सोमवार, २७ जून, २०१६

प्रसिद्धी एजंसी

वर्षभराखाली आमच्या पारपत्रांची मुदत संपली. नूतनीकरणासाठी काय काय करावे लागेल याची इंटरनेटवरून माहिती वाचली, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि नियोजित वेळेवर कार्यालयाच्या बाहेर हजेरी लावली. रांगेमध्ये उभ्या असलेल्या बहुतांश लोकांनी एजंटमार्फत पासपोर्टसाठी अपॉईंट्मेंट घेतली होती. एजंटमार्फत का? असा प्रश्न विचारल्यावर एकापेक्षा एक अशी मजेशीर उत्तरे मिळाली. एकजण म्हणाले, "आपण पासपोर्ट कशासाठी काढतो? परदेशात जाण्यासाठी. तिकिट आणि इतर प्रवासखर्च मिळून आपण माणशी लाख-दीडलाख खर्च करणारच. मग एखाद्या एजंटला हजार बाराशे द्यावे लागले तर काय फरक पडतो ?" अजून कोणीतरी म्हणाले," आपल्या देशात कितीही सगळं कॉम्प्युटराईझ झालं तरीही, एजंट असल्याशिवाय कामं चटचट होतच नाहीत. एजंट लोकांच्या वरपर्यंत ओळखी असतात. काम अडकून पडण्यापेक्षा एजंटला पैसे दिलेले परवडतात" एका उच्चशिक्षिताने तर सरळ सांगितले " कितीही झालं तरी आपल्याकडून फॉर्म भरताना चुका होतातच. एजंटच ते रोजचंच काम असल्यामुळे त्यांच्याकडून चुका होत नाहीत आणि आपली नंतरची कटकट वाचते" अजून कोणीतरी म्हणालं," आमचे नेहमीचे एक एजंट आहेत. ड्रायविंग लायसेन्स काढण्यापासून ते व्हिसा मिळवून देण्यापर्यंत आमची सगळी कामं तेच करतात. अपॉइंटमेंट घेण्याचं काम आपलं आपल्याला  करता येतं, हेच मला माहिती नव्हतं". एकेकाची उत्तरे ऐकून आम्ही अवाक झालो. आमची अपॉइंटमेंट सुरळीत पार पडली आणि आठ दिवसांत नवीन पारपत्रे घरी आली.

काही दिवसापूर्वी घरी काम करणारी मोलकरीण महिना भरायच्या आधीच म्हणाली," मॅडम, मला दोन हजार ऍडव्हान्स द्या ना. दोन-तीन महिन्यात फेडते"
मी विचारले "का गं ? आता ऍडव्हान्स कशासाठी? मुलांच्या फिया दप्तरं सगळं तर झालंय ना नुकतंच. "
"बाई माजा नवरा ट्याम्पो चालवतो. दोन दिवसांत त्याचं डायविंग लायसन संपणार हाय. एजंटला पैसे देऊन करून घ्यायचाय उद्या."
" आधी नाही का जागं व्हायचं जरा?"
" आमाला आदी कळलंच नाय ना. लायसन संपणार हाय हे पन एजंटनं सांगितलं म्हनून कळलं. आता त्येच काढून देनार हाय एक दिवसांत लायसन "
" लायसन्स करायला इतके पैसे कुठे  लागतात? फारतर चारपाचशे रुपयांत काम होतं. एजंटच्या डोक्यावर तुमचे कष्टाचे पैसे असे कशाला घालवता?" मी कळकळीने म्हणाले.
"बाई आमाला तुमच्या सारखं लिवता वाचता येत असतं तर आमी कशाला गेलो असतो एजंटकडे ? आमच्या गल्लीतलाच एजंट हाय. बाहेरच्यांकडून तो तीन हजार घेतो. आमी गल्लीतच राहतो म्हणून दोनच हजारांत करतो. बाई द्या नं पैसे. लायसन येळेत नाय आला तर नवऱ्याला  घरीच बसावं लागेल"
मी काहीही ना बोलता पैसे काढून दिले.

आपल्या देशातले "एजंटराज"संपवायचे असेल तर "एजंटराज"ची प्रसिद्धी करणाऱ्या सुशिक्षित चालत्या बोलत्या एजन्सी आधी बंद पाडल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं ?


३ टिप्पण्या: