आमच्या मदुराई-रामेश्वर सहलीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे १६ ऑक्टोबरला, मला रोजच्या सवयीप्रमाणे पहाटे लवकर जाग आली. पहाटेचा चहा घेतल्यानंतर, आम्ही राहत असलेल्या ताज ग्रुपच्या "द गेटवे हॉटेल" या रिसॉर्टचा निसर्गरम्य परिसर पायी हिंडून बघण्याचा मोह मला आवरेना. आनंद अजून साखरझोपेत होता. त्यामुळे त्याला न जागे करता, मी एकटीच पायात बूट चढवून खोलीच्या बाहेर पडले. पसुमलाईच्या टेकाडावर, या रिसॉर्टचा त्रेसष्ठ एकर विस्तीर्ण परिसर आहे. 'जे बी कोट्स' या ब्रिटिश कंपनीची भारतातील शाखा 'मदुरा कोट्स' या सूत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासाठी, १८९० साली बांधलेल्या, या भल्यामोठ्या बंगल्याचे रूपांतर, आता लक्झरी रिसॉर्टमध्ये केलेले आहे. स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश अधिकाऱ्याचे वास्तव्य असलेला मूळ बंगला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या काळातल्या धनाढ्य ब्रिटिश लोकांनी भारतामध्ये राहून काय ऐश करून घेतली असेल याची कल्पना अशा वास्तू बघितल्यावर येते. "सूत कारखानदारांच्या त्या बंगल्याचे आणि सभोवतालच्या परिसराचे वैभव बघूनच, 'सुतावरून स्वर्ग गाठणे' ही म्हण पडली असेल की काय?" असा एक गंमतशीर विचार माझ्या मनात तरळून गेला!
जुन्या वास्तूत, रिसॉर्टच्या चार-सहा खोल्या आहेत. नव्याने बांधलेल्या पंच्चावन्न-साठ खोल्या, रेस्तराँ व इतर काही इमारती आसपासच्या पाच एकरांवर पसरलेल्या आहेत. आम्ही राहत असलेली खोली जुन्या वास्तूतच होती. त्यामुळे ती खूपच मोठी होती. नजरेने अंदाज घेतला असता, आमची खोली सहजी सहाशे ते सातशे चौरस फुटाची असावी असे दिसत होते. नवीन इमारतीतील इतर खोल्याही चांगल्या प्रशस्त होत्या. प्रत्येक खोलीच्या आकारमानाला शोभेसे जुने सुंदर फर्निचर, दोन भलेमोठे क्वीन-साईझ पलंग, आणि अटॅचड वेस्टर्न टॉयलेट आणि बाथरूम होते. नवीन खोल्याही जुन्या धाटणीच्या वाटाव्या अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत. त्यामुळे एकूण सर्व रिसॉर्टला एक 'मॅजेस्टिक लुक' आलेला आहे. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, जिम, बॅडमिंटन व टेनिस कोर्ट अशा सुविधा आहेत, पण कोव्हिड निर्बंधांमुळे स्विमिंग पूल आणि जिम बंद होते. रिसॉर्टचे रेस्टॉरंट उत्तम होते. सर्व चांगल्या हॉटेल्समध्ये असतात तसे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ इथे होते. शिवाय, ताज हॉटेल्सच्या पाहुणचारात नेहमीच जाणवणारा 'Tajness', इथल्या कर्मचाऱ्यांची कर्तव्यदक्षता आणि अदबशीर वागण्यामध्ये जाणवत होताच.
हे रिसॉर्ट एका टेकाडावर असल्यामुळे, इथले सगळे रस्ते वळणा-वळणाचे आणि चढ-उताराचे आहेत. त्यामुळे माथेरान किंवा महाबळेश्वरची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. इथे दीड-दोनशे वर्षे जुनी, मोठमोठाली वडा-पिंपळाची झाडे आहेत. कित्येक भल्यामोठ्या वडाच्या पारंब्या लांबवर जमिनीत रुतून, त्यापासून नवनवीन वट-वृक्ष उगवलेले आहेत. संपूर्ण टेकडी हिरव्यागार झाडांनी भरलेली आहे. हे हरित-धन जतन कारण्याचे श्रेय अर्थातच ताज ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या निगराणीला आहे. या परिसरात अनेक मोर व इतरही अनेक पक्षी आहेत. मोरांच्या केकावलींमुळे आणि इतर पक्षांच्या मधुर किलबिलाटाने वातावरण संगीतमय झालेले होते. या परिसरात एकूण पन्नास-साठ मोर आहेत. ते सर्व मोर अगदी माणसाळलेले आहेत. काही ठराविक ठिकाणी तिथले मोर मोठ्या डौलात आपल्या हातातून दाणे टिपायला येतात.
गिरीश-प्राची काही वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांना घेऊन याच रिसॉर्टमध्ये राहून गेलेले होते. त्या वेळी आलेल्या सुखद अनुभवांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी यावेळीही पुन्हा इथेच राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे आम्हालाही हे स्वर्ग-सुख उपभोगता आले. दादांचे, म्हणजे आमच्या वडिलांचे वय लक्षांत घेऊन, गिरीशने दादांसाठी रेस्टोरंटच्या जास्तीतजास्त जवळची खोली मिळवली होती. रिसॉर्टमध्ये वयस्कर लोकांसाठी व्हीलचेयरचीही सोय होती. विशेष म्हणजे, रिसॉर्टच्या मध्यवर्ती भागांत सगळीकडे व्हील चेअर घेऊन जाता येईल असे रॅम्प्स केलेले होते. त्यामुळे दादांना जरा दमणूक जाणवली की आम्ही त्यांना व्हील चेयरवर बसवून नेत होतो.
आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही रिसॉर्टमध्ये इकडे-तिकडे हिंडत असताना हॉटेलचा एक कर्मचारी रिसॉर्टबाबतची सर्व माहिती देण्यासाठी आमच्या बरोबर आलेला होता. दुसरा एक कर्मचारी दादांना व्हील चेअर वरून आमच्यासोबत हिंडवत होता. त्यामुळे दादांनाही रिसॉर्टची आरामदायी सफर मिळाली. मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या खोल्याकडे बोट दाखवत त्या कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले, "या खोल्यांमध्ये पंतप्रधान मोदीजी दोन वेळा राहून गेलेले आहेत". त्यामुळे साहजिकच, ती खोली आपण बघून यावे असे मला वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे बाहेर पडल्यावर, मी जरा दबकतच त्या खोलीसमोरील व्हरांड्यात उभी राहून इकडे-तिकडे बघत होते. तेवढ्यात, रूम सर्व्हिससाठी आलेल्या कर्मचाऱ्याने अत्यंत अदबीने मला सांगितले की, सध्या त्या खोलीत आमच्यासारखेच कोणी गेस्ट राहत आहेत. त्यामुळे ती खोली आतून बघण्याची संधी हुकली. पण वरच्या मजल्यावर हिंडून, तिथल्या जुन्या सुंदर फर्निचरचे फोटो माझ्या मोबाईलमध्ये, आणि आणि उंचावरून दिसणारा मदुराई शहराचा नजारा माझ्या मनात मी साठवून ठेवला.
पक्ष्यांचा किलबिलाट वगळता सर्वत्र असलेल्या पहाटेच्या शांततेत तासभर फेरफटका मारून झाल्यावर, आमच्यापैकी इतर कोणी जागे झाले आहे का, ते पाहण्यासाठी मी आमच्या खोल्यांजवळ गेले. आनंदही फिरायला बाहेर पडला होता. ज्योत्स्ना आसपास हिंडून पक्षीनिरीक्षण करत होती. त्यानंतर हळू-हळू आम्ही सगळेच नाश्त्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जमा झालो. गप्पा-गोष्टी करत भरपेट नाश्ता केला, आणि तयार व्हायला आपापल्या खोल्यांकडे वळलो. आज मीनाक्षी मंदिर व मदुराई दर्शनासाठी आम्ही जाणार होतो.
तयार होऊन मी खोलीबाहेर पडले आणि नेमका त्याच वेळी मला असिलताचा, म्हणजे आमच्या ऑस्ट्रेलियास्थित मुलीचा फोन आला. आमच्या रिसॉर्टचे भरभरून वर्णन करून मी तिला सांगितले. माझ्या लहानग्या नातीला, नूरला, इकडे-तिकडे नाचणारे मोर व्हिडिओकॉलवर दाखवले. शिरीषने तर मोरांच्या मागे-मागे जाऊन, अगदी दूरवर हिंडून, नूरला मोर आणि लांडोरीही दाखवल्या. मग ज्योत्स्नानेही इलिना आणि अनया, या तिच्या सिंगापूरस्थित नातींना व्हिडीओकॉलवर मोर दाखवून खूष केले. नूरने यापूर्वी कधीच मोर बघितलेला नव्हता किंवा त्यांची केकावलीही ऐकलेली नव्हती. मोर बघून ती भलतीच आनंदित झाली. आमच्या नातींच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आम्ही ठरवूनच टाकले की, नातवंडांना घेऊन या रिसॉर्टमध्ये परत यायचे आणि त्यांना मोर दाखवायचे. हा विचार पक्का होताच, मी मनातल्या मनातच पुटपुटले, "वाह ताज! वन्स मोर..!"
वाचनीय लिखाण Nice
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवावाह ..खरेच छान लिखाण.
उत्तर द्याहटवाआभारी आहे!
उत्तर द्याहटवास्वाती, अतिशय मुद्देसूद छान वर्णन केले आहेस वाचताना तिथे मारत चक्कर मारत असल्याचा फील आला खुप छान असेच लिखाण करत रहा
उत्तर द्याहटवाधन्यवाद श्रीपाद!
हटवाTempted to visit
उत्तर द्याहटवाYou must!
हटवा