वसंत ऋतुची बहार खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर, पूर्ण ऋतूभर रोज, निसर्गाचे बारीक निरीक्षण करायला पाहिजे. सुकलेल्या झाडांना फुटलेली हिरवी-पोपटी रेशमी पालवी, हळूहळू बहरत जाणारी वेगवेगळी फुलझाडे, त्यांचे रंग आणि गंध सगळं अगदी संथपणे उपभोगावे. रोज पहाटे फिरायला जायची मला आवड आहेच. वसंत ऋतूत मला आपसूकच लवकर जाग येते. पहाटे चहा घेऊन झाला की मी निसर्गाचा वसंतोत्सव अनुभवायला बाहेर पडते. फुलांच्या रंगांच्या आणि सुवासाच्या उधळणीला वेगवेगळ्या पक्षांच्या शीळांची सांगीतिक साथ ऐकत फिरायला मस्त वाटतं. हे उष्णतेचे दिवस सुसह्य करायला कैरीचे आंबे, आईस्क्रीम्स, पन्हे, आणि इतर अनेक शीतपेये असतातच. पण रोज पहाटेचा गारवा अंगावर घेत, वसंतोत्सवाची मजा लुटत रंग आणि गंधांच्या धुंदीत दिवसाची सुरुवात झाली, की दिवसभराची उष्णता सहन करून, पुढच्या दिवशीच्या पहाटेचा उत्सव अनुभवण्याच्या ओढीने मी निद्राधीन होते.
वसंतागमनाची चाहूल, कोकिळ पक्षाच्या 'कुहू कुहू' आवाजामुळे लागते आणि संपूर्ण वसंत ऋतूत हे कोकिळगान सतत चालूच असते. बरेचदा एका कोकीळाने गायला सुरुवात केली की त्याला साथ द्यायला अजून एक दोन कोकिळ येतातच. कधीकधी दोन कोकिळांची जुगलबंदी चालू झाली की, हे कोकिळ आपापली लय वाढवून वरच्या पट्टीत, कमालीच्या जोरात, 'कुहू कुहू' गायला लागतात. काहीवेळ ही जुगलबंदी चालते आणि कसं कुणास ठाऊक, पण अचानकच त्यांचे ते 'कुहू कुहू' बंद पडते. मला अगदी लहानपणापासूनच कोकिळांचा हा खेळ ऐकायला आवडते. माझ्या लहानपणी, आमच्या एकत्र कुटुंबाच्या घरात एकावेळी आम्ही सहा-सात भावंडे होतो. उन्हाळ्याची सुट्टी लागली की त्यात अजून आते-मामे भावंडांची भर पडायची. एखादा कोकिळ गायला लागला की आम्ही सगळी भावंडे मुक्तपणे 'कुहू कुहू' ओरडायला लागायचो. मग तो कोकीळ चिडायचा आणि जिवाच्या आकांताने ओरडायला लागायचा. आम्हाला मात्र 'कुहू कुहू' ओरडून अगदी मोकळे वाटायचे आणि खूप मजा यायची. आमहा मुलांचे असे आवाज लागलेले ऐकले की कोणीतरी मोठे माणूस आम्हाला दटावून, आमचे ओरडणे बंद करायला लावून, आमच्या आनंदावर विरजण घालायचे.
काल पहाटे माझे फिरणे संपायच्या वेळी माझ्या एका बालवर्गमित्राने रोजच्या त्याच्या रिवाजाप्रमाणे WhatsApp वर मला 'सुप्रभात' चा संदेश पाठवला. घरी पोहोचल्याबरोबर मी तो संदेश वाचला. "कोकिळ स्वत:ची भाषा बोलतो म्हणून तो मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून रहतो. स्वत:ची भाषा, स्वत:चे विचार आणि स्वत:वर विश्वास ठेवा. सुप्रभात!" मी तो संदेश वाचायला आणि एका कोकिळाचे गान चालू व्हायला गाठ पडली. मला एकदम लहानपणीसारखेच 'कुहू-कुहू' असा आवाज काढून कोकिळाला चिथवण्याची सणक आली. आमच्या बेडरुममध्ये आनंद साखरझोपेत पहुडला होता, म्हणून मी दुसऱ्या बेडरुममध्ये गेले आणि अगदी मुक्तकंठाने 'कुहू कुहू' ओरडायला सुरुवात केली. ते ऐकल्यावर अर्थातच तो कोकिळ आपली लय वाढवत चेवाने ओरडायला लागला. मग मी त्याच्याहून वरच्या पट्टीत आवाज चढवून ओरडायला लागले. मला अगदी मुक्त वाटत होतं पण इतक्यात आनंदचे बोलणे कानावर पडले, "अगं अशी ओरडायला काय लहान आहेस का तू? आसपासचे लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर." मग मात्र मला माझा मुक्त छंद आवरता घेणे भाग पडले.
काही क्षण का होईना पण मनाने लहान होत, बालपणीची वेगळी मजा अनुभवायला मिळाली, हेही नसे थोडके!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा