शनिवार, २ जुलै, २०१६

भाऊसाहेब नव्हे, भाऊच!

भाऊ गेल्याची बातमी फोनवरून समजली तेव्हा मी आणि आनंद हडपसरला एक कार्यशाळा घेत होतो. त्यामुळे तातडीने निघणे अशक्य होते. तरीही शक्य तेवढ्या लवकर कार्यक्रम उरकून आम्ही सुसाट वेगाने गाडी पळवत, शैलेश सोसायटीतील त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. पण तोपर्यंत भाऊंना तिथून वैकुंठाकडे नेलेले होते. मग तसेच उलटपावली वैकुंठ स्मशानभूमी गाठली. पण भाऊंच्या पार्थिवाचे दर्शन होऊ शकले नाही.

भाऊ म्हणजे, गजानन परशुराम सहस्र्बुद्धे, हे माझ्या माहेरच्या घरातले ज्येष्ठ जावई. आमच्या सर्वात मोठ्या आत्याचे, शान्ताआत्याचे यजमान. जुन्या काळात जावयांना साहेब, राव वगैरे उपाधी लावून संबोधण्याची पद्धत होती. म्हणून त्यांना सर्वजण भाऊसाहेब म्हणत. पण आम्ही मुले त्यांना भाऊच म्हणायचो. आमच्या सोलापूरच्या वाड्यात आमची आजी राहत असल्यामुळे भाऊ आणि शांताआत्याचे वरचेवर येणे व राहणे व्हायचे. दरवर्षी आम्हीसुद्धा पुण्याला त्यांच्या शिंदेआळीतल्या घरी जायचो. भाऊ आणि शांताआत्याबरोबर आम्ही बरेचदा सहलीलाही जायचो. त्यामुळे लहानपणी भाऊंचा सहवास लाभला. भाऊंच्या अनेक आठवणी मनात आहेत. स्वच्छ गोरा रंग, प्रसन्न हसरा चेहरा, घारे डोळे, सडपातळ देहयष्टी, बेताची उंची आणि हळू आवाजातले बोलणे असे भाऊंच्या बाह्यरूपाचे वर्णन करता येईल. पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू वर्णन करायला मात्र मला शब्द कमी पडतील.

भाऊ आणि शांताआत्याचे लग्न ज्या काळांत झाले त्या काळातील रूढीप्रमाणे, पत्रिकेतील गुण जुळल्यामुळेच त्यांचे लग्न झाले असणार. पण शान्ताआत्या आणि भाऊ या दोघांच्या प्रकृती मात्र अगदी भिन्न होत्या. तरीही त्या दोघांना त्यांच्या संसारात perfect communication, mutual respect आणि giving space to  each other हे अगदी छान जमले होते. त्यांचा संसार अतिशय सुखा-समाधानाचा होता. शिंदेआळीतल्या त्यांच्या छोट्याशा भाडोत्री घरात, दोन्हीकडच्या अनेक नातेवाईकांचा पाहुणचार अत्यंत प्रेमाने व्हायचा. शांताआत्याचा भक्तिमार्ग भाऊंना कधी भावला असेल असे वाटत नाही. पण शांताआत्याचा शब्द भाऊंनी कधी पडू दिला नाही. तिच्या पूजाअर्चेसाठी, ती सांगेल ती कामे भाऊ तिच्याप्रति असलेल्या भक्तिभावाने करीत असावेत.

नात्याने ज्येष्ठ व माझ्यापेक्षा वयाने पन्नास वर्षे मोठे असले तरी मला किंवा आम्हा कोणाही भावंडाना भाऊंची भीती कधीच वाटली नाही. ते  स्वभावाने शांत होते व लहान मुलांना ते खूप प्रेमाने वागवायचे. ते अतिशय हौशी होते आणि आमचे खूप लाड करायचे.  भाऊंच्या दृष्टीने 'मुले सांभाळणे' हे 'काम' नसून तो त्यांच्या  आनंदाचा भाग होता. लहान मुले त्यांच्याकडे बराच वेळ रमायची. अगदी रडकी, हट्टी मुलेसुद्धा त्यांच्याकडे गेली की शांत व्हायची. लहान मुलांना कडेवर घेऊन ते फेऱ्या मारायचे व अनेकदा झोपवावयाचेही. कदाचित त्यांच्या हाताचा प्रेमळ स्पर्श अगदी लहानग्या मुलालासुद्धा जाणवत असावा. त्याकाळांतल्या पुरुषवर्गात भाऊंचा हा गुण विशेष उठून दिसायचा.    

भाऊ तसे खूप बोलके नव्हते. पण ते स्वतः आणि माझे  वडील, म्हणजे दादा, हे दोघेही वकील असल्यामुळे त्यांच्या गप्पा विशेष रंगायच्या. भाऊ कमालीचे हजरजबाबी व विनोदी होते. अगदी हळू आवाजात ते एक-दोन शब्दच बोलून जायचे आणि उपस्थितांमध्ये खसखस पिकायची. काही विनोदी बोलत असतांना, भाऊंच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हालत नसे अथवा कोणतेही हातवारे वा अंगविक्षेप ते करत नसत. मी लहान असताना बरेचदा मला त्यांचे बोलणे कळत नसे. पण मोठी माणसे भाऊंच्या बोलण्याला हसून दाद देत असल्यामुळे ते काहीतरी विनोदी बोलत असावेत असा अंदाज येऊन मला मजा वाटे. पुढे त्या बोलण्यातला नर्मविनोद कळायला लागल्यावर मात्र त्यांची समयसूचकता आणि विनोदबुद्धी मला अधिकाधिक भावायला लागली.

भाऊ एक निष्णात वकील होते. कायद्यातल्या खाचाखोचा त्यांना नेमक्या माहिती असायच्या. कधी-कधी आमचे दादाही एखाद्या केसमध्ये भाऊंचा सल्ला घ्यायचे. भाऊंची समरणशक्ती अफाट होती. एखाद्या पक्षकाराची केस त्यांनी ऐकली व समजावून घेतली की ती त्यांच्या डोक्यात पक्की बसायची. त्यामुळे कित्येकदा त्या केसचे कागदपत्र समोर नसतानाही भाऊ उत्तमप्रकारे ती केस चालवू शकायचे. अर्थात भाऊंची ही महती मी दादांकडून फक्त ऐकलेली आहे. पुण्यात कोर्टाच्या आवारात भाऊंचे एक ऑफिस होते. शिंदेआळीतल्या त्यांच्या घरांत पक्षकार क्वचितच यायचे. कोणी आले तरी पाच दहा मिनिटांत त्यांचे काम उरकून भाऊ त्यांची बोळवण करीत असत. त्यामुळे भाऊ कोर्टातून घरी आले, काळा कोट काढला की कुटुंबियांना त्यांचा सहवास लाभायचा. याउलट, सोलापूरला आमच्या दादांचे ऑफिस घरातच असल्यामुळे ते घरी आले तरीही सतत पक्षकारांबरोबर कामात असायचे. म्हणूनच भाऊंच्या कामाच्या पद्धतीचे  मला खूप अप्रूप वाटायचे .   

भाऊ सगळ्या कुटुंबाचा आधारवड होते. कुणालाही कसल्याही प्रकारची मदत करायला ते तत्पर असायचे. मदत करताना त्या व्यक्तीला उपकाराच्या ओझ्याखाली त्यांनी कधीही दबू दिले नाही, हे विशेष. भाऊ कमालीचे शांत आणि विचारी होते. कोणत्याही गहन कौटुंबिक समस्येमधून ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास कुटुंबातील सर्वांना वाटायचा हे विशेष. आम्ही बद्रीनाथ व केदारनाथच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा भाऊंच्या स्थितप्रज्ञ वृत्तीची एक झलक मला अनुभवता आली. एका वळणावर आमची बस रस्ता सोडून दरीच्या कडेला गेली आणि एक चाक दरीच्या वर अधांतरी अशा अवस्थेत थांबली. सर्व प्रवाश्यांचा आरडाओरडा व रडारड सुरू झाली. भाऊंनी काहीही न बोलता बसमधील शेवटचा प्रवासी सुखरूप बाहेर पडेस्तोवर अव्याहत मदतकार्य सुरू ठेवले. जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर आम्हा इतर प्रवाशांमध्ये, सगळे कसे घडले, काय होऊ शकले असते आणि आता पुढील प्रवासाचे काय होणार, अशी चर्चा चालू होती. भाऊ मात्र दरीच्या कडेला उभे राहून शांतपणे दातांना मशेरी लावत होते!

भाऊ गेले तेंव्हा पुण्यात असून आणि प्रयत्न करूनही त्यांच्या पार्थिवापर्यंत पोहोचू शकलो नाही याची खंत सदैव जाणवेल. पण भाऊंच्या व्यक्तिमत्वाच्या उत्तुंगतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करणे तर माझ्या हातात आहेच! 

1 टिप्पणी: