वनखात्याच्या सुरक्षारक्षकांकडून प्रवेशिका घेऊन पुढे जाता-जाता तिथे असलेल्या एका माहिती फलकावर आमची नजर गेली. लोणार सरोवर परिसर हा जैवविविधतेने नटलेला परिसर असल्यामुळे या परिसराला २०२० साली 'रामसर स्थळ' म्हणून मान्यता देण्यात आली आहे. इराणमधील रामसर या ठिकाणी १९७१ साली जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेतील ठरावाला 'रामसर ठराव' असे संबोधले जाते. एखादे स्थळ रामसर स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर त्या देशाला त्या स्थळाच्या संरक्षणासाठी आणि तिथली जैविविधता जपण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतात. वनखात्याने उभ्या केलेल्या फलकावर ही माहिती संक्षिप्त रूपात लिहिलेली होती. त्या परिसरामधे नीलगाय, लांडगे, अस्वले, माकडे, तरस, बिबटे इत्यादि वन्य प्राणी आणि मोर, रोहित, टिटवी, गोल्डन डक, कोकीळ, भारद्वाज व अनेक स्थलांतरित सुंदर पक्षी आहेत असेही लिहिलेले होते. तसेच वन्य प्राण्यांना पर्यटकांनी काही खायला देऊ नये अशी सूचना लिहलेली होती. तसेच तिथे बिबट्याचा लाकडी, किंवा कदाचित रबरी पूर्णाकृती पुतळा ठेवला होता. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे हे ऐकून मनामध्ये थोडीशी धाकधूक झाल्याशिवाय राहिली नाही.
आम्ही वनविभागाची चौकी पार करून पुढे निघालो. एकूण परिसरात पर्यटकांची फारशी वर्दळ नव्हती. थोडेसे उतरून गेल्यावर पुढे डाव्या बाजूला 'कुमारेश्वर' मंदिर लागते. मंदिरासमोरच उजव्या बाजूला 'सीता न्हाणी' नावाचा एक छोटा झरा आहे. कुमारेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. थोडी उतरण उतरून गेल्यावर 'यज्ञेश्वर' मंदिर लागले. या देवळांची पडझड झाली असली तरी त्याचे सौंदर्य डोळ्यात भरते. तिथून डावीकडे वळणारी पायवाट सरोवराकडे जात असल्याचे तिथल्या पाटीवरून कळल्यामुळे आम्ही ती पायवाट पकडली. जरा पुढे गेल्यावर समोरून काही पर्यटक बायका येताना दिसल्या. त्या आणि त्यांचा ग्रुप सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास एका गाईडला बरोबर घेऊन लोणार सरोवर परिसर बघायला आलेले होते. आम्ही गाईड न घेता सरोवर आणि आसपासची मंदिरे बघतो आहोत, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या गाईडने सांगितलेल्या काही अद्भुत गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. जमल्यास एखादा चांगला गाईड घेऊन उद्या परत हा परिसर बघा, असे त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितले. त्या बायकांपाठोपाठ त्यांचा गाईड आणि त्यांच्या गटातील इतर पर्यटकही परतताना दिसले.
दोन्ही बाजूला घनदाट झाडी असलेल्या त्या निर्मनुष्य वाटेवर आता आम्ही दोघेच होतो. झाडीतून कुठूनही थोडासा आवाज आला की आम्हाला बिबट्याची चाहूल लागतेय की काय अशी भीती वाटायला लागली होती. पुढे डावीकडे 'रामगया' मंदिराकडे जाणारी एक पायवाट दिसली. आधी सरोवरापर्यंत जावे आणि परतीच्या वाटेवर रामगया मंदिर पहावे असे ठरवून आम्ही निघालो. पण थोडे पुढे गेल्यावर त्या पायवाटेवरच एक वानरांची टोळी बसलेली दिसली आणि आम्ही थबकलो. पुढे जायला आम्ही जरा बिचकत होतो, कारण त्या वानरसेनेतील एक दांडगे, काळ्या तोंडाचे वानर आमच्याकडे बघून सतत दात विचकत होते. त्यांच्या टोळीतील लहान-मोठी वानरे आमच्या अवतीभोवती झाडांवर उड्या मारत होती. त्या सर्व वानरांना जरा हटकण्याचा प्रयत्न आम्ही केला पण ती जाम बाजूला होईनात. आता ही वानरे आपल्याला काही पुढे जाऊ देणार नाहीत असे आम्हाला वाटले. तितक्यात आमच्या मागून बोलण्याचे आवाज ऐकू आले, आणि दोन तरुण आमच्याजवळ आले. वानरांच्या टोळीने आमची वाट अडवून धरलेली बघून तेही थांबले आणि आमच्यासोबत गप्पा मारू लागले.
मूळ हैदराबादचे ते दोन तरुण इंडियन बँकेच्या खामगाव व शेगावजवळच्या दोन ग्रामीण शाखांमधे कनिष्ठ अधिकारी होते. सुट्टीचे निमित्त साधून ते लोणार परिसर फिरायला आले होते व संध्याकाळी परत आपल्या मुक्कामी पोहोचणार होते. आमच्यासारखेच त्यांनाही लोणार सरोवरापर्यंत जाण्याची आणि सर्वात दूरवर असलेल्या कमळजामाता मंदिराला भेट द्यायची इच्छा होती. आम्ही थांबलो होतो त्याच ठिकाणी, काही काळापूर्वी त्या दोघांची वाट त्याच वानरांच्या टोळीने अडवली होती. त्यामुळे तिथून उलटे फिरून ते रामगया मंदिर बघायला गेले होते. आमचा आवाज ऐकू आल्यामुळे ते दोघे पुन्हा हिंमत करून आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते. या निर्मनुष्य जागी आपण अगदीच एकटे नाही आहोत, हे जाणवून आमच्याही जिवात जीव आला आणि चौघांनी मिळून वानरसेनेला हाकलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने काही काळानंतर वानरे पांगली आणि आमचा रस्ता मोकळा झाला. त्यानंतर ते दोन तरुण आणि आम्ही दोघे मिळूनच कमळजामाता मंदिरापर्यंत गेलो. त्या निर्मनुष्य वाटेवर त्यांना आमचा आणि आम्हाला त्यांचा मोठाच आधार वाटला. तसेच गप्पा मारत चालत असल्यामुळे आम्हाला फारसा शिणवटाही जाणवला नाही.
दुपारचे चार वाजत आले होते. पायवाटेने चालत साधारण दोन किलोमीटर गेल्यावर अचानक आम्हाला लोणार सरोवराचे दर्शन झाले आणि आमचे डोळे दिपले. सरोवराच्या पाण्यामध्ये हिरव्या-निळ्या रंगाच्या अनेक छटा होत्या. नानाविध प्रकारचे आणि रंगाचे पक्षी तिथे दिसत होते. त्यातले कित्येक पक्षी मी आयुष्यात प्रथमच बघत होते. सरोवरापाशी पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्यामुळे त्या पक्ष्यांचा स्वैर संचार आणि मुक्तकंठाने किलबिलाट चालला होता. तिथल्या शांत, निरसर्गरम्य परिसरात ऐकू येणाऱ्या त्या मंजुळ किलबिलाटामुळे मी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. माझे मन अगदी पिसासारखे हलके झाले. त्या जागेवरून परत वर जाऊच नये आणि अनंत काळासाठी तिथेच थांबून राहावे, असे मला वाटायला लागले!
सरोवराच्या चहू बाजूंना मंदिरे आहेत व काठाकाठाने चालत गेल्यास ती पाहता येतात असे वर्णन कुठेतरी वाचनात आले होते. पण प्रत्यक्षात कमळजा मातेच्या मंदिरापाशी आम्ही पायवाटेच्या शेवटाला पोहोचलो असल्याचे लक्षात आले. कमळजामाता मंदिराचा काही भाग पाण्यात होता आणि मंदिराशेजारची दीपमाळही सरोवराच्या पाण्याने वेढलेलीच होती. आम्ही मंदिराच्या आत गेलो व दर्शन घेतले. तिथे पूजेसाठी असलेल्या एका माणसाने आम्हाला सांगितले की पाण्याची पातळी गेल्या काही वर्षात वाढलेली असल्याने कमळजामाता मंदिराचा काही भाग आणि पुढील इतर काही मंदिरे आता पाण्याखालीच होती. आम्ही मंदिराचे आणि मंदिरासमोर उभे राहून आमचेही फोटो काढले आणि मोठ्या जड अंतःकरणाने परतीचा प्रवास सुरु केला.
सरोवर परिसरामधे खाली उतरायला सुरुवात केल्यानंतर कुठेही पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय दिसली नाही. आमच्याजवळ पाण्याची बाटली होती पण त्या दोन तरुणांनी पाणी आणले नव्हते. त्यांना आम्ही आमच्याकडचे पाणी प्यायला दिले. त्यामुळे तीनेक किलोमीटर वर चढून आम्ही रस्त्यावर पोचेपर्यंत आमच्याजवळचे पाणी संपून गेले होते. भर उन्हात चालून-चालून बरेच दमायलाही झाले होते. त्यामुळे वर पोहोचताच आम्ही चौघांनी आमच्या गाडीत असलेल्या बाटल्यामधले पाणी प्यायले. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या अननस विकेत्यांना आमच्या समोरच दोन-तीन अननस सोलायला आणि फोडी करून द्यायला सांगितले. अननसाच्या फोडींवर मीठ-तिखट घालून त्या फोडी आम्ही चौघांनी अगदी मिटक्या मारत खाल्ल्या. छान श्रमपरिहार झाल्यानंतर ते दोघे तरुण त्यांच्या मोटारसायकलवर स्वार होऊन खामगावकडे निघून गेले. आम्ही आमची गाडी दैत्यसूदन मंदिराकडे वळवली. ते सुंदर मंदिर पाहत असतानाच मी आनंदला सांगून टाकले, "आपण गाईड घेऊन उद्या पहाटे लोणार परिसर बघायला परत यायचे."
दुसऱ्या दिवशी लोणारहून उशिरा निघालो आणि पुण्याला घरी पोहोचायला फार रात्र होईलसे वाटलेच तर अर्ध्या वाटेवर अहिल्यानगरला मुक्काम करू, पण पहाटे उठून लोणार सरोवर पुन्हा पाहिल्याशिवाय इथून परतायचे नाही असा निर्णय मी घेऊन टाकला. तो निर्णय किती योग्य होता, हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजले.
सुरेख वर्णन केलं आहे, त्या परिसरात फिरतोय असे वाटलं. फोटो पण छान आहेत. नितिन चौधरी
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाछानच!!
उत्तर द्याहटवातुझा, दुसरे दिवशी लोणार पाहण्याचा निर्णय का चुकला नाही, हे ही वाचायचं आहे..... अनू.
उत्तर द्याहटवापुढच्या भागात🤣
हटवाछान
उत्तर द्याहटवा- विठ्ठल कुलकर्णी
आलो फिरून लोणार सरोवर
उत्तर द्याहटवा