पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अनिरुद्धला अमेरिकेतील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे कळल्यावर मी रडायलाच लागले.
"आई, आता सगळं मनासारखं झालंय. असिलताप्रमाणे मलाही चांगले कॉलेज मिळायला हवे, ही तुझी इच्छाही पूर्ण झालीय. मग आता का रडतेयस? "
आनंदने, माझ्या नवऱ्याने अनिरुद्धला समजावले. "अरे, आनंदाश्रू आहेत ते. रडू दे मनसोक्त. हलकं वाटेल जरा तिला."
खरेदी, अमेरिकेचा व्हिसा, सामानाची बांधाबांध या गडबडीत पुढचे काही दिवस कसे गेले ते कळलेच नाही. अनिरुद्धचे जाणे दोन दिवसावर आले. पण माझे मन काही थाऱ्यावर नव्हतेच. वरचेवर डोळे पाण्याने भरून येत होते. एकदा अनिरुद्धच्या लक्षात ते आलेच.
"आई आता काय झालंय रडायला ?"
"काही नाही रे. डोळ्यात काहीतरी गेलं आणि पाणी आलंय" मी गडबडीने सारवासारव केली.
"आई, हे काय चाललय काय तुझं? आजकाल तू एकतर गप्प गप्प तरी असतेस किंवा सतत डोळ्यात पाणी आणत असतेस."
यावर मी काहीच उत्तर न दिल्यामुळे तो जास्तच वैतागून म्हणाला, "आईचं मन तुला कधीच कळायचं नाही, कारण तू कधीच आई होणार नाहीस' ' हा तुझा नेहमीचा डायलॉग नको ऐकवूस"
माझ्या डोळ्यात जास्तीच पाणी जमायला लागलेले पाहून, अनिरुद्ध कावरा बावरा होऊन म्हणाला,
"तू अशी रडत राहिलीस तर जाताना मला किती त्रास होईल, याचा तरी विचार कर."
"तू दूर चालला आहेस याचा त्रास होतोय रे फार" मी हुंदका देत म्हणाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आनंदने वर्तमानपत्रातून डोके वर काढले.
"अगं, त्याला बाहेर पाठवण्यासाठी, तुझीच तर किती धडपड होती. चांगल्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपवर तो चाललाय, याचा आनंद त्याच्या विरहाच्या त्रासापेक्षा नक्कीच जास्त आहे ना? असा रडवेल्या चेहऱ्याने निरोप दिलास तर त्याला बरं वाटेल का, सांग बरं?
"आनंद तर आहेच रे, पण आता मी अगदीच जॉबलेस होणार याचंही कुठेतरी वाईट वाटतंय"
"धिस इज नॉट फेयर हं, आई! 'तुझी बारावी होईस्तोवर माझी काही सुटका नाही'; 'एकदा का तू कॉलेजला गेलास, की मी माझ्या मनासारखं आयुष्य जगणार'; असली तुझी वाक्ये सतत चार वर्षे ऐकून कान किटले होते माझे. वर आता ही रडारड!"
अनिरुद्धच्या आवाजाला आता भलतीच धार आली होती. पण माझा रडवेला चेहरा बघून, समजूत काढत तो म्हणाला,
"अगं जॉबलेस व्हायला तू रिकामी कुठे असतेस? सकाळी फिरायला जातेस, स्वैंपाक करतेस आणि दिवसभर तुझी प्रॅक्टीस असतेच की. वाचन, संगीत, नाटक, सिनेमा या सगळया गोष्टींची तुला आवड आहे. कसा वेळ जाईल ते तुला कळणारही नाही."
"ते खरं आहे, पण आत्तापर्यंत मी काहीही करत असले तरी मनांत सतत तुम्हा मुलांचाच विचार असायचा. तुमचं सगळं करणं आणि तुमच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं, हाच जणू माझा 'फुलटाईम जॉब' होता. त्यामुळे, ना कधी मी मेडिकल कॉन्फरन्सेसना गेले, ना इतर बायकांसारखी भिशी आणि लेडीज क्लबमध्ये रमले. आता नव्यानं यातलं काही सुरु करावंस नाही वाटत. एकदम पोकळी निर्माण झाली आहे रे" मी हुंदका आवरत म्हणाले.
"हो, पण माझ्यावर लक्ष ठेवण्याच्या जॉब मधून तुला मी मोकळं करतोय याचं मला किती समाधान वाटतंय, ते तू समजूच शकणार नाहीस." अनिरुद्ध हसत-हसत म्हणाला. बाप-लेकांची नेत्रपल्लवी झाली आणि आनंदनेही गालांतल्या गालांत हसून घेतले.
माझं 'अभ्यासावर लक्ष ठेवणं' हा मुलांचा आणि आनंदचा खास चेष्टेचा विषय होता. घारीने पिल्लावर नजर ठेवावी तशी मी अनिरुद्धवर पाळत ठेवून असायचे. तो कधी उठतोय, कधी झोपतोय, कोणत्या मित्र-मैत्रिणीशी किती वेळ आणि काय बोलतोय, इंटरनेटवर किंवा इतरत्र टाईमपास करतोय का, या सगळ्यावर माझे अगदी बारीक लक्ष असायचे. माझ्याकडून कधी अतिरेक झाला, की तो चिडायचा, आमची वादावादी सुरु व्हायची आणि अशा युद्धप्रसंगांत, आमच्यात तह घडवून आणण्याची जबाबदारी आनंद अगदी खुबीने पार पाडायचा.
"जोक्स अपार्ट. पण आई, मी तुला एक चांगली आयडिया देतो. बघ पटतेय का! तू सकाळी फिरायला जातेस आणि तिथे दिसणाऱ्या माणसांशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी आम्हाला त्यांच्याबद्दल काही-बाही सांगत असतेस. आता असं कर, त्या सगळ्यांशी प्रत्यक्षात ओळख करून घे, हळूहळू गप्पा मारायला लाग. नवनवीन मित्र-मैत्रिणीचे ग्रुप्स मिळतीला बघ."
ही आयडिया मी फारशी उचलून न धरल्याने तो इतर उपाय सुचवू लागला.
"नाहीतर तुझ्या जुन्या मैत्रिणींशी पुन्हा फोनवर गप्पा सुरु कर किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तुझ्या आवडत्या सास-बहू सिरियल्स पाहणं पुन्हा सुरु कर"
माझ्या या दोन्ही आवडी - व्यसनच म्हणा ना - घरातल्यांचा खास चेष्टेचा विषय होता. गेली काही वर्षे त्या व्यसनांवर मी नियंत्रण ठेवलेले होते. मुलांच्या दहावी-बारावीच्या वर्षांत तर ही 'व्यसने' पूर्ण बंदच होती.
माझ्या 'व्यसनांचे' संभाव्य धोके लक्षांत येताच आनंद एकदम सावध झाला आणि अनिरुद्धला डोळ्याने दटावत, पण अगदी प्रेमळ आवाजांत म्हणाला,
"मी काय म्हणतो स्वाती, तू पूर्वीसारखे दोनवेळा फिरायला जा, लोकांशी गप्पा मारायला सुरु कर, म्हणजे दोन्ही वेळचे मिळून अनेक ग्रुप्स होतील तुझे!"
"आनंद, तुझं तिरकस बोलणं मला समजतंय बरं का मला. मैत्रिणींशी फोनवर बोलण्यावरून कमी टोमणे ऐकवलेयत का आजपर्यंत? आणि अनिरुद्ध, तुझे हे 'सीरियल किलर' बाबा मला एकतरी सीरियल निवांतपणे बघू देतील का? "
माझ्या आवाजातला फणकारा जाणवल्यामुळे आनंदने गडबडीने परत वर्तमानपत्रांत डोके खुपसले.
"फिरायला जाताना दिसणाऱ्या लोकांशी माझी जेमतेम तोंडओळख आहे. फारशी ओळख नसताना, असं जाऊन कसं बोलायचं? मला नाही रे जमणार ते!"
"हो का? आमच्या अभ्यासाबद्दल चौकशा करायला जाऊन बोलायचीस की बिनदिक्कतपणे अगदी अनोळखी लोकांशीही. तेंव्हा कसं जमायचं तुला? काही वेळा तर अक्षरश: लाज आणायचीस आम्हाला." अनिरुद्धने आता मला शब्दांत पकडले.
"अरे, त्यावेळी तसं करणं आवश्यकच होतं. तुम्हां मुलांचा अभ्यास हा एक कॉमन दुवा असायचा आमच्यांत. जाऊ दे, माझ्या जॉबलेस होण्याच्या प्रॉब्लेमला काही उपाय नाही. पण तू नको काळजी करूस माझी. " मी सुस्कारा सोडत म्हणाले.
तरीही अनिरुद्ध बेचैन होता. थोडावेळ विचार करून जरा भीत-भीतच म्हणाला,
"आई, तू मला रागावणार नाहीस, असं आधी प्रॉमिस दे, मग मी एक भन्नाट आयडिया देतो "
शाळेत डबा हरवला, शिक्षा झाली किंवा परीक्षेत काहीतरी घोळ झाला, की मला ते सांगायच्या आधी ही असली प्रॉमिसेस मागून, अभयदान घेण्याची अनिरुद्धची नेहमीची युक्ती होती.
मी चटकन प्रॉमिस देऊन टाकले.
"हे बघ, फेसबुक बद्दलची तुझी जहाल आणि अगदी जुनाट मते जगजाहीर आहेत. पण आज तू माझं ऐकच. तुझ्या 'जॉबलेस' होण्यावरचा उत्तम उपाय म्हणजे तुझे फेसबुक अकाऊन्ट उघडणे!"
आत्तापर्यंत अनिरुद्धच्या फेसबुक अकाऊन्टवरून आम्हा दोघांची झालेली तोंडातोंडी लक्षांत घेता त्याला अभयदान घेणे आवश्यकच होते!
पुढचा काही काळ मला फेसबुकची महती ऐकवून, माझ्या जोरदार विरोधाला न जुमानता, शेवटी त्याने माझे फेसबुक अकाऊन्ट उघडून दिले. तसेच अकौंटवर जाणे, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, चॅटींग करणे, फोटो अपलोड करणे वगैरे गोष्टी माझ्या अज्ञानावर न चिडता, अतिशय संयमाने शिकवल्या आणि त्यांचा सरावही करून घेतला. मुलगा दूर जायच्या वेळी त्याचे मन दुखावायला नको म्हणून मी ते सर्व शिकून घेतले खरे, पण 'वेळ वाया घालवण्याचे एक निरुपयोगी साधन' हे फेसबुक बद्दलचे माझे मत तो बदलू शकला नाही!
अमेरिकेला पोहोचल्यानंतर अनिरुद्धचा ना काही फोन, ना ईमेल, ना आमच्या ईमेलला उत्तर. आनंद स्थितप्रज्ञ असल्यामुळे, शांत होता. मी मात्र काळजीने कासावीस झाले. अनिरुद्धशी कसा संपर्क साधावा या विचारांत असतानाच माझ्या भाच्याचा फोन आला,
" मावशी, अनिरुद्धची अगदी ऐष आहे , मस्त रूम मिळालीय आणि कॅम्पस तर कसला पॉश आहे!"
"अरे तुला कसं कळलं? फोन आला होता का तुला ?"
"फोन कशाला पाहिजे? त्याच्या FB च्या पोस्ट्स बघ ना. अरे हो. पण तू कशी बघणार ? तू तर FB ची कट्टर विरोधक नां!" भाचा खोचकपणे म्हणाला.
"मी बघते ना लगेच माझ्या FB अकाऊन्टवर" आता माझ्या भाच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी होती. मी गडबडीने फोन ठेवून कॉम्प्यूटरकडे गेले, महत्प्रयासाने फेसबुक अकौंटमध्ये लॉग-इन केले. अनिरुद्धचे नवीन फोटो पाहून भराभर लाइक्स टाकले. तो सुखरूप पोहोचलाय आणि मजेत आहे हे पाहिल्यावर मला अगदी हुश्श झाले. पण त्याने खुशाली न कळवल्यामुळे उफाळून आलेला राग त्याला एक खरमरीत मेसेज पाठवल्यावरच जरा शांत झाला. क्षणार्धात अनिरुद्धचे उत्तर आले. काय तर म्हणे, मला फेसबुक वापरायला भाग पाडण्यासाठीच त्याने मुद्दाम फोन किंवा ईमेलवर खुशाली कळवली नव्हती ! मनोमन चिडले, चडफडले तरी मी काहीही करू शकत नव्हते. त्याची खुशाली कळण्यासाठी, वरचेवर फेसबुकवर जाण्याशिवाय त्याने आता मला पर्यायच ठेवलेला नव्हता!
हळू-हळू मी फेसबुक वापरू लागले. जुन्या मित्र-मैत्रिणींना, ओळखीतल्या आणि नात्यातल्या लहान-मोठ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, आलेल्या रिक्वेस्ट मान्य करणे सुरु झाले. बघता-बघता माझा मित्रपरिवार पाचशेच्या वर गेला. त्यांच्या आयुष्यातल्या बित्तंबातम्या मला आता फेसबुकवरूनच कळायला लागल्या. सुरुवातीला इतरांचे फोटो बघणे, कॉमेंट्स वाचणे, अशा बघ्याच्या भूमिकेत मी होते. पण बघता बघता स्वत:च्या पोस्ट आणि कॉमेंट्स टाकणे सुरु झाले. त्यामुळेच मग वारंवार अकाऊन्ट उघडून आपल्याला किती लाइक्स किंवा कॉमेंट्स येताहेत, हे बघण्याचा चाळाच लागला. नवीनच लागलेल्या चॅटींगच्या व्यसनामुळे, पंधरा-सोळा वर्षे एकत्र शिकूनही एका शब्दाचीही देवाण-घेवाण न झालेल्या, वर्गमित्रांशीसुद्धा माझ्या चक्क दिलखुलास गप्पा सुरु झाल्या.
फेसबुकमुळे काही व्यक्ती मला अगदी नव्याने उमगल्या. वरकरणी रुक्ष वाटणारे, कलासक्त किंवा कविमनाचे निघाले. तर काही पोक्त व्यक्तींच्या थिल्लर पोस्टसमुळे त्या व्यक्ती माझ्या मनातून कायमच्या उतरल्या. काही कोवळ्या वयाच्या मुला-मुलींचे प्रगल्भ विचार वाचून मी अगदी भारावून गेले. त्यामुळे हल्लीची मुले फेसबुकवर फक्त टाइमपास करत असतात हे माझे मत हळू-हळू बदलायला लागले. "फेसबुक हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. त्याला नावे न ठेवता पालकांनीच आपापल्या मुलांना ते योग्य प्रकारे वापरायला शिकवावे " हे अनिरुद्धचे मत आता मला पटायला लागले. अनिरुद्ध पहिल्यांदाच सुट्टीवर आल्या-आल्या, "फेसबुकच्या प्रेमात पडून मी ते चक्क एन्जॉय करतेय" अशी प्रांजळ कबुलीही त्याला देऊन टाकली.
तो सुट्टीवर असतानाच, एका लग्नाला जाऊन आम्ही घरी आल्या-आल्या त्याने माझ्यावर तोफ डागली,
"आई काय चालवलं आहेस तू हे ? आज तुझ्यामुळे मला सगळ्या भावंडांची बोलणी खावी लागली."
"काय बोलतोयस? मी काय केलंय ?" मी आश्चर्यमिश्रित रागाने म्हणाले.
"शिल्पामावशीला सांगून जयेशचे FB अकाऊन्ट बंद करवलेस ना तू?"
"हे बघ, मी काही अकाऊन्ट बंद करायला लावलेले नाही, "जयेश बरेचदा फेसबुकवर दिसतो", एवढंच फक्त मी शिल्पाला सांगितलं. तिला माहीतच नव्हतं त्याच्या अकाऊन्टबद्दल. आता तिनं जयेशला ते बंद करायला लावलं, तर त्यात माझा काय दोष ? "
"पण तुला शिल्पामावशीला सांगायची गरजच काय होती ?"
"अरे, जेमतेम दहा वर्षांच्या जयेशला काय करायचंय आत्तापासून फेसबुक? बरं शिल्पा आणि शिवेन दोघं दिवसभर घराबाहेर. जयेश कॉम्प्यूटरवर अभ्यास करतोय का फेसबुकवर टाईमपास करतोय हे तिच्या सासूबाईना कसं कळणार? मी शिल्पाला सांगितलं, त्यांत माझं काहीही चुकलेलं नाही."
"पण आई थोडावेळ एफबी चा ब्रेक घेतल्यामुळे अभ्यास चांगला होतो, हे तू कधी का नाही लक्षांत घेत?"
"हे बघ, ते मला सांगूच नकोस. मला कधीच पटणार नाही. आम्ही काय अभ्यास केला नाही का कधी? ब्रेकसाठी इतर बरंच काही करता येतं." मी त्याला निरुत्तर करून पुढे म्हणाले,
"बघ, चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये जयेश आला की नाही राज्यांत पाचवा?"
"तू असं बोलतेयस की जणू फेसबुक बंद झाल्यामुळेच तो राज्यांत पाचवा आलाय" अनिरुद्ध उसळून म्हणाला.
"मी डायरेक्टली तसं काही म्हणाले आहे का? पण इनडायरेक्टली ते एक कारण आहेच "
थोडा वेळ शांततेत गेला असेल नसेल, पुन्हा अनिरुद्ध उसळून म्हणाला,"बरं दीपक तर चांगला वीस वर्षांचा आहे, पहिला येतोय कॉलेजमध्ये. मग त्याची चहाडी करायला कुणी सांगितलं होतं तुला?"
"कुणी सांगायला कशाला पाहिजे? त्याच्या पोस्ट बघितल्या होत्यास का तू? काही योग्य-अयोग्यचा विचार नको का आपल्या मुलांना? दीपकचे काही चुकतंय असं वाटलं, तर मी सांगायचं नाही का मामाला? "
"माझं चुकलं तर बोल ना मला. पण दुसऱ्यांच्या मुलांना का उगीच त्रास देतेस ?"
"हे बघ. माझ्या चुलतभाच्याला मुलाला, दुसऱ्याचा मुलगा समजायला, मी काही अमेरिकेत नाही राहात. आणि अमेरिकेतसुद्धा जवळचे लोक असं करतात. पाहिलंय ना मी त्यांच्या सीरियल्समध्ये."
आता मात्र अनिरुद्धला गप्प बसणे भागच होते.
पुढचे चार दिवस गोडी-गुलाबीत गेले. अनिरुद्धचं मित्र-मैत्रिणींबरोबर सिनेमाला आणि जेवायला बाहेर जाणं चालू होतं. एक दिवस तो तणतणच घरी आला.
"आई तुझ्या वागण्याने तू मित्र-मैत्रिणींशीही माझे संबंध बिघडवून टाकणार आहेस"
"आता काय झालं बाबा?" मी शांतपणे विचारलं .
"शर्मिलाने तुझं नाव घेतलं नाही इतकंच. पण म्हणाली की एफबी वर तुझी फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्वीकारली आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने तिचे फोटो डिलीट करायला लावले"
"बरं झालं बाई. कसेतरीच फोटो होते ते. शर्मिला आणि तिला चिकटलेली चार-पाच मुलं. शाळेच्या सेंड-ऑफला हे असले फोटो काढून घ्यायचे? आणि वर ते फेसबुकवर प्रदर्शनाला ठेवायचे? तिच्या आईला नसेल चाललं ते!"
"तिने काय करावं हा तिचा प्रश्न आहे ना. तिच्या आईला फोटोबद्दल सांगण्याचा उद्योग तुझाच असणार"
"माझ्यासारख्याच इतर कुणा हितचिंतकाने सांगितलं नसेल कशावरून? जे झालंय ते शर्मिलाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्यच झालंय. पुढे जेंव्हा ती आई होईल आणि तिची मुलगी जेंव्हा वयांत येईल तेंव्हा कळेल तिला. " माझ्या कृत्याची कबुली न देण्याची सावधगिरी बाळगत, मी ठासून म्हणाले.
"आई, तू काय करशील आणि कुठलं बोलणं कुठे नेशील याचा नेम नाही. यू आर अन इम्पॉसिबल लेडी!" अनिरुद्धच्या या वाक्यावर, आनंदचा चेहरा इतका फुलला होता की कुठल्याही क्षणी तो टाळ्या वाजवेल, असे मला वाटले !
अनिरुद्ध अमेरिकेला परत जाण्याआधी त्याला भेटायला लोकांची ये-जा चालू होती. माझी एक मैत्रीण तिच्या नववीतल्या मुलाला घेऊन, बारावीपर्यंतच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, कुठली पुस्तके वापरावीत असा महत्वाचा सल्ला विचारायला आली होती. बोलता बोलता आमचा विषय फेसबुककडे वळला.
"तो फेसबुकवर नसेल तर उत्तमच. पण असेल तर जास्त वेळ घालवणार नाही यावर लक्ष ठेव. पुढची चार वर्षे फार महत्त्वाची आहेत."
हे बोलून मी चहा करायला उठले. स्वयंपाकघरात जाता-जाता सहज मुलांच्या खोलीत डोकावले तर अनिरुद्धचे बोलणे कानावर पडले,
"पुढची चार वर्षे फार महत्त्वाची आहेत. मावशी सतत आठवण करून देईलच तुला. नियमित अभ्यास कर. पण त्याच बरोबर कॉम्प्यूटर गेम्स, ग्राउंडवरचे खेळ, फेसबुक, हे सर्व थोडं थोडं करत जा. नाहीतर पकशील लेका."
"आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट आधीच सांगून ठेवतो. माझी आई आजच तुला एफबी वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल, ती इग्नोअर कर आणि शहाणा असशील तर तुझ्या आईला एफबी वापरायला मुळीच शिकवू नकोस!"
अर्थातच चहा झाल्याबरोबर मी मैत्रिणीला फेसबुक अकाऊन्ट उघडून देऊन वापरायला शिकवले!
अनिरुद्ध अमेरिकेला गेल्यापासून फेसबुकमधल्या माहिती आणि मनोरंजनाच्या दुनियेमध्ये माझा फावला वेळ उत्तम जात होताच. पण हल्ली माझ्या ओळखीतल्या तमाम बायकांना मी फेसबुक अकाऊन्ट उघडून देते आणि "फेसबुकसकट सगळीकडेच आपापल्या मुलांना योग्य मार्गावर ठेवा" असा सल्लाही देते. अर्थात, मी स्वतःदेखील त्यांच्यावर लक्ष ठेवून असते हे सांगायला नकोच!
फेसबुकमधल्या या 'जॉब' मुळे मला आता अजिबात 'जॉबलेस' वाटत नाही!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा