शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

दीपशिखा

१९९५ साली, अलाहाबाद कॅंटोन्मेंटमधील टेनिस कोर्टवर एक सुंदर, सुदृढ मुलगी तडफदारपणे टेनिस खेळताना मी बघितली. तिचा खेळ झाल्यावर मी तिला तिचे नाव विचारले. ती म्हणाली, "दीपशिखा". ती मुलगी आणि ते नाव माझ्या मनात घर करून बसले. त्यानंतर साधारण दीड-पावणेदोन वर्षांनंतर माझ्या धाकट्या वहिनीला एक गोड  मुलगी झाली. मी तिची आत्या असल्याने तिचे नामकरण करण्याचा मान माझाच होता. मी त्या मुलीचे नाव 'दीपशिखा' ठेवले. 

आम्हा तीन भावंडांच्या मुलांपैकी दीपशिखा सगळ्यात लहान असल्याने ती आम्हा सर्वांचीच लाडकी होती. घरात इतर सगळेजण तिला  दिलू म्हणत. पण माझ्यासाठी ती नेहमीच दीपशिखा होती. लहानपणी जरा घुमी वाटणारी दीपशिखा वयात आल्यावर एखाद्या सुंदर, टवटवीत फुलासारखी खुलली. अतिशय हुशार,  प्रेमळ, अधिकारवाणीने बोलणारी, माणसांमध्ये रमणारी दीपशिखा कलासक्त होती. प्रवासाची, चवीचे खाण्याची,  नटण्याची आवड असलेली आणि सदैव उल्हसित असलेली ती तरुणी तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे प्रत्येकावर छाप पाडत असे. 

आम्हा दोघींचे रूप, बोलण्याची ढब, आणि एकंदर व्यक्तिमत्त्व यांमधे खूप साम्य आहे असे इतरांना वाटायचे. आम्हा दोघींचे एकमेकींवर अतोनात प्रेम असले तरीही छोट्या-मोठ्या कारणांवरून आमचे बरेच वाद व्हायचे. त्यामुळे, तुम्हा दोघींची Love-Hate relationship आहे, असे माझा भाऊ गिरीश नेहमी म्हणायचा. आम्ही एकमेकींची मनसोक्त चेष्टामास्करी करायचो, अगदी समवयस्क मैत्रिणी असल्यासारख्या आम्ही रात्ररात्र गप्पा मारत बसायचो, एकमेकींवर बौद्धिक कुरघोड्या करायचो. खूप मजा करायचो.  

दीपशिखा दहावीमध्ये शिकत असताना काही कारणाने आम्ही मुंबईला गेलो होतो. शाळेतून आल्या-आल्या  ती मला म्हणाली, "आज माझ्या शाळेतल्या संस्कृतच्या बाईंनी मला विचारले माझे नाव कोणी ठेवले. मी अर्थातच तू ठेवल्याचे त्यांना सांगितले. आमच्या बाई म्हणाल्या, तुझ्या आत्याला जाऊन सांग की तिने तुझे अगदी खास नाव ठेवले आहे. बाईंनी मला माझ्या नावाचा अर्थही समजावून सांगितलाय. त्यामुळे I am feeling really special. Thank you very much!" अलाहाबादला भेटलेल्या मुलीमुळे प्रभावित होऊन, मी तिचे नाव दीपशिखा ठेवले होते, असे मी तिला सांगितले. त्यावेळी  तिने मला, "दीपशिखा कालिदास" असे काहीसे सांगितलेले मला आठवते. त्यानंतरही अनेकदा याच कारणासाठी ती माझे वरचेवर आभार मानत आली. पण तो संदर्भ  मी पार विसरून गेले होते. 

एका आठवड्यापूर्वी आम्ही तिच्या लग्नासाठी नाशिकला निघालो होतो. त्यावेळीदेखील, मी तिचे नाव दीपशिखा ठेवल्याबद्दल तिने माझे आभार मानले आणि मला म्हणाली," आत्या, माझ्या नावाचा काहीतरी खास अर्थ आहे. तू जरा बघून सांग ना." पण लग्नाच्या धामधुमीत मी ते विसरूनच गेले. 

२८ डिसेंबरला सकाळी दीपशिखाच्या हळदीचा कार्यक्रम होता आणि गोरज मुहूर्तावर तिचा विवाह होणार होता. पण नियतीला ते मंजूर नसावे. त्याच दिवशी सकाळी झालेला दीपशिखाचा आकस्मित मृत्यू आम्हा आप्तस्वकीयांनाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला चुटपुट लावून गेला. त्यानंतर गेले आठवडाभर मी माझ्या भावाच्या घरीच आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या सांत्वनासाठी शब्द नसले तरीही लोक येऊन भेटत आहेत. 

आज मी "दीपशिखा" या नावाचा अर्थ शोधला आणि मला "दीपशिखा कालिदास" याचा संदर्भदेखील सापडला. "दीपशिखा" ही कालिदासाच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट उपमा मानली जाते. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या ज्या श्लोकामधे ती उपमा मिळते तो श्लोक खालीलप्रमाणे आहे:-

संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।

या श्लोकामध्ये कवी कालिदासांनी राजकुमारी इंदुमतीस  दीपशिखेची (मशालीची) उपमा दिली आहे. राजकुमारी इंदुमतीच्या स्वयंवराच्या प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या विवाहोत्सुक राजांचे चेहेरे पाहत  इंदुमती पुढे-पुढे चालत जात असते. त्या प्रसंगाच्या वर्णनासाठीच कालिदासाने ही उपमा योजलेली आहे. तो म्हणतो, "जसे कुणी हातात दीपशिखा अथवा मशाल घेऊन रात्रीच्या काळोखात पुढे जात असताना राजमार्गावरील पुढील घरांचे सज्जे प्रकाशित होतात व मागील घरे अंधारात बुडून जातात; त्याचप्रमाणे, इंदुमती आपल्याला वरमाला घालेल असे वाटून तिच्या मार्गात पुढे असलेल्या राजांचे चेहरे मोठ्या आशेने उजळून जात व मागील राजांचे चेहरे निराशेने काळे पडत". असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. उपमा या अलंकाराचा असा सौन्दर्याविष्कार निव्वळ अद्वितीयच आहे! उपमेतील या सौंदर्यामुळे कालिदासांना पुढे “दीपशिखा कालिदास” असे संबोधन मिळाले. 

आमची दीपशिखा जिथे असेल तिथे मशालीसारखी तळपत राहील याची मला खात्री आहे. तिला उद्देशून अनेक प्रश्न आज विचारावेसे वाटतात, "दीपशिखा, तुझ्या स्वयंवरातील राजकुमार तर तू आधीच ठरवलेला होतास. मग त्याला वरमाला न घालताच तू पुढे का निघून गेलीस? आम्हा सर्वाना इहलोकीच्या दुःखमय अंधारात ढकलून तू परलोक उजळून काढायला गेली आहेस का? का तू स्वतःच परलोकीची एक शापित अप्सरा होतीस?"

हे सगळे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार... 

२२ टिप्पण्या:

  1. स्वाती - फार अर्थगर्भित लिहिले आहेस. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दि.२८ डिसेंबर २०२५ चा दिवस निष्ठूर होता. दीपशिखा ही अप्सरा चटका लावून गेली.

    उत्तर द्याहटवा
  2. जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला ! पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा…..गदिमांच्या ओळी …पण आपल्या जवळच्या माणसांमधे …असं काही घडलं की फार वाईट वाटतं.
    कालाय त्समै नमः 🙏.
    लग्न ..आयुष्यातील केवढा आनंदाचा दिवस…त्या क्षणी बाळा तुझी काय अवस्था झाली असेल …कल्पना देखील करवत नाही….पण मृत्युला देखील आनंदाने सामोरं जायचं…हेच तू दाखवून दिलस .दीपशिखा तुला नक्कीच सद्गती मिळणार .

    उत्तर द्याहटवा
  3. रघुनाथ दामले वकील सोलापूर२ जानेवारी, २०२६ रोजी ५:४८ PM वाजता

    अत्यंत दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  4. खूप खूप खूपच सुंदर नातं होतं. आजही आहेच.
    जे काही झालं, त्याबद्दल बोलणं केवळ अशक्य.
    खूप रडावंस वाटतं गं!

    उत्तर द्याहटवा
  5. निनावी
    नियतीने पोटचा गोळा आणि काळजाचा तुकडा हिरवून नेला अत्यंत वाईट वाटत. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

    उत्तर द्याहटवा
  6. तिच जाण एवढ चटका लावणार आहे की नवीन वर्ष दीपाशिखेशिवाय जाणार ह्या भावनेने आकाशालाही अश्रू अनावर झाले आणि १ जानेवारीला मुंबईत पाऊस पडला

    उत्तर द्याहटवा
  7. स्वाती ताई, मन हेलावून गेलं. कधीच हलकं न होणारं दुःख मागे ठेवून गेली दीपशिखा..

    उत्तर द्याहटवा
  8. स्वातीताई , बातमी ऐकूनच खूप दुःख झाले आहे. दीपशिखा नावाचा अर्थ ही समजला, आत्या आणि भाची मधील प्रेमभावना
    खूप छान होत्या.

    कु. दीपशिखा, भावपूर्ण श्रद्धांजली.

    Sunil Zunje and family, Solapur

    उत्तर द्याहटवा
  9. फार वाईट. काळजाला भिडणारी घटना .
    असे होणे नको होते .
    दीपशिखा कायम अमर राहो.

    उत्तर द्याहटवा
  10. ही अनपेक्षित दुःखद घटना आम्हा इतरांनचे हृदय हलवून गेली तुम्हा कुटुंबियांवर काय आघात झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. धाडसी मुलगी होती दीपशिखा. देव तिच्या आत्म्यास शांती देवो आणि तुम्हा सर्वाना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. 🙏

    प्रकाश कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  11. नियतीचा क्रूर खेळ! तिला प्रत्यक्ष पहिले नव्हते पण ही घटना चटका लावून गेली! काय तुमचे सांत्वन करायचे!
    मेघा

    उत्तर द्याहटवा
  12. खूप दुःखद घटना, भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  13. अतिशय वाईट प्रसंग, अशी वेळ कोणावरही येऊ नये.तुम्हा सर्वांना हा धक्का सहन करण्याची ताकद देवो,हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

    उत्तर द्याहटवा
  14. मन विषण्ण करणारी घटना आणि तितक्याच हृद्य आठवणी..
    तुमचे लेखन आणखी हेलावून गेले 🙏🙏
    दीपशिखा असेल तेथे प्रकाशच असेल, बेटा तुला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏
    अनुपमा

    उत्तर द्याहटवा
  15. दीपशिखा ला मी ज्युनिअर केजी पासून ओळखते. पूर्णतः बिनधास्त! अत्यंत straightforward! जे आहे तस! ती नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही!
    कालही येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते!
    हा प्रसंग पाहिल्यावर वाटतं, देवाला विचारावं की तू आहेस ना, मग असा कस झालं?
    देव तिच्या आत्माला शांती देवो. 🙏

    उत्तर द्याहटवा
  16. अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक, धक्कादायक घटना घडली. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, ईश्वर तिच्या आत्म्यास सदगती देवो ही प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली.
    ( स्वाती तू डॉक्टर म्हणून ह्या घटनेचे विश्लेषण करावे ही विनंती )

    उत्तर द्याहटवा
  17. She always will be in memory of not only Girish n Prachi but in memory of everyone who came in her contact...it was really a very early n painful exit of Deepshikha!! Om shanti

    उत्तर द्याहटवा
  18. देवाला अशी उमलणारी गोड कळी खुडावी असं का वाटलं असेल?खरंच शापित अप्सरा! काही बोलायला शब्दच नाहीत. अतिशय दुःखद घटना. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो.

    उत्तर द्याहटवा
  19. अत्यंत दुःखद घटना,29 Dec 25 ला वृत्तपत्रात बातमी वाचली, तेंव्हा पासून मनाची उदासी जात नाहीये. श्री गिरीश आणि सौ प्राची वहिनी यांची प्रत्यक्ष ओळख नाही, पण माझ्या संवेदना तुम्हा सर्वांच्या सोबत आहेत नितिन चौधरी.














    गिरीश आणि सौ प्राची यांची प्रत्यक्ष ओळख नाही पण माझ्या संवेदना त्यांच्या आणि तुम्हा सर्वांच्या सोबत आहेत. परमेश्वर दीपशिखा च्या आत्म्यास शांती देवो.

    उत्तर द्याहटवा