रविवार, २६ मे, २०२४

प्रेरणादायी तोरणा सहल!

या वर्षी एप्रिल-मे महिन्यांतल्या उकाड्यामुळे फारच हैराण व्हायला झाले होते. दोन-तीन दिवस महाबळेश्वरला जायचे पक्के केले होते. पण तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावातल्या एका रिसॉर्टबद्दल समाजमाध्यमात आलेली एक पोस्ट वाचली आणि तिकडे जावे असे अचानक मनात आले. आम्ही दोघे, माझे वडील दादा, माझा आतेभाऊ राजीव, आणि माझे सोलापूरस्थित काका, श्री. हरि गोडबोले आणि सौ. प्रियंवदाकाकू अशा सहाजणांनी जायचे ठरवले. 

आम्ही चौघे पुण्याहून आणि काका-काकू सोलापूरहून, पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचलो. त्या रिसॉर्टमधून अगदी समोरच तोरणा दुर्ग दिसत होता. वामकुक्षीनंतर चहासाठी म्हणून बागेमध्ये बसलो असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. काही क्षणांतच समोरचा तोरणा दुर्ग ढगांच्या आणि धुक्याच्या आड दिसेनासा झाला. सगळ्या परिसरातील दिवे गेलेले असल्याने, बाहेरच पण जरा आडोश्याला बसून  रिसॉर्टच्या मालकांशी मनसोक्त गप्पा झाल्या. तोरणा चढायला आणि उतरायला किती वेळ लागतो, गाडी कुठपर्यंत जाऊ शकते, ही माहिती त्यांच्याकडून समजली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गडावर जायचे, असे मी, आनंद व राजीवने फारसा विचार न करता ठरवूनच टाकले. सहलीला निघण्यापूर्वी, तोरणा गडाबाबत काहीही वाचलेले नव्हते किंवा गड चढायचा विचारही केलेला नव्हता हे विशेष.

पहाटे साडेपाच वाजता रिसॉर्टमधून आमच्या गाडीने निघून, आम्ही तिघे तोरणा गडाच्या पायथ्याशी  पोहोचलो. आम्ही बरोब्बर पावणेसहा वाजता चढायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच्या मुसळधार पावसामुळे वाटेवरची खडी चढण निसरडी झाली होती. त्यावेळी आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. आम्ही slow but steady अशा पद्धतीने, कुठेही न थांबता सतत चढत राहिलो. साधारण वर्षभरापूर्वी आनंदला हार्ट अटॅक येऊन त्याची  दोनवेळा angioplasty झालेली असल्यामुळे, माझ्या मनामध्ये जरा धाकधूक होती. पण मी ती कोणाजवळही बोलून दाखवलेली नव्हती. किल्ला चढायला लागल्यानंतर माझीच इतकी दमछाक होत होती की काही बोलायला माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, हे वेगळेच. माझ्या शरीरातला 'अतिरिक्त' भार पेलत चढणे, हे मोठे जिकिरीचे काम होते. त्या मानाने राजीव आणि आनंदला कमी कष्ट पडत होते. जरूर पडेल तेंव्हा ते दोघे मला हातही देत होते. 

अर्धी चढण चढून आम्ही आलो असू तेंव्हा आमच्या मागून काही कोवळी मुले आरडा-ओरडा करत, एकमेकांची चेष्टा करत, गाणी म्हणत, ठिकठिकाणी सेल्फ्या काढत वर येताना दिसली. ती मुले अगदी लीलया वर चढत होती. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आलेली जेमतेम सोळा-सतरा वर्षांची ही मुले, हातकणंगल्याहून आली होती. त्यांचे ते सरसर गड चढणे पाहून, त्यांच्यामध्ये मला सोळा-सतरा वर्षे वयाचे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच दिसू लागले. त्या कोवळ्या वयात, शिवरायांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले, इतर समवयस्क मुलांना प्रेरित केले, हा किल्ला जिकंण्याची मोहीम आखली आणि ती यशस्वीरीत्या पारदेखील पाडली, हे सगळेच आज आपल्यासाठी आश्चर्यकारक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच दुर्ग आहे. आम्ही दोन तासात गडावर पोहोचलो. तिथे थोडेफार फिरून, काही फोटो काढून आणि सभोवतालचे नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवून आम्ही खाली उतरायला लागलो. त्या वेळी, वीस ते तीस वयोगटातले अनेकजण गड चढताना आम्हाला दिसत होते. बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने पुण्याहून आलेली कॉलेजची मुले, बँकेतील कर्मचारी, अंत्रोळीहून आलेल्या काही मुली अशी तरुणाई भेटल्यामुळे खूप छान वाटले. पुण्यातील एका कॉलेजचा गट तर चक्क हातात शिवरायांचा जरीपटका घेऊन वर येताना दिसला. त्यांना थांबवून, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायचा मोह आवरता आला नाही. आजच्या तरुण पिढीला इतक्या वर्षानंतरही शिवरायांचा प्रताप प्रेरणादायी ठरत आहे, हे विशेष.  

वेल्हे गावाजवळच, मढे घाटातला लक्ष्मी धबधबा अतिशय प्रेक्षणीय आहे, असे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकच समजले. तो बघायला म्हणून, सकाळी साडेसातच्या सुमारास गाडीने बाहेर पडलो. अर्थात भर उन्हाळ्यात आम्हाला धबधबा बघायला मिळणार नव्हताच. वाटेवर गुंजवणी धरणाचा बंधारा आणि भट्टी वाघदरा, केळद वगैरे गावे लागली. वेल्हे गावातून सोळा किलोमीटर, वळणावळणाचा घाटरस्ता पार करून आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो. बराचसा रस्ता निर्मनुष्य होता. ज्या मोकळ्या पठारावरून खाली धबधबा दिसतो, त्या जागेजवळ आम्ही पोहोचलो. सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. अचानक काही लोकांचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पुढे जाऊन पहिले तो, पाच-सहा पुरुषमंडळींनी पठारावरच्या मोकळ्या जागेत लहान-लहान तंबू ठोकून रात्रभर मुक्काम केला होता, असे समजले. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून बरीच माहिती मिळाली. केळद गावामध्ये तंबू भाड्याने मिळतात, असेही समजले. पुण्याच्या अभिनव स्थापत्य महाविद्यालयातील प्राध्यापक, श्री. अतुल भागवत नामक अवलियाबरोबर त्यांचे एक-दोन नातेवाईक व मित्र, खास पौर्णिमेच्या रात्री मुक्कामाला तेथे आलेले होते. प्रा. भागवत यांना अवलिया म्हणण्याचे कारण असे की, दर पौर्णिमेच्या रात्री, ते इथे येऊन मुक्काम करतात, कधी नातेवाईक अथवा मित्रकंपूसोबत, तर कधी एकटेच! हे ऐकून आम्हाला अगदी अवाक व्हायला झाले. सरांकडे स्वतःचे दोन तंबूदेखील आहेत. आमच्या परतीच्या  वाटेवर, केळद गावातली देवराई बघून जायचा सल्ला भागवत सरांनीच आम्हाला दिला. 

देवराईची संकल्पना, पावित्र्य आणि त्यामागची गावकऱ्यांची भावना याबाबत आम्हाला पूर्वकल्पना असली, तरीही प्रत्यक्ष देवराईला भेट देण्याचा अनुभव खूपच सुखद होता. ही देवराई तशी छोटीशीच आहे. देवळाभोवती, वर्षानुवर्षे  गावकऱ्यांनी आपुलकीने जतन केलेली झाडे बघून भारावून जायला झाले. आम्ही वाटेवर पाहिलेल्या भट्टी वाघदरा या गावामधे, लोखंड वितळवून शस्त्रास्त्रे बनवण्याची शिवकालीन भट्टी आहे, अशी माहिती आम्हाला नंतर एका मित्राकडून कळली. पण ती माहिती कळेपर्यंत आम्ही वेल्ह्याला पोहोचलो होतो. त्यामुळे ही भट्टी बघायच्या निमित्ताने, पुन्हा या परिसराला भेट द्यायचे आम्ही मनाशी ठरवले. 

दोन दिवसांची आमची ही छोटीशीच सहल अनेक कारणांमुळे अविस्मरणीय झाली. 

काहीही न ठरवता आणि माहिती न घेता गेलेलो असूनही आम्ही तोरणा किल्ला चढलो. किल्ल्याची चढण बरीच अवघड आहे, हे आधी कळले असते तर माझ्याच मनाने कदाचित कच खाल्ली असती! कारण, मागच्या वर्षी, १२ जून २०२३ रोजी आनंदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये तयार झालेल्या गुठळीमुळे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती. (१००% ब्लॉक). त्यावेळी 'इमर्जन्सी अँजिओप्लास्टी' द्वारे ती गुठळी काढून स्टेंट बसवावा लागला होता. त्याच वेळी त्याच्या हृदयाची आणखी एक मोठी रक्तवाहिनी ७० ते ८०% बंद असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. पण तो अत्यवस्थ असल्याने, दुसरी अँजिओप्लास्टी लगेच न करता, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केली गेली. आमच्या तोरणा मोहिमेमधे आनंदच्या हृदयाच्या क्षमतेचा कस लागला, आणि मोहीम यशस्वी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला. 

अनेक तरुण-तरुणी, नुसते लोळत सुट्टी न घालवता, किल्ला चढायला आलेले बघूनही आम्हाला खूप कौतुक वाटले. किल्ल्याची अवघड चढण चढताना, "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.. .." हे शब्द मनामध्ये घोळत होते. प्रा. अतुल भागवतांच्या भटकंतीच्या कथा ऐकून मी अगदी भारावून गेले. 

एकूण काय, तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या उत्तुंग, 'प्रचंडगड', अर्थात तोरणा गडाला भेट देऊन मला नवीन ऊर्जा तर मिळालीच, पण तिथली शुद्ध हवा पिऊन, आणि पक्ष्यांचे मंजुळ गान ऐकून, प्रसन्न मनाने आम्ही पुण्याला परतलो.        

सोमवार, ६ मे, २०२४

कर्णफुलांच्या गोष्टी!

त्या दिवशी जोरजोरात सायकल चालवत, मी कशीबशी कॉलेजमधे वेळेत पोहोचले होते. पहिला तास सुरू व्हायला जेमतेम एक-दोन मिनिटे बाकी होती. आम्ही मैत्रिणी वर्गात शिरून बाकांवर बसत असतानाच माझी एक मैत्रीण माझ्याकडे बघून हासत-हासत उद्गारली,
"स्वाती, काय गं हे? एकाच कानात रिंग घातली आहेस. दुसऱ्या कानातली रिंग घालायला विसरलीस की काय?"
मी चपापून दोन्ही कानांना हात लावला, तर काय? खरोखर फक्त एकाच कानात रिंग होती. तितक्यातच आमचे प्राध्यापक वर्गात शिरले आणि त्यांनी  तास चालू केला. 

माझी छाती धडधडायला लागली. सकाळी घरातून निघताना, दोन्ही कानामधे सोन्याच्या रिंग्ज घातल्याचे मला निश्चित आठवत होते. पण मग एक रिंग गेली तरी कुठे? सरांच्या शिकवण्याकडे माझे लक्षच लागेना. आता घरी गेल्यावर कुणाकुणाची, किती आणि काय-काय बोलणी खावी लागतील, या विचाराने मी भलतीच अस्वस्थ झाले. ती  रिंग वाटेत कुठे पडली असेल का? पडली असली तर कुठे? माझ्या मनांमध्ये सगळ्या उलट-सुलट विचारांनी जणू रिंगणच धरले. 
सरांचा तास संपेपर्यंत मी कशीबशी कळ काढली. सर बाहेर पडल्याबरोबर, मीही तडक वर्गाच्या बाहेर पडून  सायकल  मारत घराच्या दिशेने निघाले. पण घरापर्यंत न जाता, काहीतरी विचाराने वाटेतच एके ठिकाणी मी थांबले. तिथेच खाली बसून, वेड्यासारखी तिथल्या धुळीमध्ये हात फिरवत मी शोधू लागले. आणि आश्चर्य म्हणजे त्या धुळीत माझी सोन्याची रिंग चकाकताना मला दिसली! माझा जीव भांडयात पडला. मी ती रिंग उचलून कानात घातली  आणि पुन्हा सायकल पळवत  कॉलेजात येऊन पोहोचले!

त्याचे असे झाले होते की, मी घरातून बाहेर पडताना माझा 'एप्रन' बॅगमध्ये ठेवला होता. सायकलवर कॉलेजला निघणार तेवढ्यात लक्षात आले की सायकलमध्ये हवा अगदीच कमी आहे. म्हणून मग सायकल हातात धरून चालत जवळच्या सायकलवाल्याकडे गेले. सायकलमध्ये हवा भरायला थांबलोच आहोत तर, नंतरचा वेळ वाचावा म्हणून, बॅगमधला एप्रन बाहेर काढून मी गडबडीत अंगावर चढवला. हे सगळे मला आठवत होते.  कदाचित एप्रन घालताना ती रिंग माझ्या कानातून निसटून खाली पडली असेल ही एक शक्यता होती. म्हणून मी तिथे शोधू लागले आणि खरोखरच तसे झाले असल्याने ती रिंग मला मिळाली.
 

तुम्ही म्हणाल, आज इतक्या वर्षानंतर ही गोष्ट सांगण्याचे काय कारण? ते कारणदेखील कर्णफुले हरवण्याच्या अलीकडच्या काही घटनांबाबतीतले आहे.  परंतु, ते माझ्या कर्णफुलांचे नाही आणि ती कर्णफुलेही एका वेगळ्याच प्रकारची आहेत! 

नव्वदी पार केलेल्या माझ्या वडिलांनी, आमच्या आग्रहाखातर, चार-पाच वर्षांपूर्वी, त्यांच्या दोन्ही कानांसाठी मशिन्स  (hearing aid) विकत घेतली. अतिशय चांगल्या प्रतीची व नवीन तंत्रज्ञान वापरून बनवलेली ती यंत्रे बऱ्यापैकी महाग होती. एकेका कानाचे मशीन जवळपास लाख-लाख रुपयाचे होते. त्यांच्या या कानाच्या मशीन्सबद्दल, आम्ही गमतीनेच, "दादा, ही तुमची कर्णफुले आहेत", असे म्हणतो. आणि ही मौल्यवान कर्णफुले  माझ्या वडिलांकडून अनेक वेळा आणि वेगवेगळ्या प्रकारे गहाळ होत राहतात. 
चाळीस वर्षांपूर्वी माझ्या कानातली रिंग गायब झाली होती, तेंव्हा मी वडीलधाऱ्यांच्या भीतीने कावरी-बावरी झाले होते. गंमत म्हणजे आज वडिलांची कर्णफुले गहाळ झाली की, माझ्या धाकाने ते कावरेबावरे होतात!

वडिलांची दोन्ही मशिन्स एकाचवेळी दिसेनाशी झाली की आम्हाला जवळजवळ खात्रीच असते की त्यांनी ती नेहमीच्या जागी न ठेवता दुसरीकडे कुठेतरी ठेवली असणार. थोडी शोधाशोध केली की ती सापडतात. पण एकच मशीन गायब झाले तर मात्र फारच मोठे शोधकार्य हाती घ्यावे लागते. 
कुठल्यातरी शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात, कधी बाथरूममध्ये, कधी खुर्ची किंवा सोफ्याच्या सीटखाली, तर कधी चष्म्याच्या केसमध्ये, अशा वेगवेगळ्या आणि अकल्पनीय जागी आम्हाला ते कर्णफूल सापडते. 

एकदा असेच, त्यांचे एकाच मशीन दिसेनासे झाले. आम्ही सगळे घर उलथे -पालथे केले. त्यांची खोली दोन-दोनदा झाडून काढली. अगदी कपाटे आणि टेबलाखालूनही झाडू फिरवला. पण मशीन काही सापडले नाही. त्या दिवशी वडिलांनी त्यांचे कपाट आवरले होते. त्या आवरा-आवरीनंतर बराच सुका कचरा फेकून दिल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. काहीच मिनिटांपूर्वी आमच्या इमारतीत कचरा गोळा करायला येणाऱ्या बाईला, आमच्या घरातला सगळा सुका कचरा आम्ही दिला होता. मशीन कचऱ्यात गेले असेल तर तिला शोधायला सांगावे म्हणून गडबडीने तिला फोन केला. तर ती म्हणाली, "अवो, आत्ताच तर सगळा कचरा महानगरपालिकेच्या गाडीवाल्याला दिला की!"
 
मग काय? आम्ही महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीचा माग काढत-काढत गेलो. बरेच लांब गेल्यावर एका सोसायटीच्या बाहेर ती गाडी दिसली. त्या गाडीवरचा असंख्य पोत्यामधून, आमच्या इमारतीतील पोते आम्ही अंदाजाने शोधून काढले. ते पोते उलटे करून बघितले. पण त्या पोत्यामध्ये ते मशीन काही सापडले नाही. 

हताश होऊन आणि काहीसे वैतागून आम्ही घरी परत आलो. मशीन शोधण्याच्या नादात, घरात बराच पसाराही आम्ही करून ठेवला होता. तो आवरण्याचे  काम होतेच. माझे वडील तोंड पाडून, एका कोपऱ्यात बसून होते. आपल्यामुळे आपल्या मुलीला आणि जावयाला त्रास सहन करावा लागतोय, अशी कमालीची अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. आम्ही दोघांनी त्यांना धीर दिला. आजच नवीन मशीन घेऊन टाकूया असे सांगितले आणि घरातला पसारा आवरायला लागलो. आवरून झाल्यावर जरा नीट स्वच्छता करावी या हेतूने वडलांच्या खोलीतले टेबल पुढे ओढून त्यामागून व त्याखालूनही पुन्हा झाडून घेतले. टेबल भिंतीकडे सरकवत असतांना, टेबलाच्या मागच्या पट्टीला ते मशीन अडकून, लटकलेल्या अवस्थेत दिसले! 

आम्हाला सर्वांनाच काय आनंद झालाय म्हणून सांगू!

त्याच कर्णफुलाची काल संध्याकाळी घडलेली गोष्ट. 
वडिलांच्या एका कानातले मशीन जरा विचित्रपणे बाहेर आल्याचे मला जाणवले. पाहते तर काय, कानाच्या मागे बसणार मशीनचा मुख्य भाग व्यवस्थित होता, पण कानाच्या आत जाणारा छोटा रिसीव्हर मात्र गायब झालेला दिसत होता. पुन्हा घर झाडणे, गाद्या उलट्या-पालट्या करणे, चादरी झटकणे, ठिकठिकाणी शोधाशोध करणे हे सगळे सोपस्कार झाले. पण तो तुकडा काही मिळेना. सहज माझ्या डोक्यात काहीतरी आले. मोबाईलच्या टॉर्चने, वडिलांच्या कानाच्या आत प्रकाशझोत टाकला, तर काय? तो तुकडा तुटून, त्यांच्या कर्णनलिकेच्या (Auditory  Canal) बराच आत रुतून बसलेला दिसला! मग सर्जिकल चिमट्याच्या साहाय्याने, आम्ही तो मोठ्या खुबीने बाहेर काढला.

 
कर्णफुले हरवण्याच्या आणि गवसण्याच्या या काही गमतीदार गोष्टी षट्कर्णी व्हाव्यात यासाठीच हा लेख!

रविवार, ५ मे, २०२४

जागतिक हास्यदिन?


आज सकाळी नेहमीप्रमाणेच फिरायला गेले होते. तिथे ठिकठिकाणी घोळक्यामधे उभे राहून काही मंडळी जोरजोरात हासताना दिसली. तशी ती मंडळी नेहमीच हासतात. पण आज जास्त जोरात हासत होती! समाजमाध्यमांतून आज 'जागतिक हास्यदिन' असल्याचे कळले आणि मला हासायलाच आले.





अमेरिकन लोकांनी mother's day आणि father's day साजरा करायला आपल्याला शिकवले. खरंतर आई-वडिलांवर प्रेम करायला, त्यांच्या ऋणांची उतराई करायला एखादा दिवस राखून ठेवण्याची कल्पना सुद्धा मला हास्यास्पद वाटते. पण डॉकटर मदन कटारिया, या एका भारतीय डॉक्टरने जगाला 'हास्यदिन' साजरा करायला शिकवले, हे वाचून कुठेतरी बरे वाटले. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी, उकाड्याने हैराण झालेलो असतानाही 'हास्यदिन' साजरा करायच्या निमित्ताने लोकं जोरजोरात हसायला लावणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे!

सध्या निवडणुकीचे वारे चालू असल्याने आपल्या सर्वांना नेतेमंडळी हासण्याची भरपूर संधी देत आहेत. समाजमाध्यमामधून नेत्यांवर किंवा राजकीय पक्षांवर होणाऱ्या टिप्पण्या, कविता, मिम्स आपल्याला सात हसवत राहत आहेत. 

पण खरं सांगा  हासायला आपल्याला काही कारण लागते का?

सकाळी बरेचदा फिरायला बाहेर पडते तिथे काही व्यक्ती वरचेवर भेटतात. अशा व्यक्ती कधीकधी माझ्याकडे बघून हासतात. कधी मी अशा व्यक्तींकडे बघून मी हासते. मी त्यांच्या हास्याचे आणि ते माझ्या हास्याचे, हासून स्वागत करतो. आमची अगदी छोटीशी 'हास्यमैत्री' होते. ती मैत्री जवळपास नि:शब्द असते. परस्परांकडे बघून हासण्यापेक्षा ती फार पुढे जाते असे नाही. पण रोज असे हासरे चेहरे मनाला आनंद देऊन जातात, हे मात्र खरे.

सिग्नल नसलेल्या रस्त्यावर, एखादा वाहनधारक आपल्या कडे बघत, सुहास्य करत आपल्याला त्याच्या किंवा तिच्याआधी जाण्याची खूण करतो. कधीकधी आपणही असे हासून  दुसऱ्याला आपल्या आधी जाण्याचा इशारा करतो. भर रहदारीच्या रस्त्यावर, आपण कातावलेले असताना हे हास्य दोन्ही पक्षांना सुखद वाटते.

व्हॉट्सअप, फेसबुक, इंन्टाग्रॅम मुळे तर क्षणाक्षणाला हास्याची कारंजी उडत असतात. त्या पोस्ट वाचून/ऐकून/बघून आपण प्रत्यक्षात हासतोच पण पोस्टकर्त्याला स्माईलींची बरसात करून 'हास्यपावती' पाठवतो.

थोडक्यात काय? दिवसभर अनेक कारणांमुळे मी हासतच असते. हास्यदिन साजरा करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक दिन हा 'हास्यदिन' समजून साजरा करत राहायला काय हरकत आहे?

 डॉक्टर स्वाती बापट, पुणे