जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला जाणे झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत काम संपणार होते. त्यानंतर तसेच पुढे लोणारला जावे असे आम्ही ठरवले. अनेक वर्षांपासून लोणार सरोवराला भेट द्यायची इच्छा माझ्या मनामधे होतीच. माझ्या तीन मैत्रिणी नुकत्याच तिथे जाऊन आल्याचे, त्यांनी ग्रूपवर पाठविलेल्या फोटोंवरून कळले होते. त्यामुळे आपणही तिथे जावे आणि आपलेही फोटो शेयर करावेत, असे वाटायला लागले. त्यापैकी एका मैत्रिणीला फोन केला असता तिने, "लोणारपर्यंत जाताच आहात, तर शेगावला पण जाऊनच या", असे आग्रहाने सांगितले. आम्ही दोघेही फारसे भाविक नसल्याने, आवर्जून शेगावला जाण्याचे कदाचित ठरवलेही नसते. पण मैत्रिणीच्या सूचनेप्रमाणे, आम्ही शेगाव आणि इतर एक-दोन ठिकाणांची भ्रमंती करायचे ठरवले.
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-१
छत्रपती संभाजीनगरपासून जवळच, शिंगी नावाच्या छोट्या गावातील शाळेमध्ये आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथला कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास आम्ही निघालो आणि वैजापूर गावाजवळ समृद्धी महामार्गाला लागलो. या महामार्गाबद्दल फक्त वर्तमानपत्रामधून वाचले होते. पण प्रत्यक्षांत, ताशी १२० किमी वेगाने या महामार्गावर प्रवास करताना, आपण अमेरिकेतल्या Interstate highway वर प्रवास करतोय की काय असे वाटत होते. मात्र या महामार्गावर अजून बऱ्याच सोयी व्हायला हव्यात याची जाणीव मात्र प्रकर्षाने झाली. बुलढाणा एक्झिटने समृद्धी महामार्ग सोडून आम्ही डावीकडे उतरलो आणि तिथून सिंदखेडराजा या गावाकडे निघालो. राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानाला भेट देण्याचा आमचा इरादा होता.
जिजाऊंचे वडील, सरदार लखुजीराव जाधव यांच्या, सिंदखेडराजा येथील वाड्यामधे जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. १५७६ साली बांधल्या गेलेल्या या दगडी वाड्याची खूपच पडझड झालेली असून तिथे काही डागडुजीचे काम चालू होते. वाड्याच्या भोवतालच्या तटबंदीचा आवाका पाहता, कोणे एके काळी ही भव्य वास्तू मोठ्या दिमाखात उभी असेल याचा अंदाज येतो. वाड्यात जायला फक्त पाच रुपये तिकीट आहे. वाड्याच्या उंच दरवाज्यावर, दगडामधे कोरलेल्या चौदा नारळांचे तोरण आहे. प्रवेशद्वारात सर्वात खाली देवड्या, वर नगारखाना आणि त्यावर सज्जा आहे. आत गेल्यावर उजव्या बाजूच्या एका खांबावर जाधवांची वंशावळ आणि डाव्याबाजूच्या खांबावर सिंदखेडराजामधील सर्व प्रेक्षणीय स्थळांची नावे लिहिलेली आहेत. म्हाळसामहाल आणि दरबारमहाल अशा दोन भागामध्ये वाडा विभागला गेला आहे. जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसा असल्यामुळे, त्यांच्या राहत्या महालाचे नाव म्हाळसामहाल असे ठेवले होते. या महालात जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी जिजाऊमातेच्या मांडीवर बसलेल्या बालशिवाजीराजांचा पुतळा आहे. महालात असलेला एक भुयारी मार्ग आता बंद करून ठेवण्यात आला आहे. या महालाखालील तळघर धान्यकोठार म्हणून वापरत असत. म्हाळसामहालाच्या जवळच जरा मागच्या बाजूला दरबारीमहाल आहे. लखुजीराजे यांचा दरबार इथे भरायचा. समोरच्या पटांगणावर सामान्य जनतेला बसण्याची जागा असावी. वाड्याबाहेर जिजामातांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्या पुतळ्याला वंदन करून, तिथे आम्ही आमचे फोटो काढून घेतले आणि पुढे लखुजीराजे जाधवांच्या समाधीकडे निघालो.
