाहीर करून टाकला. त्यामुळे आम्ही दोघीच, दुपारच्या चहानंतर रिक्षा पकडून देवदर्शनाला निघालो. आम्हा सहा जणांपैकी श्रद्धाळू म्हणावे अशी फक्त प्राचीच होती. आधीच्या बेतानुसार गिरीश आणि प्राची असे दोघेच सोमनाथ-द्वारका करणार होते. नंतर मीही सोबत येतेय हे समजल्यावर, प्राचीबरोबर देवळामधे जाण्याचे काम गिरीशने अगदी तत्परतेने मला आऊटसोर्स करून टाकले होते! मला देवळे बघायला आवडत असल्याने मीही ते आनंदाने स्वीकारले होते.  

मंदिर परिसरात अतोनात गर्दी असल्याने, देवळापासून चार-पाचशे मीटरच्या अंतरावर पोलिसांनी वाहनप्रतिबंधक अडथळे लावून ठेवले होते. रिक्षावाल्याने ज्या ठिकाणी आम्हाला सोडले, तिथे समोरच लक्ष्मीनारायण मंदिर दिसत होते. त्या देवळात दर्शन घेऊन, उजवीकडे वळून आम्ही समुद्राच्या दिशेने, म्हणजे सोमनाथ मंदिराकडे पायी चालत निघालो. अनेक शतके भग्नावस्थेत आणि दुर्लक्षित असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे कार्य श्री. वल्लभ भाई पटेलांच्या पुढाकारामुळे १९५१ साली पूर्ण झाले. अतिशय भव्य आणि देखणे असे हे मंदिर आहे. 
मुख्य सोमनाथ मंदिरात मोबाईल, बॅग्स, पर्सेस, डिजिटल घड्याळे आणि अर्थातच चपला न्यायला मनाई आहे. या वस्तू लॉकरमध्ये ठेवण्याची मोफत व्यवस्था आहे. आपण आपली वस्तू ठेवली की आपल्याला एक टोकन मिळते. ते टोकन परत केले की आपली वस्तू आपल्याला परत मिळते. मात्र, मोबाईल्स एका ठिकाणी, पर्स दुसऱ्याच ठिकाणी आणि चप्पल्स तिसऱ्याच  ठेवायची असल्याने बराच वेळ वाया जातो. देवळात फार गर्दी असेल तर लॉकरमध्ये जागा नसते आणि बराच वेळ तिष्ठत उभे राहावे लागते. त्या दालनामध्ये सर्वत्र CCTV कॅमेरे बसवले असल्यामुळे वस्तू चोरीला जाण्याची भीती जरा कमी असते. आमचे मोबाईल्स, पर्सेस आणि चप्पल्स ठेऊन, टोकन घेऊन आम्ही महिलांच्या बारीमध्ये उभे राहिलो. 

रांगेमध्ये जवळपास तास-दीडतास उभे राहिल्यानंतर आम्ही देवळामध्ये पोहोचलो. गर्दी असल्याने, लांबूनच जेमतेम काही सेकंद दर्शन मिळाले. संध्याकाळच्या आरतीच्या दोन मिनिटे आधीच आम्ही गाभाऱ्यात पोहोचल्यामुळे, ती आरती बघायला मिळाली नाही. बाहेर पडून, परत रांगेत घुसून आरती बघण्याचा प्रयत्न केला पण आम्ही  गाभाऱ्यापर्यंत पोहोचेस्तोवर आरती संपून गेली होती. 

देवळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार ठेवलेला आहे. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रतट आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेला सुप्रसिद्ध, दिशादर्शक बाणस्तंभ आम्ही बघितला. मुख्य मंदिराजवळच एक जुने शिवमंदिरदेखील आहे.  १७७३ साली पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी ते बांधून घेतले होते. त्या मंदिरातही जाऊन आम्ही दर्शन घेतले. अशा रीतीने सर्व परिसराची पाहणी (Recce) करून आम्ही हॉटेलवर परतलो. सोमनाथ मंदिराची महती, आणि त्याचा इतिहास यावर पुढील भागांमध्ये लिहीन.   




 

४ टिप्पण्या: