गुरुवार, २ जुलै, २०२०

पाऊले चालती ...

आज पहाटे अगदी लवकर जाग आली. चटकन तयार होऊन लांब सायकल स्वारीला जावे असा विचार केला होता. पण सायकल दुरुस्तीसाठी टाकली आहे हे लक्षात आले. म्हणून मग खूप लांब चालायला जायचे ठरवले. अचानक मला, कॅनबेरामध्ये विकत घेतलेल्या, माझ्या नव्याकोऱ्या एसिक्स बुटांची आठवण झाली. नव्याकोऱ्या नव्हे, न वापरलेल्या, असे म्हणूया. कारण ते बूट विकत घेऊन दहा महिने उलटून गेले. पण आज प्रथमच मी ते वापरले आणि चांगला दहा-बारा किलोमीटरचा फेरफटका मारून आले. मला थोडे दमायला झाले. पण  त्यामानाने, माझ्या पायांना व्यवस्थित बसणाऱ्या बुटांमुळे माझ्या पायांना खूप थकवा जाणवला नाही.  
 
मागच्या वर्षी, जुलैच्या शेवटाला मी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे, माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी गेले होते. माझी नात दोन आठवड्याची झाल्यानंतर तिला घेऊन, माझी मुलगी, जावई आणि मी असे कॅनबेरात हिंडायला बाहेर पडायला लागलो होतो. मला तिथे काही खास खरेदी करायची नव्हती. पण, निघताना माझे वापरातले बूट पुण्यातच राहिल्यामुळे मी प्राचीचे, म्हणजे माझ्या मुंबईच्या वहिनीचे, बूट घालून ऑस्ट्रेलियाला गेले होते. ते बूट माझ्या पायाला जरा घट्टच होत होते. पुण्यात राहिलेले माझे बूटही तसे जुनेच झाले होते. त्यामुळे, कॅनबेरात मी चांगले बूट खरेदी करावेत, असा 'बूट' निघाला आणि माझी मुलगी व  जावई मला तिथल्या मॉलमध्ये घेऊन गेले.

एरवी, मी आणि माझी मुलगीही, मॉलमध्ये जायला अजिबात उत्सुक नसतो. पूर्वी तिच्याकडे शिकागोला गेले असताना, केवळ अमेरिकन मॉल्समधल्या वातावरणाची झलक दाखवायला म्हणून, मुलीने मला आवर्जून तिथल्या  मॉलमध्ये नेले होते. अमेरिकेतला मॉल बघितल्यावर, भारतातल्या मॉलमधले चंगळवादी वातावरण कुठून आले आहे, ते लगेच कळते. कॅनबेरातल्या मॉलमध्ये साधारण आपल्या इथल्या मॉल सारखीच मोठी-मोठी दुकाने होती. पण अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या मॉल्समध्ये अनुभवायला मिळणारे, कान किटवणारे संगीत, धांगडधिंगा करणारे तरुण-तरुणींचे घोळके, श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन किंवा बेभानपणे खरेदी करत सुटलेल्या बायका, असे फारसे काहीच दिसले नाही. 

आम्ही एसिक्स कंपनीच्या दुकानात गेलो. तिथे नेमका सेल चालू होता. सेलवर असलेल्या बुटांकडे माझे पाय वळणार इतक्यात मुलीने आणि जावयाने नजरेनेच मला दाबले. तिकडची पद्धत जराशी वेगळी असते. दुकानात गेल्यानंतर, तुम्हाला काय हवे आहे असे कोणीतरी विचारते. मग तिथल्या विक्रेत्या पोऱ्याला आपल्याला नेमके काय हवे आहे ते आधी सांगायचे. मग तो आपल्याला त्यांच्या दुकानांत कुठे आणि काय विकत घ्यायचे याबाबत मार्गदर्शन करतो. तिथल्या विक्रेत्याने मला दोन-चार प्रश्न विचारून, बूट नेमके कुठे आणि कशासाठी वापरायचे आहेत याचा अंदाज घेतला. आपल्याकडे बूट-चपलांच्या दुकानात जसे पायाचे माप घेतात तसे माझ्या पायाचे अंदाजे माप त्याने घेतले. मग कुठल्यातरी मशीनद्वारे माझ्या दोन्ही पायांचे सर्व बाजूने (३D )नेमके माप घेतले. त्यानंतर मला, दहा-बारा पावले एका रेषेत चालत जाऊन परत यायला सांगितले. माझ्या चालण्याचे त्याच्या हातात असलेल्या टॅबवर त्याने व्हिडीओ शूटिंग केले. या सगळ्या गोष्टींचे कंप्यूटर अनॅलिसिस झाल्यावरचे सर्व निष्कर्ष, त्याने आम्हाला समजावून सांगितले. माझे एक पाऊल दुसऱ्या पावलापेक्षा थोडे मोठे असल्याने, मोठया पावलाच्या मापाचे बूटच खरेदी करावेत; मला मुख्यतः सपाट रस्त्यावरून चालण्यासाठी बूट हवे असल्याने पळणे, खडकाळ रस्तावरुन चालणे किंवा टेकडीवर चढणे, यासाठी वापरायचे बूट घेऊ नयेत; तसेच माझा चवड्यांचा भाग थोडा अधिक रुंद असल्याने, पुढे रुंद असलेले बूट विकत घ्यावेत; असा सल्ला त्याने दिला. शेवटी, बूट रचून ठेवलेल्या अनेक रांगांपैकी एका विशिष्ट रांगेकडे बोट दाखवून, या रांगेतल्या बुटांपैकी कुठलेही एक बूट तुमच्यासाठी योग्य होतील असे सांगून तो निघून गेला. 

त्याने निर्देशित केलेल्या बुटांच्या रांगेकडे आम्ही वळलो. त्या रांगेतले कुठलेच बूट सेलवर नव्हते. त्यामुळे सेलमधले, पन्नास-साठ ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंमतीचे, चांगले बूट मिळण्याची आशा मावळली. त्याने दाखवलेल्या त्या रांगेतले एक-दोन बूट घालून मी चालून बघितले. अर्थातच ते माझ्या पायांना अगदी सुखावह वाटत होते. दीड-दोनशे डॉलर्स किंमत बघून मी खरेदीतून पाय मागे घेणार, हे माझ्या मुलीच्या लक्षात आले. "अगं, हे बूट पायाला अगदी आरामदायी असतात, वर्षानुवर्षे टिकतात, एक बुटाची जोडी तू विकत घेच" असा आग्रह तिने व जावयाने धरला. मग, मला आवडलेले निळ्या रंगातले बूट मी खरेदी केले. भारतात परतल्यानंतर, माझ्या आईच्या आजारपणात मी अतिशय व्यस्त होते. गेल्या ऑगस्टमध्ये खरेदी केलेले ते बूट, मी अजून वापरलेच नव्हते. आई गेल्यानंतर माझे सायकलस्वारीचे रूटीन सुरु झाले, पण माझे जुने बूटच मी वापरत होते. आज प्रथमच, खूप लांबवर चालण्यासाठी एसिक्स कंपनीचे नवीन बूट वापरले. पहाटेच्या शांत वातावरणांत चालता-चालता माझ्या मनातल्या विचारांनाही  चालना मिळाली. 
             
कालच आषाढी एकादशी झाली. या वर्षी वारी, दिंड्या, रिंगण या सगळ्या गोष्टीना करोनामुळे बंदी होती. सहजच, माझ्या मनासमोर पंढरीच्या वारकऱ्यांचे चित्र उभे राहिले. वर्षानुवर्षे, गावोगावचे अनेक वारकरी विठूमाऊलीच्या ओढीने पंढरीला पायी चालत जातात. माझी आजीही वयाच्या पंच्च्याहत्तरीपर्यंत सोलापूरहून पंढरपूरला चालत  जायची. पण ती कधी बूट वापरायची नाही, चप्पलच घालायची. ती वारीला निघायची त्यावेळी माझे आई-वडील तिला चांगल्या चपला घेऊन द्यायचे. वारीबरोबर पाच-दहा किलोमीटर चालून, सोशल मीडियावर स्वतःचे पन्नास फोटो टाकून, आपल्या भक्तीचे प्रदर्शन मांडणारे, मॉडर्न 'वारकरी'ही मला आठवले. ते मात्र  रिबॉक, आदिदास, नायके  वगैरे कंपन्यांचे बूट घालून चालत असतील. पण सामान्य वारकऱ्यांचे काय? तुटक्या, झिजलेल्या बूट-चपला घालून हे वारकरी रोजचे वीस-वीस किलोमीटर अंतर चालतात. कित्येकांना मी अनवाणी पायानेही जाताना पाहिलेले आहे. भक्तिमार्गावर चालणाऱ्या या खऱ्याखुऱ्या वारकऱ्यांच्या पायांना, तो पंढरीनाथ शीण येऊच देत नसावा. महागडे आणि आरामदायी बूट घालून, व्यायामासाठी मी करत असलेल्या पायपिटीच्या दरम्यान मला, पांडुरंगाच्या भेटीसाठी मैलोन-मैल अनवाणी चालणाऱ्या गरीब वारकऱ्यांची आठवण झाली आणि मनोमनच त्या अनामिक वारकऱ्यांचे मी पाय धरले.       

४८ टिप्पण्या:

  1. खूप छान.
    सहज सुंदर आणि ह्रदयस्पर्शी लिखाण.

    उत्तर द्याहटवा
  2. तुझी सहजसुंदर लेखनशैली आहे. कुठेही अभिनिवेश वाटत नाही. असेच लिहीत जा. तुझे अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरु शकतील.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान साधी सोपी सरळ पण मनाला भिडणारी भाषा !

    उत्तर द्याहटवा
  4. स्वाती खुप छान सोप्या भाषेत अगदी चपखल निरीक्षण असणारे वर्णन आहे आवडले खुप. अशीच लीहीत जा.व पाठवत रहा.

    उत्तर द्याहटवा
  5. वरील कमेंट माझी दातार ची आहे

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय छान आणि सुरेख लिहिले आहे . चंगळवाद या बद्दल योग्य शब्दात लिहिले आहेस . मंदार हा माझा भाच्चा इवानहोव्हला रहायचा . त्याच्या मुलींना पहिली पासून येथे शिक्षण मिळावे म्हणून आला आहे . बाणेर येथील शाळा करत आसलेली लूटमार बघून थक्क झाला आहे . असो एकूणच छान , साधे , सोप्पे , सरळ , अकृत्रिम लिहायची हातोटी लाभलेली आहे . वाचताना आनंद वाटतो . असेच लिहित रहा ......विनायक जोशी (vP)

    उत्तर द्याहटवा
  7. कोणतेही कार्य सुरू करताना डोक्यात शक्ती असली की मग साधनाशिवाय मनुष्य तो पूर्ण करू शकतो.पंढरी ची वारी हा त्यातीलच एक उदाहरण आहे

    उत्तर द्याहटवा
  8. कोणतेही कार्य सुरू करताना डोक्यात शक्ती असली की मग साधनाशिवाय मनुष्य तो पूर्ण करू शकतो.पंढरी ची वारी हा त्यातीलच एक उदाहरण आहे.somesh vaidya

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान वास्तव आणि अंतर्मनातील तळमळ मांडली आहे Mam.

    उत्तर द्याहटवा
  10. Very well penned. More strength to your craft.... Rani

    उत्तर द्याहटवा
  11. छान शब्दात अनुभव लिहिला आहे डॉक्टर... खूपच छान

    उत्तर द्याहटवा
  12. अगदी सहज सोपे लिहिले आहेस. छान. बुटा बुटाचे रूप आगळे.. प्रत्येकाचे रंग वेगळे......... मेघा

    उत्तर द्याहटवा