अहमदनगरचा (म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगरचा) सुलतान निजामशाह दौलताबादचा किल्ला जिंकण्यासाठी जवळपास एक तप प्रयत्न करीत होता पण त्याला ते जमले नव्हते. १५७२ साली लखुजीराजे जाधव यांनी निजामशहाला तो किल्ला जिंकून दिल्यामुळे निजामाने त्यांना मोठी जहागिरी दिली. पण पुढे २६ जुलै १६२९ या दिवशी, निजामशहानेच लखुजीराजे, त्यांचे दोन पुत्र अचलोजीराव व राघोजीराव आणि नातू यशवंतराव यांचा दौलताबादच्या दरबारात खून करवला. म्हाळसाबाई आणि त्यांच्या दोन्ही सुना आपापल्या नवऱ्यांच्या चितेवर सती गेल्या. या सर्वांच्या आणि जाधव कुटुंबातील इतरही स्त्री-पुरुषांच्या समाधी, लखुजीरावांचे बंधू जगदेवराव यांनी बांधून घेतल्या. हे दगडी बांधकाम चौरसाकृती आहे आणि त्यावर विटांनी बांधलेला घुमट आहे. समाधीच्या दरवाजावर कीर्तिमुखाचे शिल्प आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्तीवर आरूढ झालेल्या वाघाचे शिल्प आहे. प्रत्येक समाधीवर शंकराची पिंड आहे. समाधीस्थळावर गेल्यावर मन अगदी खिन्न होते. हे हत्याकांड ज्यावेळी झाले त्यावेळी शिवराय जिजामातेच्या पोटामध्ये होते. या हत्याकांडानंतर आपले वडील, भाऊ आणि भाचा यांच्या खुनाचा बदला घेण्याची तीव्र इच्छा कदाचित जिजाऊंच्या मनात निर्माण झाली असावी. त्यामुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याची कल्पना त्यांच्या मनात रुजली आणि ती त्यांनी आपल्या पराक्रमी सुपुत्राच्या हस्ते प्रत्यक्षात आणली.
या समाधीच्या शेजारी सिंदखेडचे ग्रामदैवत असलेले रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर शेजारी-शेजारी असलेले दोन नंदी आपले लक्ष वेधून घेतात. महादेवासमोर दोन नंदी क्वचितच बघायला मिळतात. मंदिराच्या आवारात एक भलेमोठे मोठे दगडी तुळशीवृंदावन आणि सहा शिवलिंगे आहेत. या परिसरामधे मंदिराचे अनेक भग्नावशेष पडून आहेत. प्रभू रामचंद्रांनी या रामेश्वर मंदिरातील पिंडीची स्थापना केली असे मानले जाते. दर महाशिवरात्रीला इथे आठवडाभर जत्रा भरते. या मंदिराजवळच नीळकंठेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराच्याच आवारात दगडी बांधकाम असलेली, चौरस आकाराची नीळकंठेश्वर बारव आहे. या आवारात भैरव, गणेश, हनुमान आणि शनिदेवाची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या एका गर्भगृहात शंकराची पिंड आहे तर दुसऱ्या गर्भगृहामधे चतुर्भुज हरिहराची खंडित मूर्ती आहे. या मूर्तीचे उजवे अंग भगवान शंकराचे आहे तर डावे अंग भगवान विष्णूचे आहे. एकाच मंदिरामध्ये शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांची मंदिरे क्वचितच पाहायला मिळतात. आम्ही पूर्वी पाहिलेल्या, सोलापूरजवळच्या हत्तरसंग कुडल येथील मंदिराची आठवण नीळकंठेश्वर मंदिर पाहताना मला झाली.
रामेश्वर महादेव व नीळकंठेश्वर ही दोन्हीही मंदीरे पुरातन असून यांचा जीर्णोध्दार आधी लखुजीराव जाधवांनी आणि कालांतराने अहिल्यादेवी होळकरांनी केला होता.
आम्हाला पुढे देऊळगावराजा गावाच्या दिशेने निघायचे असल्याने आमच्या हातात वेळ कमी होता. दगडी बांधकाम असलेला चांदणी तलाव, त्यामधला चांदणी महाल, मोती तलाव आणि 'जिजाऊ सृष्टी' नावाचे एक आधुनिक स्मारक, ही सर्व ठिकाणे आम्ही बाहेरूनच पहिली आणि देऊळगावराजाकडे निघालो.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सुरेख स्थान महात्म्य वर्णन, नीटनेटका इतिहास आणि म्हणूनच पुढील भागाबद्दल उत्कंठा
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवाऐतिहासिक ठिकाणी भेट देतांना तुम्ही सर्व संदर्भ आणि घटनांचा अभ्यास करून ती वाचकांपर्यंत पोचवता हे विशेष उल्लेखनीय आहे 👍👌🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवाएकदम सविस्तर छान लिहिले आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवाऔरंगाबाद मार्गे जाताना किंवा रिटर्न जर्नीत न भेटता गेलात, फोन हि केला नाही. असो.Col साहेबांच्या हातात बँडेज दिसतेय, तुमच्या ओमान टूर मधे पण फोटोत दिसत होते, काय झालं आहे,take care. हे हाडाचे दुखणं तापदायक प्रकरण असते, मी Frozen shoulder च्या त्रासातून आता अंशता सावरत आहे. नितिन चौधरी
उत्तर द्याहटवागडबडीत होतो.
उत्तर द्याहटवाआनंदचे मनगट सध्या दुखावले गेले आहे.
वा, छानच!
उत्तर द्याहटवा- विठ्ठल कुलकर्णी
धन्यवाद विठ्ठल!
उत्तर द्याहटवाछान,,
उत्तर द्याहटवावर्णन प्रत्येक गोष्टीचा बारकावा दाखविणारे , सविस्तर पणे सांगणारे आहे.
धन्यवाद सर!
हटवाखूप छान वर्णन.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाछानच प्रवास वर्णन!
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवाखूप छान वर्णन स्वाती .तुझे लेख वाचावेसे वाटतात
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवामाहितीपूर्ण लेखन. खूप छान लिहिले आहेस.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवाछान वर्णन 👌👌
उत्तर द्याहटवा