माझ्या गंगास्नानानंतर, "अखेर गंगेत घोडी न्हाली" अशी कॅप्शन लिहून आनंदने चतुराई केली होती असे मला वाटले. घोडा या शब्दाचे अनेकवचन म्हणूनही 'घोडी' हा शब्द वापरात आहे. त्यामुळे, आनंदने घोडी हे संबोधन माझ्यासाठी वापरले होते, का आम्हा दोघांनाही मिळून 'घोडी' असा बहुवचनी शब्द वापरला होता ते त्याने गुलदस्त्यातच ठेवले.
गंगास्नान घडेपर्यंत सहन कराव्या लागलेल्या अनेकांच्या अनेकविध व्यथांच्या कथा आम्हाला पूर्वीच कळलेल्या होत्या. त्याच्या तुलनेत, आमचे गंगास्नान म्हणजे अक्षरशः 'VIP स्नान' झाले, हेच आमच्या कुंभयात्रेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल! अर्धा-पाऊण तास पाण्यात डुंबून झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर परतलो. मी गंगास्नान करण्याच्या विचाराने गेलेले नसल्यामुळे, बदलण्यासाठीचे कपडे मी सोबत नेले नव्हते. त्यामुळे किनाऱ्यावर उन्हात बसून कपडे वाळवण्याशिवाय पर्यायच नव्हता. अंजली आणि प्राचीने बदलण्याचे कपडे आणले असले तरी संगमावरच्या त्या भारलेल्या वातावरणापासून पासून त्यांनाही दूर जावेसे वाटत नव्हते. आम्हाला संगमावर सोडून गेलेला आमचा नावाडीही परत आलेला नसल्यामुळे आम्हाला आपोआपच किनाऱ्यावर तासभर थांबायला मिळाले. तो तासभर एका अर्थाने अनुभवांची गंगाजळीच म्हणावी असा होता.
पूजेचे साहित्य, कलश, नारळ, विड्याची पाने, सुपारी व दूध या साहित्याचे अनेक विक्रेते सरस्वती घाटाजवळच्या किनाऱ्यावर आम्ही पाहिले होतेच. तसेच संगमाजवळच्या किनाऱ्यावरही काही विक्रेते हिंडत होते. अर्थात, हे सगळेजण अव्वाच्या-सव्वा भावाने ते साहित्य विकत होते, हे सांगायलाच नको. काहीजण आपापले पूजेचे सर्व साहित्य घरूनच घेऊन आलेले होते. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारे गंगापूजन करत होते. त्या सर्वच पद्धती मला नवीन असल्यामुळे मी त्या लक्षपूर्वक पाहत होते. बरेचजण गंगेला तांब्याचा कलश अर्पण करत होते. कलशाच्या आत हळकुंड, साळीच्या लाह्या अथवा गहू, आणि एखादे नाणे टाकून, कलशावर श्रीफळ ठेवून व त्यावर वस्त्र गुंडाळून, तो कलश गंगेच्या प्रवाहामधे सोडण्याची प्रथा आहे. काहीजणांकडे गंगेला साडी दान करण्याची पद्धत आहे. गंगेच्या पात्रामधे उभे राहून, हळद-कुंकू लावून, साडीची घडी पूर्ण उघडून व साडीची चारही टोके हातात धरून गंगेच्या पात्रामधे हलकेच ती साडी सोडतात. गंगेच्या पात्रावर हेलकावे खात जात असलेल्या अनेक रंगाच्या साड्या संपूर्ण वातावरणामध्ये वेगळाच रंग भरत होत्या.
काही कुटुंबीय नवीन कोरे कपडे परिधान करून गंगास्नान करायला आले होते. गंगास्नान झाल्यानंतर त्यांनी आपले ते नवेकोरे, ओलेते कपडे गंगाकिनारी सोडून दिले व सोबत आणलेली निराळीच नवीन वस्त्रे परिधान केली. गंगास्नानाच्या निमित्ताने गरिबांना वस्त्रदान करण्याच्या अशा पद्धती रूढ असाव्यात असे मला वाटले. एका बाईने तर मला सांगितले की तिने घरून येतानाच ब्लाउज-पीस जोडलेली नवीन साडी, फॉल-पिको करून आणली होती. ज्या कुणा गरीब स्त्रीला ती साडी मिळेल तिला ती साडी अगदी मॅचिंग ब्लाऊजसह लगेच वापरता यायला मिळावी अशी सुंदर भावना त्यामागे होती. काही स्त्रियांनी गंगेच्या काठावरच्या वाळूमधे पूजा मांडली होती. त्यांनी ओल्या वाळूच्या पिंडी तयार केल्या होत्या. त्या पिंडींना हळदकुंकू व फुले वाहून त्यावर दुधाचा अभिषेक त्या करत होत्या. अशी पूजा करताना त्या आपापल्या भाषेमधे स्तोत्रे, काही श्लोक किंवा गाणी म्हणत होत्या. प्रज्वलित केलेला दिवा गंगेला अर्पण करून या पूजेची सांगता करत होत्या. काहींनी आपल्या घरची देवाची मूर्ती बरोबर आणली होती. त्या मूर्तीला गंगास्नान घालून, गंगाकिनारी तिचे पूजन ते करत होते. एकूण सगळे वातावरण भक्तिमय झालेले होते.
संगमाकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ आता वाढतच चालला होता. गंगेचे आणि यमुनेचे पात्र असंख्य बोटींनी भरून गेले होते. दोन्हीं नद्यांची पात्रे स्वच्छ करण्यासाठी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्वयंचलित बोटी हिंडत होत्या. अरेल घाटापासून काही अंतरावर असलेल्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरमधून पॅराग्लायडर आणि हॉट एयर बलूनद्वारे पर्यटकांना सैर करता येत होती. तिथून निघालेल्या पॅराग्लायडरमधून काहीजण गंगेच्या पात्रावरून आकाशात भ्रमंती करताना आम्हाला दिसले. संगमावर आलेल्या अनेकांनी गंगेचे पाणी भरून नेण्यासाठी बाटल्या किंवा कॅन्स सोबत आणलेले होते. अशा प्रकारचे कॅन व बाटल्या विकण्याचा व्यवसायही किनाऱ्यावर जोरात सुरु असल्याचे आम्ही आधीच पाहिले होते. माझ्याकडे विमानात मिळालेली २०० मिलिलिटरची एक छोटी बाटली होती. मी त्यातले पाणी पिऊन संपवून टाकले आणि त्यातच गंगेचे पाणी, माझ्या भाविक सिंधी शेजाऱ्यांना देण्यासाठी भरून घेतले. सोबत आणलेल्या पिशव्यांमध्ये अनेकजण गंगेकाठची वाळू भरून नेत होते. त्यातल्या एकीला, "वाळू का नेत आहेस?" असे मी कुतूहलापोटी विचारले. गंगेकाठची वाळू आणि गंगेचे पाणी आपापल्या घरी नेऊन देवघरामधे ठेवायची पद्धत आहे असे तिच्याकडून कळले. मग प्राचीने आणि अंजलीनेही, प्लॅस्टिकच्या एका छोट्या पिशवीमधे संगमातली वाळू भरून घेतली.
११ वाजत आले होते आणि आता सूर्य वर चढायला लागला होता. आम्ही आमच्या नावाड्याची वाट बघत होतो. इतक्यात एका बाईने माझ्या खांद्याला हात लावून माझे लक्ष वेधून घेतले. ती बहुतेक ओडिया भाषेमधे मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. ती काय म्हणत होती ते मला काही केल्या समजेना. त्यानंतर तिने मला तीच गोष्ट खुणेने सांगितली आणि मला कळली. स्नान करून आल्यानंतर तिच्या भांगामधे तिला सिंदूर भरून हवा होता. मी तो भरून दिला. तिच्याजवळ आरसा नसल्याने, माझ्या फोनचा कॅमेरा सेल्फी मोडमधे करून, सिंदूर भरलेले तिचे रूप तिला मी दाखवले. ती कमालीची खूष होत माझ्याकडे पाहून हसली आणि पुन्हा ओडिया भाषेत काहीतरी म्हणाली. मला काहीही बोध झाला नसला तरी मीही उत्तरादाखल हसले. गंगातीरावर आलेल्या सर्व भाविकांना, त्यांचे प्रांत, भाषा, जात-पात या सर्वांपलीकडे जाऊन, एकत्र जोडणारी आपली भारतीय संस्कृतीच आहे याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. त्याबरोबर हेही जाणवले की, विविधतेचे भांडार असलेल्या भारतामध्ये आपणा सर्वांना एकत्र जोडू शकणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. तरीही, आपण आसपासच्या लोकांमधले वेगळेपण शोधत, एकमेकांमध्ये भिंती का उभ्या करू पाहतो?
आमचा नावाडी संगमावर परत येताच आम्ही सगळेजण नावेत बसून किनाऱ्याकडे निघालो. गंगास्नान झाल्यानंतर लगेच एखाद्या देवळामधे जाऊन देवदर्शन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे किनाऱ्यावर उतरताच आम्हाला किल्ल्यामधल्या पाताळपुरी देवस्थानाच्या आणि अक्षयवटाच्या दर्शनाला जायचे होते....
(क्रमशः)