काल संध्याकाळी मला व्हॉट्सऍपवर नूतन या माझ्या बालमैत्रिणींचा संदेश आला, "तुला कधी फोन करू गं?'
संदेश वाचल्या-वाचल्या, तिला माझ्याशी काय बोलायचे असणार आहे, याचा मला अंदाज आला. मी लगेच तिला फोन लावला.
"अगं, ते बाळ आहे ना, त्याला गेले कितीतरी दिवस खोकला आहे. त्याची आई काही लक्षच देत नाही बघ. नुसतं बाटलीच्या दुधावर ठेवते. दहा महिन्याच्या बाळाला सगळं चारायला हवं ना? मी पंधरा दिवस सोलापूरला होते. परत आले तर आमच्या बाळाची हाडं अगदी वर आली आहेत. आता मी दिवसभर त्याला माझ्याकडेच ठेऊन खाऊ-पिऊ घालणार आहे. अजून काही टॉनिक वगैरे देऊ का सांग ना?" नूतन कळकळीने विचारत होती.
जवळजवळ सहा महिने झाले, दर महिन्या-पंधरा दिवसाला तिच्या शेजाऱ्यांच्या एका बाळासाठी नूतन माझा असाच काही-बाही सल्ला घेत असते.
मी म्हणाले, "नूतन, असं बाळाला न बघता सांगणं अवघड आहे. पण तू त्याला भरपूर खायला घाल. त्यातून त्याला सगळं पोषण मिळेल. बाळाच्या नेहमीच्या डॉक्टरांनी त्याला काय औषधे दिली आहेत, तेही बाळाच्या आईला विचारून सांग. मग बघूया."
"खायला तर मी घालतेच आहे गं. त्याच्यासाठी छोट्या कुकरमध्ये मुगाच्या डाळीची मऊ खिचडी शिजवून, तूप घालून त्याला चारते. वरण-चपाती, दूध-चपाती, इडली, शिरा, उपमा, सगळं चारते. बाळाचे हाल बघवत नाहीत गं. मी नसले की हे लोक चार-चार दिवस बाळाला अंघोळ पण घालत नाहीत. कितीदातरी मीच त्याला अंघोळ घालते. आपण सोलापूर सिव्हिलला असताना अगदी भिकाऱ्यांना सुद्धा खायला घालायचो, अंघोळ घालायचो. हे तर माझ्या शेजाऱ्यांचे बाळ आहे. याचं तर मी सगळं करतेच गं."
नूतनने भिकाऱ्यांची आठवण काढली आणि माझ्या मनामध्ये अगदी चर्रर्र झाले. सोलापूर हा दुष्काळी जिल्हा. चाळीस वर्षांपूर्वी तर अनेकांची फार हलाखीची परिस्थिती असायची. अत्यंत खंगलेले, भुकेकंगाल भिकारी बरेचदा आमच्या वार्डांमध्ये भरती व्हायचे. अगदी हाडापर्यंत गेलेल्या त्यांच्या जखमांमध्ये अळ्या झालेल्या असायच्या. तसले रुग्ण अनेक महिने वॉर्डमध्ये पडून असायचे. त्यांच्याजवळ गेले तरी कमालीची दुर्गंधी यायची. अशा त्या रुग्णांची सेवा-सुश्रुषा करणाऱ्या काही मोजक्याच परिचारिका आणि डॉक्टर्स असायचे. बाकीचे त्यांना हिडीस-फिडीस करायचे किंवा अगदी पळवून सुद्धा लावायचे. रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या नूतनने ते काम मनापासून केले असणार याची मला जाणीव झाली.
नूतन सोनतळे ही माझी बालमैत्रीण. तिची आई सोलापूर महानगरपालिकेच्या लेडी डफरिन हॉस्पिटलमध्ये मेट्रन होती. आम्ही शाळेत असताना, डफरिन हॉस्पिटलच्या आवारातच असलेल्या क्वार्टर्समध्ये नूतन राहायची. तिचे घर आमच्या शाळेच्या अगदी जवळ असल्याने, लहानपणी कितीदातरी आम्ही तिच्या घरी जायचो. पुढे, नूतन आणि मी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असलो तरीही मैत्रीचा धागा पक्का राहिला. बारावीनंतर मी सोलापूरच्या वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला लागले. नूतनचे लग्न होऊन ती सौ रोहिणी पडसलगी झाली व सोलापूर सिव्हिलला ती परिचारिका म्हणून रुजू झाली. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही वर्षे आमची भेट होत राहिली. पुढे अनेक वर्षे ती तिच्या नोकरीत, मी माझ्या व्यवसायात, आणि आम्ही दोघीही आपापल्या संसारात गुंतून गेल्यामुळे भेट क्वचितच होत असे. मात्र मागील काही वर्षे, आमच्या शाळेच्या दहावीच्या बॅचचा व्हॉट्सऍप ग्रुप झाल्यामुळे, आम्ही पुन्हा एकमेकींच्या जवळ आलो.
'सिस्टर इन-चार्ज ऑफ ऑपेरेशन थिएटर' या पदावरून, जवळपास दोन वर्षांपूर्वी नूतन निवृत्त झाली. पण सेवाभाव तिच्या रक्तातच आहे. त्यामुळेच, शेजाऱ्यांच्या लहान बाळाला खायला-प्यायला घालणे, न्हाऊ-माखू घालणे ही कामे ती आपणहून करते, याची मी साक्षीदार आहे.
माझ्या बालमैत्रिणीने सेवानिवृत्तीनंतरही चालू ठेवलेल्या या सेवेचा मला खूप अभिमान वाटतो आणि तिचे कौतुक करावेसे वाटते!
Great
उत्तर द्याहटवानूतनच्या सहृदयतेला सलाम!
उत्तर द्याहटवाGreat
उत्तर द्याहटवादोघींनाही सलाम
उत्तर द्याहटवानूतन आणि स्वाती दोघीही ग्रेट आहेत.🙏🙏
उत्तर द्याहटवाGod bless Nutan ji 💝💝💝
उत्तर द्याहटवाचांगल्या कामाचे फळ चांगलंच मिळणार,
उत्तर द्याहटवातुम्हा दोघींना देवाचा, सृष्टी निर्मात्यांचा आशिर्वाद मिळु दे
नूतन, स्वाती तुम्ही दोघीही वैद्यक क्षेत्रात अहात, अभिमान वाटतो तुमचा. ग्रेट. नितीन चौधरी
उत्तर द्याहटवास्वाती,नूतन तुम्ही दोघेही समाजासाठी देवच आहात,तुम्हास मनापासून दंडवत🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाOur nightingale of group
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवा