गुरुवार, १९ मे, २०१६

रंगबिरंगी

होळीच्या आसपास आणि पुढे महिना-दोन महिने  पहाटे फिरायला जाताना, निसर्गातल्या अनेकविध रंगांच्या फुलांची उधळण मला भुलवून टाकते. मला या नैसर्गिक रंगांच्या होळीपुढे, रंगपंचमी किंवा होळीचे रंग नेहमीच फिके वाटतात. त्यातल्या त्यात अनेक रंगी बोगन वेलीच्या फुलांचे रंग मला फार आवडतात. होळी आणि रंगपंचमीला, अनेक रंगांनी रंगलेल्या लोकांच्यामध्ये, पांढरे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती विशेष उठून दिसते. जणू तशीच, गुलबाक्षी, जांभळ्या, गुलाबी, अबोली, केशरी, पिवळ्या व लाल बोगनवेलीमध्ये, पांढरी बोगनवेल सुद्धा उठून दिसते आणि माझे लक्ष वेधून घेते.

या पांढऱ्या बोगनवेलीची एक मजा म्हणजे बरेचदा, तिच्या पांढऱ्या फुलांमध्ये कुठूनतरी हळूच गुलाबी रंग शिरलेला असतो. इतका हलका, इतका तरल गुलाबी रंग असतो की काही विचारू नका. त्या पांढऱ्या-गुलाबी फुलांच्या रंगाच्या छटा बघून मी थक्क होते. पांढऱ्या रंगाने रंगकाम चालू असताना, मधेच विधात्याचा कुंचला चुकून गुलाबी रंगात बुडाला असावा आणि त्यामुळेच या पांढऱ्या आणि गुलाबी रंगातील अनेक छटा निर्माण झाल्या असाव्यात असे वाटते. हा कुंचला, कधीकधी एकाच फुलामध्ये आणि कधी आसपासच्या अनेक पांढऱ्या फुलांमध्ये, गुलाबी रंगाच्या अनेक छटा भरतो .कधी या फुलांमधल्या गुलाबी छटेकडे पहिले की, एखाद्या गोऱ्यापान बाळाचे, थंडीमुळे  झालेले गुलाबी गाल  आठवतात. त्या आठवणीबरोबर नकळतच,  त्या गालांचा मुलायम स्पर्श, बाळाचे खळखळणारे हसू, निरागस निष्पाप भाव, गालावरची तीट आणि तेल-वेखंडाचा मिश्र वास, डोळ्यावरची अलगद झोप,सगळं जाणवायला लागतं. असं एखादं गोंडस बाळ डोळ्यासमोर आलं, की पुन्हा मातृत्वाची आस लागल्याशिवाय राहात नाही.


कधी कधी मात्र ही फुले, एका क्षणात मला लहानपणीच्या विश्वात नेतात. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी आजच्यासारखे घराघरांत मिक्सर किंवा फ्रीज नव्हते. आज बाहेर ठीक ठिकाणी सहजी मिळतात तसे,  आईस्क्रीम किंवा मिल्क शेक्सही त्यावेळी मिळायचे नाहीत. त्यामुळे आईस्क्रीम आणि मिल्क शेक्सचे आम्हाला अगदी अप्रूप असायचे. आमच्या घरी मिक्सर नसला तरी फ्रीज होता. उन्हाळ्याच्या दिवसांत दुधात रंग आणि इसेन्स घालून ते फ्रीजमध्ये गार करून, दूध कोल्ड्रिंक बनवून प्यायला खूप मजा यायची. घरच्या घरी पॉट आईस्क्रीम बनवून, सगळ्यांनी मिळून ते  खाणे म्हणजे तर एक पर्वणीच होती म्हणा ना. दूध कोल्ड्रिंकच्या किंवा आईस्क्रीमच्या दुधामध्ये, आई-आजी अगदी हळूच गुलाबी रंगाचा एखादा थेंब टाकायच्या. मग दुधाच्या पांढऱ्या रंगात, गुलाबी तरंग उठायचे. ते दूध चमच्याने हलवले की, पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या अनेक छटा निर्माण व्हायच्या. त्या दोन रंगांचे ते मीलन बघताना मी अगदी गुंग होऊन जायचे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच फुलणारी आणि मधूनच गुलाबी झालेली ही पंढरी बोगनवेल पाहताना, चक्क  मला लहानपणीच्या दूध कोल्ड्रिंकचा किंवाआईस्क्रीमचा गारवा आणि गोडवासुध्दा अनुभवायला मिळतो!९ टिप्पण्या:

 1. सुंदर! फुलांची बाग आणि जुन्या आठवणी यात रमले मी!!!! 👌😊

  उत्तर द्याहटवा
 2. सुंदर! फुलांची बाग आणि जुन्या आठवणी यात रमले मी!!!! 👌😊

  उत्तर द्याहटवा
 3. सुंदर! निसर्ग साध्या साध्या करामतीतून आपल्याला आनंद देतो, मात्र हे जाणवण्यासाठी तितक्याच तरल जाणिवा मन हवे.

  उत्तर द्याहटवा
 4. सुंदर! निसर्ग साध्या साध्या करामतीतून आपल्याला आनंद देतो, मात्र हे जाणवण्यासाठी तितक्याच तरल जाणिवा मन हवे.

  उत्तर द्याहटवा
 5. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

  उत्तर द्याहटवा