रविवार, २६ जुलै, २०१५

देवाचिया दारी!

काही दिवसांपूर्वी माझ्या वयस्कर आईला आळंदीला दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. वयोमानाप्रमाणे तिला चालताना थोडे कष्ट होत असल्याने गाडीने देवळाच्या शक्य तितके जवळ उतरून आम्ही चालत आत गेलो  साधारण साडेबाराच्या सुमारास देवळांत पोहोचलो असू. त्यावेळी विशेष गर्दी नव्हती पण नैवेद्याची वेळ असल्यामुळे, दर्शन एक वाजेपर्यंत बंद होते. मी चौकशी केली तेंव्हा कळले की, देवळाच्या मागच्या बाजूच्या दारावरच्या सुरक्षारक्षकांना विनंती केल्यास, वृद्ध किंवा अपंग भाविकांना लगेच आत सोडतात. मी आईला घेऊन देवळाच्या मागच्या बाजूला गेले व मुक्ताईच्या देवळाजवळ एका खुर्चीवर तिला बसवले. बरोबर एक वाजता तिथल्या सुरक्षारक्षकाने आम्हाला दोघींनाच आत पाठवले. आईचे दर्शन घेऊन होईपर्यंत, पुजाऱ्यांनी बारी थांबवलेली होती. त्यामुळे दर्शन उत्तमरीत्या पार पडले.

आम्ही बाहेर पडल्याबरोबर, आमच्या मागोमाग भाविकांची झुंड पुढील दाराने आत आली. त्यामध्ये आईपेक्षाही वयस्कर, वाकलेले, म्हातारे-कोतारे, अपंग- अधू असे कितीतरी भाविक बघून मला वाईट वाटले. कित्येकजण एक-एकटेच, काठी टेकत, कसेबसे तिथपर्यंत चालत आलेले होते. काहीजण परगावाहूनही आलेले असावेत. बरेचसे अशिक्षितही असावेत. मला वाटले, या सर्वच वयस्कर आणि अधू व्यक्तींना सुलभपणे देवदर्शन घेता यावे, यासाठी इथे कुठल्याही सोयी का नाहीत? 'मागच्या बाजूने गेल्यास विनासायास, रांगेत उभे न राहता दर्शन घेता येईल' ही माहिती, मी विचारली म्हणून मला कळली. इतर सर्व वृद्ध व्यक्तींना रांगेत तिष्ठत राहून दर्शन का घ्यावे लागले ? देवाच्या दारीचा हा कुठला न्याय ?

'देवळात सामान घेऊन जाता येणार नाही' असे सूचना फलक कोठेही लावलेले नव्हते परंतु, देवळाबाहेरचे काही दुकानदार, भाविकांना तसे सांगून, त्यांचे सामान स्वतःच्या दुकानांत ठेवायला भाग पाडत होते. काही भाविक आपले सामान दुकानदारांजवळ ठेवतही होते. देवस्थानात सामान न्यायला मनाई नसतांना, भाविकांनी त्यांच्या पिशव्या अथवा इतर सामान देवळाबाहेरील या दुकानदारांकडे ठेवून त्यासाठी पैसे का भरायचे? देवस्थानातर्फे चपला व सामान ठेवण्याची योग्य व्यवस्था का केलेली नसावी ?

देवळाच्या आवारांत सुरक्षेसाठी कॅमेरे बसवलेले आहेत तसेच 'आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर आहे' असे ठिकठिकाणी लावलेल्या पाट्यांवर लिहलेले होते. 'देवळाच्या आवारात पादत्राणे नेण्यास मनाई आहे', तसेच 'देवळाच्या आवारात मोबाईल नेण्यास मनाई आहे', अशा सूचनाही सर्वत्र लिहिलेल्या होत्या. सर्वजण पादत्राणे बाहेर काढून ठेवत होते. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांसकट कित्येकजण, मोबाईल  देवळाच्या आवारात घेऊन जाऊन मोठमोठ्या आवाजांत मोबाईलवर निवांतपणे बोलत होते. कित्येक भाविक आणि काही सुरक्षा कर्मचारीदेखील पान-तंबाखू खाऊन देवळाच्या आवारातच पिचकाऱ्या टाकून घाण करत होते. देवळाचा परिसर पान तंबाखूच्या पिंका, बिडी-काडी व इतर कचरा या सर्व गोष्टींनी प्रदूषित आणि अपवित्र होत होता.

देवळाच्या आवारांत सगळीकडे अस्वच्छता होती. फुलांचे हार आणि कोमेजलेली फुले इकडे-तिकडे पडलेली होती. ठिकठिकाणी पाणी सांडून घसरडे झालेले होते. आत जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या भाविकांकरिता  वेगवेगळे मार्ग असावेत म्हणून लावलेल्या धातूच्या दांड्या, जमिनीतून अर्धवट निखळून हलत होत्या. गर्दीच्यावेळी, भाविकांच्या लोंढ्याच्या रेट्याने, हा दांड्याचा अडसर तुटून, ऐन दरवाज्यातच अपघात होण्याची शक्यता होती. आवारात बारीसाठी बांबू लावून केलेली व्यवस्था अपुरी, तकलादू आणि अतिशय धोकादायक असल्याचे जाणवले. देवळांत किमान स्वच्छता आणि कोणी पडणार नाही किंवा चेंगरा-चेंगरी होणार नाही इतपत सुरक्षा असायला नको का? देवळाची आणि देवाची सुरक्षा जशी महत्त्वाची तशी भक्तांची सुरक्षाही महत्त्वाची नाही का?

आळंदी देवस्थानातील अस्वच्छता, ध्वनिप्रदूषण, देवस्थानाची आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा अभाव आणि भाविकांकडून पैसे उकळण्याचा किळसवाणा प्रकार ही सर्व दृश्ये माझ्या नजरेला खटकली. फक्त 'आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे' अशा पाट्या सगळीकडे लावून  भागणार आहे का? आळंदीला जाऊन  मला असे म्हणावेसे वाटले " देवा, कृपा करा, हे प्रकार उघड करणारे कुठलेतरी सीसी टीव्ही कॅमेरे तुम्हीच बसवा आणि हे प्रकार थांबवा"!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा