आज दुपारी मी माझ्या कारमधून क्लिनिकला निघाले होते. एका सिग्नलवर थांबले असताना, अतिशय वेगाने आणि नागमोडी वळणे घेत, एक मोटारसायकल माझ्या उजव्या हाताला येऊन थांबली. मी बिचकले. माझे लक्ष साहजिकच त्या मोटारसायकलस्वाराकडे गेले. अगदी कोवळ्या वयाचा, एक बारकुडा मुलगा ती मोटारसायकल चालवत आहे, हे बघून मला दुसरा धक्का बसला. त्याच्या मागच्या सीटवर एक चाळीशीचा मनुष्य बसला होता. दोघांच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. मला अगदी राहवले नाही. कारच्या उजव्या खिडकीची काच खाली करून, मी त्या मागे बसलेल्या माणसाला विचारले,
"हा मुलगा खूपच लहान दिसतो आहे. काय वय आहे याचे?"
"आता चौदावे चालू आहे" त्या माणसाने उत्तर दिले.
"अहो, मग इतक्या कोवळ्या वयाच्या मुलाला मोटारसायकल चालवायला का दिलीत? अठरा वर्षांच्या खालच्या मुलांना चालवायला कायद्याने बंदी आहे. महत्त्वाचे म्हणजे हे त्याच्या जिवाच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. तो किती जोरात चालवतोय, पाहिलंत ना " मी पोटतिडिकीने बोलले.
"अहो मॅडम, कोवळ्या वयात मुलं गाडी चालवायला शिकली की त्यांची भीड चेपते आणि पटकन शिकतात. माझाच मुलगा आहे आणि मी मागे बसलोय. मी काळजी घेतोय ना त्याची." तो माणूस हसत-हसतच म्हणाला.
मला खरंतर खूप राग आला होता. या दोघांचा आणि त्या मोटरसायकलच्या नंबरप्लेटचा, असे दोन फोटो काढून, त्वरित ट्राफिक कंट्रोल रूमला पाठवून द्यावेत, असा विचार माझ्या मनामध्ये चमकून गेला. पण तितक्यात सिग्नल हिरवा झाल्यामुळे सगळीच वाहने पुढे निघाली. तो मोटारसायकलस्वार तर विजेच्या चपळाईने, वळवळत माझ्या नजरेआड झाला.
मी क्लिनिकला पोहोचले. तिथे एक बंगाली सुवर्णकार आणि त्याची बायको, त्यांच्या दोन लहानग्यांना घेऊन आले होते.
"मॅडम इनके स्कूल की छुट्टी पडी हैं ना, तो ये लोग गाँव जा रहें है। आपसे कुछ दवा लिखवाके ले के जाऊं, ऐसे सोच के आया था।" मुलांच्या वडिलांनी खुलासा केला.
मी त्या दोन्ही मुलांना तपासले, आणि सध्या कुठलीही औषधे देण्याची गरज नसल्याचे सांगितले.
" कैसे जा रहे हैं? ट्रेनसे या फ्लाईटसे? " खरंतर, उत्तर माहिती असूनही मी विचारले.
" कलकत्ता तक फ्लाईट्से, और वहाँसे टैक्सी करके मिदनापूर डिस्ट्रिक्ट में हमारें गाँव चलें जायेंगे।"
गेल्या अनेक वर्षांपासून पुष्कळ बंगाली स्वर्णकारांची मुले मी तपासत आलेले आहे. हे सगळे लोक, नवरात्रामध्ये एकदा, आणि मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की एकदा, असे वर्षातून दोन वेळा, कलकत्त्यापर्यंत विमानप्रवास करून, पुढे टॅक्सीने आपापल्या खेडेगावी जातात, हे मला माहिती आहे.
ताप, उलटी, जुलाब यावरची जुजबी औषधे कशी द्यायची, हे मी त्यांना समजावून दिले.
"मॅडम, इनको छोडके अभी मैं वापस आ जाऊँगा। जूनमें स्कूल खुलनेसे पहले, मैं फिर इनको लेने जाऊँगा। इधर पुणे में अपना कारोबार है ना।" स्वर्णकाराने जास्तीची माहिती पुरवली.
मी सहजी विचारले, "आपके यहाँ कितने मजदूर काम करते है?
"पच्चीस लडके हैं"
जेमतेम पस्तिशीच्या त्या माणसाच्या हाताखाली, इतके कामगार आहेत हे ऐकून मला कौतुक वाटले.
"आपने ये काम कब सीखा था?'
"मैं तेरा-चौदा सालकी उमरमें इधर आया था। पहले आठ साल तक काम सीखा। बादमें अपना मॅन्युफॅक्चरिंग युनिट शुरू किया। धीरे धीरे बढाया।"
मी आश्चर्यचकित झाले.
"इतनी छोटी उमरमें आपके पिताजीनें आपको कैसे भेजा?"
"मॅडम, ये काम कच्ची उमरमेंही सीखना होता हैं। बडी उमरमें सीखना मुश्किल होता है। हमारे इधर के सब लडके छोटी उमर में ही सीखना चालू करते हैं। इसीलिये मेरे पिताजीनें मुझे भी भेज दिया था। मेरेको पूना आये अभी बावीस साल हो गये। इधर कारोबार बहोत अच्छा चलता हैं।"
मी विचारात पडले.
तेरा-चौदा वर्षांच्या आपल्या मुलाला भर ट्रॅफिकमध्ये मोटारसायकल चालवू देणारे एक वडील, आणि साधारण त्याच वयाच्या आपल्या मुलाला कामासाठी दूर पाठवणारे दुसरे वडील.
कायद्याच्या दृष्टिकोनामधून बघितले तर दोघेही अयोग्य कृत्यच करत होते. पण अर्थार्जनासाठी काहीतरी कसब शिकून, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला एक मुलगा आज अनेकांना रोजगार देऊ शकत होता.
अतिशय धोकादायक पद्धतीने, सुसाट मोटारसायकल चालवायला शिकून त्या दुसऱ्या कोवळ्या मुलाचे पुढे नेमके काय विशेष भले होणार होते? कुणास ठाऊक?
गुजराती, मारवाडी, सिंधी समाजातली खूप मुले-मुली शाळा-कॉलेज शिकता-शिकता, फावल्या वेळेत वडिलांबरोबर दुकानांच्या गल्ल्यावर बसतात. असे करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांची चेष्टा करणारे लोकही मला माहित आहेत. आणि दुसरीकडे, "धंदा करणे मराठी माणसाच्या रक्तातच नाही" अशी स्वतःचीच लाजिरवाणी चेष्टा स्वतःच्याच तोंडाने करणारे महाभागदेखील मी पाहते.
त्याउपर, "महाराष्ट्रातील सगळे व्यवसाय, नोकऱ्या, कामधंदे परप्रांतीयांनी बळकावल्यामुळे मराठी तरुणांना बेकारीची झळ सोसावी लागते", अशी ओरडही आपण ऐकतो.
पण तसे होऊ नये म्हणून आपण मराठी माणसे काय पाऊले उचलतो? आपली पुढची पिढी आपण कशी घडवतो?
हा विचार अधिक महत्वाचा नाही का?
छान विषय मांडला आहे. हीच गोष्ट मोबाईल बद्दल सांगता येईल. शाळेत जाण्याआधी मुलांना मोबाईल सर्व तर तऱ्हेने वापरता येतो. त्याचेही अतोनात कौतुक करणारे महाभाग पालक आहेत. मग अशा साधनांचा गैरवापर यातील बरीच मुले करतात. क्वचित गुन्हेही त्यांच्या हातून घडतात
उत्तर द्याहटवाखरं आहे!
हटवाछानच विषय आणि विचार मांडले आहेत ह्या मुलाच्या मागे स्वतः बाप बसून नियम तोडायला भाग पाडतो म्हणजे कसली पिढी घडतीय ट्रिपल सिट बसवून कर्कश हाँर्न लावून जेव्हा जोरात जवळून गेले तर आमच्या सारख्यांचा तोलच जातो कधी कट मारून पळून जातील यचा नेम नाही
उत्तर द्याहटवाहो. अशावेळी फार भिती वाटते.
हटवाHard work pays.आजकाल कोणाला कष्ट विशेषतः शारीरिक नको असतात.
उत्तर द्याहटवाखरं आहे.
हटवातसा हा संवेदनशील विषय. जर अल्पवयीन मुलगा/मुलगी गाडी चालवत असेल आणि अपघात झाला तर कायद्याप्रमाणे पालकांना शिक्षा होऊ शकते. व्यवसायांचे शिक्षण/ काम देण्या बरोबर शालेय/ विद्यालयीन शिक्षण पण दिलेतर सुशिक्षीत कुशल व्यावसायीक
उत्तर द्याहटवातयार होतील.
पण लक्षात कोण घेतंय?
हटवाचिंतनीय विचार मांडले आहेत, नितीन चौधरी
उत्तर द्याहटवाधन्यवाद नितीन!
हटवाबालमजूर म्हणण्यापेक्षा...हे व्यवसाय शिक्षण म्हणता येईल.
उत्तर द्याहटवाहेच राजस्थानी ...किराणा माला बाबतीत घडत आहे.....chain ch झाली आहे त्यांची.
कोरोना मध्ये आॕन लाईन नावाचा प्रकार लोकप्रिय झाला . कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद चेहऱ्यावर न दाखवता , स्क्रिनकडे बघावे त्या प्रमाणे थंड चित्ताने बघत राहणे या गोष्टीचा पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या कडून यावर्षी अनुभव घेतला . ही सर्व मुले वय वर्षे अकरा ते चौदा मधील आहेत ....यू ट्यूब गुरू या गोष्टीला असाधारण महत्त्व मुलांच्या आयुष्यात आले आहे ....विनायक जोशी
हटवाअतिशय चिंतनीय विषय,जेव्हां लहान वयातील मुलें ट्रिपल सीट बसून कर्कश्श हाॅर्न वाजवत जवळून जातात तेव्हा खुप भिती वाटते. मुलांना लहान पणापासून व्यवसायाभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे पण शिक्षण पूर्ण होणं ही गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाआपण मुलांच्या शालेय शिक्षणाला महत्व देतो घरचा व्यवसाय असला तरीकाही डीग्री असावी असा विचार असतो
उत्तर द्याहटवाअरे वा ! खूप छान स्वाती !!
उत्तर द्याहटवाविषय माहीतीतलाच आहे पण असा काटेकोर पणे कधीच लक्ष दिलं नव्हतं …
लहान मुलांना एखाद्या व्यवसायात नियम बाह्य अशा वयात घालणे हा प्रकार आपल्याकडे पिढ्या नं पिढ्या चालूच आहे. आज नवीन विचार मनात आला.
अशा लहान वयातील मुलांना सरकारने काही विशेष अटी घालून (उदा: सर्वांगीण विकासाची हमी …) जर कायद्याने अनुमती दिली तर काय होईल ?
घरच्या व्यवसायात काम करता येते असे मला वाटते.
हटवाखूप छान, विचार करायला लावणारे आहे
उत्तर द्याहटवाआमच्या कडे बालकामगार नाहीत असा बोर्ड लावून, त्यांना कामाला लावतातच
अतिदक्षता व बेफिकिरी, दोन्ही चूकच.
हटवासमतोल साधून मुलांना ट्रेनिंग द्यावे.सरकारने पुढाकार घ्यावा
बरोबर आहे.
हटवाखूप छान विषय मांडलाय .
उत्तर द्याहटवा🙏👍
हटवाछान विषय मांडला आहे. लहान मुलं असणाऱ्या पालकांनी नक्की वाचवा आणि विचार करावा असा मुद्दा आहे
उत्तर द्याहटवा👍🙏
हटवाखूप विचार करायला लावणारा लेख आहे.
उत्तर द्याहटवाअशा वेळी काय काय चूक असा प्रश्र्न पडू शकतो
काही बाबतीत बरोबर असतं तर काही बाबतीत फक्त चुकिचं नाही तर जीवावर बेतणारं. त्यामुळे तारतम्य महत्वाचं.
बाकी नेहमीप्रमाणे लेखन उत्कृष्ट!
धन्यवाद!
हटवाछान लेख.. सुरेख मांडणी
उत्तर द्याहटवाVery nicely written
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाजय श्रीराम 🙏
उत्तर द्याहटवा