शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

दीपशिखा

१९९५ साली, अलाहाबाद कॅंटोन्मेंटमधील टेनिस कोर्टवर एक सुंदर, सुदृढ मुलगी तडफदारपणे टेनिस खेळताना मी बघितली. तिचा खेळ झाल्यावर मी तिला तिचे नाव विचारले. ती म्हणाली, "दीपशिखा". ती मुलगी आणि ते नाव माझ्या मनात घर करून बसले. त्यानंतर साधारण दीड-पावणेदोन वर्षांनंतर माझ्या धाकट्या वहिनीला एक गोड  मुलगी झाली. मी तिची आत्या असल्याने तिचे नामकरण करण्याचा मान माझाच होता. मी त्या मुलीचे नाव 'दीपशिखा' ठेवले. 

आम्हा तीन भावंडांच्या मुलांपैकी दीपशिखा सगळ्यात लहान असल्याने ती आम्हा सर्वांचीच लाडकी होती. घरात इतर सगळेजण तिला  दिलू म्हणत. पण माझ्यासाठी ती नेहमीच दीपशिखा होती. लहानपणी जरा घुमी वाटणारी दीपशिखा वयात आल्यावर एखाद्या सुंदर, टवटवीत फुलासारखी खुलली. अतिशय हुशार,  प्रेमळ, अधिकारवाणीने बोलणारी, माणसांमध्ये रमणारी दीपशिखा कलासक्त होती. प्रवासाची, चवीचे खाण्याची,  नटण्याची आवड असलेली आणि सदैव उल्हसित असलेली ती तरुणी तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे प्रत्येकावर छाप पाडत असे. 

आम्हा दोघींचे रूप, बोलण्याची ढब, आणि एकंदर व्यक्तिमत्त्व यांमधे खूप साम्य आहे असे इतरांना वाटायचे. आम्हा दोघींचे एकमेकींवर अतोनात प्रेम असले तरीही छोट्या-मोठ्या कारणांवरून आमचे बरेच वाद व्हायचे. त्यामुळे, तुम्हा दोघींची Love-Hate relationship आहे, असे माझा भाऊ गिरीश नेहमी म्हणायचा. आम्ही एकमेकींची मनसोक्त चेष्टामास्करी करायचो, अगदी समवयस्क मैत्रिणी असल्यासारख्या आम्ही रात्ररात्र गप्पा मारत बसायचो, एकमेकींवर बौद्धिक कुरघोड्या करायचो. खूप मजा करायचो.  

दीपशिखा दहावीमध्ये शिकत असताना काही कारणाने आम्ही मुंबईला गेलो होतो. शाळेतून आल्या-आल्या  ती मला म्हणाली, "आज माझ्या शाळेतल्या संस्कृतच्या बाईंनी मला विचारले माझे नाव कोणी ठेवले. मी अर्थातच तू ठेवल्याचे त्यांना सांगितले. आमच्या बाई म्हणाल्या, तुझ्या आत्याला जाऊन सांग की तिने तुझे अगदी खास नाव ठेवले आहे. बाईंनी मला माझ्या नावाचा अर्थही समजावून सांगितलाय. त्यामुळे I am feeling really special. Thank you very much!" अलाहाबादला भेटलेल्या मुलीमुळे प्रभावित होऊन, मी तिचे नाव दीपशिखा ठेवले होते, असे मी तिला सांगितले. त्यावेळी  तिने मला, "दीपशिखा कालिदास" असे काहीसे सांगितलेले मला आठवते. त्यानंतरही अनेकदा याच कारणासाठी ती माझे वरचेवर आभार मानत आली. पण तो संदर्भ  मी पार विसरून गेले होते. 

एका आठवड्यापूर्वी आम्ही तिच्या लग्नासाठी नाशिकला निघालो होतो. त्यावेळीदेखील, मी तिचे नाव दीपशिखा ठेवल्याबद्दल तिने माझे आभार मानले आणि मला म्हणाली," आत्या, माझ्या नावाचा काहीतरी खास अर्थ आहे. तू जरा बघून सांग ना." पण लग्नाच्या धामधुमीत मी ते विसरूनच गेले. 

२८ डिसेंबरला सकाळी दीपशिखाच्या हळदीचा कार्यक्रम होता आणि गोरज मुहूर्तावर तिचा विवाह होणार होता. पण नियतीला ते मंजूर नसावे. त्याच दिवशी सकाळी झालेला दीपशिखाचा आकस्मित मृत्यू आम्हा आप्तस्वकीयांनाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला चुटपुट लावून गेला. त्यानंतर गेले आठवडाभर मी माझ्या भावाच्या घरीच आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या सांत्वनासाठी शब्द नसले तरीही लोक येऊन भेटत आहेत. 

आज मी "दीपशिखा" या नावाचा अर्थ शोधला आणि मला "दीपशिखा कालिदास" याचा संदर्भदेखील सापडला. "दीपशिखा" ही कालिदासाच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट उपमा मानली जाते. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या ज्या श्लोकामधे ती उपमा मिळते तो श्लोक खालीलप्रमाणे आहे:-

संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।

या श्लोकामध्ये कवी कालिदासांनी राजकुमारी इंदुमतीस  दीपशिखेची (मशालीची) उपमा दिली आहे. राजकुमारी इंदुमतीच्या स्वयंवराच्या प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या विवाहोत्सुक राजांचे चेहेरे पाहत  इंदुमती पुढे-पुढे चालत जात असते. त्या प्रसंगाच्या वर्णनासाठीच कालिदासाने ही उपमा योजलेली आहे. तो म्हणतो, "जसे कुणी हातात दीपशिखा अथवा मशाल घेऊन रात्रीच्या काळोखात पुढे जात असताना राजमार्गावरील पुढील घरांचे सज्जे प्रकाशित होतात व मागील घरे अंधारात बुडून जातात; त्याचप्रमाणे, इंदुमती आपल्याला वरमाला घालेल असे वाटून तिच्या मार्गात पुढे असलेल्या राजांचे चेहरे मोठ्या आशेने उजळून जात व मागील राजांचे चेहरे निराशेने काळे पडत". असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. उपमा या अलंकाराचा असा सौन्दर्याविष्कार निव्वळ अद्वितीयच आहे! उपमेतील या सौंदर्यामुळे कालिदासांना पुढे “दीपशिखा कालिदास” असे संबोधन मिळाले. 

आमची दीपशिखा जिथे असेल तिथे मशालीसारखी तळपत राहील याची मला खात्री आहे. तिला उद्देशून अनेक प्रश्न आज विचारावेसे वाटतात, "दीपशिखा, तुझ्या स्वयंवरातील राजकुमार तर तू आधीच ठरवलेला होतास. मग त्याला वरमाला न घालताच तू पुढे का निघून गेलीस? आम्हा सर्वाना इहलोकीच्या दुःखमय अंधारात ढकलून तू परलोक उजळून काढायला गेली आहेस का? का तू स्वतःच परलोकीची एक शापित अप्सरा होतीस?"

हे सगळे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार...