शनिवार, १३ जुलै, २०१३

'मेंटल ब्लॉक'

हल्ली मला मनापासून सारखं काहीतरी लिहावसं वाटतंय आणि मी रोज चक्क लिहितेय.

झालं असं की, मला आधीच हात दुखण्याचा त्रास होत होता. तरी तसेच कॉम्प्युटर वरचा मराठी font वापरून, लिखाण चालू ठेवलं होतं. पण typing च्या त्रासातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून बघितला, मित्र-मैत्रिणींशी बोलले. मी सगळं हातानीच लिहून काढावं, कुणाकडून तरी लिहून घ्यावं, किंवा सरळ मराठी टायपिस्ट कडून type करून घ्यावं, असे आणि इतर बरेच उपाय  समोर आले. स्वतः डॉक्टर असल्यामुळे शंका अशीही आली की माझं हस्ताक्षर इतरांना तर सोडाच, पण माझं मला तरी परत वाचता येईल का? आणि लिहिताना  हात दुखणार होते ते वेगळंच. बरं, माझ्या मनात जसे जसे विचार येत जातील तसे ते लगेच type  करणारा टायपिस्ट कुठून आणायचा? मराठीसाठी speech to text असं काही software मिळतंय का, हे शोधलं पण तसं काही  मिळालं नाही. मग हळू-हळू type करत,सात आठ लेख लिहून काढले.

माझ्या दुखण्यावर मात करून, कसं जिद्दीने मी लिहितेय हे मी मोठ्या अभिमानानं  अमेरिकेत शिकणाऱ्या आमच्या मुलांना सांगितलं. लगेच त्या दोघांनीही, "एक ब्लॉग लिहायला सुरु कर" असं सुचवलं. पण मला तर ब्लॉग कसा उघडायचा ते माहिती नव्हतं. मग तो उघडणार कोण ? बरं, तो उघडला तर वापरायचा कसा हे कोणाकडून शिकणार? मग सोयीस्करपणे मनाशी म्हटलं, मला कुठलं काय ब्लॉगिंग जमणार? खरंतर,  blogging, netbanking या असल्या गोष्टींबद्दल केवळ अज्ञानामुळे बसलेली, एक सुप्त अढी माझ्या मनांत होतीच! मी मग मुलांना सांगून टाकलं, "तुम्ही  पुण्याला आलात की मला शिकवा." खरंतर हे सांगण्यात शिकण्याच्या उर्मीपेक्षा, ब्लॉग  प्रकरण पुढे ढकलण्याची माझी इच्छाच जास्त प्रबळ होती. मग, माझं लिखाण आधीच्याच पद्धतीनं हळू हळू चालू राहिलं. 

आमच्या मुलीचा मित्र, रघू महाजन गेल्या शनिवारी सहा जुलैला पुण्यात आमच्या घरीच उतरला  होता. तो स्वत:च्या तीन-चार ब्लॉग्सवर नेहमी काही न काही लिहीत असतो, या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटत आलंय. पण त्याच्यासारख्या हुषार मुलाला काय सगळंच शक्य आहे, असंही वाटायचं. आमच्या दोन दिवसांच्या सहवासात, पुण्या मुंबईतील हॉटेलमधल्या चांगल्या-चुंगल्या खाण्याबद्दलचं माझं ज्ञान ऐकून, मी ह्या विषयावर एक ब्लॉग लिहावा, असं रघूनं सुचवलं. त्याची ती सूचना ऎकूनही मी न ऎकल्यासारखी केली. रविवारी, सात जुलैला रघूबरोबर मुक्त संवादाचा एक कार्यक्रम आम्ही स्वानंद फाउंडेशनतर्फे, गरवारे कॉलेजच्या ए.व्ही. हॉलमध्ये ठेवला होता. हॉल उघडण्याची वाट बघत, आम्ही उभे होतो. तेवढ्यात रघूनं  हॉलच्या भिंतीकडे कुठेतरी बोट दाखवून प्रश्न केला, "पुराचं पाणी तिथपर्यंत आलं होतं का?" मी त्या दिशेनं बघितलं. भिंतीवर एके ठिकाणी मला flood level अशी लाल रेघ दिसली. मी दुजोरा दिला. "किती साली आला होता पूर?" त्याचा पुढचा प्रश्न आला. मग मात्र, "माझ्या जन्माच्या आधी एक दोन वर्षे" असं vague उत्तर देऊन मी त्याच्या पुढच्या प्रश्नांपासून सुटका करून घेतली. खरंतर, इतके वेळा इथे येऊनही, flood level ची ही  लाल रेघ,  मला आधी कधीच दिसली नाही आणि पानशेत धरण नेमकं कधी फुटलं हेही मला माहीत नसावं या दोन्ही गोष्टींची मला कमालीची लाज वाटली होती. पण तीही तेवढ्यापुरतीच! वेळ तर मारून नेली होती, त्यामुळे मग तो विषय डोक्यातून निघून गेला. 

बारा जुलै २०१३. सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्र चाळताना लक्षात आलं  की पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला आज बावन्न वर्षे झाली. सगळ्या वर्तमानपत्रांमधून त्यावेळचा घटनाक्रम, बातम्या, थरारक अनुभव, छायाचित्रं, असं सर्व छापून आलेलं होतं. गेली कित्येक वर्षे, म्हणजे निदान चाळीस तरी, या दिवशी छापून येणाऱ्या अशाच प्रकारच्या बातम्या मी वाचत राहिले असेन. अगदी लहानपणापासून या घटनेबद्दल घरातल्या मोठ्या माणसांकडून, बरेच वेळा बरंच काही ऐकलेलं होतं. पण पुण्याच्या इतिहासातील इतक्या महत्त्वाच्या घटनेबद्दल माझ्या लक्षात फारसं काहीच राहिलेलं नव्हतं, हे  रघूशी बोलताना हे प्रकर्षानं जाणवलं होतं. त्यामुळे मग आज मात्र सगळ्या बातम्या अगदी मन लावून वाचल्या. जास्त पाणी साठल्यामुळे आधीच कच्चे असलेले बांध फुटून 'पानशेत झालं'. पण धरण फुटण्यापूर्वी सैन्याच्या जवानांनी, धरणाला पडलेल्या फटी ब्लॉक करण्यासाठी वाळूच्या bags रचून, धरणफुटी काही काळ तरी लांबवली होती, तसेच खडकवासला धरणाची काही दारे वेळीच उघडून पुणेकरांना पुरापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता म्हणे. हे वाचून भारतीय सैन्याबद्दल नेहमीप्रमाणेच पुन्हा अभिमान वाटला. 
  
परवा मुलाचा मित्र सुजीत घोलप, आमच्या घरी रहायला आला होता. सहज म्हणून त्याला माझे लेख वाचून दाखवले. "काकू, छान लिहिता आहात अगदी. तुमचा ब्लॉग आहे का? ब्लॉगवर टाका ना. आणि ब्लॉग नसेल तर आजच उघडा आणि त्यावर लिहीत जा." असं म्हणाला. त्याच्यापुढे माझं अज्ञान उघडे पडू नये असं एकीकडे वाटत असलं तरी, सरळ मी सांगितलंच, "मला ब्लॉग उघडता आणि वापरता येत नाही." लगेच सुजीतने, मला माझा ब्लॉग उघडून दिला आणि त्यावर लिहायला शिकवले. ब्लॉगवर लिहितेय तर जाणवतंय की  ब्लॉगवर लिहिणं नुसतं type करण्यापेक्षा बरच सोप्पं आहे. जाम मस्त वाटतंय आता. मग जेंव्हा माझ्या मुलांनी सांगितलं तेंव्हा मी का बरं तयार नव्हते? एकमेव कारण म्हणजे माझा 'मेंटल ब्लॉक'! तो 'ब्लॉक' निघाला आणि हा 'ब्लॉग' उघडला, तेंव्हाच मला मजा यायला लागली. 

'मेंटल ब्लॉक' वरून, सहज मनांत विचार यायला लागले.  आपापल्या मनातले अज्ञानाचे 'ब्लॉक्स' लवकरात लवकर हटवून टाकण्यातच शहाणपणा असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगांत हे किती सुकर होऊन गेलंय ते. पण मनामध्ये, न्यूनगंडाचे, नैराश्याचे, नकारात्मक विचारांचे, तर कधी गैरसमजुतीचे 'ब्लॉक' देखील असतातच  की. मनाचे काही दरवाजे बंद ठेवण्यानं खूप काही साधतं हे खरं आहे. पण, बांध फुटू नये यासाठी, वेळच्यावेळी आपल्या मनाची काही दारं उघडून तिथले 'ब्लॉक' काढावेच लागतात. केंव्हा कुठले दरवाजे उघडायचे आणि कुठले बंदच ठेवायचे, हे ज्याचं त्यानं समजून घेतलेलं बरं. नाही का? प्रत्येक वेळी कोण आणि कसं समजावून सांगणार?

1 टिप्पणी:

  1. ब्लॉगची कल्पना उत्तम. छान सुरुवात आहे, वाचून खूप छान वाटले. सुंदर वाचनीय लेख तुझे नक्कीच वाचायला मिळतील ह्यात शंका नाही. मस्त. असेच लिहित रहा. खूप शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा