शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

सब घोडे बारा टक्के!

२० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रामधे विधानसभेसाठी मतदान झाले. 

"आपले मत मोलाचे असते. ते वाया घालवू नका", "माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा विचार करून मतदान टाळू नका" किंवा," मतदारांनो, आपल्या मतांसाठी पैसे घेऊ नका. आपले मत विकू नका" असल्या संदेशाचा, पांढरपेशा वर्गाच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर सुळसुळाट झालेला होता. सुशिक्षितांच्या ग्रुपमध्ये हे असले संदेश काही कामाचे नसतात, असे मला वाटते. आपले मत वाया घालवू नये किंवा एका मताने काय फरक पडतो हे न कळण्याइतका पांढरपेशा वर्ग निर्बुद्ध नाही. आणि या वर्गातल्या कोणालाही कधीही कोणताही राजकीय पक्ष मतांच्या बदल्यात पैसे देत नाही. त्यामुळे तिसऱ्या संदेशाचाही आपल्यासारख्याना काही उपयोग नसतो. पण ते असो. 


मतदानाच्या आदल्या दिवशी, पुण्यात माझ्याकडे काम करणारी मोलकरीण म्हणाली," ताई मी उद्या सुट्टी घेणार आहे."

मी म्हणाले," ठीक आहे. जरूर सुट्टी घे.  मतदान करायचे असेल ना. "

" हो, आणि पैसे पण मिळणार आहेत." 

मी म्हणाले, " खरंच पैसे वाटतात का गं ? 

" हो. वाटतात की " ती निर्विकारपणे उत्तरली. 

" दर निवडणुकीला पैसे वाटतात का ?"

" देतात ना. दर वेळी देतात. आमच्या घरात तर आम्ही आठ जण मतदार आहोत. प्रत्येकाच्या नावाने देतात." 

" कुठली पार्टी देते गं ?" मी कुतूहलाने विचारले. 

" आमच्या वस्तीत एकच पार्टी देते. तिकडे दुसऱ्या मुहल्ल्यात दुसरी पार्टी देते." 

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ती आल्याबरोबर मी तिला विचारले, "मतदान केलेस का गं ?'

डाव्या हाताची तर्जनी माझ्यासमोर धरून ती म्हणाली "हे बघा. केले की ताई" 

"पैसे मिळाले का? कसे आणि कुठे देतात गं पैसे?" मी उत्सुकतेपोटी विचारले.

" हो. मिळाले की पैसे. घरी येऊन नोटा देऊन जातात. यावेळी प्रत्येक मताला तीन हजार दिले की . आमच्या सगळ्यांच्यात मिळून २४००० रुपये मिळाले" 

मी आश्चर्यचकित झाले. 

ती पुढे बोलू लागली, "वर आम्हाला प्रत्येकाला, काहीतरी खूण केलेली वीस रुपयाची एक-एक नोट देऊन गेले आहेत. ती जपून ठेवायला सांगितले आहे"

" ती नोट कशासाठी?"

"ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांची पार्टी निवडून आली की आम्ही ती वीसची नोट त्यांना दाखवायची. त्यानंतर ते अजून पैसे देणार म्हणाले आहेत. 

हे सगळे ऐकून मी थक्क झाले. 

" पण मग तू मत कोणाला दिलेस?"

" ज्यांनी पैसे दिले त्यांच्या उमेदवारालाच मत दिले. आम्ही बेईमानी नाही करत." 

निवडणूकांमधे गरिबांची मते विकत घेतली जातात, हे अगदी लहानपणापासून मी ऐकून आहे. लहानपणी आमच्या घरातल्या मोलकरणींना निवडणुकीच्या आधी नव्या साड्या मिळायच्या, झोपडपट्टीतील पुरुषांना धोतरजोडी मिळायची. पुढे अनेक राजकीय पक्ष मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने विकत घ्यायला लागले. पण यावेळच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या कल्पकतेला धुमारे फुटले होते, असे वाटले. 

दिवाळीच्या आधी सोलापूरला गेले होते. तोपर्यंत महाराष्ट्रामधे  निवडणुकीचे वारे वाहायला लागलेच होते. 

मी आलेली आहे हे बघितल्यावर आमच्या शेजारी राहणारी सत्तरीची यास्मिन, मला भेटायला घरी येऊन बसली. गप्पा मारता-मारता सांगू लागली " मैं दिवालीमे अजमेर दरगेको जा रहीं हूँ. इसबार इन लोगोने बहोत अच्छा किया हैं. वहीच लोग हं सबकू लेको जा रहे है. सब खाना-पिना, गाडी सब उनकाच हैं. आपन खाली जानेका. खाली एक फार्म भरकु ले रहे हैं और एक फोटू और आधार कार्डकी कापी देना हैं. दिवालिके  बाद  निवडणुका हैं ऐसा बोल रहे हैं." 

तिने एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले. 

थोड्या वेळाने सोलापूरची मोलकरीण आली आणि आनंदाने सांगू लागली "ताई, दिवाळीनंतर दोन दिवस अष्टविनायकाला जाणार आहे."

सदैव कर्जबाजारी असलेली ही बाई, कामाचा खाडा करून अष्टविनायकाला जाण्याचा खर्च कसा करणार आहे? हा प्रश्न मला पडला. मी तिला काही विचारायच्या आत तिनेच खुलासा केला, "निवडणूका आल्यात नव्ह. म्हणून आम्हाला नेणार आहेत." 

तिनेही दुसऱ्या एका राजकीय पक्षाचे नाव घेतले. 

आपल्या देशामधे कुठलाच पक्ष धुतल्या तांदुळासारखा नाही. सगळे पक्ष एकमेकांवर पैसे वाटपाचे आणि मतदारांना विकत घेण्याचे आरोप करत असतात. पण निवडणूक तोंडावर आली की सर्वच पक्षांकडून पैसे वाटप होते. एकप्रकारे, तळागाळातील बहुजनांचा तात्पुरता आर्थिक विकास घडतो इतकेच!  

उद्या सकाळी माझी मोलकरीण कामाला आली की, "त्या वीस रुपयाच्या नोटेच्या बदल्यात तुला कधी आणि किती पैसे मिळणार?" हा प्रश्न विचारून तिचे उत्तर ऐकायला मी उत्सुक आहे. 

डॉ. स्वाती बापट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा