रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

आणि आज माझं अपहरण झालं!

आज मला जरा उशीराच जाग आली. नेहमी पहाटे चार-साडेचारला जाग येते, पण आज साडे सहा वाजता डोळे उघडले. रोजच्याप्रमाणे फिरायला जावे, का आज उशीर झालाय तर न जावे, अशा द्विधा मनस्थितीत मी होते. पण फिरणे चुकवायला नको, या विचाराने शेवटी तयार होऊन मी बाहेर पडले. रोजच्या सवयीच्या मार्गावर चालत चालत आर्मीच्या सबएरिया ग्राऊंडपाशी पोहोचले. तिथून तसेच पुढे जाऊन मी रेसकोर्सवर रोज पायी एक-दोन चकरा मारत असते.

इतक्यात माझ्या मागून एक चारचाकी गाडी सतत जोरजोरात हॉर्न वाजवत यायला लागली. सकाळच्या शांत वातावरणात तो कर्कश्श आवाज ऐकून मी वैतागले. मागे वळून बघितले, तर ती गाडी सर्रकन येऊन अगदी माझ्या अंगाजवळच थांबली. गाडीच्या आतून एक करडा आवाज आला, "मुकाट्याने गाडीत बस" आवाज स्त्रीचा होता आणि खूप ओळखीचा वाटत होता. त्यामुळे मला जास्तच आश्चर्य वाटले. ती गाडी माझी मैत्रिण स्मिता शिरवळकर चालवत होती. तिनेच, स्मितहास्य करत पण मोठ्या अधिकारवाणीने मला गाडीत बसायला सांगितले होते.

"अगं, माझा व्यायाम अजून व्हायचाय. आत्ता कुठे जायचंय? आत्ता नको गं. मग माझं चालणं राहून जाईल..."
"मी तुझं काही ऐकणार नाही. मुकाट्याने गाडीत बस आणि माझ्याबरोबर घरी चल. आज आपण एकत्र चहा-कॉफी पिऊ या, पूर्वीसारख्या मनसोक्त गप्पा मारूया, मग मी तुला परत घरी सोडते"

माझ्या मैत्रिणीची ती लाडिक आज्ञा मानून मी गाडीत तिच्याशेजारी जाऊन बसले. स्मिताची आणि माझी अनेक वर्षांपासून जवळची मैत्री आहे. तिचा नवरा आणि माझा नवरा यांची पण आधीपासूनची ओळख होतीच. आर्मीच्या सेपरेटेड क्वार्टर्समधे काही वर्षे आम्ही एकाच कॉलनीत जवळ-जवळच राहात होतो. तिचा मुलगा अभिमन्यू आणि माझी मुलगी असिलता एकाच वयाचे आणि एकाच वर्गात शिकणारे. त्यामुळे आम्हा दोघींमधला मैत्रीचा धागा अजूनच पक्का होत गेला. त्यावेळी आम्ही दोघीही आपापल्या व्यवसायात व्यग्र असायचो. पण रविवारी सकाळी एकमेकींकडे जाऊन चहा पिता-पिता गप्पा मारणे हा आमचा आवडता छंद होता. 

आज सकाळी-सकाळी तिच्या घरी मी अचानकच पोचल्याने तिच्या नवऱ्याला सुखद धक्का बसला. मग त्या दोघांनी फर्मान काढले, "आत्ताच्या आत्ता आनंदला बोलवून घे". थंडीच्या दिवसात आनंद  पांघरूणात गुरफटून साखरझोपेत असणार याचा मला अंदाज होता. म्हणून आनंदला फोन न करता  मेसेज पाठवून, "माझे अपहरण झाले आहे" असे कळवले. त्याचे उलटे उत्तर आले, "तुझी सुटका करण्यासाठी खंडणी काय द्यायचीय, ते सांग". आनंदचे ते उत्तर ऐकून मी मनोमन भलतीच सुखावले. लग्नाला चाळीस वर्षे होत आलेली असताना, चक्क खंडणी द्यायची तयारी दाखवून, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बायकोला सोडवून आणायला आपला नवरा तयार असावा, हे कोणाही बायकोला सुखावह असणारच ना? 

आनंद नुकताच जागा होऊन, मी आधीच करून ठेवलेल्या चहाचा आस्वाद घेत बसला होता. त्यामुळे, तो मला घ्यायला येऊ शकला नाही. पण स्मिता आणि कर्नल शिरवळकर यांच्याबरोबर कपभर चहा पिऊन आणि पोटभर गप्पा मारून मला मात्र खूप हलके वाटले. 

अगदी आश्चर्यकारकरीत्या, माझ्या रविवारची अशी आनंदी सुरूवात करून दिल्याबद्दल माझ्या अपहरणकर्तीचे शतशः आभार !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा