शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

'विजय' राम

या वर्षी रामनवमीला पहाटे पाच-साडेपाचलाच उठलो. गच्चीवरील बागेला पाणी घालणे, भांडी घासणे व इतर घरकामे उरकून, अंघोळी करून तयार झालो. सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही सोलापूर जिल्ह्यातील कुंभेज गावाच्या दिशेने आमच्या गाडीने प्रवास सुरू केला. नव्वदीतले माझे वडील, दादा, हेही उत्साहाने तयार होऊन निघाले होते. मी गूगल मॅपवर कुंभेजचा रस्ता लावला. त्याप्रमाणे बरोबर साडेअकरा वाजता आम्ही कुंभेजला पोहोचलो. हायवे सोडून आतल्या रस्त्याला लागल्यावर, बराच काळ रस्ता खूपच खराब लागला. वाटेतल्या तळ्यांवर आणि भीमा नदीच्या पात्रामधे अनेक सुंदर पक्षी दिसल्यामुळे तो प्रवास सुसह्य झाला. शेवटी कुंभेज गावाची पाटी दिसल्यामुळे मला हायसे वाटले. 

मी आनंदला म्हणाले, "चला, आपण पोहोचलो आहोत. आता रामजन्माचा सोहळा पाहू, सुंठवडा खाऊ आणि सोलापूरकडे रवाना होऊ. आपण आलेले बघून सुनीता आणि विजय कुलकर्णींना फार आनंद वाटेल" 

सुनीता ही माझी बालमैत्रीण. तिचे यजमान श्री. विजय कुलकर्णी हे सोलापूर जिल्ह्यातील, कुंभेजच्या कुलकर्णी कुटुंबातले. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने विजय कुलकर्णी गावाबाहेर पडले आणि शेवटी पुण्याला स्थायिक झाले. पण त्यांच्या मनाचा ओढा सदैव आपल्या मूळ गावाकडेच होता. विजय कुलकर्णी हे अत्यंत भाविक असून  गोंदवलेकर महाराजांचे अनुयायी आहेत. पंधरा वर्षांपूर्वी, त्यांनी पुढाकार घेऊन गावातल्या प्राचीन व्यंकटेश मंदीराचा जीर्णोद्धार केला होता. आपल्या गावात आपण एक राममंदिर बांधावे हे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी मागील वर्षी, ऑगस्ट महिन्यात पूर्ण केले. त्यानंतर यंदा या देवळांत प्रथमच रामनवमी साजरी होणार होती. नेमके रामनवमीच्या दिवशीच आम्ही पुण्याहून सोलापूरला निघालो होतो. त्यामुळे, वाटेत या मंदिरात रामजन्माचा सोहळा बघावा व दर्शन घेऊन पुढे जावे अशी माझी इच्छा होती. 

आम्ही कुंभेजला पोहोचलो तरी तिथे कोणत्याही समारंभाची काहीच लगबग दिसेना. सुनीताचा फोन उचलला जात नव्हता. विजय कुलकर्णी यांचा दूरध्वनी क्रमांक आमच्याकडे नव्हताच. आता हे मंदिर कसं शोधायचं? हा प्रश्न आम्हाला पडला. तेवढ्यात एका ट्रॅक्टरवर एक मनुष्य निवांत बसलेला दिसला. 

"कुलकर्णींनी गावामधे नवीन बांधलेले राममंदिर कुठे आहे?" आम्ही विचारणा केली. 

तो मनुष्य थोडावेळ विचारमग्न झाला. शेवटी, एका बाजूला मान वळवून, तोंडातल्या तंबाखूची पिंक लांबवर टाकत उत्तरला,  "राममंदिर?  आमच्या गावात तर राममंदिर नाही. तरी पण खाली बामणाच्या आळीत विचारा." 

आम्ही बुचकळ्यात पडलो. पण तसेच पुढे निघालो. पारावर बसलेल्या एका मध्यमवयीन मनुष्याला 'बामणाची आळी' कुठे आहे, हे विचारले. त्याच्यासोबत झालेल्या संवादातून एक धक्कादायक गोष्ट पुढे आली. आम्ही ज्या कुंभेजला पोहोचलो होतो ते करमाळा तालुक्यातील कुंभेज होते. प्रत्यक्षात आम्हाला माढा तालुक्यातील कुंभेजला जायचे होते. अर्थात ही चूक सर्वस्वी माझीच होती. गूगल मॅपवर जायचे ठिकाण मी 'कुंभेज' इतकेच टाकले होते. पण माढा तालुक्यातील कुंभेज, असे शोधून टाकले नव्हते. सोलापूर जिल्ह्यात दोन कुंभेज असतील, असा विचारही माझ्या मनाला स्पर्शून गेला नव्हता. गूगलने मात्र इमानेइतबारे आम्हाला एका कुंभेजला, अगदी वेळेवर पोहोचवले होते. आनंद माझ्या बावळटपणावर चिडला, पण माझ्या इच्छेखातर त्याने गाडी माढा तालुक्यातील कुंभेजकडे वळवली. या सगळ्या प्रकारात दादांनी काही कुरकूर केली नाही, हे विशेष. 
मजल-दरमजल करत, शेवटी दीड वाजायच्या सुमारास, आम्ही विजय कुलकर्ण्यांच्या कुंभेजला पोहोचलो. कुलकर्णीं दांपत्याने अतिशय प्रेमाने आमचे स्वागत केल्यामुळे आमचा प्रवासाचा थकवा पार निघून गेला. 

आम्ही पोहोचेपर्यंत रामजन्माच्या सोहळ्याची सांगता झाली होती. बरेचसे लोक प्रसादाचे जेवण जेऊन गेले होते.  कुलकर्णी पती-पत्नींनी उत्साहाने आम्हाला देऊळ दाखवले. मुख्य गाभाऱ्यामधे, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या अतिशय सुबक, रेखीव व मोहक मूर्ती बसवल्या आहेत. उजव्या बाजूला शंकराची पिंड व नंदी आहेत. त्यापुढे गोंदवलेकर महाराजांच्या पादुका आहेत व मागील भिंतीवर महाराजांचा फोटो लावलेला आहे. देवळात, गाभाऱ्याच्या बाहेर, उजव्या बाजूला दत्ताची व डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. सर्व मूर्ती संगमरवरी असून, खास राजस्थानमधून बनवून घेतल्या आहेत. मंदिराच्या डाव्या हाताला छानशी छोटी बाग केलेली आहे. देवपूजेसाठी फुले मिळत राहावीत  म्हणून तिथे अनेक फुलझाडे लावलेली आहेत. 

देवळाच्या मागे एक छोटी खोली, स्वयंपाकघर व न्हाणीघर बांधलेले आहे. कुलकर्णीं कुटुंबीय गावात आले की तिथेच राहतात. देवळाच्या उजव्या हाताला, विजय कुलकर्णी यांच्या मोठ्या बंधूंचे घर आहे. ते पेशाने शिक्षक असून, आपली नोकरी सांभाळून शेती करतात. राममंदिराची व्यवस्था व रोजची पूजा-अर्चा तेच बघतात. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामधे राममंदिरामधे मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यावेळी कुलकर्णी दांपत्याच्या कलेक्टर पद भूषवणाऱ्या मुलाने योगेशने व त्याच्या पत्नीने, गावातल्या घरात राहून सगळ्या समारंभाला हातभार लावला होता. 

रामजन्माच्या सोहळ्यासाठी कुलकर्णींचे अनेक नातेवाईक व मित्रपरिवार जमलेला होता. जवळपासच्या गावातूनही बरेच लोक दर्शनासाठी आलेले होते. नवरात्रात रोज अखंड रामनामाचा जप, कीर्तन, अभिषेक, पूजा चालू असल्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेले होते. देवदर्शन झाल्यावर आम्ही प्रसादाचे जेवण जेवलो. त्यानंतर सुनीताने माझी खणा-नारळाने ओटी भरली, बुंदीचे लाडू व सुंठवड्याच्या पुड्या दिल्या. विजय कुलकर्णी यांनी प्रसाद म्हणून द्राक्षे व रामाच्या मूर्तीला घातलेला साखरेच्या गाठींचा हार आम्हाला दिला. त्यानंतर साधारण साडेतीनच्या सुमारास आम्ही सोलापूरला निघालो. त्या दरम्यान, वाट चुकून करमाळा तालुक्यातील कुंभेजला पोहोचलेल्या एक-दोघांचा फोन विजय कुलकर्णींना आला. त्यांचे फोनवरचे बोलणे ऐकले, आणि माझ्यासारखाच बावळटपणा करणारे इतरही कोणी आहे, म्हणून कुठेतरी बरे वाटले. 
श्री. विजय कुलकर्णी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठ वर्षांखाली, बँक ऑफ इंडियातल्या अधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली होती. त्यानंतर २०१७ साली त्यांचे लिव्हर ट्रांन्सप्लांट हे मोठे ऑपरेशन झाले. त्यांची इतरही छोटी-मोठी पाच-सहा ऑपरेशन्स झालेली आहेत. मोठे आर्थिक पाठबळ आणि तब्येतीची साथ नसतानाही अतिशय जिद्दीने व हौसेने हे मंदीर त्यांनी बांधले, हे विशेष आहे. त्यांच्या पत्नीची, आणि सर्व आप्तांचीही साथ त्यांना लाभली. रामविजयाबद्दल आपण नेहमीच अभिमान बाळगतो. पण श्री. विजय कुलकर्णी यांनी आपल्या अत्यवस्थ प्रकृतीवर विजय मिळवून, इतके सुरेख राममंदिर बांधलेले बघून आम्हाला खरोखरीच कौतुक वाटले. त्यामुळे मनोमन या राममंदिराचे नामकरण मी 'विजय' राममंदिर असे करून टाकले. 

सोलापू-पुणे प्रवासा थोडीशीच वाट वाकडी करून, तुम्हीही या 'विजय' रामाचे दर्शन निश्चित घ्या. हायवे सोडून, यावली फाट्याला आत वळले की कुंभेजला जाता येते. पण आपल्याला माढा तालुक्यातील कुंभेजला जायचे आहे, हे मात्र विसरू नका, म्हणजे झालं! 

४५ टिप्पण्या:

  1. स्वाती खूपच छान अनुभव लिहिला आहेस.सोलापुरात 2 कुंभेज आहेत हे बऱ्याच लोकांना किबहूना माढा व कर माला या तालुक्यातील लोकांनाही माहीत नाही हा माझा अनुभव आहे. सुनिता ही आमच्या खात्यातील घायाळ यांची मुलगी आहे. आणि कुंभेजकर कुटुंबीय ही माझ्या परिचयाचे आहेत. खूप छान अनुभव. विजय राम आवडला. तुमच्या दादांचा उत्साह ही भारी आहे. तुमचे अभिनंदन. दातार

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुझ्या खात्यातील लोकांना माहिती असणारच. विजय कुंभेजकरांचे फार कौतुक वाटले.

      हटवा
    2. 🌻 सर्वप्रथम जय श्रीराम 🙏🏽🙏🏽🏵🌼 मॅडम
      डॉक्टर म्हणजे एक देव असतो असे आमच्या गावाकडे समजले जाते पण तेच डॉक्टर एक सुंदर असे लेखक असू शकतात हे तुमच्या लेखणीतून कळाले , आणि लगेच मला ग दि माडगूळकरांचा वळीवाचा पाऊस या धड्याची आठवण झाली जरी तुम्ही चुकून दुसऱ्या खेड्यात गेले असेल तरी पण त्या खेड्यातील अनुभव तुम्हाला अनुभवल्या मिळाला तेथील चाली रिती तिथले रस्ते बघायला मिळाले तुम्ही केलेले पक्षाचे वर्णन छान खरच मॅडम तुम्ही फार सुंदर असे लेखक आहात ही आम्हाला तुमचा लेख वाचून लक्षात आले धन्यवाद 🙏🏽🙏🏽मॅडम 🌼🌼🌼🌼🌼🌼

      हटवा
    3. विजय गाथा या ग्रंथ तर ऐकलाच होता आणि वाचला हि होता पण तुमच्या अशा सुरेख अभिलेखाने विजय राम गाथा खूप सुरेख छान वाटला आणि वाचलाही शब्दाचे बोल अप्रतिम होते

      हटवा
    4. Swati kiti chhan varnan Keli ahes... apratim.

      हटवा
  2. मला call केला असतास तर हा घोळ झाला नसता. असो, आमचा विजय अजुनपण दर महिना गोंदवले येथे जाऊन, आठवडा भर सेवा करतो, हे राहिले म्हणून सांगितले

    उत्तर द्याहटवा
  3. स्वाती तू अगदी योग्य नाव दिले आहेस विजय राम .
    मार्च १९तारखेला मी व पती शिरीष आम्ही दोघे सोलापूरहून पुण्याकडे परत येताना कुंभेजला भेट दिली . खरच कुंभेज सारख्या छोट्या गावात विजय कुलकर्णी यांनी इतके सुंदर राम मंदिर बांधले आहे तसेच जवळच व्यंकटेश मंदिर बांघले आहे .नुसतेच मंदिर बांधले नाही तर सुंदर मूर्ती ह्या जयपूर येथील आहेत . आणि बांधकाम करताना तब्येत सांभाळून त्यांनी हे मोठे मंदिर उभं केलं आहे. खरोखरीच कौतुक आहे . त्यांनी केलेलं हे काम गावातील लोकांना फार मोठे वाटते आणि तेथील लोक त्यांना देवमाणूस म्हणत आहेत . खूप उत्तम कार्य त्यांनी केले आहे.
    नक्कीच हे मंदिर आवर्जून बघावे असे आहे. श्रीराम जय राम जय जय राम

    उत्तर द्याहटवा
  4. तुमचा फोटो पाहून मला प्रेरणा मिळाली!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी ,राजाभाऊ कुलकर्णी ,सद्या वास्तव्य बिबवेवाडी पुणेदूरचा मावसभाऊ पण गेल्या चार पिढ्यंपासून जपलेले संबध .
      आपली ओळख कुंभेज येथेच त्याच दिवशी सौ सुनीता वाहिनीने करून दिली.
      आधी ओळख असती तर आपण बरोबर गेलो असतो कारण त्याभागतील प्रत्येक खेडे माझ्या मला माहीत आहे.असो
      जय विजय-राम


      हटवा
  5. छान लिहलयस, राम नवमीच्या शुभेच्छा. नितीन चौधरी

    उत्तर द्याहटवा
  6. छान लिहिलंस. पैठणला पांडुरंगाचे मंदिर आहे. त्याला विजयी पांडुरंग म्हणतात. तसे हे कुंभेजचे विजय-राम मंदिर.

    उत्तर द्याहटवा
  7. मॅडम ,
    खूपच मस्त लिखाण , एकदम सर्व चित्रच उभं केलं डोळ्यासमोर . खूप ओघवती भाषा .
    मला तर भालचंद्र नेमाडें च्या 'हिंदू , जगण्याची समृद्ध अडगळ ' कादंबरी आठवली .

    उत्तर द्याहटवा
  8. अतुलनीय....श्री विजय कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंब...

    उत्तर द्याहटवा
  9. छान! आपण भाविक नसलो तरी अशी भक्ति आणि साधना पाहून मन सुखावते.

    उत्तर द्याहटवा
  10. यथाप्रमाणे, जिवंत आणि सुंदर लिखाण..मला वाटते डाॅ. स्वाती पेक्षा तू एक निष्णात लेखिका पण आहे..नक्कीच माढाच्या कुंभेज 'विजय' राम मंदिर बघायलाच पाहिजे..खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल..👍👍

    उत्तर द्याहटवा
  11. स्वाती फार छान लिहिले आहेस. देऊळ पण एकदम सुंदर दिसतंय

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मंदिराचे फोटो काढले का, असतील तर पोस्ट कर, तिकडेही कधी भेट देईन, सोलापूर पासून किती दूर आहे? नितीन चौधरी

      हटवा
    2. सोलापूर पासून साधारण पन्नास किलोमीटर आहे. मंदीराला कळस नाही. त्यामुळे बाहेरून फोटो काढलेले नाहीत. मंदीर आणि मागच्या खोलीच्या वर गच्ची आहे. गाभाऱ्या वर येणारा गच्चीचा भाग रेलिंग लावून बंदिस्त केलेला आहे. त्यामुळे गाभाऱ्या वर असलेल्या छतावर कोणाचेही पाय पडत नाहीत.

      हटवा
  12. फारच सुंदर लेख ,सहज सोपा पण खिळवून ठेवणारा !!विजय कुलक्णी आणि परिवार यांच्या भक्तीस नमन आणि स्वाती मॅडम तुमचे धन्यवाद,it's always a pleasure to see different shades of world through your eyes !

    उत्तर द्याहटवा
  13. छान लेख.सुंदर मूर्ती व त्यांचे सुंदर फोटो.

    उत्तर द्याहटवा
  14. स्वाती बापट नावाचा स्पर्श या उत्कृष्ठ लेखाला लाभला आहे . एकदम सरळ , साधे , स्वच्छ लिहिले आहेस . एक एप्रिलची सुरुवात उत्तम झाली ..जय श्रीराम ...विनायक जोशी

    उत्तर द्याहटवा
  15. वा, वा,, वा!
    सहज, सुंदर लेखन, कमालीचा प्रांजळपणे, प्रामाणिकपणा. साधं, सरळ आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसांमधील असामान्यत्व शोधून ते आमच्यासारख्यांपर्यंत अतिशय निर्मळ हेतूने पोहचवतेस., हे अतिशय कौतुकास्पद!
    सौ. सुनीता आणि विजय ह्यांच्या बद्दल काय बोलू?
    ह्या दंपतीस खरंतर साष्टांग प्रणिपात केला पाहिजे.
    श्री विजय कुलकर्णी माझ्या नव-याचा जवळचे मित्र आहेत. हे अतिशय आदरणीय जोडपं आहे.सुनीता आपली मैत्रीणच.

    उत्तर द्याहटवा
  16. विजयी राम अप्रतिम प्रवास वर्णन अजून एक महत्वाचे म्हणजे बाबा अजून व्यव स्थित प्रवास करतात हे कळले ( खास यांना पी .आर. ) नां सांगितले .

    उत्तर द्याहटवा
  17. अतिशय सुंदर. रामाचं दर्शन घेतल्याचा अनुभव घेतला.

    उत्तर द्याहटवा
  18. राम मंदिर नक्की बघायला हव असं वाटलं

    उत्तर द्याहटवा