रविवार, ८ मार्च, २०२०

असे मातृत्व दे गा देवा!

माझ्या माहेरी एकत्र कुटुंबात एकाच वेळी आम्ही सख्खी-चुलत मिळून कमीतकमी सात भावंडे असायचो. दिवाळीत किंवा उन्हाळयाच्या सुट्टीत आमची आते-मामे-मावस-चुलतचुलत अशी सर्व  भावंडे आली की आमचा भलामोठा वाडा गजबजून जायचा. आमच्या आयांना आमच्यासाठी किती कष्ट उपसावे लागत होते याची कल्पनाही त्यावेळी मला नव्हती. लग्न झाल्यावर वाटायचे की आपल्याला चांगली चार-पाच मुले होऊ द्यावीत. घर कसे मुलांनी भरलेले असावे. आईपण निभावताना आईला कशाकशातून जावे लागते, हे आई झाल्यावरच कळते. मला मोठी मुलगी आणि नंतर एक मुलगा झाला. पण दुसऱ्या बाळंतपणात मला बराच त्रास झाल्याने दोन अपत्यांवरच थांबावे लागले.

आई आपल्या मुलांवर प्रेम करतेच पण मुलांना शिस्त, संस्कार, बचत, वागणे-बोलणे, स्वच्छता अशा अनेक गोष्टी शिकवते. माझ्या मुलांचे संगोपन करीत असताना, ही जबाबदारी ओझे न वाटता नेहमी सुखदच वाटायची. मला आणखी दोन-तीन मुले असायला पाहिजे होती ही इच्छा सतत मनात असायचीच. मग अधून-मधून भाचरंडे, माझ्या मुलांचे मित्र-मैत्रिणी यांची आई होऊन मी माझी मातृत्वाची तहान तात्पुरती भागवायचे. मला लहान मुले खूपच आवडतात. मागे एकदा जम्मू ते पुणे या संपूर्ण प्रवासात, एका सहप्रवासी जोडप्याच्या दोन-तीन वर्षांच्या गोड मुलीला मी पूर्णवेळ स्वखुशीने सांभाळले होते. त्यावेळी मला मातृत्वाचे सुख भरपूर मिळाले. पण पुणे स्टेशन आल्यावर त्या मुलीने तिच्या आईकडे जायला नकार देऊन माझी आणि त्या जोडप्याचीही चांगलीच पंचाईत केली होती.

माझी आजी तिच्या वयाच्या ९५ व्या वर्षी वारली. आजी गेली तेव्हा माझी आई ७२ वर्षांची आणि वडील ७५ वर्षांचे होते आणि ती दोघेच तिची देखभाल करत होते. आजी जायच्या आदल्या वर्षी माझ्या भाऊ-वहिनीने माझ्या आई-वडिलांना परदेशवारीसाठी नेले. त्यावेळी माझ्या आजीला ते माझ्या घरी सोडून गेले होते. आजीला मी भरवायचे, तिची स्वच्छता, करमणूक, औषधपाणी  सगळे करायचे. त्यावेळेपर्यंत माझ्या आजीला स्मृतीभंश झाला होता. "मी तुझी कोण आहे?" असे विचारले की " तू माझी आई आहेस" असे ती पटकन म्हणायची. मी सुखावून जायचे आणि आजीला आईच्या मायेनेच बघायचे.

आज माझे सासू-सासरे दोघेही हयात नाहीत. माझ्या सासऱ्यांना त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत, मधेच केंव्हातरी आपण आजारी आहोत असे वाटू लागे. घाबरून जाऊन ते  स्वतःचा आहार कमी करीत व मला बोलावून घेत असत. त्यांना तपासून, "तुम्हाला  काहीही झाले नाही. मी नेमून दिलेला आहार  घेतलाच पाहिजे" असा दम त्यांना द्यावा लागे. मग ते  पुन्हा व्यवस्थित जेवू लागायचे. माझ्या सासऱ्यांची आई, ते अगदी लहान असतानाच वारली होती. ते मला त्यांची आईच मानायचे. माझ्या सासूबाई, शेवटचे चार महिने काहीच खात नव्हत्या. त्यातल्या काही काळ त्या माझ्याकडे होत्या. त्यांनी काहीतरी खावे म्हणून मी रोज नवनवीन पदार्थ करायचे. एकदा मी ज्वारीच्या पिठात पालक घालून गरमागरम भीमरोटी करून, ताज्या लोण्याबरोबर त्यांना भरवली. कुठलीही खळखळ न करता त्यांनी ती खाल्ली आणि म्हणाल्या, "तू माझी आई आहेस". माझे दोन्ही भाऊदेखील गंभीर आजारांना तोंड देत असताना मी त्यांची काळजी घेतली होती. त्या वेळेपर्यंत आमची आई स्वतःच ऐंशीच्या घरात असल्याने ती स्वतः त्यांची सेवा करण्यास असमर्थ होती. "तू आम्हाला आईची उणीव भासू दिली नाहीस" असे माझे दोघेही भाऊ मला म्हणत. या सर्वांच्या मातृत्वाचे सुखही मला लाभले आहे .

अर्थात मातृत्वाच्या सुखद अनुभवांबरोबर काही कटू अनुभवही पदरी आहेतच. पोटच्या मुलांनादेखील त्यांच्या कानाला गोड न लागणारा एखादा सल्ला दिला की ती रागाच्या भरात ,"तू माझी आई आहेस का कोण आहेस?" असे चटकन म्हणून जातात. पण मग काही काळाने स्वतःहून जवळ येतात. अनेक वेळा  "माझे आई" असे म्हणून माझा नवरा किंवा माझ्या मित्र-मैत्रिणी, माझा उध्दार करत असतात. त्या-त्या वेळी त्यांच्या बालिशपणाला हसून मी त्यांचे बोलणे कानाआड करते, हे सांगायला नकोच.

नुकतीच माझी आई अनेक महिने हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ होती. गेला सव्वा महिना ती घरी असली तरी तिची पुष्कळ काळजी घ्यावी लागते आहे. त्यामुळे लग्न किंवा इतर समारंभांची बोलावणी आली तरी "आईच्या तब्येतीच्या कारणास्तव आम्ही येऊ शकत नाही", असे कळवावे लागते. त्यावर 'तुम्हाला खूप ताण पडत असेल. तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या", "काही लागले तर सांगा" अशा दिलासा देणाऱ्या प्रतिक्रिया येतात. हॉस्पिटलमध्ये असताना आई बराच काळ ग्लानीतच असल्याने फारशी बोलत नसे. घरी आल्यावर हळूहळू ती सुधारते आहे व थोडी बोलायलाही लागली आहे. "मी तुझी कोण आहे?" असे विचारले की ती म्हणते," तू माझी आई आहेस". केवळ एखाद्याची जन्मदात्रीच त्याची आई होऊ शकते असे नाही. समोरच्या व्यक्तीला तुमच्या वागण्यातले वात्सल्य जाणवले की ती व्यक्ती स्वतःच तुम्हाला मातृत्व बहाल करते. आईविना वाढलेल्या कित्येक मुलांच्या वडिलांना किंवा पोटचे मूल नसलेल्या स्त्रियांनाही मातृत्वाचे हे सुख मिळतच असेल.

गेल्या महिन्यात आनंदच्या एका मित्राच्या मुलीचे लग्न दिल्लीला होते. "सासू आजारी असल्याने आम्ही  येऊ शकत नाही", असे आनंदने त्याला कळवले. त्यावर त्या समंजस मित्राचे आलेले उत्तर वाचून आमचे डोळे पाणावले,

" No problem Anand. We are really fortunate to take care of our elders . Take care of her"

अनेक आप्तेष्टांचे आणि खुद्द स्वतःच्या जन्मदात्रीचे मातृत्व निभावण्याचे भाग्य मला लाभले आहे, याची जाणीव आनंदच्या मित्राने करून दिली.

चटकन एक मागणे मनात आले,
"असे मातृत्व दे गा देवा".

१२ टिप्पण्या:

  1. खूप छान लिहिले आहेस स्वाती..शब्दच नाहीत व्यक्त करायला..

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम सुंदर. ह्यातल्या काही घटनांची मी दुरून का होईना साक्षीदार आहे. ताई,.तुझे ब्लॉग वाचून दादा,वहिनी जवळच आहेत असे वाटते.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान, सुंदर. असच लिखाण चालू राहू दे



    मिलिंद वैद्य

    उत्तर द्याहटवा
  4. खुप सुंदर लिहीता तुम्ही .... तुमचे लेख वाचून फार छान वाटते... तुमचयाशी भेट होणे आणि तुमचे मार्ग दर्शन मिळणे ही खुप चांगली आणि समाधानकारक बाब आहे आमच्यासाठी ������

    उत्तर द्याहटवा
  5. आईची आई होणे हे अतिशय अवघड काम आहे . तूम्ही करत असलेले काम आदर्शवत आहे . यासाठी स्वतःची एक कणखर तत्व प्रणाली लागते . आत्मिक समाधान वगैरे शब्द या साठी राखीव आहेत परंतु ते मला कृत्रिम वाटतात ....विनायक जोशी

    उत्तर द्याहटवा
  6. आनंदच्या मित्राने, घरातल्या मोठ्या व्यक्तींचे संगोपन करण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे, हे लिहल्यामुळे मला ही पोस्ट सुचली.

    मातृत्वाबाबतच्या मनोगतातला भाव तुम्हा सर्वांना भावाला हे वाचून बरे वाटले!



    धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  7. Swatee to get up ( whether one is six months or eighty yesr old) and see your loved one lookibg at you with all the care and joy in their eyes is the biggest joy one can ever experience.

    उत्तर द्याहटवा
  8. क्या बात है स्वाती ,कमाल आहे.तुला संधी मिळाली असं मातृत्व निभावण्याची , कौतुकास्पद म्हणजे अतिशय आनंदाने आणि समर्थपणे तू केलंस.अगं घरातल्या ज्येष्ठांनी आणि भावंडांनी आई म्हणणं किंवा आईची उपमा देणं ह्यासारखा सन्मान किंवा ह्यासारखं सुख असूच शकत नाही.

    उत्तर द्याहटवा