रविवार, २ मे, २०२१

कानामागून आली आणि ... !

आयुष्यभरात कधीही मी बागकाम केले नव्हते. पण गेल्या वर्षी आमच्या व्याह्यांकडच्या पानवेलीची कोवळी पाने वेलीवरून खुडून खाल्ल्यामुळे म्हणा किंवा माझ्या आत्याच्या बंगल्यातल्या बागेतला ताजा कढीलिंब फोडणीसाठी वापरल्यामुळे असेल, अचानकच मला बागकामाची हुक्की आली. सुरुवातीला, आपण आपल्या रोजच्या जेवणात वापरतो त्या वनस्पती लावाव्यात असा मी विचार केला. कढीलिंब, गवती चहा, पुदिना, तुळस, ओवा, बेसिल, मिरची  अशी रोपे लावली. आज सकाळी सहज शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर त्यातल्या एक-दोन रोपांचे फोटोही पाठवले. तसेच, मी लावलेली मिरचीची रोपे जगली नाहीत हेही मी लिहिले. लगेच ग्रुपवर चर्चा सुरु झाली. विषयही चांगला  तिखट होता... तो म्हणजे मिरची!


आज मिरची आपल्या भारतीयांच्या जेवणाचा अविभाज्य घटक झालेला असला तरी, मिरची बाहेरून आपल्या देशात आलेली आहे हे कोणाला सांगून खरे वाटणार नाही. सोळाव्या शतकात, वास्को-द-गामाच्या कृपेने भारतात मिरची आली असे म्हणतात. तोपर्यंत भारतात तिखटपणासाठी फक्त काळे मिरेच वापरले जात होते. खरे सांगायचे तर या मिऱ्यांच्याच वासावर पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश व्यापारी भारतात आले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. पण नंतर, सतराव्या आणि अठराव्या शतकात मात्र, ही मिरची भारतीय खाद्यजीवनाचा अविभाज्य घटक झाली. कदाचित या घटनाक्रमामुळेच "कानामागून आली आणि तिखट झाली" हा वाक्प्रचार पडला असावा. आज लाल, हिरव्या मिरच्यांशिवाय आपले जेवण होतच नाही!

मी अमेरिकेला पहिल्यांदा गेले तेंव्हा सुशी, बर्गर, पिझ्झा, नूडल्स, पास्ता वगैरे पदार्थ बरे वाटले. नाही म्हणायला पिझ्झावर ऍलोपिनो नावाच्या, तशा बेताच्या तिखट मिरच्या होत्या. मात्र तिकडे बाहेर मिळणारे एकूण सर्व जेवण मला मिळमिळीतच वाटले. त्यामुळे पुढील खेपेला मात्र माझ्या मुलीला, असिलताला, "निदान घरच्या जेवणात, भारतात मिळते तसली चांगली झणझणीत मिरची मला पाहिजेच" असे सांगून टाकले. तरीही, यांच्या देशात आपल्याकडे मिळते तशी झणझणीत मिरची कुठली मिळायला? असाच विचार माझ्या मनात होता. 

तसे पाहता, खादाडीमध्ये आम्हा दोघांपेक्षा असिलता अधिक दर्दी आहे. त्यामुळे, अमेरिकेत मिळणाऱ्या मिरच्यांबद्दल इत्थंभूत माहिती तिला होती. भारताबद्दल किती वृथा अभिमान आपण बाळगून असतो ते असिलताने मला लगेच दाखवून दिले. ती मला एका मोठ्या दुकानात घेऊन गेली. तिथून आणलेल्या, मेक्सिकोची 'हाबानेरो', थायलंडची 'बर्ड्स आय' अशा जातीच्या मिरच्या खाल्ल्यावर मात्र, माझा तो वृथा अभिमान माझ्या नाका-डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याबरोबर, अगदी शब्दशः गळून पडला. त्यानंतर, विविध जातींच्या मिरच्या आणि त्यांचा तिखटपणा यावर, असिलताने माझे एक झणझणीत बौद्धिक घेतले. 

मिरच्यांच्या बियांमध्ये तिखटपणा नसतो. त्यामुळे बिया खाल्ल्या तरी काही त्रास होत नाही ही माहितीही मला नव्यानेच समजली. अर्थात, मिरच्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या 'त्रासा'त, आपल्याला फक्त बियाच दिसतात! म्हणूनच, आपल्याला मिरचीच्या बियांचाच त्रास होतो असे आपल्याला वाटते, हेही माझ्या लक्षात आले. मिरचीचा सगळा तिखटपणा तिच्या सालींमधे असतो. सालींमधे कॅप्साइसिन (Capsaicin) नावाचे एक रसायन असते. मिरची खाल्ल्यावर हे रसायन आपल्या तोंडातल्या pain receptors ना उत्तेजित करते. ही संवेदना, क्षणार्धांत  आपल्या मेंदूपर्यत पोहोचून आपल्याला तिखटपणाची जाणीव होते. मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी Scoville Heat Unit (SHU) वापरले जाते.

माझ्या संकुचित दृष्टीकोनामुळे, मला आपली कोल्हापूरची "लवंगी मिरची", किंवा फारतर आसामची "भूत जलोकिया" या भारतीय मिरच्या जगातल्या सर्वात जास्त तिखट मिरच्या असतील असेच वाटत होते. असिलताने इंटरनेटवरून याविषयी आणखीही बरीच रंजक माहिती काढून मला दाखवली. तिखटपणामध्ये आपल्या मिरच्यांचा नंबर बराच खाली आहे ही माहिती मात्र माझ्या नाकाला चांगलीच झोंबली! 

इतर देशांमध्ये मिरच्यांचे अनेक पदार्थ असतीलही. पण मिरच्यांपासून बनवलेल्या, आपल्या भारतीय पदार्थांचा मात्र मला सार्थ अभिमान आहे. ओल्या लाल मिरच्या आणि लसूण कुटून, त्यावरून फोडणी घालून केलेला रंजक्याचा चकचकीत रंग कुठल्याही रंगपेटीत मिळणार नाही. लोखंडी तव्यावर गरम तेलात ताज्या हिरव्या मिरच्या परतून, त्या अर्धवट मऊ झाल्यावर तव्यावरच खरडून, त्यात दाण्याचे कूट घालून, केलेला खर्डा अप्रतिम लागतो. हिरव्यागार मिरच्या उखळात किंवा खलबत्त्यात कुटून केलेला ठेचा तर लाजवाबच!

ठेचा, खर्डा किंवा रंजक्यासोबत झुणका-भाकरीच्या ताटापुढे पंचपक्वान्नाचे ताटही फिके पडते. डाळ फ्राय किंवा इतर काही पदार्थांवर, फोडणीत परतून घातलेली काश्मीरी मिरची फारच लोभस दिसते. मिरच्यांची भजी, खाराची मिरची, सांडगी मिरची, ताकातल्या मिरच्या, भरल्या भोंगी मिरच्या, असे अनेक पदार्थ, जेवणाला चव आणतात. 

म्हणूनच मी मनाशी म्हणते, "डोळ्यात पाणी आणायच्या बाबतीत जगातल्या इतर मिरच्या भले जास्त श्रेष्ठ असतीलही. पण मिरचीपासून केलेल्या आपल्या भारतीय पदार्थांच्या नुसत्या विचारांमुळेच आपल्या तोंडाला पाणी सुटते, हे विशेष नाही का?  
 

३१ टिप्पण्या:

  1. कानामागून येऊन तिखट होते ते मिरचीच. साखरेचा हा गुणधर्म नाही. कारण साखर गोड असते. बाकी गोडबोल्यांनी तिखट मिरचीबद्दल लिहिले हे विशेष!
    असो. विनोद बाजुला राहु द्या.
    स्वाती, मिरचीबद्दल मनोरंजक माहिती मिळाली. तुझ्याप्रमाणे माझ्यासकट अनेक मराठी माणसांचे मिरची बद्दल गैरसमज असतात. मनोरंजक माहितीबद्दल धन्यवाद.
    पण अजून In depth माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. ओघाने जी माहिती आली ती लिहिली...

    उत्तर द्याहटवा
  3. स्वाती मिरची बद्दल इतकी छान माहिती दिलीस. खुपच छान लिखाण व अनुभव.आवडले.

    उत्तर द्याहटवा
  4. खुपचं ओघवत्या भाषेत लिहिता मॅडम तुम्हीं, त्यामुळे वाचक प्रत्यक्ष त्या भूमिकेत जातो, खूपच छान

    उत्तर द्याहटवा
  5. मिरचीची लज्जत फिकी वाटेल असे लिखाण !!!!
    मस्त मेजवानी !!

    उत्तर द्याहटवा
  6. मिरची वर लिहिलेला चटकदार लेख! एकदम मस्त!

    उत्तर द्याहटवा
  7. लेख आवडला, असिलता नावाचा अर्थ काय होतो मी हे नाव ऐकलेले नाही, एक प्रकारच्या ठेच्याला रंजक्या म्हण तात ही पण नवीन माहिती मिळाली ��

    उत्तर द्याहटवा
  8. मिरचिचा ठेचा छान लागतो मिरची लेख डोळ्यात पाणी आणणारा नव्हता की तिखटामुळे ठसका लागणारा नव्हता.मनोरंजक माहिती पूर्ण होता.
    गाभुळलेल्या चिंचेचा तिखट मिठ गुळ घालून ठेचा चा करतात त्याला रंजका म्हणतात.आंबट गोड तिखट असा भाकरीबरोबर छान लागतो.

    उत्तर द्याहटवा