लोणार सरोवर बघून आम्ही संध्याकाळी MTDC रिसॉर्टवर परत आलो, आणि इथे "कोणी चांगला माहितगार गाईड आहे का?" अशी विचारणा तिथल्या कर्मचाऱ्यांकडे केली. महेश मिश्रा नावाच्या गाईडचा नंबर त्यांच्याकडून मिळाला. मी लगेच महेश मिश्रांशी संपर्क साधला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता लोणार सरोवराच्या प्रवेशद्वाराजवळ भेटायचे आम्ही ठरवले. उद्या पहाटे तो आमच्या बरोबर लोणार सरोवरापर्यंत येऊन त्या परिसरातील सर्व मंदिरांची माहिती देणार होता.
रात्रीचे जेवण लवकर उरकून आम्ही त्वरित झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे आंघोळीच्या गरम पाण्याने दुखरे अंग शेकून घेतले आणि बरोबर सात वाजता आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो. महेश मिश्राही वेळेत तिथे आलेला होता. महेश हा जेमतेम तिशी पार केलेला, एम.कॉम. शिकलेला, मृदुभाषी तरुण आहे. त्याचे आडनाव मिश्रा असले तरी तो उत्तम मराठी बोलत होता. पहिल्या पाच-सात मिनिटांमधले त्याचे बोलणे ऐकूनच, चांगला माहितगार गाईड मिळाला असल्याची आम्हा दोघांची खात्री पटली. लोणार परिसराचे गाढे अभ्यासक, व तेथील कॉलेजचे माजी प्राचार्य कै. सुधाकर बुगदाणे सरांशी महेशचा शालेय जीवनातच संपर्क आलेला होता. त्यांच्यासोबत हा संपूर्ण परिसर महेशने हिंडून पाहिलेला होता. बुगदाणे सरांकडून महेशने मिळवलेल्या माहितीला, MTDC आणि वनखात्याकडून त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचीही जोड मिळालेली आहे.
महेशने सांगितले की, सरोवराच्या परिसरामधे महादेवाची एकूण बारा मंदिरे आहेत. या बारा महादेवांचे दर्शन घेतले तर भारतभर विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य मिळते असे मानतात. गोमुख तीर्थाच्या जवळच असलेले, भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळचे हटकेश्वर किंवा हटेश्वर मंदिर हे तंत्र-मंत्र करणाऱ्या हटयोगी लोकांचे आराध्यदैवत आहे. या मंदिरातली पिंड उत्तराभिमुख नसून पूर्वाभिमुख आहे. पूर्वाभिमुख पिंड हे प्रत्येक 'हटेश्वर' किंवा हटकेश्वर' महादेव मंदिराचे वैशिष्ट्य असते. तिथून जवळच नारदेश्वर मंदिर आहे. ही दोन मंदिरे पहिली आणि आम्ही पायऱ्या उतरून सरोवराच्या दिशेने जायला लागलो. हटकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने खाली असलेले पापहरेश्वर मंदिर दिसत होते. पण तिथे जाण्यासाठीचा रस्ता चांगला नसल्यामुळे आम्ही ते मंदिर दुरूनच पाहिले. पापहरेश्वर मंदिराच्या आसपास उत्खननाचे काम चालू असून तिथे भुयारी मार्ग आणि जुन्या मंदिरांचे काही अवशेष सापडलेले आहेत. काही पायऱ्या उतरून गेल्यावर डाव्या हाताला कुमारेश्वर मंदिर लागले. राष्ट्रकूट काळातले, हेमाडपंती शैलीतील या मंदिराची रचना इजिप्तच्या पिरॅमिड्स सारखी आहे. कुमारेश्वर मंदिराच्या समोरील झऱ्याला 'सीतान्हाणी' किंवा 'ललित तीर्थ' असे म्हणतात. राम-लक्ष्मण व सीता वनवासात असताना, रामाने जमिनीत बाण मारून हा झरा काढला आणि सीतेला स्नान करण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते, अशी आख्यायिका आहे. या तीर्थाच्या पाण्यामधे स्नान करू नये अशी पाटी असूनही वनखात्याचा एक कर्मचारी, तिथून नुकताच स्नान आटपून बाहेर पडताना दिसला!
त्यानंतर आम्ही यज्ञेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलो. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रेश्वर मंदिराच्या छताला जसे गोलाकार भोक आहे तसेच भोक या मंदिराच्या छताला आहे. हे भोक पूर्वीच्या काळात आकाशदर्शनासाठी वापरले जात असे. पण आता ते भोक बुजवलेले आहे. शुक्राचार्य ऋषी या मंदिराचा वेधशाळा म्हणून वापर करायचे. या मंदिराजवळील एका मोठ्या शिळेतून वेगवेगळे आवाज निघतात. जवळच असलेले याज्ञवल्केश्वर मंदिर मात्र पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे. शिवभक्त असलेले याज्ञवल्केश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. त्यांनी या परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करून विविध रोगांवर औषधे शोधली होती. तिथून जरासे उंच स्तरावर असलेले रामगया मंदिर महेशने आम्हाला दाखवले. या मंदिरातील राम-लक्ष्मण व सीतेच्या प्राचीन मूर्ती निजामाच्या काळात फोडल्या गेल्या. आता इथे रामाची एक लाकडी रंगवलेली मूर्ती बसवलेली आहे. या मंदिरामधे तिन्ही बाजूने प्रकाश येतो. गर्भगृहासमोर आपण उभे राहिलो की आपल्याला तीन सावल्या दिसतात, हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. होकायंत्राच्या सहाय्याने या मंदिराच्या दगडामधील चुंबकीय गुणधर्माचे प्रात्यक्षिक महेशने आम्हाला करून दाखवले. मंदिराजवळ रामकुंड नावाचे एक चौरसाकृती कुंड आहे. तिथून पुढे सरोवराकडे चालत जात असताना, लोणार सरोवराची आणि त्या परिसरातल्या वनस्पती व प्राणिसृष्टीबद्दलची खूप माहिती महेश आम्हाला देत होता. वाटेवर पडलेले साळींदराचे काटे आणि लालचुटुक गुंज बिया त्याने उचलून मला दिल्या, महादेवाच्या पिंडाच्या आकाराची बी असलेले लाल फूल दाखवले, अनेक झाडांची, पक्ष्यांची व प्राण्यांची माहिती दिली. तिथे वाटेतच पडलेली बिबट्याची विष्ठाही त्याने आम्हाला दाखवली. बिबट्याचा नित्य वावर त्या वाटेवर होत असल्याचे लक्षात येताच आम्ही पुन्हा एकदा मनातून जरा चरकलो!
कमळजा मंदिराच्या वाटेवर, वाघ महादेव मंदिर, मोर मंदिर, शंकर-गणेश मंदिर अशी अर्धवट पाण्याखाली गेलेली आणि मोडकळीला आलेली काही मंदिरे आम्हाला काठावरूनच पाहता आली. कमळजा मंदिराचाही काही भाग पाण्यात गेलेला आहे. त्या मंदिरापुढे, सरोवराच्या परिघावर असलेली बगीचा मंदिर अथवा विष्णू मंदिर, देशमुख महादेव मंदिर, अंबारखाना मंदिर, चोपडा महादेव, मुंगळा महादेव, ही मंदिरे मात्र हल्ली संपूर्णपणे पाण्याखाली असल्याने आम्हाला पाहता आली नाहीत. महेशने आम्हाला सांगितले की लोणार सरोवराचे पाणी खारट असले तरी अत्याधिक आम्लारी (alkaline) असल्यामुळे या सरोवराच्या पाण्यात मासे जगू शकत नाहीत, आणि ते पाणी पिण्यासाठीही अयोग्य आहे. मात्र त्या पाण्यात वाढणारे प्रथिनयुक्त शेवाळ किंवा Blue-Green Algae खायला विविध स्थलांतरित पक्षी दरवर्षी येऊन जातात. लिटमस पेपरच्या सहाय्याने सरोवराच्या पाण्याचा pH तपासल्यास १२ च्या आसपास येतो असे महेशने आम्हाला सांगितले. त्यानंतर एका पारदर्शक ग्लासमधे सरोवराचे पाणी त्याने घेतले व त्यामध्ये हळद घातली. हळदीमुळे त्या पाण्याचा रंग पिवळा न होता त्यातील आम्लारी गुणधर्मामुळे काही क्षणातच ते पाणी कुंकवाच्या रंगासारखे लाल झाले. मग त्याच लाल पाण्यामधे महेशने लिंबाचा रस मिसळला. लिंबूरस आम्लधर्मी असल्याने त्या पाण्याच्या अम्लारीधर्मावर मात झाली आणि त्या लाल पाण्याचा रंग बदलून पिवळा झाला. प्रयोगशाळेमधले रसायनशास्त्राचे प्रत्याक्षिकच आमच्यासमोर चालू असल्यासारखे आम्हाला वाटले. या पाण्यावर विशिष्ट प्रकारचे दगड तरंगतात हे महेशने दाखवल्यावरही आम्हाला आश्चर्य वाटले. लोणार सरोवराचा परिसर अनेक अद्भुत आणि गूढ गोष्टीनी भरलेला आहे. या खाऱ्या पाण्याच्या सरोवराशेजारी खड्डा खणल्यास तिथे मात्र गोड्या पाण्याचे झरे लागतात. सरोवराच्या अगदी शेजारी गोड्या पाण्याची एक विहीरदेखील आहे. सरोवराच्या आसपासची माती लोहकणमिश्रित आहे. तिथल्या काही दगडांमधे चुंबकीय गुणधर्म आहेत. या परिसरामध्ये अजूनही अनेक भुयारी मार्ग, मूर्ती, मंदिरे आणि इतर ऐतिहासिक अवशेष मिळण्याची शक्यता असल्याने, पुरातत्वखात्यातर्फे उत्खनन व संशोधन अजूनही चालूच आहे.
सकाळच्या वेळी सरोवराचे सौंदर्य जास्तच खुलून दिसत होते आणि थंड वातावरणातली भटकंतीही आल्हाददायक वाटत होती. मंदिरे बघून परतत असताना, लोकांनी वाटेतच टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या महेश गोळा करत होता. वर पोहोचल्यावर तो सगळा कचरा त्याने कचरापेटीत टाकला. आपल्या परिसराचे सौंदर्य जपण्यासाठीची त्याची धडपड पाहून आम्हाला अतिशय कौतुक वाटले. आम्ही वर येईपर्यंत साडेअकरा वाजून गेले होते. आम्हाला त्याच दिवशी मोठा पल्ला गाठून पुण्याला परतायचे होते. त्यामुळे गोमुख धारेवरील मंदिरांची माहिती आम्ही बाहेरूनच ऐकली. या धारेच्या वरच्या बाजूला देवीच्या आणि बालविष्णू मंदिरांमधे अनेक कोरीव शिल्पे आहेत. आम्ही आमच्या खोलीवर परतलो आणि झटपट सामान आवरून खोली सोडली. दैत्यसूदन मंदिराजवळ पुन्हा महेशला भेटायचे ठरले होते. आदल्या दिवशीही आम्ही ते सुंदर मंदिर बघून आलो होतो. पण त्या मंदिराचा इतिहास, स्थापत्यशास्त्र, पौराणिक महत्त्व आणि तिथली कलाकुसर याबाबत महेशने आम्हाला सविस्तर माहिती दिली. हे मंदिर चालुक्यराजा विजयादित्य याने लोकपालदेवी या आपल्या पत्नीच्या आग्रहास्तव बांधले होते. १८७८ साली उत्खनन करून हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मंदिरात मूळ मूर्ती मात्र सापडली नव्हती. सध्या मंदिरामध्ये असलेली विष्णूची मूर्ती नागपूरच्या राजे भोसले यांनी दिलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर अनेक सुंदर शिल्पचित्रे कोरलेली आहेत. त्यामध्ये लवणासुराचा वध आणि इतरही अनेक कथा चितारलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय रेखीव शिल्पे आहेत. त्यामधे ब्रम्हा-विष्णू-महेश, श्रीकृष्ण, महिशासुरमर्दिनी, नृसिंह अशा अनेक देवादिकांची चित्रे कोरलेली आहेत. तसेच खजुराहो येथील मंदिरांमध्ये आहेत तशीच कामक्रीडेची काही शिल्पचित्रेही आहेत. लोणार येथे प्रत्यक्षात जाऊनच अनुभवायला व मनात साठवायला हवे असे दैत्यसूदन मंदिराचे सौंदर्य आहे.
दैत्यसूदन मंदिर बघून झाल्यावर आम्ही मोठा मारुती मंदिर बघायला गेलो. १८४१ साली कोकणातून आलेल्या कानिटकर घराण्यातील एका संतपुरूषाला ही ९ फूट ३ इंच लांब आणि चार फूट रुंद अशी हनुमानाची भव्य मूर्ती पालापाचोळ्यामधे सापडली होती. तिथे राहून ते या मूर्तीची पूजा-अर्चा करायचे. निजामाचा दिवाण, राजा चंदुमल याने १८६५ साली इथे मंदिर बांधून दिले. या मूर्तीला अनेक वर्षे शेंदूर फासला जात होता. त्यामुळे ही मूर्ती दिसायला अगदीच ओबडधोबड होती. काही वर्षांपूर्वी या मूर्तीवर साठलेला जवळपास वीस टन शेंदूर खरडून काढण्यात आला. त्यानंतरच या मूर्तीचे मूळ सुंदर रूप दिसू लागले. काळ्या दगडात कोरलेली ही मूर्ती अतिशय भव्य आणि रेखीव आहे. या मूर्तीचा दगडही चुंबकीय गुणधर्म असलेला आहे. कानिटकर कुटुंबीयांनी अलीकडेच त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हे मंदिर पाहून झाल्यावर, महेश आम्हाला लोणार सरोवराच्या 'व्ह्यू पॉंईंट'वर घेऊन गेला. तिथे उंचावर उभे राहून लोणार सरोवराचे मनोहर दृष्य आम्ही डोळ्यात आणि आमच्या फोनच्या कॅमेऱ्यामधे बंदिस्त केले आणि मोठ्या जड मनाने पुण्याकडे निघालो.
महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी लोणार सरोवर हे एक आहे, हे मला तिथे जाईपर्यंत माहिती नव्हते, याची मला लाज वाटली. या सरोवराची निर्मिती निसर्गाच्या चमत्कारामुळे झाली आहे. सरोवर आणि भोवतालचा प्रदेश म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा आविष्कार आहे. आपल्या राजे-रजवाड्यांनी इथे सुंदर मंदिरे बांधून या जागेच्या सौंदर्यामधे भर घातलेली आहे. त्यांची कल्पकता, कलासक्तता आणि दूरदृष्टी जागोजागी दिसून येते. पण इतक्या सुंदर स्थळाला म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. त्यामुळेही असेल कदाचित, पण इथे पर्यटन-विकास खूपच कमी झालेला वाटला. अजिंठा-वेरूळपर्यंत येणारे काही जाणकार परदेशी पर्यटक मात्र आवर्जून लोणारलाही येतात. देशातील ऐतिहासिक स्थळाबद्दल भारतीयांमधे असलेली अनास्था बघून त्यांना काय वाटत असेल याची कल्पना न केली तर बरे. विदर्भामधे भेटलेल्या अनेक स्थानिक लोकांना मी "लोणार-मेहेकर पाहिलेत का?" असा प्रश्न विचारला. अनेकांनी ते अजून बघितलेले नाही असे कळले. खरे तर, प्रत्येक शाळा-कॉलेजच्या सहली इथे नेऊन विद्यार्थ्यांना या स्थळाचे पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भूगर्भशास्त्रीय, आणि खगोलशास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, या आणि इतर अनेक शास्त्रांची प्रात्यक्षिके इथल्या रम्य वातावरणामधे दाखवल्यास विद्यार्थ्यांमधे शास्त्र विषयाची गोडी वाढवता येईल असे मला वाटले.
पुण्या-मुंबईकडचे माझ्यासारखे अनेक सुशिक्षित लोक विदर्भ, मराठवाडा खानदेश या भागाबद्दल बऱ्यापैकी अनभिज्ञ असतात असे मला अनेकदा जाणवते. मागे मराठवाड्यामधील परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि आसपासची देवळे पहिली तेंव्हाही मला असेच वाटले होते. आम्हाला भेटलेल्या तेलंगणनिवासी बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यही भेट देण्यासारखे आहे. या जिल्ह्यात आम्ही ज्या भागांमधे फिरलो, तो सगळा प्रदेश हिरवागार दिसला. तिथले शेतकरी प्रगत असावेत आणि एकूण बऱ्यापैकी सुबत्ता असावी असे वाटले. तिथले लोक बोलायला नम्र आणि मदत करायला तत्पर दिसले. एक गोष्ट मात्र खटकली. ती म्हणजे, शेगाव कचोरी वगळता खास वैदर्भीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे एकही उपाहारगृह आम्हाला दिसले नाही. आपली भाषा, आपला इतिहास, आपली कला, आपली संस्कृती आणि आपली खाद्यसंस्कृती या सगळ्याचा पोकळ अभिमान बाळगून उपयोग नाही. या गोष्टींचे जाणीवपूर्ण जतनही केले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली. लोणार सरोवर परिसरामधे प्लास्टिकला बंदी असल्यासंबंधीचे अनेक फलक लावलेले होते. तरीही जागोजागी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या पडलेल्या बघून खूप वाईट वाटले. या परिसराचे सौंदर्य टिकावे असे वाटत असेल तर पर्यटकांचे सामान तपासून प्लॅस्टिकच्या पिशव्या व बाटल्या प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्याची सक्ती करायला हवी.
फारसे काही पूर्वनियोजन केलेले नसतानाही आमची बुलढाणा जिल्ह्याची भ्रमंती उत्तम रीतीने पार पडली. आता पुन्हा कधीतरी मुद्दाम ठरवून किमान चार-पाच दिवसांचा दौरा काढला पाहिजे, असे वाटते. बघू या पुन्हा केंव्हा योग येतो ते!
मार्गदर्शक श्री. महेश मिश्रा यांना संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक:- ८२०८३६१४४६ / ९५२७९७९५३८