बुधवार, २० मार्च, २०२४

चिमणी पाहावी शोधून!

आज २० मार्च, म्हणजे जागतिक चिमणी दिवस. 

वळचणीला बसलेल्या आणि सर्वत्र चिवचिवाट करत असलेल्या असंख्य चिमण्या मी लहानपणी पहिल्या होत्या. आज चिमणीचे दर्शन केवळ स्वप्नांमधेच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या दुर्लक्षित पक्ष्यासाठी पुढे कधीतरी एखादा 'जागतिक दिवस' राखून ठेवला जाईल असे लहानपणी मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.  

रोजच्याप्रमाणेच आजही सकाळपासून दिवसभर व्हाट्सऍपवर केवळ चिवचिवाटच चालू होता. त्यामध्ये 'चिमणी' या विषयावरचे बरेच लेख, कविता आणि विनोदही होते. आमच्या शाळेतल्या एका शिक्षिकेचे टोपणनाव विद्यार्थ्यांनी 'चिमणी' असे ठेवले होते. आमच्या शाळेच्या व्हाट्सऍप ग्रुपवर एका वात्रट विद्यार्थ्याने आज त्या 'चिमणाबाईंची' सुध्दा आवर्जून आठवण काढली! पण गेले काही दिवस माझ्या मनामध्ये मात्र एक वेगळीच चिमणी चिवचिवत होती. आजच्या या 'जागतिक चिमणी दिनाचे' औचित्य साधून, त्या चिमणीवर एक लेख लिहून काढायचा मोह मला आवरला नाही!

आमच्या घराचे नूतनीकरण करण्याचा धाडसी निर्णय आम्ही नुकताच अमलात आणला. धाडसी निर्णय अशासाठी असे की नूतनीकरणाच्या काळामध्ये, गेले तीन महिने आम्ही आमच्याच घरामध्ये निर्वासितांसारखे राहत होतो. एक-दोन भिंती फोडणे, बाथरूम्स नवीन करणे, खिडक्या बदलणे अशा इतर कामांबरोबर आम्ही 'मॉड्युलर किचनही' करून घेतले. त्या किचनबरोबर 'चिमणी' अत्यावश्यक आहे, हे समजल्यामुळे 'किचन चिमणी'ची शोधाशोध सुरु केली. आजच्या काळात एखादी उडती-फिरती चिमणी शोधण्यापेक्षाही 'किचन चिमणी' शोधणे जास्त अवघड आहे, असे माझ्या लक्षात आले. अनेक वेबसाईट्स, यू-ट्यूब व्हिडीओ, मैत्रिणींची मते आणि समाजमाध्यमातील अनेक ग्रुप्सवर शोधाशोध केल्यावर मी जास्तच संभ्रमात पडले. 

मिळत गेलेल्या माहितीतील एकेक तपशील हळू-हळू डोक्यामध्ये शिरायला लागला. किचन चिमणी ६० आणि ९० सेंटीमीटर, अशा दोन आकारामध्ये येते. सर्वसाधारणपणे दोन-तीन बर्नर असलेल्या शेगडीसाठी ६० सेंटीमीटर आणि ४-५ बर्नर असलेल्या शेगडीसाठी ९० सेंटिमीटर्सची शेगडी असावी. तसेच आपल्या गॅसच्या शेगडीच्या लांबी इतकी किचन चिमणी घेतलेली उत्तम. माझ्याकडची गॅस शेगडी तीन बर्नरची असली तरी त्या शेगडीची लांबी जवळपास ७५ सेंटिमीटर्स भरली. पण ७५ सेंटिमीटरमधे अगदीच कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणि त्या चिमण्यांनाही ६० सेंटिमीटर्सच्या चिमणीचीच मोटार बसवलेली असते, फक्त वरची काच ७५ सेंटिमीटर्सची असते इतकेच. ही बाबा लक्षात आल्यावर मी ६० सेंटिमीटरची चिमणी घेण्याचे ठरवले. 

फिल्टरवाली चिमणी घ्यावी का फिल्टरलेस चिमणी घ्यावी? हा प्रश्न पुढे आला. फिल्टरवाली चिमणी घेणेच योग्य आहे, असे माझ्या अभ्यासांती लक्षात आले. कार्बन फिल्टर, मेश फिल्टर आणि बॅफल फिल्टर, अशी वेगवेगळी नावे ऐकून मला, इंग्रजीमधल्या 'to get baffled' या वाक्यरचनेचा अर्थ पुरेपूर कळला!

बरीच माहिती गोळा केल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे baffle न होता म्हणजेच बावचळून न जाता Baffle filter असलेली चिमणीच घ्यायचे पक्के केले. हा Baffle filter फोडणीतले तेल चिमणीच्या मोटारपर्यंत जाऊ देत नाही, असे असले तरी दर दोन-तीन आठवड्यातून तो फिल्टर स्वच्छ करण्याचे काम गळ्यात पडते, हेही खरे. मात्र हा फिल्टर वरचेवर स्वच्छ करून चिमणी वापरली तर  स्वयंपाकघरामध्ये चिकट मेणी साठत नाही हे विशेष. 

चिमणी ductless घ्यावी का ducted ? हा प्रश्न  त्यानंतर उद्भवला. चिमणीमधून हवा बाहेर फेकणारी duct त्याच्या मॉड्युलर किचनच्या सौंदर्यामधे बाधा आणते असे अनेक गृहिणींना वाटते. त्यासाठी त्या ductless  चिमणी घेतात. अशा चिमणीमध्ये वरच्या बाजूला एक कार्बन फिल्टर बसवलेला असतो. तो फिल्टर, स्वयंपाकघरातला धूर आणि वास काही प्रमाणात शोषून घेत असला तरीही बाहेर फेकू शकत नाही. तसेच स्वयंपाक करत असताना निर्माण होणारी वाफ आणि गरम हवासुद्धा ही चिमणी बाहेर फेकू शकतनाही. म्हणून मग स्वयंपाकघरातला उकाडा आणि कोंदटपणा कमी होत नाही. Ductless चिमणीमधे बसवलेल्या कार्बन फिल्टरमध्ये काजळी साठून तो दर चार-सहा महिन्यांनी गच्च भरतो आणि नीट काम करेनासा होतो. त्यामुळे कंपनीचा माणूस बोलवून कार्बन फिल्टर बदलावा लागतो. त्यासाठी दीड-दोनहजार रुपये मोजावे लागतात ते वेगळेच. चिमणीची duct डोळ्यांना खुपली तरीही चालेल पण माझे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणारी ducted चिमणीच मी घेणार, हे मी पक्के ठरवले. चिमणीच्या खालच्या बाजूला असलेला baffle filter तेल शोषून घेतो, आणि वास, धूर व गरम हवा बाहेर फेकण्याचे काम चिमणीतून घराबाहेर जाणारी duct करते.    

बाजारामध्ये 'ऑटो-क्लीन' आणि 'नॉन ऑटो-क्लीन'  अशा दोन प्रकारच्या चिमण्या उपलब्ध आहेत. 'ऑटो-क्लीन' चिमणीमध्ये एक बटन दाबले की त्या चिमणीच्या आतल्या बाजूला चिकटलेली मेणी वितळून एका ट्रेमध्ये साठते आणि चिमणी स्वच्छ होते. ही प्रक्रिया दाखवणाराने मस्त व्हिडीओ यू-ट्यूबवर बघायला मिळतात. आपल्या शरीरावर चिकटलेली मेणी, एखादे बटन दाबून बाहेर काढता आली तर किती बरे होईल, हा विचार ते व्हिडीओ पाहताना मनामध्ये आल्याशिवाय राहिला नाही! वर्षातून एकदा तरी कंपनीचा माणूस बोलवून 'नॉन ऑटो-क्लीन' चिमणी, आतून-बाहेरून स्वच्छ करवून घ्यावीच लागते. पण 'ऑटो-क्लीन' चिमणीसुध्दा तशीच दर वर्षी स्वच्छ करवून घ्यायला लागते, हे जसे समजले तशी मी 'ऑटो-क्लीन' चिमणी मनातून बाद करून टाकली. 

किचन चिमणी हे तसे बरेच महागडे प्रकरण आहे. इंटरनेटवर बघायला मिळत असलेल्या बऱ्याचशा 'मॉड्युलर किचन'मध्ये 'स्लॅन्टेड' किंवा तिरप्या छताच्या चिमण्या दाखवलेल्या असतात. तिरप्या किंवा स्लॅन्टेड चिमण्या जागा कमी व्यापतात, हे खरे आहे. पण आपण चिमणी ज्या कामासाठी विकत घेतो, त्यासाठी त्या अगदीच कुचकामी ठरतात. केवळ  'आमच्याकडे महागडी किचन चिमणी आहे बरं का!' अशी शेखी मिरवण्यासाठी स्लॅन्टेड चिमण्या उपयोगी पडतात! एखादी वस्तू जास्त महाग असली कि ती जास्त चांगली असते, अशी अनेकांची समजूत असते. पण  कित्येकदा तसे नसतेही. 

किती suction power असलेली चिमणी विकत घ्यावी हे ठरवण्यासाठी माझ्या मेंदूची बरीच पॉवर खर्च झाली. सर्वसाधारणपणे, सध्याच्या विभक्त कुटुंबात जेमतेम तीन-चार माणसेच असतात. स्वयंपाकघरेही जेमतेम १००-१५० चौरस फुटांची असतात. अशा घरामध्ये १०००-१२०० सक्शन पॉवरची (ताशी १०००-१२०० घनमीटर) चिमणी पुरेशी होते. अशा पॉवरच्या चिमणीचा आवाजही सुसह्य असतो.  १०-१२ लोकांच्या कुटुंबात, जिथे सतत आणि भरपूर स्वयंपाक होत असतो अशा कुटुंबासाठी १४००-१५०० पॉवर असलेली चिमणी लागते! पण अशा पॉवरबाज चिमण्यांचा आवाजही जबरदस्त असतो, हे लक्षात घ्यायला हवे. "तो आवाज ऐकल्यावर गिऱ्हाईक पॉवरबाज चिमणी घ्यायला तयार होत नाहीत, म्हणून आम्ही त्या चिमण्या शोरूम्समध्ये ठेवतच नाही" असे एका डीलरने मला दबक्या आवाजात सांगितले! पूर्ण विचारांती माझ्या किचनसाठी मी ११५० पॉवरची चिमणी निवडली. 

आपल्या हाताच्या इशाऱ्यावर चालू-बंद होणाऱ्या, वेग कमी-जास्त करणाऱ्या (मोशन सेन्सर किंवा gesture control ) अशा चिमण्या बाजारामध्ये येतात. आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर सगळे घर नाचावे अशी सुप्त इच्छा स्त्रीच्या मनामध्ये असल्यामुळे, तशी 'मोशन सेन्सर' चिमणी घेण्याचा मोह न पडला तरच नवल! पण तो मोह टाळणेच उत्तम. काही काळातच ते मोशन सेन्सर पॅनल बंद पडते, किंवा त्रास द्यायला सुरुवात करते आणि अखेर बदलावे लागते. खरंतर push buttons ने चालणारी चिमणी सर्वात उत्तम. पण हल्ली बाजारामध्ये तशी चिमणी सहजी उपलब्ध नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक बटन्स असलेली चिमणी विकत घ्यावी लागली. 

अशी 'सर्वगुणसंपन्न' चिमणी एकदाची माझ्या घरात येऊन बसली आणि मला अगदी 'हुश्श' म्हणावेसे वाटले. पण नुसते हुश्श म्हणून गप्प बसेन तर मी कसली?

म्हणून, माझ्या चिमणी-शोधमोहिमेचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तर हा चिवचिवाट!

३ टिप्पण्या: