रविवार, ५ मे, २०२४

जागतिक हास्यदिन?


आज सकाळी नेहमीप्रमाणेच फिरायला गेले होते. तिथे ठिकठिकाणी घोळक्यामधे उभे राहून काही मंडळी जोरजोरात हासताना दिसली. तशी ती मंडळी नेहमीच हासतात. पण आज जास्त जोरात हासत होती! समाजमाध्यमांतून आज 'जागतिक हास्यदिन' असल्याचे कळले आणि मला हासायलाच आले.





अमेरिकन लोकांनी mother's day आणि father's day साजरा करायला आपल्याला शिकवले. खरंतर आई-वडिलांवर प्रेम करायला, त्यांच्या ऋणांची उतराई करायला एखादा दिवस राखून ठेवण्याची कल्पना सुद्धा मला हास्यास्पद वाटते. पण डॉकटर मदन कटारिया, या एका भारतीय डॉक्टरने जगाला 'हास्यदिन' साजरा करायला शिकवले, हे वाचून कुठेतरी बरे वाटले. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी, उकाड्याने हैराण झालेलो असतानाही 'हास्यदिन' साजरा करायच्या निमित्ताने लोकं जोरजोरात हसायला लावणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे!

सध्या निवडणुकीचे वारे चालू असल्याने आपल्या सर्वांना नेतेमंडळी हासण्याची भरपूर संधी देत आहेत. समाजमाध्यमामधून नेत्यांवर किंवा राजकीय पक्षांवर होणाऱ्या टिप्पण्या, कविता, मिम्स आपल्याला सात हसवत राहत आहेत. 

पण खरं सांगा  हासायला आपल्याला काही कारण लागते का?

सकाळी बरेचदा फिरायला बाहेर पडते तिथे काही व्यक्ती वरचेवर भेटतात. अशा व्यक्ती कधीकधी माझ्याकडे बघून हासतात. कधी मी अशा व्यक्तींकडे बघून मी हासते. मी त्यांच्या हास्याचे आणि ते माझ्या हास्याचे, हासून स्वागत करतो. आमची अगदी छोटीशी 'हास्यमैत्री' होते. ती मैत्री जवळपास नि:शब्द असते. परस्परांकडे बघून हासण्यापेक्षा ती फार पुढे जाते असे नाही. पण रोज असे हासरे चेहरे मनाला आनंद देऊन जातात, हे मात्र खरे.

सिग्नल नसलेल्या रस्त्यावर, एखादा वाहनधारक आपल्या कडे बघत, सुहास्य करत आपल्याला त्याच्या किंवा तिच्याआधी जाण्याची खूण करतो. कधीकधी आपणही असे हासून  दुसऱ्याला आपल्या आधी जाण्याचा इशारा करतो. भर रहदारीच्या रस्त्यावर, आपण कातावलेले असताना हे हास्य दोन्ही पक्षांना सुखद वाटते.

व्हॉट्सअप, फेसबुक, इंन्टाग्रॅम मुळे तर क्षणाक्षणाला हास्याची कारंजी उडत असतात. त्या पोस्ट वाचून/ऐकून/बघून आपण प्रत्यक्षात हासतोच पण पोस्टकर्त्याला स्माईलींची बरसात करून 'हास्यपावती' पाठवतो.

थोडक्यात काय? दिवसभर अनेक कारणांमुळे मी हासतच असते. हास्यदिन साजरा करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक दिन हा 'हास्यदिन' समजून साजरा करत राहायला काय हरकत आहे?

 डॉक्टर स्वाती बापट, पुणे

५ टिप्पण्या:

  1. हसते रहो, मुस्कुराते रहो. हास्य दिनाच्या शभेच्छा. नितिन चौधरी

    उत्तर द्याहटवा
  2. सध्या महाराष्ट्रात जिकडे तिकडे हास्यजत्रा चालूच आहे.
    हसताय ना? हसायलाच पाहिजे! 😀
    पण आमच्या गावात सुहास्य वदने दिसणे जरा कठीणच!😂😂
    छान ब्लॉग 👌🙏

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान.. रडवणं सोपं , पण हसवणं कठीणच
    म्हणून हसतच राहावं...आणि हसवतच राहावं

    उत्तर द्याहटवा