मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

नियमबाह्य ?

एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत, एकदा का आम्ही हायवेला लागलो की आमचीं चारचाकी गाडी सुसाट चालवत प्रवास करत असू. "छोट्या गाडीनेदेखील कसे आम्ही तीन तासांत पुण्याहून मुंबई आणि साडेतीन तासात पुण्याहून सोलापूर गाठतो", अशी फुशारकी आम्ही मारत असू. पण एकदा असे झाले की, आमच्या गाडीने निर्धारित वेगमर्यादा ओलांडल्याचे दृश्य 'स्पीड गन'च्या कॅमेरामध्ये टिपले गेले आणि आम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागला. त्या घटनेमुळे आमच्या गाडीच्या वेगालाच नव्हे तर जाहीरपणे फुशारक्या मारण्यालाही आपोआपच चाप बसला. त्यानंतर मात्र, "आम्ही वेगमर्यादेचे उल्लंघन कधीही करत नाही", असे सांगून आम्ही मोठेपणा मिळवू लागलो. मात्र, १००० रुपयांचा भुर्दंड बसल्यानंतरच आम्ही नियम पाळायला लागलो, ही कबुली अर्थातच आम्ही कुणापुढे देत नव्हतो! 


आज सकाळी, गाडीच्या टपावरच्या कॅरियरवर सामान बांधून, आम्ही सोलापूर-पुणे प्रवासाला सुरुवात केली. एक टोल पार करून पुढे आलो तोच, रस्त्यावर उभ्या असलेल्या एका सहाय्यक फौजदाराने आम्हाला थांबवले. त्यांनी काही विचारायच्या आतच आनंदने गाडीची कागदपत्रे आणि स्वतःचा वाहनपरवाना त्यांच्या हातात दिला. "गाडीवर कॅरियर बसवून, सामान लादून नेण्याची परवानगी फक्त व्यावसायिक वाहनांना आहे, खाजगी वाहनांना नाही" असे सांगून त्या सहाय्यक फौजदार साहेबांनी आमच्या गाडीचे फोटो काढायला सुरुवात केली.  

गेली दहा वर्षे आम्ही CNG वर चालणारी 'मारुती वॅगन-आर' गाडी वापरतो. CNG चा सिलिंडर गाडीची संपूर्ण डिकी व्यापत असल्यामुळे, आम्ही सुरुवातीपासूनच गाडीवर कॅरियर बसवून घेतले होते. अनेकवेळा आम्ही कॅरियरवर सामान लादून प्रवास करीत  होतो. पण आत्तापर्यंत कधीच दंड भरावा लागलेला नव्हता. तसे करणे नियमबाह्य आहे, हेही आज प्रथमच ऐकले होते. 

"तसा काही नियम आहे का ते गूगलवर तपासून बघा" असे आनंदने मला आणि आमच्या भाचेसुनेला सांगितले. गूगलमावशीने काढून दिलेल्या एक-दोन अनधिकृत लिंक्समधून, असा काही नियम नसल्याचे आम्हाला कळले. मग आनंदने त्या सहाय्यक पोलीस फौजदाराला, "तुम्ही म्हणता तो नियम मला दाखवलात तर मी लगेच दंड भरायला तयार आहे" असे सांगितले. 

दरम्यान, कुठे काही अधिकृत  माहिती मिळते आहे का,  याचा आम्ही दोघी तपास करू लागलो.  

'नियम दाखवा आणि मगच दंड वसूल करा', असा पवित्रा आनंदने घेतल्याने त्या सहाय्यक फौजदाराने आनंदला, जवळच उभ्या असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI)कडे नेले. त्या अधिकाऱ्यानेदेखील तो नियम शोधण्यासाठी गुगलमावशीचेच पाय धरले. पाच-दहा मिनिटे खटाटोप केल्यावरही त्यांना तो नियम सापडेना. 

शेवटी त्या अधिकाऱ्याने आनंदला विचारले, "साहेब, आपण काय काम करता?" 

आनंद निवृत्त सेनाधिकारी आहे, हे समजल्यावर मात्र नरमाईचा स्वर लावत ते पोलीस उपनिरीक्षक आनंदला  म्हणाले, "अहो साहेब, हे आधीच नाही का सांगायचे? आम्ही तुमचा इतका वेळ घेतलाच नसता. जा तुम्ही" 

ते सहाय्यक फौजदारसाहेबही खजील होऊन आनंदला म्हणाले "साहेब मी पावती फाडण्याबद्दल कुठे काय म्हणालो होतो?"

दंड  भरावा लागला नाही या आनंदात आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि पुढे निघालो. 

पण, "खाजगी वाहनाच्या कॅरियरवर सामान लादून प्रवास करणे नियमबाह्य होते, की आनंद निवृत्त सेनाधिकारी आहे, हे कळल्याबरोबर त्याला तातडीने सोडून देणाऱ्या पोलिसांचे वर्तन नियमबाह्य होते?"  या विचाराने मला आता ग्रासून टाकले आहे!

२ टिप्पण्या: