मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

त्या कुणी ना पाहिले ...

मागील काही महिने माझ्या व्यायामामधे अनियमितपणा आला होता. तसे होण्यासाठी काही कारणही घडले होते. जुलै महिन्यात माझ्या डाव्या पायाच्या करंगळीजवळच्या बोटाला, घरच्या घरीच दुखापत झाली आणि बारीकसे फ्रॅक्चर झाले. फ्रॅक्चर लहानसे असले तरी बोट बरेच दुखत होते. पण Orthopedic Surgeon ने सांगितले की, "प्लॅस्टर वगैरे घालण्याची गरज नाही, तीन-चार आठवडे 'Buddy Strapping' करून ठेवा. डाव्या पायावर आणि विशेषतः त्या बोटावर वजन घेऊ नका". त्याप्रमाणे ती शेजार-शेजारची दोन बोटे एकमेकांना बांधून ठेवली. त्यानंतर एखादा आठवडा घरी लोळून काढला. पण मग मात्र नेहमीच्या कामाला सुरुवात केली.

फ्रॅक्चर झाल्यावर मला सगळ्यात मोठी काळजी ही होती की, "आता माझ्या रोजच्या व्यायामाचे काय होणार?" डॉक्टरांनाही मी त्याबाबत विचारले. त्यांचे म्हणणे पडले की, चालणे, पळणे यासारखे पायावर जोर पडणारे व्यायाम  वगळता इतर व्यायाम मी करावा. पण पहिले दोन-अडीच महिने मी चालण्याचा तर नाहीच, पण इतर कोणताच व्यायाम केला नाही. व्यायाम नसला की एकप्रकारे negative cycle सुरू होते असं मला वाटतं. एकीकडे शरीराला व्यायाम नाही, आणि दुसरीकडे खाणंही कमी केलेलं नाही, अशा परिस्थितीत वजनवाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे जास्तच guilty feeling येते. त्यामुळे मनाला जास्तच मरगळ येते. आता गेले काही आठवडे मी  पुन्हा हळूहळू चालण्याचा व्यायाम सुरू केला आहे.

रोज काही किलोमीटरचा फेरफटका मारायचा, आणि मग किती पावले झाली, किती वेग होता, त्या काळात हृदयाच्या ठोक्यांचा वेग किती होता, हे सगळे घरी आल्यावर हातातल्या स्मार्ट वॉचवर बघायचे; असे सध्या चालू आहे. आपले आपणच मनोमन कौतुक करायचे आणि सुखावून जायचे हे ओघाने आलेच. नुसते तेवढेच नव्हे तर, आपण केलेल्या व्यायामाच्या आलेखाचा स्क्रीनशॉट घेऊन वेगवेगळ्या फिटनेस ग्रूपवर आणि मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपवर पाठवायचे, हा एक त्यापुढचा चाळा!

हल्ली हळूहळू चालणे वाढवत नेतेय. पूर्वी १२-१३ किलोमीटरचा फेरा सहजी व्हायचा. आता मात्र पहिले काही दिवस ५ किलोमीटर पासून चालू करून आता ८-९ किलोमीटर पर्यंत चालतेय. आज सकाळी मी जरा जास्तच चालले. कदाचित १० किलोमीटर चालले असावे. पण नेमकी किती पावले झाली? किती कॅलरीज बर्न झाल्या? हार्ट रेट किती होता हे सगळे बघायला घरी आल्यावर बसले, तर काय? मनगटावर स्मार्ट वॉचच नाही. मग लक्षात आलं की पहाटे उठल्यावर माझ्या स्मार्टवॉचचा चार्ज कमी आहे हे मी पाहिले होते. त्यामुळे ते स्मार्टवॉच मी चार्जिंगला लावले होते. चहा पिऊन, तयार होईपर्यंत कदाचित चार्जिंग पूर्ण झालेही असेल. पण निघण्याच्या गडबडीत ते स्मार्टवॉच चार्जरमधून काढून हातावर बांधायला मी विसरून गेले होते. 

खरंतर ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. पण माझं मन फार खट्टू झालं. आज नेहमीपेक्षा मी जरा जास्त व्यायाम केला होता. पण नेमका किती याचं मोजमापन झालं नाही, म्हणून मला वाईट वाटले. तसेच, माझ्या आजच्या व्यायामाचा स्क्रीनशॉट इतरांना पाठवून त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याची संधी हुकली म्हणूनही मी हळहळले. या दोन्हीपैकी कुठल्या गोष्टीचा मला जास्त त्रास झाला, हे सांगणे अवघड आहे. पण कदाचित दोन्हीचा सारखाच त्रास झाला असावा.

स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि अशी अनेक स्मार्ट उपकरणे आपल्या हातात आल्यापासून आपण सतत आपले कोडकौतुक स्वतःच करण्यासाठी आणि इतरांकडूनही ऐकण्यासाठी उत्सुक असतो. छोटेसे यशदेखील आपण समाजमाध्यमावर पोस्ट करतो. त्यावर कोणी कौतुकाचे चार शब्द लिहिले की मनोमन सुखावतो. व्हॉटस्अप, इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी माध्यमातून आपण सतत व्यक्त होत असतो. आपण पाठवलेल्या विनोदी पोस्टवर कोणीतरी निदान एखादा 'स्माइली' तरी पाठवावा, असे आपल्याला वाटत असते. आपल्या कुठल्याही पोस्टची बराच वेळ कोणी दखलच घेतली नाही, तर आपण अस्वस्थ होतो. आपण विचारलेल्या शंकेचे कोणी समाधानकारक उत्तर दिले नाही तरी आपण चडफडतो.

कौतुकासाठी आणि इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी मनुष्य किती हपापलेला असतो, याची जाणीव माझ्यासोबत घडलेल्या आजच्या या छोट्याशा घटनेमुळे मला प्रकर्षाने झाली. 

तुमचंही होतं का असं  ? 

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

आणि आज माझं अपहरण झालं!

आज मला जरा उशीराच जाग आली. नेहमी पहाटे चार-साडेचारला जाग येते, पण आज साडे सहा वाजता डोळे उघडले. रोजच्याप्रमाणे फिरायला जावे, का आज उशीर झालाय तर न जावे, अशा द्विधा मनस्थितीत मी होते. पण फिरणे चुकवायला नको, या विचाराने शेवटी तयार होऊन मी बाहेर पडले. रोजच्या सवयीच्या मार्गावर चालत चालत आर्मीच्या सबएरिया ग्राऊंडपाशी पोहोचले. तिथून तसेच पुढे जाऊन मी रेसकोर्सवर रोज पायी एक-दोन चकरा मारत असते.

इतक्यात माझ्या मागून एक चारचाकी गाडी सतत जोरजोरात हॉर्न वाजवत यायला लागली. सकाळच्या शांत वातावरणात तो कर्कश्श आवाज ऐकून मी वैतागले. मागे वळून बघितले, तर ती गाडी सर्रकन येऊन अगदी माझ्या अंगाजवळच थांबली. गाडीच्या आतून एक करडा आवाज आला, "मुकाट्याने गाडीत बस" आवाज स्त्रीचा होता आणि खूप ओळखीचा वाटत होता. त्यामुळे मला जास्तच आश्चर्य वाटले. ती गाडी माझी मैत्रिण स्मिता शिरवळकर चालवत होती. तिनेच, स्मितहास्य करत पण मोठ्या अधिकारवाणीने मला गाडीत बसायला सांगितले होते.

"अगं, माझा व्यायाम अजून व्हायचाय. आत्ता कुठे जायचंय? आत्ता नको गं. मग माझं चालणं राहून जाईल..."
"मी तुझं काही ऐकणार नाही. मुकाट्याने गाडीत बस आणि माझ्याबरोबर घरी चल. आज आपण एकत्र चहा-कॉफी पिऊ या, पूर्वीसारख्या मनसोक्त गप्पा मारूया, मग मी तुला परत घरी सोडते"

माझ्या मैत्रिणीची ती लाडिक आज्ञा मानून मी गाडीत तिच्याशेजारी जाऊन बसले. स्मिताची आणि माझी अनेक वर्षांपासून जवळची मैत्री आहे. तिचा नवरा आणि माझा नवरा यांची पण आधीपासूनची ओळख होतीच. आर्मीच्या सेपरेटेड क्वार्टर्समधे काही वर्षे आम्ही एकाच कॉलनीत जवळ-जवळच राहात होतो. तिचा मुलगा अभिमन्यू आणि माझी मुलगी असिलता एकाच वयाचे आणि एकाच वर्गात शिकणारे. त्यामुळे आम्हा दोघींमधला मैत्रीचा धागा अजूनच पक्का होत गेला. त्यावेळी आम्ही दोघीही आपापल्या व्यवसायात व्यग्र असायचो. पण रविवारी सकाळी एकमेकींकडे जाऊन चहा पिता-पिता गप्पा मारणे हा आमचा आवडता छंद होता. 

आज सकाळी-सकाळी तिच्या घरी मी अचानकच पोचल्याने तिच्या नवऱ्याला सुखद धक्का बसला. मग त्या दोघांनी फर्मान काढले, "आत्ताच्या आत्ता आनंदला बोलवून घे". थंडीच्या दिवसात आनंद  पांघरूणात गुरफटून साखरझोपेत असणार याचा मला अंदाज होता. म्हणून आनंदला फोन न करता  मेसेज पाठवून, "माझे अपहरण झाले आहे" असे कळवले. त्याचे उलटे उत्तर आले, "तुझी सुटका करण्यासाठी खंडणी काय द्यायचीय, ते सांग". आनंदचे ते उत्तर ऐकून मी मनोमन भलतीच सुखावले. लग्नाला चाळीस वर्षे होत आलेली असताना, चक्क खंडणी द्यायची तयारी दाखवून, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बायकोला सोडवून आणायला आपला नवरा तयार असावा, हे कोणाही बायकोला सुखावह असणारच ना? 

आनंद नुकताच जागा होऊन, मी आधीच करून ठेवलेल्या चहाचा आस्वाद घेत बसला होता. त्यामुळे, तो मला घ्यायला येऊ शकला नाही. पण स्मिता आणि कर्नल शिरवळकर यांच्याबरोबर कपभर चहा पिऊन आणि पोटभर गप्पा मारून मला मात्र खूप हलके वाटले. 

अगदी आश्चर्यकारकरीत्या, माझ्या रविवारची अशी आनंदी सुरूवात करून दिल्याबद्दल माझ्या अपहरणकर्तीचे शतशः आभार !