शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

जय महाराष्ट्र?

मागच्या आठवड्यात आम्ही आमच्या गाडीने पुणे ते कोल्हापूर, सांगली आणि परत असा प्रवास केला . संध्याकाळ झाली होती आणि  रस्त्यावरच्या पाट्या नीट  दिसत नव्हत्या.  कुठल्यातरी आडगावाच्या नाक्यावर उभ्या असलेल्या काही तरुणांना रस्ता विचारावा म्हणून थांबलो.
"पलूस फाटा किती लांब आहे?"
"पलूस यहां कहां? आप आगे आ गये.  पलूस तो पाक पिछे रह गया" एका तरुणाने तत्परतेने उत्तर दिले.
"मी मराठीत विचारलं आणि तुम्ही सुद्धा मराठी बोलणारे दिसता आहात. मग माझ्या प्रश्नाला हिंदीत का उत्तर देता आहात?"
ओशाळवाणं हसून तो तरुण म्हणाला, "कुटं बिगडलंय हिंदीत बोललुय तर?"
मी स्पष्ट केलं, "मी स्वतः जर प्रश्न राष्ट्रभाषेमध्ये विचारला असता तर तुमचं उत्तर योग्यच होतं. पण महाराष्ट्रात मराठी भाषेत विचारलेल्या प्रश्नाला एका मराठी भाषिक माणसाकडून मला उत्तर मराठीत अपेक्षित होतं" 
पुन्हा कसनुसं हसून तो म्हणाला, "मला वाटलं तुम्ही मुंबईहून आलाय. म्हणून मी हिंदीतून उत्तर दिलं."
मला त्याच्या उत्तराची फारच गंमत वाटली.  मी त्याला विचारलं,
"मुंबई महाराष्ट्रातच आहे, का महाराष्ट्राच्या बाहेर?"
माझ्या प्रश्नाला तो काय उत्तर देतो आहे, हे ऐकायला आम्ही तिथे थांबलोच नाही. जाता जाता नाक्यावर एका राजकीय पक्षाच्या भव्य फ्लेक्स वर लिहिलेले दिसले "जय महाराष्ट्र".
दुर्दैवानं आज "जय महाराष्ट्र" ही फक्त एक राजकीय घोषणा होऊन राहिली आहे. मनात आलं, आता कुठल्या तरी राजकीय पक्षाने असा फतवा काढावा की,"प्रत्येक मराठी भाषिक माणसाने निदान मराठीत विचारलेल्या प्रश्नाला तरी मायबोली मराठीत उत्तर दिलं पाहिजे'. कदाचित त्यानंतर आपण सगळेच अभिमानानं म्हणू शकू  "जय हिंद, जय महाराष्ट्र"!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा