रविवार, २६ मे, २०२४

प्रेरणादायी तोरणा सहल!

या वर्षी एप्रिल-मे महिन्यांतल्या उकाड्यामुळे फारच हैराण व्हायला झाले होते. दोन-तीन दिवस महाबळेश्वरला जायचे पक्के केले होते. पण तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावातल्या एका रिसॉर्टबद्दल समाजमाध्यमात आलेली एक पोस्ट वाचली आणि तिकडे जावे असे अचानक मनात आले. आम्ही दोघे, माझे वडील दादा, माझा आतेभाऊ राजीव, आणि माझे सोलापूरस्थित काका, श्री. हरि गोडबोले आणि सौ. प्रियंवदाकाकू अशा सहाजणांनी जायचे ठरवले. 

आम्ही चौघे पुण्याहून आणि काका-काकू सोलापूरहून, पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचलो. त्या रिसॉर्टमधून अगदी समोरच तोरणा दुर्ग दिसत होता. वामकुक्षीनंतर चहासाठी म्हणून बागेमध्ये बसलो असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. काही क्षणांतच समोरचा तोरणा दुर्ग ढगांच्या आणि धुक्याच्या आड दिसेनासा झाला. सगळ्या परिसरातील दिवे गेलेले असल्याने, बाहेरच पण जरा आडोश्याला बसून  रिसॉर्टच्या मालकांशी मनसोक्त गप्पा झाल्या. तोरणा चढायला आणि उतरायला किती वेळ लागतो, गाडी कुठपर्यंत जाऊ शकते, ही माहिती त्यांच्याकडून समजली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गडावर जायचे, असे मी, आनंद व राजीवने फारसा विचार न करता ठरवूनच टाकले. सहलीला निघण्यापूर्वी, तोरणा गडाबाबत काहीही वाचलेले नव्हते किंवा गड चढायचा विचारही केलेला नव्हता हे विशेष.

पहाटे साडेपाच वाजता रिसॉर्टमधून आमच्या गाडीने निघून, आम्ही तिघे तोरणा गडाच्या पायथ्याशी  पोहोचलो. आम्ही बरोब्बर पावणेसहा वाजता चढायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच्या मुसळधार पावसामुळे वाटेवरची खडी चढण निसरडी झाली होती. त्यावेळी आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. आम्ही slow but steady अशा पद्धतीने, कुठेही न थांबता सतत चढत राहिलो. साधारण वर्षभरापूर्वी आनंदला हार्ट अटॅक येऊन त्याची  दोनवेळा angioplasty झालेली असल्यामुळे, माझ्या मनामध्ये जरा धाकधूक होती. पण मी ती कोणाजवळही बोलून दाखवलेली नव्हती. किल्ला चढायला लागल्यानंतर माझीच इतकी दमछाक होत होती की काही बोलायला माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, हे वेगळेच. माझ्या शरीरातला 'अतिरिक्त' भार पेलत चढणे, हे मोठे जिकिरीचे काम होते. त्या मानाने राजीव आणि आनंदला कमी कष्ट पडत होते. जरूर पडेल तेंव्हा ते दोघे मला हातही देत होते. 

अर्धी चढण चढून आम्ही आलो असू तेंव्हा आमच्या मागून काही कोवळी मुले आरडा-ओरडा करत, एकमेकांची चेष्टा करत, गाणी म्हणत, ठिकठिकाणी सेल्फ्या काढत वर येताना दिसली. ती मुले अगदी लीलया वर चढत होती. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आलेली जेमतेम सोळा-सतरा वर्षांची ही मुले, हातकणंगल्याहून आली होती. त्यांचे ते सरसर गड चढणे पाहून, त्यांच्यामध्ये मला सोळा-सतरा वर्षे वयाचे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच दिसू लागले. त्या कोवळ्या वयात, शिवरायांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले, इतर समवयस्क मुलांना प्रेरित केले, हा किल्ला जिकंण्याची मोहीम आखली आणि ती यशस्वीरीत्या पारदेखील पाडली, हे सगळेच आज आपल्यासाठी आश्चर्यकारक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच दुर्ग आहे. आम्ही दोन तासात गडावर पोहोचलो. तिथे थोडेफार फिरून, काही फोटो काढून आणि सभोवतालचे नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवून आम्ही खाली उतरायला लागलो. त्या वेळी, वीस ते तीस वयोगटातले अनेकजण गड चढताना आम्हाला दिसत होते. बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने पुण्याहून आलेली कॉलेजची मुले, बँकेतील कर्मचारी, अंत्रोळीहून आलेल्या काही मुली अशी तरुणाई भेटल्यामुळे खूप छान वाटले. पुण्यातील एका कॉलेजचा गट तर चक्क हातात शिवरायांचा जरीपटका घेऊन वर येताना दिसला. त्यांना थांबवून, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायचा मोह आवरता आला नाही. आजच्या तरुण पिढीला इतक्या वर्षानंतरही शिवरायांचा प्रताप प्रेरणादायी ठरत आहे, हे विशेष.  

वेल्हे गावाजवळच, मढे घाटातला लक्ष्मी धबधबा अतिशय प्रेक्षणीय आहे, असे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकच समजले. तो बघायला म्हणून, सकाळी साडेसातच्या सुमारास गाडीने बाहेर पडलो. अर्थात भर उन्हाळ्यात आम्हाला धबधबा बघायला मिळणार नव्हताच. वाटेवर गुंजवणी धरणाचा बंधारा आणि भट्टी वाघदरा, केळद वगैरे गावे लागली. वेल्हे गावातून सोळा किलोमीटर, वळणावळणाचा घाटरस्ता पार करून आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो. बराचसा रस्ता निर्मनुष्य होता. ज्या मोकळ्या पठारावरून खाली धबधबा दिसतो, त्या जागेजवळ आम्ही पोहोचलो. सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. अचानक काही लोकांचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पुढे जाऊन पहिले तो, पाच-सहा पुरुषमंडळींनी पठारावरच्या मोकळ्या जागेत लहान-लहान तंबू ठोकून रात्रभर मुक्काम केला होता, असे समजले. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून बरीच माहिती मिळाली. केळद गावामध्ये तंबू भाड्याने मिळतात, असेही समजले. पुण्याच्या अभिनव स्थापत्य महाविद्यालयातील प्राध्यापक, श्री. अतुल भागवत नामक अवलियाबरोबर त्यांचे एक-दोन नातेवाईक व मित्र, खास पौर्णिमेच्या रात्री मुक्कामाला तेथे आलेले होते. प्रा. भागवत यांना अवलिया म्हणण्याचे कारण असे की, दर पौर्णिमेच्या रात्री, ते इथे येऊन मुक्काम करतात, कधी नातेवाईक अथवा मित्रकंपूसोबत, तर कधी एकटेच! हे ऐकून आम्हाला अगदी अवाक व्हायला झाले. सरांकडे स्वतःचे दोन तंबूदेखील आहेत. आमच्या परतीच्या  वाटेवर, केळद गावातली देवराई बघून जायचा सल्ला भागवत सरांनीच आम्हाला दिला. 

देवराईची संकल्पना, पावित्र्य आणि त्यामागची गावकऱ्यांची भावना याबाबत आम्हाला पूर्वकल्पना असली, तरीही प्रत्यक्ष देवराईला भेट देण्याचा अनुभव खूपच सुखद होता. ही देवराई तशी छोटीशीच आहे. देवळाभोवती, वर्षानुवर्षे  गावकऱ्यांनी आपुलकीने जतन केलेली झाडे बघून भारावून जायला झाले. आम्ही वाटेवर पाहिलेल्या भट्टी वाघदरा या गावामधे, लोखंड वितळवून शस्त्रास्त्रे बनवण्याची शिवकालीन भट्टी आहे, अशी माहिती आम्हाला नंतर एका मित्राकडून कळली. पण ती माहिती कळेपर्यंत आम्ही वेल्ह्याला पोहोचलो होतो. त्यामुळे ही भट्टी बघायच्या निमित्ताने, पुन्हा या परिसराला भेट द्यायचे आम्ही मनाशी ठरवले. 

दोन दिवसांची आमची ही छोटीशीच सहल अनेक कारणांमुळे अविस्मरणीय झाली. 

काहीही न ठरवता आणि माहिती न घेता गेलेलो असूनही आम्ही तोरणा किल्ला चढलो. किल्ल्याची चढण बरीच अवघड आहे, हे आधी कळले असते तर माझ्याच मनाने कदाचित कच खाल्ली असती! कारण, मागच्या वर्षी, १२ जून २०२३ रोजी आनंदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये तयार झालेल्या गुठळीमुळे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती. (१००% ब्लॉक). त्यावेळी 'इमर्जन्सी अँजिओप्लास्टी' द्वारे ती गुठळी काढून स्टेंट बसवावा लागला होता. त्याच वेळी त्याच्या हृदयाची आणखी एक मोठी रक्तवाहिनी ७० ते ८०% बंद असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. पण तो अत्यवस्थ असल्याने, दुसरी अँजिओप्लास्टी लगेच न करता, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केली गेली. आमच्या तोरणा मोहिमेमधे आनंदच्या हृदयाच्या क्षमतेचा कस लागला, आणि मोहीम यशस्वी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला. 

अनेक तरुण-तरुणी, नुसते लोळत सुट्टी न घालवता, किल्ला चढायला आलेले बघूनही आम्हाला खूप कौतुक वाटले. किल्ल्याची अवघड चढण चढताना, "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.. .." हे शब्द मनामध्ये घोळत होते. प्रा. अतुल भागवतांच्या भटकंतीच्या कथा ऐकून मी अगदी भारावून गेले. 

एकूण काय, तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या उत्तुंग, 'प्रचंडगड', अर्थात तोरणा गडाला भेट देऊन मला नवीन ऊर्जा तर मिळालीच, पण तिथली शुद्ध हवा पिऊन, आणि पक्ष्यांचे मंजुळ गान ऐकून, प्रसन्न मनाने आम्ही पुण्याला परतलो.        

१३ टिप्पण्या:

  1. Great 👍, मोहीम फत्ते. नितिन चौधरी

    उत्तर द्याहटवा
  2. शिवराय आणि त्यांचे मावळे ह्यांनी 16 व्या वर्षी तोरणा सर केला असे म्हणतात.
    तुम्ही तोरणा सर केलात ते साधारण 61व्या वर्षी.
    आकडे तेच, फक्त मागे पुढे झालेत इतकेच. 😀

    तुझा ब्लॉग वाचून अनेकांना गड -पर्यटन करण्याची प्रेरणा मिळो ही सदिच्छा 💐
    - विठ्ठल कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  3. उत्साही आहेत, इथं उष्म्यात घराबाहेर पडावं वाटत नाहीय.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. घराबाहेर पडलो म्हणून छान वाटले

      हटवा
    2. या वर्षी प्रथमच औरंगाबाद येथे दिल्ली येथे असते अशी गरम हवा रात्री आठ पर्यन्त वहात आहे. स्मार्ट सिटी झाल्यावर काय काय होणारं समजत नाही सिमेंट रोड चा इफेक्ट आहे की काय कळेनासं झालंय

      हटवा
  4. अतिशय प्रेरणादायक लेख.नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन.

    उत्तर द्याहटवा
  5. तुझ्या धाडसाला सलाम. आनंदला घेऊन गड सर केला हे नक्कीच कौतुकास्पद आहे. विशेष करून दोनदा ॲंजिओप्लास्टी होऊन पण गड चढायचे त्यांनी केलेल यशस्वी धाडस .

    उत्तर द्याहटवा
  6. आधी माहिती नव्हते म्हणूनच चढू शकलो🚩

    उत्तर द्याहटवा
  7. Great,प्रत्येक क्षण तुम्ही खऱ्या अर्थाने जगत आहात, कोठल्याही गोष्टीचा बाऊ न करता 🙏🙏

    उत्तर द्याहटवा