आज पहाटे आमच्या घराजवळच्या आर्मी सब एरियाच्या मैदानामध्ये फिरायला गेले होते. तिथे चालण्यासाठी एक छोटाच पण अगदी छानसा सिन्थेटिक ट्रॅक केलेला आहे. त्या मैदानाच्या आवारात खूप जुनी, मोठमोठालीं झाडे आहेत. त्या झाडांची सावली वॉकिंग ट्रॅकवर पडते. तसेच त्या झाडांवर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी किलबिल करत असतात. वॉकिंग ट्रॅकच्या कडेकडेने रंगीबेरंगी फुलांची झुडपे लावलेली आहेत. एकूणच, या सर्व वातावरणात चालणे अतिशय आनंददायी असते.
आज चालताना ट्रॅकच्या बाजूच्या हिरव्यागार झुडुपावर (Calyptocarpus Vialias) लक्ष गेले. वसंत ऋतूमध्ये या झुडुपावर अतिशय नाजूक अशी पिवळी धमक्क फुले येतात. गर्द हिरव्या पानांच्या मखमली पार्श्वभूमीवर ती पिवळी फुले उठून दिसतात. ते बघायला मला खूप आवडते. आज, नेहमीच्या फुलांबरोबरच, पण या झुडुपाच्या फुलांपेक्षा वेगळ्या आकाराची लहान-मोठी अनेक पिवळी फुले या झुडुपावर मला दिसली. मी जरा निरखून बघितल्यावर, ती फुले या झुडुपाची नसून, शेजारी असलेल्या पिवळ्या गुलमोहोराची (Peltophorum Petrocarpum) फुले आहेत असे लक्षात आले. त्या झाडाची फुले गळून खाली असलेल्या या हिरव्या झुडुपावर पडलेली होती. या झुडुपाने, जणू आपलीच फुले असल्यासारखी पिवळ्या गुलमोहराची ती फुले आपल्या अंगाखांद्यावर अलगद झेललेली होती. ते बघून मला, माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली.
पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले अगदी हक्काने मामाच्या घरी जात. मामा-मामीची तीन-चार मुले आणि पाहुणे म्हणून आजोळी आलेली पाच-सहा भाचरंडे अगदी गुण्यागोविंदाने तिथे नांदत. स्वतःच्या मुलांमध्ये आणि नणंदांच्या मुलांमध्ये कुठलाही भेदभाव न करता, आमच्या माम्या सर्व मुलांना प्रेमाने खाऊ-पिऊ घालायच्या, त्यांचे रुसवे-फुगवे काढायच्या आणि त्यांचे अमाप लाड करायच्या. त्यामुळेच आमच्या पिढीतल्या सर्वच मुलांचा 'मामी' हा एक जिव्हाळ्याचा विषय असायचा. आजोळी एकत्र जमलेले ते लेंढार आनंदाने आणि अलगद 'झेलणाऱ्या' त्या माऊल्या खरोखर कौतुकाला पात्र होत्या!
एखाद्या प्रसंगाला, किंवा व्यक्तीला 'झेलणे' या उक्तीमधे जरासा नकारात्मक भाव आहे.पण 'अलगद झेलणे' असं म्हटलं की त्या उक्तीला एक सकारात्मकता येते. आजकालची अनेक मुले लग्नच करायला नको म्हणतात. बरं, लग्न केलेच तर आम्हाला मूल नकोच आहे, एकापेक्षा जास्त तर नकोच नको, अशीच विचारसरणी हल्ली होत चालली आहे. आमच्या नंतरच्या पिढीतली कित्येक नाती आधीच हद्दपार होऊन गेली आहेत. आता तर काय? दर घरटी फक्त एकच मूल असल्याने मुलांना भावंडंच नसतात. त्यामुळे त्यापुढच्या पिढीत सख्खा मामा, मावशी, काका आत्या ही नाती नाहीत मग आते, मामे, चुलत आणि मावस भावंडे कुठून असणार?
आजोळी जाणे, मामा-मामीच्या अंगाखांद्यावर अलगद खेळणे, मामीशी गुळपीठ असणे आणि हितगुज करणे या सगळ्या गोष्टींना भावी पिढीला मुकावे लागणार आहे. आपला संपूर्ण समाज कुठेतरी निसर्ग-नियमाच्या विरोधात चालला आहे असं मला वाटतं. पटतंय का तुम्हाला?
अतिशय वास्तववादी सुरेख लिहिले आहे... विनायक जोशी
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाकुटुंब व्यवस्था विभाजन हळुवारपणे आपल्याकडे सुरु आहे. त्यामुळे बरीचशी नाती नाहिशी होत चालली आहेत. कालाय तस्मै नम:।
उत्तर द्याहटवावाईट वाटते
हटवाअगदी खरंय्, फार छान लिहिलंय, 😊🙏
उत्तर द्याहटवाहं... पण खंत वाटते
हटवाहं... पण वाईट वाटते
उत्तर द्याहटवानाती गोती विरळ होत चालली आहेत आता, पण असं अपेक्षित आहे, आज माझा भाचा ४वर्षांनी भेटला, अमेरिकेत असतो, त्याच्या आत्याला भेटायला इथे काल आला होता, पुण्याला परत जाताना on the way घरी आला. मी स्वतः माझ्या मामाना ४वर्षे झाली भेटलो नाहीय. भाचा VC वर भेटत जाउत म्हणाला. जेते आपापल्या जागी सुखात असू देत. नितिन चौधरी
उत्तर द्याहटवाखरंय.. हल्ली अनौपचारिक भेटी गाठी होतच नाहीत.
हटवाज्या झुडपावर वरील मोठ्या झाडाची फुलं पडली आहेत त्याचीही फुलं त्याच रंगाची असतात. अन् वर्षाव करणाऱ्या झाडाला सोनमोहोर असं अगदी यथार्थ नाव आहे. ही झाली botanical टिप्पणी. नात्या बद्दल तू जे लिहिलं आहेस तीच भावना माझ्याही मनात आहे. एकत्र कुटुंबात वाढलेल्या आपल्या सारख्या लोकांना फार जाणवते
हटवाआधी तर लेक वाचून असे वाटले की आला उन्हाळा आता सुट्टी त्याला मामाकडे मामाच्या गावी जाऊ या पण आता सध्या परिस्थिती बदलली आहे लोक नाती गोती ती यामध्ये ताळमेळच उरलेला नाही आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नातेगोतीमध्ये संवाद निर्माण होत नाही जो आनंद जो एकत्रपणा मिसळून राहण्याचा जो वर्षा आता उठलेला नाही तो वत्यामुळझालाआहे हेच मूळ कारण आहे जर तो आपले स्वार्थ साध्य करत आहे त्यामुळे नात्यांचा दुरावा निर्माण झाला आहे फक्त लग्नकार्यातच भेटणे त्यात पण क्वचितच घरातील एक दोन मंडळी येऊन कार्याला भेट देतात आणि आपली कारणे सांगतात आजची परिस्थिती खूप बदललेली आहे अगोदरच्या जीवनामध्ये खूप तारतम्य आणि एकत्रपणा होता तो आता उरलेला नाही आजची परिस्थिती ही काळानुसार बदलली आहे माणूस तर तोच आहे पण माणसांची विचार मात्र बदलली आहे
हटवा